दि लूप होल (भाग १८)

This is a thread and suspense story

      अभिज्ञाला जाग आली तेंव्हा ती अगम्यच्या मिठीत होती.अगम्य गाढ झोपला होता. तिने घड्याळ पाहिले तर घड्याळत सात वाजले होते. तिने अलगद त्याच्या मिठीतुन सुटण्याचा प्रयत्न केला पण झोपेत ही तो तिला सोडायला तयार नव्हता ते पाहून ती त्याला पाहून स्वतःशीच हसली! आणि त्याचा हात अलगद बाजूला करत ती त्याच्या मिठीतुन सुटली. उठून बसत आज उठायला  खूपच उशीर झाला या विचारातच ती बाथरूमकडे वळली. रात्री झालेल्या अगम्यच्या प्रेमाच्या वर्षावाच्या खुणा स्वतःच्या शरीरावर पाहून ती स्वतःशीच लाजली. अंघोळ करून ड्रेसिंग टेबल समोर बसली तेंव्हा स्वतःचाच प्रसन्न चेहरा पाहून ती हसली पण आज टिकली लावताना ना आणि मंगळसूत्र घालताना तिच्या डोळ्यातून अलगद अश्रू ओघळले.आरशातूनच झोपलेल्या अगम्यकडे  पाहत तिने समाधानाने अश्रू पुसले आणि ती हळूच कसला ही आवाज न करता बेडरूमचे दार लावून घेत विचाराच्या तंद्रीतच बाहेर आली

          असं अगम्य पहाटे पाच वाजता उठणारा माणूस पण गेल्या दीड महिन्यात तो खूप उशिरा उठत होता कदाचित अशक्तपणा आणि औषधाच्या डोसमुळे त्याच्यात हा बदल झाला असावा असा विचार करत अभिज्ञा किचन मध्ये गेली तर तिची आई नाष्टा बनवत असताना तिला दिसली. पण आज्ञांकचा कुठेच आवाज येत नाही हे तिच्या लक्षात आले म्हणून ती  आईला म्हणाली.


अभिज्ञा,“ आई अदु कुठे आहे त्याचा आवाज पण नाही आणि तू कशाला नाष्टा बनवत आहेस मी बनवला असता की; आज जरा उशिरच झाला बघ मला उठायला!” ती साडीचा पदर खोचत म्हणाली.


आई,“ अग अदुला तुझे बाबा देवळात घेऊन गेले आहेत आणि नाष्टा मी बनवला आहे आणि हो अमूसाठी त्याच्या डाएट प्रमाणे पौष्टिक मुगाच्या डाळीचा शिरा केला आहे. उठला नाही का तो अजून?( तिच्याकडे पाहत) अभी आज तू साडी नेसली आहेस! आज किती छान दिसत आहेस.तीन वर्षे झाली तू साडी नेसली नाहीस अभी! कारण अगम्यला तू साडी नेसलेली आवडते! वो हो म्हणून आज साडी काय?” त्या तिला डोळा मारत म्हणाल्या.


अभिज्ञा,“ काही तरीच काय आई!” ती लाजत म्हणाली.


आई,“ बरं बरं राहू दे! मला तुझ्याशी बोलायचे आहे अभी चल डायनींग टेबलावर बसून नाष्टा करत बोलू” त्या म्हणाल्या.


अभिज्ञा,“बरं” दोघी नाष्टा घेऊन डायनींग टेबलावर जाऊन बसल्या.


आई,“ खरं तर मी तुला हे सगळं सांगण्याची गरज नाही कारण तू समजूतदार आहेच ग!पण मला तुला सांगावस वाटत!” त्या म्हणाल्या.


अभिज्ञा,“ अग असं काय बोलतेस आई? काय सांगायचे आहे तुला सांग ना?” ती त्यांच्या हातावर हात ठेवून म्हणाली.


आई,“ अभी अगम्य खूप मोठ्या ट्रॉमा मधून जात आहे मेंटली आणि फिजिकली ही! त्याला खास करून तुझ्या आधाराची सगळ्यात जास्त गरज आहे. मला वाटत तू  त्याला जरा जास्त जपावस तुझा मूळ स्वभाव बाजूला ठेऊन! त्याला कोणत्या ही प्रकारे तू दुखवू नकोस कारण तो अजून ही पूर्ण बरा झालेला नाही! जर काही बोलला तो तुला काही बोलणार नाही याची खात्री आहे मला कारण तुझ्या पेक्षा जास्त त्याच्यावर विश्वास आहे मला तरी अशा मानसिक स्थितीत माणूस बोलू शकतो काही ही तर तू त्याला भांडत बसण्यापेक्षा समजून घे आणि तो म्हणतो तसे वाग काही दिवस तरी! म्हणूनच आम्ही दोघे इथे आलो आहोत अदुला सांभाळायला म्हणजे तुला वेळ मिळेल आणि अमूला अदुचा सहवास ही! कळतंय का तुला मी काय म्हणतेय?” त्यांनी अभिज्ञाकडे पाहत विचारले.


अभिज्ञा,“ हो आई कळतंय मला तुला काय म्हणायचे आहे ते मी तू म्हणतेस तसच वागेन!” तिने हसून आश्वासन दिले.


आई,“ मग नाष्टा कर आणि जा बघ तो उठला आहे का?” त्या म्हणाल्या.


         अभिज्ञाने नाष्टा केला आणि आई काय म्हणाली या विचारांच्या तंद्रीतच ती रूममध्ये गेली तर अगम्य अजून ही झोपलाच होता.अभिज्ञा त्याच्या जवळ बेडवर जाऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.


अभिज्ञा,“उठा साहेब किती वाजले बघा जरा!?”ती म्हणाली.


       अगम्य तिच्या आवाजाने जागा झाला आणि तिला जवळ ओढत म्हणाला.


अगम्य,“ good morning!”


अभिज्ञा,“ good morning उठा आता” ती हसून म्हणाली.


अगम्य,“ पहिल्यादा मॉर्निंग तर गोड होऊ दे!” त्याने तिला आणखीन जवळ ओढले असे म्हणून तिच्या ओठांवर ओठ ठेवले.थोड्या वेळा नंतर अभिज्ञा त्याला उठवत म्हणाली.


अभिज्ञा,“ झाली ना आता गोड मॉर्निंग उठ आता! बघ नऊ वाजून गेलेत आवर लवकर आणि नाष्टा करून घे तुला औषधे पण घ्यायची आहेत ना! अदु तुझी वाट पाहतोय बाहेर!” ती त्याला उठवून बसवत म्हणाली.


अगम्य,“ काय ग तू माझ्या रोमान्सची पार वाट लावलीस! आवरतो आता! अदुला आणायचं ना मग इथे!” तो तोंड वाकड करून उठत म्हणाला.


अभिज्ञा,“ अच्छा! रोमान्स करून झाला आणि मी वाट लावली म्हणे! वा हे बरं आहे तुझं!अदुला आणून तुझ्या रोमान्सचे काय झाले असते मग?” ती त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत म्हणाली.


अगम्य,“हो का?पण आज साडी! क्या बात हैं!मस्त दिसते आहेस पण!” तो तिच्या कमरे भोवती हात घालत म्हणाला.


अभिज्ञा,“ बरं बरं उठ आता! आवर उशीर होतोय” ती स्वतःला सोडवून  घेत म्हणाली.


         अगम्य अभिज्ञाच्या मदतीने तयार होऊन बाहेर गेला आज्ञांक त्यांना पाहून धावतच त्याच्या जवळ आला. अगम्य त्याच्या बरोबर बराच वेळ खेळत होता. 

  ●●●●

      असेच पंधरा दिवस गेले. रोज राहुल ही  न चुकता अगम्यला भेटायला येत होता. अगम्यच्या तब्बेतीत ही  डॉक्टरांनी म्हणाल्या प्रमाणे आता चांगलीच सुधारणा झाली होती.घरात कोणाचा ही आधार न घेता तो आता फिरू लागला होता.अज्ञांकला ही उचलून घेऊ लागला होता पण त्याचे लॅपटॉपमध्ये काही तरी  करणे सुरूच होते कधी अभिज्ञा चोरून तर कधी अभिज्ञा समोर! अभिज्ञाच्या हे लक्षात आले होते की अगम्य कधी तरी तिला चोरून लॅपटॉपवर काही तरी सर्च करत असतो पण बहुतेक वेळा तो लॅपटॉपवर काही तरी टाईप करत असलेल्या दिसायचा म्हणून अभिज्ञाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. आज ही रात्री तो लॅपटॉपवर काही तरी टाईप करत बसला होता.अभिज्ञा रूममध्ये आली आणि त्याला बसलेले पाहून ती म्हणाली.


अभिज्ञा,“ काय चाललेलं असत रे तुझं या लॅपटॉपमध्ये?घड्याळात बघ किती वाजले आहेत झोप की आता!” ती रागाने म्हणाली.


अगम्य,“ एक मिनिट हा मेल पाठवतो मग सांगतो!(असं म्हणून त्याने लॅपटॉपमध्ये काही तरी केले आणि तिला जवळ बसवुन घेत  लॅपटॉपमध्ये काही तरी दाखवत म्हणाला) हे बघ मी सप्तरंग वर्तमानपत्रासाठी एक लेखमाला लिहीत आहे. माझ्या पत्रकार मित्राच्या मदतीने ती उद्या पासून दर रविवारी छापून येईल.मी जे काही तीन वर्षांत अनुभवले ते मी  मालिकेच्या स्वरूपात लिहीत आहे. ‛मी आणि माझा वेडेपणा!’ या नावाने!” त्याने अभिज्ञाला सविस्तर सांगितले.


अभिज्ञा,“ अच्छा! आता साहेबांना लेखक व्हायचे आहे तर!” ती हसून म्हणाली.


अगम्य,“ चेष्टा करतेस काय माझी!  झोप आता थोडं अजून काम आहे माझं तेव्हढे करतो आणि झोपतो! बरं अदु झोपला का?” तो लॅपटॉपमध्ये परत तोंड खुपसत म्हणाला.


अभिज्ञा,“ अदु झोपला आहे! बरं तू कर तुझं काम!” असं म्हणून ती झोपली.


        अगम्य लॅपटॉपवर टाईप करत बसला आणि अभिज्ञा झोपून गेली. रात्रीचे साधारण बारा वाजले असतील.   अगम्यला तहान लागली म्हणून त्याने टेबलावर जार मध्ये पाहिलं तर पाणी संपले होते म्हणून तो पाणी पिण्यासाठी रूममधून बाहेर आला हॉलमध्ये त्याचे त्याच पेंटिंगकडे लक्ष गेले.तर त्या पेंटिंग मधून एक मंद प्रकाश बाहेर येत असलेला त्याला दिसला तो पेंटिंग जवळ गेला आणि संमोहीत झाल्या सारखा काही अदृष्य पायऱ्या चढून त्या पेंटिंगमध्ये त्याने पाय ठेवला.तो पर्यंत इकडे अभिज्ञाने तिला जाग आल्यावर पाहिले तर   अगम्य बेडरूममध्ये नव्हता; म्हणून ती बेडरूम मधून बाहेर आली तर समोर तिने हे दृष्य पाहिले आणि तिच्या पाचावर धारण बसली.ती धावतच त्याच्या जवळ गेली आणि तिने अगम्यचा हात धरून त्याला ओढले.अगम्य भानावर आला पण अभिज्ञा त्याला मिठी मारून घाबरून रडू लागली. ती त्याला रडतच म्हणत होती.


अभिज्ञा,“ सॉरी अमू मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता! तू म्हणत होता ते खरं होत! I am really very sorry!” ती असं म्हणून रडत होती.

         

            ती भीतीने थरथर कापत होती.अगम्य मात्र तिला शांत करण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न करत होता. त्याने अभिज्ञाला तसंच धरून सोफ्यावर आणून बसवले पण ती ना त्याला सोडायला तयार होती ना ती रडणे थांबवत होती.बराच वेळ अभिज्ञा अगम्यला मिठी मारून रडत होती!


म्हणजे अगम्यला कोणता ही मानसिक रोग झाला नव्हता तर तो खरंच गेले तीन वर्षे पेंटिंगमध्ये अडकला होता पण कसा आणि का? पण इतक्या वर्षात अभिज्ञा का त्या पेंटिंगमध्ये गेली नाही किंवा  अगम्यला जसे पेंटिंगने आकर्षित केले तसे अभिज्ञाला का आकर्षित केले नाही? आता अगम्य त्याच्या बरोबर नेमके काय घडले ते अभिज्ञाला सांगणार होता का?

क्रमशः


या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहे. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहण्याचा आली आहे. या कथेचा उद्देश कोणत्या ही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही.

©swamini chougule 



 




🎭 Series Post

View all