Feb 25, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

भविष्यास पत्र

Read Later
भविष्यास पत्र


प्रिय भविष्या स.न.वि.वि,
भविष्या तुला काय म्हणून संबोधू मित्र,सखा,सवंगडी,दोस्त,कारण तुझ्याविषयी मनात इतकं कुतूहल आणि उत्सुकता आहे की ती मी तुला शब्दात सांगू शकत नाही.
मित्रा,आमच्या आयुष्यात तुझ्याबद्दल आशा आहे. तू उजळच असणार अशी नवी उमेद असल्याने आम्ही सारी मानवजात आजच्या वर्तमान काळात कितीही संघर्ष, प्रश्न आणि उणिवा,वंचना असल्या तरीही मित्रा तू भव्य आणि उज्वल असाच असशील अशी मनोमन कामना करीत असतो.
पण सख्या आमची ही कामना करणे हा केवळ स्वार्थ आहे असेच म्हणावे लागेल, कारण कालच्या भूतकाळातल्या कृती आजचा वर्तमान घडवत असतात. आणि आजच्या वर्तमानाचे निर्णय उद्याच्या भविष्याची रोपे लावत असतात. आम्ही आमच्या भूतकाळात इतके स्वार्थी आणि आंधळेपणाने वागलो की त्या कृतीची झळ आम्हाला आत्ता वर्तमानातच बसते आहे. अमर्याद वृक्षतोड,जंगलतोड आम्ही केली, पाण्याचा बेफिकीर आणि गैरवापरही केला,अति उत्पन्नासाठी शेतीवर रासायनिक प्रयोग करून तिला पूर्णत: नापीक केली,अशा कितीतरी वाईट गोष्टी आम्ही आमच्या भूतकाळात केल्या, त्यामुळे आता तुझ्याकडे कोणत्या तोंडाने आशेने बघायचे रे? शब्दशः लाजच वाटली पाहिजे आम्हाला असे आणि इतके बेजबाबदार आणि धुंदीत वागत होतो आम्ही.
आम्हीच निसर्ग दोन्ही हातांनी ओरबाडला, आता त्याच्याजवळ आम्हाला द्यायला तरी काय उरले असेल? दरवर्षी महापूर, रोगराई , जंगलावर वाढलेले अतिक्रमण,वेळोवेळी पेटणारे वणवे,अवर्षण,साथीच्या रोगांचे होणारे वारंवार हल्ले,कोरोनाासारख्या महामारी च्या काळात प्राणवायू शिवाय कित्येकांचा प्राण तळमळला एवढे सगळे होऊनही आम्हाला जाग आली आहे असे कसे म्हणावे?
काही ठिकाणी जेव्हा पूर,महापूर येतात किंवा काही ठिकाणी कोरड्या दुष्काळाची स्थिती असते तेव्हा मन अगदी विषण्ण होतं,सरकारी नियम,योजना,कृती-दल कितीही असल्या तरी त्या अंमलात आणण्यासाठी हवं असतं एक संवेदनशील आणि हळवं मन,निसर्गाविषयीची तळमळ जोपर्यंत सरकारी नोकरदारांना मध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये येणार नाही तोपर्यंत निसर्गाचे हल्ले थांबणार नाहीत आणि या सरकारी योजना प्रत्यक्षातही येणार नाहीत.
रेन वॉटर हार्वेस्टिंग,रुफ टॉप हार्वेस्टिंग,सौर ऊर्जा,पवन ऊर्जा यांचा पाहिजे त्या प्रमाणात वापरच होत नाही आहे. सगळे नियम,कायदे केवळ कागदावरच आजूबाजूच्या निसर्गाबद्दलची आमची उदासिनता,काँक्रिटीकरण यामुळे आणि शहरात गट्टु लावल्याने पावसाचे पाणी जमिनीत जिरत नाही,भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे,नैसर्गिक आणि इलेक्ट्रिक ऊर्जेचा अमर्याद वापर,कारखान्यांचा धूर, वातावरणातली धूळ,आणि प्लास्टिकच्या ढिगाऱ्यात मुळे आमचा श्वास गुदमरला आणि समुद्रातील जलचर हि जीवन-मरणाच्या संकटात सापडले तरी सांगायचे कोणाला? आणि ऐकणार तरी कोण? आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती झालेली आहे.
एकदा स्वामी विवेकानंद त्यांच्या वडिलांच्या खर्चिक स्वभावाला उद्देशून म्हणाले होते "बाबा तुम्ही आमच्यासाठी मागे काय ठेवणार आहात"आज सामाजिक कार्यकर्ते,निसर्गप्रेमी,लहान लहान मुलं,तरुण वर्ग आम्हालाही प्रश्न विचारतो "आमच्यासाठी तुम्ही निदान शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी तरी ठेवणार आहात की नाही?"
" ग्रेटा थनबर्ग" ही केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे आजच्या आमच्या तरुण सजग पिढीचे.

प्रिय मित्रा भविष्या आम्ही जे आमच्या भूतकाळात केले, त्या चुका आता ही पिढी पुन्हा करणार नाही अशी आशा वाटते.आम्हीही आमच्या परीने चुका सुधारण्याचा प्रयत्न करूच, म्हणूनच प्रिय सख्या तुला विनंती आहे की, तू आमच्या विषयी कोणतीही तेढ किंवा आकस मनात न ठेवता आरोग्याचं,स्वास्थ्याचे माप भरभरून आमच्या पदरात टाक. आजपर्यंत ज्या चुका आम्ही केल्या त्याची पुरेपूर शिक्षा आम्हाला मिळालेली आहे, त्यामुळे त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न तर आम्ही करूच पण, तुही आम्हाला योग्य अशीच साथ देशील असा विश्‍वास बाळगते आणि पत्र थांबवते.

तुझीच कृपाभिलाषी
राखीता.क.
मला वाटते रे नवा जन्म घेऊ
नवे श्वास गुंफू ,नवे गीत गावू
अशी वाहते मी स्वरांच्या प्रवाही
मिळो तीर किंवा दरी खोल जाऊ
जुना गाव राहे कुठे दूर मागे
नव्या पावलांनी नवी वाट देऊ
नवी चित्र साकारून ये समोरी
उभी स्वागत मी उभारून बाहू
-शांता शेळके.


©® राखी भावसार भांडेकर.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//