दि लूप होल (भाग १९)

This is triller and suspense stoey

     अभिज्ञा बराच वेळ रडून शांत झाली होती तरी ती मधून मधून हुंदके देतच होती म्हणून अगम्य तिला म्हणाला.


अगम्य,“ तू थांब मी किचनमधून पाणी घेऊन येतो.” असं म्हणून तो उठला.


अभिज्ञा,“ तू एकटा जाणार नाहीस मी पण येणार तुझ्या बरोबर!” ती अजून रडत म्हणाली.


अगम्य,“ वेडी आहेस का तू? अग मी किचनमध्ये जातोय!” तो आता जरा वैतागून तिला म्हणाला.


अभिज्ञा,“मी येणार! नाही तर मला पाणी नको!” ती हुंदका आवरत म्हणाली.


अगम्य,“ चल मग!” तो वैतागून म्हणाला.


          अगम्य पुढे आणि अभिज्ञा त्याच्या मागे किचनमध्ये  गेली.अगम्यने तिला पाणी दिले व तो ही पाणी प्यायला.एक जार त्याने पाण्याने भरून घेतला.अभिज्ञा परत हॉलमध्ये सोफ्यावर  पायवर घेऊन बसली आणि पुन्हा गुडघ्यात तोंड घालून रडायला लागली.अगम्य मात्र आता भडकला आणि तिच्या समोर जाऊन तिला म्हणाला.


अगम्य,“आता हे रडणे थांबणार आहेस का? नाही तर बस इथेच रडत मी जाऊन झोपतो!” तो चिडून म्हणाला.


अभिज्ञा,“ नालायक माणसा तुला काहीच कसं वाटत नाही. एक तर तू बोलत होतास त्यावर माझा पहिल्यांदा विश्वास नव्हता त्यामुळे मी निश्चिंत होते. पण आज प्रत्यक्ष मी डोळ्याने पाहिले तुला त्या पेंटिंगमध्ये जाताना! मला धक्का बसणे साहजिक आहे आणि आज तू पुन्हा त्या पेंटिंगमध्ये गेला असतास तर? याचा विचार केलास का? आधी गेलास तर तीन वर्षांनी माघारी आलास आणि ते ही मरणासन्न अवस्थेत मग आता गेला असतास तर मी काय करणार होते?” ती तावातवाने  त्याच्या समोर उभी राहवून बोलत होती.


अगम्य,“ ओरडू  नकोस! आई बाबा जागे होतील! चल झोप चल खूप उशीर झालाय!” तो या विषयावर बोलणे टाळत म्हणाला.


अभिज्ञा,“ झोप? माझी झोप उडवलीस तू आणि झोप म्हणतोस मला? मला सगळं सविस्तर ऐकायचे आहे तुझ्याकडून समजले तुला!  या असल्या दळभद्री पेंटिंग विषयी!” ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली.


अगम्य,“ ठीक आहे पण न  रडता आणि शांतपणे ऐकून घेणार असशील तर सांगेन बरं कॅलेंडर कुठे आहे तेव्हढे दे मला आणि चल बेडरूममध्ये!” तो शांतपणे म्हणाला.


अभिज्ञा,“बरं!  कॅलेंडर आहे आपल्या रूममध्ये देते! पण ते कशाला हवे तुला?” ती डोळे पुसून  म्हणाली.


अगम्य,“चल तर सांगतो!” असं म्हणून तो अभिज्ञाला हात धरून बेडरूममध्ये घेऊन गेला.


         अभिज्ञाने त्याला कॅलेंडर दिले. अगम्य शांतपणे बेडवर बसून कॅलेंटर पाहत होता पण अभिज्ञाची त्याच्या शेजारी बसून  चुळबूळ मात्र सुरू होती. ती खूपच अस्वस्थ वाटत होती. अगम्यने तिच्याकडे न पाहतच विचारले.


अगम्य,“ अभी मी घरी किती तारखेला आलो होतो ग?” 


अभिज्ञा,“ ३जूनला! हे तुझं काय चाललंय मला जरा कळेल का?” ती अधिरपणे म्हणाली.


अगम्य,“ हो सांगतो! पण ऐक ना मी तीन वर्षापूर्वी गायब झालो ती तारीख लक्षात आहे का तुझ्या? आणि तीन वर्षांपूर्वीचे कॅलेंडर मला मिळू शकेल का?” तो काही तरी विचार करून म्हणाला.


अभिज्ञा,“ हो आहे लक्षात ती कशी विसरेन मी 16फेब्रुवारी आणि हे घे मोबाईल मध्ये ऍप  आहे त्यात हे बघ तीन वर्षापूर्वीचे मराठी कॅलेंडर!”ती मोबाईल त्याच्या हातात देत म्हणाली.


अगम्य,“ ओ  असं आहे तर!” तो काही तरी गावसल्याच्या आनंदात म्हणाला.


अभिज्ञा,“ झालं का तुझं? आता काही बोलणार आहेस का? मी वाट पाहतेय किती वेळ झालं!” ती चिडून म्हणाली.


अगम्य,“ अग हो! तिला चिडशील हे बघ  मी जेंव्हा गायब झालो त्या दिवशी अमावस्या होती. मी ज्या दिवशी माघारी आलो त्या दिवशी ही अमावस्या होती आणि आज ही अमावस्या आहे म्हणजे हे पेंटिंगमधले लूप होल  फक्त अमावस्येच्या रात्री उघडते बाकी दिवशी आणि रात्री ही हे बंद असेल!” तो म्हणाला.


अभिज्ञा,“ तू काय म्हणतो आहेस ते मला काहीच कळले नाही!” ती असंमजस पणे म्हणाली.



अगम्य,“ अग ती पेंटिंग म्हणजे लूप होल आहे अभी जे प्रत्येक अमावस्येला खुलते लूप होल म्हणजे एक  असा रस्ता किंवा एक असे छिद्र जे आपल्याला आपल्या जगातून दुसऱ्या एका वेगळ्या जगात घेऊन जाते. त्या पेंटिंगमध्ये ही असेच एक जग आहे आणि ती पेंटिंग त्या जगात जायचा मार्ग आहे!” तो सांगत होता.


अभिज्ञा,“ अच्छा म्हणजे लॅपटॉपवर  माझी नजर चुकवून तू इतके दिवस ही माहिती गोळा करत होतास बरोबर ना?” ती नजरेचा एक तिरकस कटाक्ष अगम्यवर टाकत म्हणाली.


अगम्य,“ हुंम! तुझ्या शिवाय  मी एक श्वास पण नाही घेऊ शकत अभी हेच खरं!” तो हसून तिला जवळ घेऊन तिच्या गालावर ओठ ठेवत म्हणाला.


अभिज्ञा,“झाली लाडीगोडी लावून! चोरी पकडली म्हणल्यावर!(हसून म्हणाली पण पुन्हा गंभीर होत पुढे बोलू लागली) आता मला सविस्तर सांगशील तू त्या पेंटिंगमध्ये कसा गेला.तिथे काय आहे आणि हो तू माघारी कसा आलास आणि तुझी अवस्था तशी कशामुळे झाली?”ती गंभीर होत म्हणाली.


अगम्य,“ तुला आठवतंय का? त्या रात्री मी तुझी झोप चाळवते  म्हणून हॉलमध्ये लॅपटॉप घेऊन गेलो आणि सोफ्यावर बसून काम करत होतो पण अचानकपणे आज सारखाच त्या पेंटिंगमधून मंद  प्रकाश पडत होता मी त्या पेंटिंगकडे आकर्षित झालो आणि त्या प्रकाशाच्या दिशेने चालत गेलो संमोहित झाल्या सारखा आणि जेंव्हा मी भानावर आलो तेंव्हा एका वेगळ्याच जगात एका वेगळ्याच दुनियेत होतो.तिथे ना दिवस आहे ना रात्र आहे ना वेळ न वर्षे ना काळ आहे फक्त आणि फक्त भयाण संध्याकाळ आणि रक्ताळलेला सूर्य जो कधीच अस्त होत नाही.जितकी ही पेंटिंग बाहेरून सुंदर वाटते ना अभी तितकेच या पेंटिंग मधील जग भयाण आहे ग!” तो एक मोठा निःश्वास सोडून बोलायचा थांबला.

  

       अगम्यच्या डोळ्यात एक वेगळीच उदासीनता आणि भीती तरळत होती. अभिज्ञाने ते पहिले आणि अलगद त्याला जवळ घेऊन त्याला म्हणाली. 


अभिज्ञा,“ बरं पण तू इतके दिवस तिथे केलंस काय? आणि तुझ्या बरोबर अजून माणसे होती तिथे तू म्हणाला होतास त्यांचे काय ती कोण आहेत? आणि त्या  पेंटींग मध्ये दिसणारा तो विचित्र माणूस तो कोण आहे?” तिने पुन्हा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.


अगम्य,“ अभी ते पेंटिंग म्हणजे एक शेत आहे जसे दिसते तसे बरेच मोठे नागमोडी वाटांचे! त्यात एक जिवंत झरे असणारी विहीर आहे जी सतत भरलेली असते.शेतात कायम ज्वारी असते फक्त त्याची कणसं काढली जातात आणि परत त्या पिकाला कणसं येतात ही गोष्ट मात्र विचित्र आहे.शेताची संपूर्ण काढणी आपल्या जगा प्रमाणे होत नाही आणि तिन्ही  बाजूंनी अदृष्य अशा भिंती त्या भीतीच्या पलीकडे कोणीच जाऊ शकत नाही आणि समोर रक्ताळलेला सूर्य आणि क्षितिज! आणि त्याच्या विरुद्ध दिशेला ती बंगली आहे. त्या पेंटिंगमध्ये दहा-पंधरा लोक अडकले आहेत. ते कोण आहेत हे मात्र माहीत नाही कारण तिथला अलिखित नियम आहे कोणी कोणाशी बोलायचे नाही जर कोणी तोंडातून आवाज काढला तर त्या बंगली मधल्या माणसाला लगेच कळते. तो येतो आणि ज्यांनी आवाज केला त्याला आसुडाने मारतो. आराम खुर्चीवर बसलेला तो विचित्र माणूस त्या जगाचा अनभिषिक्त राजा आहे. तेथे जितके लोक आहेत अगदी मी ही सगळ्यांना शेतीची कामे करावी लागतात. मोटेने पाणी काढून शेताला द्यावे लागते. बैलां ऐवजी तिथली माणसेच हे काम करतात.तिथे ना दिवस ना रात्र त्यामुळे झोपणे ही भानगड नाही हा पण आरामासाठी थोडा वेळ दिला जातो. खाण्यासाठी दिवसातून एक वेळ प्रत्येकी फक्त एक भाकरी तो विचित्र माणूस सगळ्यांना वाटतो. पाणी मात्र मुबलग आहे तिथे! पण एक गोष्ट मात्र विचित्र घडत होती. ती म्हणजे जेंव्हा-जेंव्हा तो विचित्र माणूस मला पहायचा तेंव्हा-तेंव्हा त्याची तळपायाची आग मस्तकाला जात होती. तो चवताळून माझ्या अंगावर हत्यार घेऊन बऱ्याचदा येत होता पण काही तरी बघून  घाबरून चरफडत निघून जात होता.कोणती तरी शक्ती त्याला माझ्यावर वार करण्यापासून रोखत होती. मी तो कशाला घाबरतो याचे निरीक्षण केले तर माझ्या गळ्यात तू घातलेल्या ओमचे पेंडल असलेल्या लॉकेटला तो घाबरतो हे माझ्या लक्षात आले!” तो बोलता बोलता थांबला.त्याच्या चेहऱ्यावर ते सगळं आठवून त्याला आलेला मानसिक ताण स्पष्ट दिसत होता.


      ते अभिज्ञाने पाहिले आणि अगम्यला म्हणाली.


अभिज्ञा,“बरं बाकीचे आपण उद्या बोलू आणि हो त्या पेंटिंग जवळ गेलास ना तर याद राख पुन्हा! झोप आता रात्रीचे तीन वाजले आहेत!” तिला खरं तर अगम्यकडून सगळी हकीकत ऐकायची होती पण त्याला आलेला ताण पाहून तिने ही त्यावर जास्त जोर दिला नाही.


अगम्य,“ बरं असं ही मला झोप येत होती आज बऱ्याच दिवसांनी मोकळं झाल्यासारखे वाटतय! अभी I need you!” असं म्हणून तो तिच्या कुशीत शिरला.


              अभिज्ञा त्याला काहीच बोलली नाही पण तिच्या स्पर्शात असणारा मायेचा ओलावा खूप काही बोलत होता.स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते हेच खरे! ती त्याच्या केसातून हात फिरवत होती आणि तो निश्चिंतपणे तिच्या कुशीत झोपला होता. पण आज जे पाहिले जे अनुभवले आणि अगम्यकडून जे ऐकले त्यामुळे तिची मात्र झोप उडाली होती खरं तर तिला आता खूप भीती आणि दडपण आले होते कारण अगम्यला आज तिने त्या पेंटिंगमध्ये जाण्यापासून रोखले होते पण पुढे तिला ते शक्य होईलच असे ही नव्हते. तिला अगम्यकडून त्या पेंटिंग बद्दल सगळी माहिती घेऊन त्या पेंटींगची विल्हेवाट लवकरात लवकर लावायची होती.पण ती अगम्यला कोणता ही मानसिक ताण देवू इच्छित नव्हती म्हणून तिने हळूहळू त्याच्याकडून माहिती काढून घ्यायचे असे ठरवले.

             या सगळ्यात एक गोष्ट  मात्र तिला दिलासा देणारी होती ती म्हणजे अगम्य म्हणाला तसे त्या पेंटिंगमधील लूप होल हे अमावस्येला उघडत होते आणि आजच अमावस्या होती आणि ते लूप होल आता एका महिन्याने खुलणार होते म्हणजे तिच्याकडे एका महिन्याचा कालावधी होता हे सगळे करण्यासाठी!


      अगम्य पेंटिंग मधून बाहेर कसा पडला होता? तो पेंटिंगमधील विचित्र इसम अगम्यला जीवे मारण्याचा प्रयत्न का करत होता? आणि ती पेंटिंग अगम्यलाच का आकर्षित करत होती अभिज्ञाला का नाही? त्या पेंटिंगचा आणि अगम्यचा काय संबंध होता?अभिज्ञा त्या पेंटींगची विल्हेवाट लावण्यात यशस्वी होईल का?

क्रमशः


 या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule


         








🎭 Series Post

View all