Login

दि लूप होल (भाग १६)

It's a thrilled and suspense story

                 दुपारी जेवणा नंतर या सगळ्या घटना घडून गेल्या होत्या. अभिज्ञाला मात्र आज मानसिक आणि शारीरिक खूप थकवा आल्या सारखे वाटत होते. ती खुर्चीवर बसून तिथेच अगम्यचा हात धरून बेडवर डोके ठेऊन झोपली होती. अगम्यला जाग आली तेंव्हा घड्याळत संध्याकाळचे सहा वाजले होते. त्याचा हात अभिज्ञाच्या डोक्याखाली अडकला होता म्हणून त्याने तिच्या डोक्या  खालून हात काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हाताची हालचाल जाणवून अभिज्ञा खडबडून जागी झाली आणि त्याला काळजीने म्हणाली.


अभिज्ञा,“ काय होतंय का तुला अमू डॉक्टरांना बोलवू का?” ती काळजीने डोळे चोळत म्हणाली.


अगम्य,“ अग किती काळजी करशील माझी?मी ठीक आहे पण माझ्या हालचालीने तू मात्र जागी झालीस सॉरी!” तो थोडा ओशाळत म्हणाला.


अभिज्ञा,“ काय तरीच काय! किती वाजल्या बाप रे सहा वाजले आणि मला तर कळले पण नाही बरं तू चहा घेणार का किंवा तुला काही खायला आणू का मी?” ती म्हणाली.


अगम्य,“नको आहे मला काही! (तिला निहाळत) तू जरा स्वतःकडे लक्ष दे अभी बघ जरा किती सुकलाय तुझा चेहरा! मी आता ठीक आहे तर तू उद्यापासून घरीच झोपत जा! दिवसा येत जा फक्त” तो काळजीने तिला पाहत  म्हणाल.


अभिज्ञा,“ अच्छा! अजून काय बोलायचे आहे का? नाही म्हणजे उद्या पासून ऑफिसला जातोस का तू डायरेक्ट हॉस्पिटलमधून! म्हणजे माझी काळजीच मिटली!”  ती त्याला रागाने तिरकसपणे म्हणाली.


अगम्य,“ किती चिडशील अभी?” तो हसून तिचा हात धरत म्हणाला.


अभिज्ञा,“ चिडू नाही तर काय करू मग? मी ठीक आहे तू स्वतःची काळजी कर अजून चालायला ही येत नाही तुला नीट आणि म्हणे उद्या पासून येऊ नकोस रात्री!” ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.


अगम्य,“ बरं ते राहू दे! आपला अदू सेम माझ्यासारखा दिसतो ग! त्याने मला लगेच ओळखले” तो तिचा मूड ठीक करण्यासाठी म्हणाला.


अभिज्ञा,“ आता तुझा मुलगा आहे मग नाही ओळखायला काय झालं तुला! आणि तुझ्याच सारखा झालाय तो नुसता दिसायला नाही तर सगळ्याच बाबतीत अगदी फुगून बसायला पण!” ती त्याला तिरकस बघत म्हणाली.


        या तिच्या बोलण्यावर  अगम्य मनसोक्त हसला आणि अभिज्ञा फक्त त्याला डोळे भरून पाहत होती. आता अगम्य जरा गंभीर होत म्हणाला.


अगम्य,“ आज मी पोलिसांना जी स्टेटमेंट दिली ती तू त्यांच्या कडून ऐकलीच असशील! मी त्या पेंटिंग मध्ये अडकलो होतो या गोष्टीवर तुझा ही विश्वास नाही ना?” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.


अभिज्ञा,“ हे बघ अगम्य तू पोलिसांना काय सांगितलेस आणि  तू इतके दिवस कोठे होतास याच्याशी मला खरंच काही कर्तव्य नाही. तू आत्ता इथे माझ्या बरोबर आहेस आणि इथून पुढे माझ्या बरोबर असणार आहेस हे माझ्यासाठी महत्वाचे आहे!” ती तिच्या जवळ बेडवर बसत त्याला बिलगत म्हणाली.

             अगम्यने ही तिला हळूच जवळ घेतले.हलकेच त्याने तिच्या ओठावर ओठ ठेवले आणि अभिज्ञाच्या कानात म्हणाला.


अगम्य,“ I love you!” आणि तिला आणखीन घट्ट मिठी मारली.


          अभिज्ञा मात्र काहीच बोलली नाही. ती फक्त शांत होती.  जणू फक्त ती अगम्यचा स्पर्श आणि त्याचा सहवास अनुभवू इच्छित होती. जो तिला  बऱ्याच वर्षानी आज मिळत होता. दोघे ही एकमेकांच्या सहवासाने तृप्त होण्याचा प्रयत्न करत होते. पण दारावर टकटकचा आवाज झाला आणि दोघे ही भानावर आले. अभिज्ञा सावरून पुन्हा खुर्चीवर बसली  आणि म्हणाली.


अभिज्ञा,“ yes come in!”


     हे ऐकून नर्स रूम मध्ये आली  एका ट्रे मध्ये ती कसल्याशा बाटल्या घेऊन येत म्हणाली.


नर्स,“ डॉक्टरांनी सरांना ड्रीप लावायला सांगितली आहे!” असं म्हणून तिने बाटली ड्रीप स्टॅंडला लटकवली  आणि अगम्यच्या हाताला ड्रीप लावू लागली. अगम्य मात्र या सगळ्याला आता खूप कंटाळला होता. तो अभिज्ञाकडे पाहत म्हणाला.


अगम्य,“ तू डॉक्टरांना सांग ना आता मी ठीक आहे मला या सगळ्याची गरज नाही! सोडा म्हणावं मला घरी! आता काय वर्ष भर ठेऊन घेणार का मला इथे?” तो वैतागून म्हणाला.


अभिज्ञा,“ तू ठीक आहेस की नाही ते डॉक्टर ठरवतील! तू नको लोड घेऊ! गप्प पडून राहा फक्त!” ती त्याला रागाने पाहत म्हणाली.


           नर्स मात्र या दोघांचे बोलणे ऐकून गालात हसत ड्रीप चढवून निघून गेली. अगम्यचा नाईलाज होता अभिज्ञाचे ऐकण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय ही नव्हता. तो तोंड फुगवून पडून राहिला. अभिज्ञा मात्र भलत्याच विचारात गढली होती. तिचे अगम्यकडे लक्ष नव्हते. तिला आता उद्या सायकॉलॉजिस्ट अगम्य बद्दल काय सांगणार आहेत याची चिंता सतावत होती.तिला तर अगम्य अगदी पहिल्या सारखा नॉर्मल वाटत होता. पण तो इतके दिवस कोठे होता हा प्रश्न मात्र अनुत्तरित होता. तिने अगम्यची समजूत काढण्यासाठी त्याला तू कुठे होतास याच्याशी मला कर्तव्य नाही असे म्हणले असले तरी तिला मात्र अगम्य कोठे होता हे जाणून घेण्याची मनोमन इच्छा होती पण अगम्य जे सांगत होता त्यावर तिचा विश्वास बसणे अशक्य होते. पण पेंटिंगचे खुळ त्याच्या डोक्यात आले कुठून हा सगळा विचार ती करत असताना वोर्ड बॉयच्या हाकेनी ती भानावर आली.


वोर्ड बॉय,“ मॅडम जेवण आणले आहे!कुठे ठेवू?” त्याने विचारले.


अभिज्ञा,“ त्या टेबलावर ठेव!” ती टेबलकडे बोट करत म्हणाली.

         

     आता तिचे लक्ष अगम्यकडे गेले. अगम्य डोळे झाकून पडला होता पण त्याचे फुगलेले तोंड तिला लगेच तिच्या लक्षात आले आणि ती गालात हसून अगम्यला म्हणाली. 


अभिज्ञा,“ उठा देशमुख साहेब! जेवण करा!” ती हसून म्हणाली.


       जेंव्हा ही अगम्य तिच्यावर रुसत किंवा चिडत असे तेंव्हा ती त्याला देशमुख साहेब म्हणून हाक मारत असे आणि तिची ही जुनी खोड अगम्यला ही चांगलीच माहीत होती. अगम्यने मात्र तिची हाक ऐकून ही तिला उत्तर दिले नाही. अभिज्ञा त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याला  उठवून बसवले आणि जेवणाचे ताट हातात घेत त्याला म्हणाली.


अभिज्ञा,“ एका मुलाचा बाप झालास पण तुझं लहान मुला सारखं  वागणं काही बदलत नाही.आता ट्रीटमेंट पूर्ण झाल्या शिवाय आणि तू पूर्ण बरा झाल्या शिवाय तुला कसे सोडतील डॉक्टर! जे चाललंय ते तुझ्या भल्या साठीच ना?”  ती त्याची समजूत काढत म्हणाली.


अगम्य,“हो! पण मला कंटाळाला आला आहे या सगळ्याचा!” तो तोंड वाकड करत म्हणाला.


अभिज्ञा,“ अजून थोडे दिवस!” ती त्याला जेवण भरवत म्हणाली.

        

      त्याने फक्त मान डोलावली. अगम्यला भरवून अभिज्ञा जेवली.अगम्य झोपला पण अभिज्ञाला मात्र झोप लागत नव्हती.तिला उद्या सायकॉलॉजिस्ट काय सांगणार याची चिंता सतावत होती.

●●●●

      दुसऱ्या दिवशी अभिज्ञा घरी गेलीच नाही. तिचे मन आज थऱ्यावर नव्हते.अभिज्ञाचे आई-बाबा ही  हॉस्पिटलमध्ये आले होते पण ते ही काळजीतच दिसत होते. राहुल ही हॉस्पिटलमध्ये पोहचला होता त्याला ही आज अगम्य बद्दल सायकॉलॉजिस्ट काय सांगणार आहेत याची काळजी लागून राहिली होती.


             अगम्यची ट्रीटमेंट करत असलेले डॉक्टर शिंदे सायकॉलॉजिस्ट पाटील यांना ठरल्या वेळेत म्हणजेच दहा वाजता अगम्यच्या रूममध्ये पोहचले. त्यांनी अगम्य आणि डॉक्टर पाटील यांची ओळख करून दिली. बाकी सगळे बाहेर होते. आता रुममध्ये फक्त डॉक्टर पाटील आणि अगम्य होते.डॉ.पाटील यांनी अगम्यशी गप्पा मारायला सुरुवात केली. अगम्यशी जुजबी गप्पा म्हणजे शिक्षण, तो काय करतो तसेच बायको मुले अशा गप्पा मारून झाल्यावर त्यांनी हळूच विषयाला हात घातला.


डॉ.पाटील,“ मि. देशमुख मला डॉ शिंदेंनी सांगितले की तुम्ही तीन वर्षे गायब होतात!” ते अगम्यच्या हावभावांचे  निरीक्षण करत म्हणाले.


अगम्य,“ हो किती वर्ष मी नाही सांगू शकणार पण गायब नक्की होतो.” तो अगदी सहज म्हणाला.


डॉ. पाटील,“ डॉ शिंदे अस ही म्हणत होते की तुम्हाला जेंव्हा तुमच्या मिसेस इथे घेऊन आल्या तेव्हां तुमची कंडिशनर क्रिटिकल होती. तुम्ही अगदी अशक्त होतात इतके की तुम्ही मरणाच्या दाढेतून बाहेर आले आहात!” त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला.


अगम्य,“ खरं तर मी परत आलो तेंव्हा मला फक्त मी अभिज्ञाला पाहिल्याचे  आठवते त्या नंतर काय झालं मला काहीच आठवत नाही. त्यानंतर मला वाटते मी पंधरा दिवसां पासूनचे मला आठवते.” तो म्हणाला.


डॉ.पाटील,“ पण गेली तीन वर्षे तुम्ही कोठे होतात?” त्यांनी अगम्यचे हावभाव टिपत पुन्हा प्रश्न विचारला.


अगम्य,“ मी आमच्या घरात असलेल्या पेंटींगमध्ये अडकून पडलो होतो त्यातून कसा बसा बाहेर आलो आहे मी! पण मला माहित आहे की माझ्यावर कोणी ही विश्वास ठेवत नाही आहे खुद्द माझी बायकोच माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर इतरांना मी काय सांगणार!” तो अगदी निर्विकार हसत म्हणाला.


डॉ. पाटील,“बरं मी ठेवला तुमच्यावर विश्वास! पण तुम्हांला तेथे खायला वगैरे काहीच मिळाले नाही का? त्या पेंटिंग मध्ये की तुम्ही इतके अशक्त झालात बरं मी म्हणतो तुम्हांला नाही मिळालं खायला तेथे तर तुम्ही तिथे तीन वर्षे जिवंत कसे राहिलात!” पुन्हा नवीन प्रश्न


अगम्य,“ मला तर हेच माहीत नव्हते की मी तीन वर्षे तिथे होतो कारण तिथे ना दिवस आहे ना रात्र फक्त मावळतीला जाणारा रक्ताळलेला सूर्य आणि शेत बास!आणि हो तिथे खायला दिवसातून एकदाच मिळत होते. एक व्यक्ती रोज तिथे असणाऱ्या लोकांना माझ्या सहित एक फक्त एक भाकरी देत असे आणि हो शेतात वाहणाऱ्या पाटाचे पाणी मात्र मुबलग होते. कदाचित म्हणून मी तिथे इतके दिवस तग धरून होतो पण बाहेर आल्यावर इथल्या वातावरणा प्रमाणे मी अशक्त झालो असेन” तो शांतपणे म्हणाला.


डॉ.पाटील,“ अच्छा म्हणजे तुमच्या बरोबर आणखीन लोक होते का तिथे?” डॉक्टरांनी विचारले.


अगम्य,“ हो अजून बरेच लोक आहेत!” तो म्हणाला


डॉ.पाटील,“ मग ते लोक तुमच्या बरोबर बाहेर का नाही आले कुठे आहेत ते लोक?”


अगम्य,“ ते आजून ही तिथेच अडकून आहेत मला मात्र त्या पेंटिंगच्या क्षितिजा पलीकडे पोहचल्यावर बाहेर पडण्याचा रस्त्या मिळाला” तो म्हणाला.


डॉ.पाटील,“ हो का बर आपण नंतर बोलू मि देशमुख! आराम करा तुम्ही!Nice to meet you doctor deshmukh!”ते हसून हस्तांदोलन करत म्हणाले.


अगम्य,“ o same here! मला माहित आहे डॉक्टर तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही कदाचित तुम्ही मला मानसिक रुग्ण समजून माझी ट्रीटमेंट करण्याच्या विचारात आहात! पण मी जे बोलत आहे ते खरे आहे. पण जर बाहेर माझी काळजी करत असणाऱ्या माझ्या माणसांना माझ्या तुमच्या कडून ट्रीटमेंट घेण्याने समाधान मिळणार असेल तर  मी तुमच्याकडून ट्रिटमेंट घ्यायला तयार आहे डॉक्टर!”तो अगदी निर्विकार चेहऱ्याने शांतपणे म्हणाला.

     

       हे अगम्यचे बोलणे ऐकून डॉ.पाटील अजूनच बुचकळ्यात पडले. ते बाहेर आले तेंव्हा त्यांना सगळ्यांना घेतले.डॉ.पाटील यांना त्यांच्या डोळ्यातील प्रश्न समजत होते पण ते ही अगम्य बद्दल अजून कोणत्या ही निष्कर्षापर्यंत पोहचले नव्हते तर ते या सगळ्यांना काय सांगणार होते. ते विचार करतच अभिज्ञाला म्हणाले.


डॉ.पाटील,“ मिसेस देशमुख माझ्या बरोबर जरा केबिन मध्ये या मला तुमच्याशी सविस्तर बोलता येईल मिस्टर देशमुखा बद्दल!” ते विचार करत बोलले आणि केबिनमध्ये गेले.

        

      हे ऐकून अभिज्ञा अजून जरा चिंतीत झाली व ती डॉ. पाटीलांच्या मागोमाग  त्यांच्या केबिनमध्ये गेली. डॉ. पाटील त्यांच्याच विचारात मग्न होते.अभिज्ञाने दारावर नॉक केले तसे डॉ. पाटील भानावर आले आणि म्हणाले.


डॉ. पाटील,“ yes come in!  मिसेस देशमुख या बसा ना!” ते हसून म्हणाले.


अभिज्ञा,“ डॉक्टर अगम्यला नेमकं काय झाले आहे?” तिने चिंतीत होत डायरेक्ट विषयाला हात घातला.


डॉ.पाटील,“ मी तुमची चिंता समजू शकतो मिसेस देशमुख म्हणूनच मि देशमुखां बद्दल  सविस्तर चर्चा करण्यासाठी मी तुम्हाला बोलावले आहे. मी माझ्या पंधरा वर्षांच्या करिअर मध्ये मि देशमुखां सारखी केस पहिल्यांदाच पाहतोय!” ते गंभीर होत म्हणाले.


अभिज्ञा,“ म्हणजे नेमके काय म्हणजे आहे तुम्हाला डॉक्टर स्पष्ट बोला!” ती चिंतीत होत विचारले.


डॉ.पाटील,“ मिसेस देशमुख मला तुमची  काळजी समजत आहे.मी मि.देशमुखांना भेटलो त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेतले.त्यांचे म्हणणे आहे की ते तीन वर्षे तुमच्या घरात असणाऱ्या एका पेंटिंग मध्ये अडकून होते.मावळतीला जाणाऱ्या सूर्याची शेत असलेली पेंटिंग तुमच्या घरात आहे का?” त्यांनी प्रश्न विचारला.


अभिज्ञा,“ हो आम्ही दोघे एका पुरातन वस्तूंच्या लिलाव पाहायला गेलो होतो तेंव्हा अगम्य त्या पेंटिंगकडे आकर्षित झाला होता पण मला ती पेंटींग विचित्र वाटली तरी अगम्यच्या आनंदासाठी मीच ती पेंटिंग खरेदी करून अगम्यला दिली होती. ती त्याने आमच्या हॉलमध्ये लावली आहे. ती अजून ही तेथेच आहे. पण अगम्य असा का म्हणतोय की तो त्या पेंटिंगमध्ये तीन वर्षांपासून अडकला होता!” ती डोक्याला हात लावून म्हणाली.


डॉ. पाटील,“तेच आपल्याला शोधून काढावे लागेल!बरं पुढे मिस्टर देशमुखांनी सांगितले की तिथे खायला नीट न मिळाल्यामुळे आणि ते बाहेरील वातावरणात आल्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली. वर ते असं ही म्हणत आहेत की त्यांच्या बरोबर तिथे अजून काही लोक अडकले आहेत. प्रथम दर्शनी मला ही केस अल्जायरनची वाटली म्हणजे यात एखादा माणूस टोतली ब्लँक होतो त्याला काहीच आठवत नाही मग तो भरकटत कोठे ही फिरतो,खाण्यापिण्याची ही शुद्ध त्याला राहत नाही पण एखाद्या वेळी तो झोपेतून खडबडून जागा झाल्या सारखा अचानक सगळं आठवून घरी परत येतो! मला वाटले की मि देशमुखांच्या बाबतीत असे घडले असावे आणि त्यांना मागच्या तीन वर्षांतील काही आठवत नाही म्हणल्यावर त्यांच्या मेंदूने त्या आवडलेल्या पेंटींगला घेऊन ही कल्पना केली की ते त्या पेंटिंगमध्ये अडकले होते. याला हेल्युजनेशन म्हणतात.म्हणजे अल्जायरन आणि हेल्युजनेशन अशा दोन मानसिक स्टेज आहेत आणि मि देशमुख त्या स्टेज मध्ये अडकले आहेत पण…..” असं म्हणून डॉ.पाटील थांबले आणि त्यांनी एक दीर्घ निःश्वास सोडला.


अभिज्ञा,“ पण काय डॉक्टर?” ती काळजीने म्हणाली.


डॉ.पाटील,“ पण मि. देशमुख शेवटी  मला जे बोलले त्यामुळे माझ्या या तर्काला किंवा कंक्लुजनला तडा गेला आहे.मी पुरता चक्रावून गेलो आहे!” ते म्हणाले


अभिज्ञा,“ असं काय म्हणाला अगम्य तुम्हाला डॉक्टर?” तिने अधीरपणे विचारले.


डॉ. पाटील,“ मि. देशमुख मला शेवटी म्हणाले की मला माहित आहे तुम्हांला माझ्यावर विश्वास नाही खुद्द माझ्या बायकोलाच माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तर मी काय बोलणार कोणाला! तुम्हाला वाटत असेल की मी मानसिक रुग्ण आहे पण मी जे बोलतोय ते खरे आहे पण जर बाहेर असणाऱ्या माझ्या माणसांना तुमच्याकडून मी ट्रीटमेंट घेतल्याने समाधान मिळणार असेल तर मी तुमच्याकडून ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे! मिसेस देशमुख प्रत्येक मानसिक रुग्ण मी म्हणतो तेच खरे आहे याच्या पलीकडे ना काही ऐकून घेतो ना कोणता विचार करतो.त्या मानसिक रुग्णाची अपेक्षा असते की त्याच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवावा पण मि. देशमुखांना पूर्ण जाणीव आहे की त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही तरी ते म्हणतात की ते पेंटिंग मध्ये अडकले होते.मी पूर्णपणे चक्रावलो आहे.” ते  कन्फ्युज होत म्हणाले.


अभिज्ञा,“ काय? मला  सुध्दा अगम्य आता त्याच्या नावा प्रमाणे अगम्य वाटू लागला आहे पण आता पुढे काय करायचे डॉक्टर?” तिने प्रश्न विचारला.


डॉ.पाटील,“ सध्या तरी मी मि. देशमुखांना कोणती ही ट्रीटमेंट सुरू करत नाही. मला त्यांना समजून घेण्यासाठी अजून दोन तीन वेळा तरी त्यांना भेटावे लागेल पण त्यांना लगेच लगेच भेटून व प्रश्न विचारून त्यांना जास्त मानसिक ताण देणे ही योग्य नाही. मी मि. देशमुखांना आता दहा दिवसांच्या गॅपने भेटेन! तो पर्यंत तुम्ही सगळेच त्याच्याशी या विषयावर बोलणे टाळा तेच उत्तम होईल आणि हो त्यांना कसे आनंदी ठेवता येईल ते पहा कारण ते खूप मोठ्या मानसिक आणि शारीरिक ट्रॉमा मधून जात आहेत.take care of him!” असं म्हणून ते बोलायचे थांबले.


अभिज्ञा,“ ठीक आहे डॉक्टर!” असं म्हणून ती विचारांच्या तंद्रीतच डॉक्टरच्या केबिन मधून बाहेर पडली.


            अगम्यच्या बोलण्यामुळे डॉक्टर पाटील आणि अभिज्ञा ही चक्रावून गेले होते. खरंच अगम्यला कोणता मानसिक आजार झाला होता का? की अगम्य खरंच त्या पेंटिंगमध्ये अडकला होता? हे प्रश्न मात्र  अजून ही निरुत्तरीत होत!

क्रमशः

©swamini chougule

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत.


        







               

 



🎭 Series Post

View all