~ अखेरची भेट ~

'किती दिवसांनी पाहतो आहे हिला. किती दिवसांनी काय! शंभर एक वर्षे तरी! खरचं, ही तीच आहे काय? किती बदल?

~ अखेरची भेट ~

"कोण?"

"ती आलीये?"

"कुठे?"

दासीने निरोप सांगताच तिच्या उत्तराची वाट न पाहता तो धडधडत श्रीसोपानाच्या शिशवी पायदंड्या उतरून खालीही आला. कक्षाच्या द्वाराकडे धावला. तोच, ती काठीच्या आधाराने हळुवार पावलं टाकत आतमध्ये प्रवेशली. समोर त्याला पाहून थबकली. तो ही तिला पाहून स्तब्ध झाला.

\"किती दिवसांनी पाहतो आहे हिला. किती दिवसांनी काय! शंभर एक वर्षे तरी! खरचं, ही तीच आहे काय? किती बदललीये. हातात काठी. कमरेतही वाकली आहे. केसही पांढरे झाले आहेत. चेहऱ्यावर तर सुरकुत्यांच जाळंच झाल्यासारखं वाटतंय. पण हो! तिचे डोळे! अजूनही तसेच भुरे, पाणीदार, बोलके.\"

हातातली काठी टेकवत ती हळूच पुढे सरसावली. अगदी जवळ आली त्याच्या. हाताच्या अंतरावर. तो तिला निरखून पाहू लागला. त्याच्या गालाला थरथरत्या हातांनी स्पर्श करत ती म्हणाली,

"कान्हा sss"

तो चमकलाच. ती हाक! त्यातला आर्तभाव! फक्त तोच समजू शकत होता. आणि अशी आर्त हाक फक्त तिच मला मारू शकते. आपसूकच त्याच्या काळ्याभोर गहिऱ्या डोळ्यांमध्ये अश्रुंच्या ढगांची गर्दी दाटू लागली.

"असा काय पाहतोयस रे?"

त्याने तिचा थकलेला थरथरता हात हातात घेतला. अश्रुरूपी मोतीबिंदूंनी पापण्यांच्या कडा ओलांडल्या, गालांवरून घरंगळत तिच्या हातांवर विसावू लागले. त्याच्या भावविभोर डोळ्यांतील नरम आसवांच्या स्पर्शाने तिचं मन तिला भूतकाळात खेचू लागलं.

गोकुळातली ती निरव, उदास सकाळ उजाडली. सारे गोप गोपिका हिरमुसलेल्या होत्या. गुरं ढोरांना, जनावरांनाही त्या निरस वातावरणाचा वास लागला होता जणू!

\"तो गाव सोडून जाईल असे त्यांना कधीच वाटले नव्हते. त्याचे हे जाणे आता कायमचेच कि काय? तो कुणीतरी मोठा आहे. चुकून आपल्यात येऊन राहिला होता. आता त्याला पुढे जाऊन खूप मोठे कार्य करण्यासाठी जाणे भाग आहे. हे सत्य त्यांना कळून चुकले होते. पण हे सगळे खोटे असावे! तो कधी जाऊच नये! किंवा पुन्हा माघारी येईल! अशी भोळी आशा प्रत्येकाच्या मनात होती.

कृष्ण - बलराम आज मथुरेला निघाले होते. वाड्याबाहेर नंदबाबा, यशोदा, भाऊ, चुलते, सारे गोप गोपी, झाडून सारा गोकुळ निरोप देण्यासाठी जमला होता. साऱ्यांचा निरोप घेऊन धूळ उडवत रथ यमुनेच्या तिराकडे दौडू लागला. नेहमीचा रस्ता हळूहळू मागे पडत होता. यमुनेचा किनारा दृष्टीपथात येऊ लागला. वेशीजवळ असलेला कदंब वृक्ष दिसू लागला. तोच कदंब वृक्ष! ज्याच्या सावलीत कृष्ण त्याच्या बासरीमधून अवीट ताण छेडायचा. त्यातून निघणारे मंजुळ, सुमधुर संगीत! सारे गोप गोपी, राधा, तल्लीन होऊन, भान हरपून, डोळे मिटून घट्कांघटका ऐकत राहायची. याच वृक्षाला बांधून राधेसोबत घेतलेले उंचच उंच झोके! त्याच्या गर्द छायेखाली बसून खाल्लेला भाकर तुकडा! दूध, दही, लोणी! किती किती म्हणून आठवणी निगडीत होत्या. त्या भल्यामोठ्या कदंबाच्या झाडाखाली एक मानवी आकृती उभी होती. आपल्याचकडे पाहत होती. कृष्णाचं लक्ष गेलं. \"राधा!\"

कृष्णाने सारथी दारुकाला रथ थांबवायला सांगितलं. डोळे अश्रूंनी डबडबलेले. हुंदका अनावर झालेला. ओठांतून एकही शब्द फुटत नव्हता. तिची पापणीही लवत नव्हती. भरल्या डोळ्यांनी ती किशोर कृष्णाला पाहत होती. प्रेम आणि विरह, दोन्हींचा किती घनिष्ट संबंध ना! जो पर्यंत प्रेमात विरह येत नाही, तोपर्यंत त्याची ओढ, हुरहूर, महत्व कळत नाही. हि शेवटचीच भेट कि काय? म्हणून त्याला एक क्षणही पापण्यांआड होऊ देत नव्हती.

रथाच्या लाकडी पायदंड्या उतरून कृष्ण खाली आला. जडावलेल्या पावलांनी आणि अश्रू भरल्या नयनांनी कृष्ण तिच्या दिशेने ओढला जात होता. त्याचेही डोळे प्रत्येक पावलागणीस एकेका थेंबाने भरत होते. आता काहीच पावलं उरली होती. समोर साश्रू नयनांनी राधा त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यांना डोळे भिडवण्याचं बळही त्याच्यात नव्हतं.

किती वेड लावलंस रे कान्हा!

तुझ्या बासरीच्या मंजुळ आवाजाने, संगीताने मला मोहवून टाकलंस!

तुझं निखळ, निरागस हास्य !

मान झुकवून मिश्किल हसत डोळ्यांनी पाहणं!

तुझा खट्याळपणा!

तुझं सुमधुर बोलणं!

किती सवय लावलीस रे आम्हा सगळ्यांना!

आणि आता, असा अचानक कसा रे चाललास?

या गोकुळाला सोडून!

गोधनाला सोडून!

या यमुनेला सोडून!

या वेड्या राधेला सोडून!

पुन्हा येशील ना रे?

तिचे भरलेले डोळे खूप काही सांगुन जात होते. अगदी हाताच्या अंतरावर उभी असलेली राधा. त्याची नजर तिच्या पावलांवर खिळली होती. त्याने नजर वर करताच, त्याची दृष्टी तिच्या गहूवर्ण उभट चेहऱ्यावर गेली. किती करुणा! किती प्रेम! किती वात्सल्य ओथंबून आणि भरभरून वाहत होतं तिच्या चेहऱ्यावरून. तिच्या डोळ्यांत आगतिकता, विरह, दुःख कितीतरी भावभावनांचा संगम झाला होता. त्याने थरथरत तिचा स्निग्ध हात हातात घेतला.

तुझ्या डोळ्यांतील भावना समजत नसतील का गं मला!

पण मी तरी काय करू!

नियतीच्या पुढे मलाही काही करता येत नाही!

समोर आलेलं प्रत्येक कर्तव्य पूर्ण करत राहणं एवढंच तर आपल्या हातात असतं!

खूप काही बोलायचं होतं. शब्दच फुटत नव्हते. पण डोळ्यांना डोळ्यांची भाषा कळत होती. त्याच्या स्पर्शातच सर्वकाही तो मूकपणे तिच्याशी बोलत होता. जिथं आत्म्याशी आत्म्याचे बंध जुळलेले असतात, तिथं संवादासाठी शब्दांची गरजच उरत नाही. तिचे कोमल, नरम हात हातात घेत त्याने अलवार दाबले. तिच्या हातांना कंप सुटला होता. तिचे दोन्ही हात वर घेऊन त्याने त्यावर आपलं मस्तक झुकवलं. त्याच्या डोळ्यांतील दोन थेम्ब अश्रू तिच्यात हाताच्या तळव्यांवर खळकन ओघळले. कमरेला अडकवलेली बासरी तिच्या हातांवर ठेवली. हळुवार तिची मूठ बंद केली. तिच्या गालांवरून ओघळणारे अश्रू हाताने अलवार टिपले.

तिचा हात सोडून कृष्ण रथाकडे निघाला. पावलांनी वेग घेतला. आता मागे वळून पाहणं शक्य नव्हतं, नाहीतर तो स्वतःला रोखू शकला नसता. हा एकच असा क्षण होता! जर राधेने हाक मारली असती, तर कृष्ण जाऊ शकला नसता. तिचा आवाज ऐकण्यासाठी तो आतुर झाला होता. त्याचे प्राण कानांशी येऊन थांबले होते! पण, तिलाही माहिती होतं, कि जर आपण त्याला हाक मारली तर त्यालाही स्वतःला आवरणं कठीण होईल.

कृष्ण!

कन्हेय्या !

मुरलीधर!

किशोर!

मिलिंद!

मुकुंद!

कान्हा!

काय आणि किती नावं तिच्या ओठांवर येऊ लागली. डोळ्यांतून अविरत अश्रुधारा वाहत होत्या. दुथडी भरून वाहणाऱ्या यमुनाआईलाही आज तिच्या अश्रूंची सर आली नसती. हाक मारण्यासाठी तिचे ओठ अलग झाले. हात त्याच्या दिशेने उंचावला गेला. तोंडातून अस्फुट आवाज आला.होऊन

"कान्हा ssss ! पुन्हा भेटशील ना रे मला?"

पण तो ऐकण्यासाठी कृष्णाचा रथ कधीच दूर निघून गेला होता. घोड्यांच्या टापांनी उंच उडणारे धुळीचे लोट फक्त दिसत होते.

गोकुळचा कान्हा मथुरेला कृष्ण होऊन निघाला होता. पुन्हा कधी येईल कि नाही? नियतीलाच माहित!

प्रेमात कधीही वियोग नसतो. कारण प्रेमचं अंतिम योग आहे अंतिम मिलन आहे!

जडावलेल्या अंतःकरणाने राधेची पावलं घराकडे आपसूकच पडत होती. हृदयातील प्रत्येक स्पंदनात फक्त एकच नाव...

कान्हा... कान्हा... कान्हा...

देवघरात समयीतील ज्योत मंद तेवत होती. नमस्कार करण्यासाठी तिचे हात जोडले जाणार; कृष्णाने दाबलेली मूठ उघडली. बासरीबरोबर एक सुंदर मोरपंख होतं! पाहताच तिचा हुंदका अनावर झाला. डोळ्यांतील दोन थेम्ब त्यावर पडून ज्योतीच्या प्रकाशात चमकू लागले.

कृष्णरूपी ते चमकणारे दोन थेम्ब,डोळे बनून तिलाच तर पाहत नव्हते ना!

दिवसांमागुन दिवस जाऊ लागले. एकीकडे राधा पत्नी म्हणून आपल्या संसारिक जबाबदाऱ्या संभाळत होती आणि दुसरीकडे श्रीकृष्ण आपल्या दैवी जबाबदाऱ्यांची पूर्तता करत होते. महिने - वर्षे उलटून गेली. एक नव्हे दोन नव्हे तब्बल शंभर वर्षांचा काळ उलटून गेला होता. सारा गोकुळ, वृंदावन कान्हाची वाट पाहतच होतं. कधी बलराम येऊन गेला, कधी उद्धव तर कधी त्याची पत्नी रुक्मिणीही गोकुळात येऊन गेली. जेव्हा जेव्हा कुणी द्वारकेहून यायचं! माघारी जाताना राधेला न विसरता भेटून जायचं! पण कन्हयाचे पाय कधीच गोकुळाकडे वळले नाहीत. कारण, गोकुळातून गेलेला कान्हा, आता अखिल भारतवर्षाचा श्रीकृष्ण होऊन गेला होता.

सकाळची वेळ होती. प्रहर उलटून गेला होता. आकाशाचा राणा सूर्याचं तांबूस कोवळं ऊन अंगावर घेत श्रीसोपानातल्या झोपाळ्यावर कृष्ण डॊळे मिटून शांत चित्त पहुडला होता. गत शंभर एक वर्षांचा धामधुमीचा काळ उलटला होता. गोकुळातून कुणी राधा म्हणून आलंय. दासीने सांगताच तो कक्षाच्या द्वाराकडे धावला. समोर ती उभी होती.

"राधे..."

त्याच्या आवाजाने ती भानावर आली. त्याच्या आवाजामध्ये अजूनही तीच मार्दवता, ती मधुरता होती. त्याने तिच्या डोळ्यांत पाहिलं. ती गोड हसली.

"कान्हा... का रे नाही आलास पुन्हा गोकुळात.? तुझी वाट पाहून थकले रे सारे."

तिच्या हाताला धरून शेजारच्या आसनावर बसवत कृष्णाने दासीला खूण केली. दासीनं आणलेला दह्याचा वाडगा त्याने तिच्या समोर धरला.

"मला नकोय तुझं काही."

"हे माझं कुठंय राधे... हे तर तुझंच आहे. तुझ्या घरातून चोरून खाल्लेलं."

"आठवतं का रे तुला?"

तिच्याकडे पाहत तो मंद हसला.

"हो. खूप आठवणी आहेत, खूप बोलायचं आहे. संध्याकाळी भेटशील?"

"वेळ आहे ना तुला? द्वारकेच्या राजाला एका म्हातारीला भेटायला."

"कोण म्हणतं तू म्हातारी आहेस. मला तर अजूनही तू सोळा-सतरा वर्षांच्या पोरीसारखी दिसतेस. तेच हसणं. तेच डोळे. तोडीशी मान तिरकी करून तुझं पाहणं. गालांना स्पर्श करून मला हाक देणं."

"चल... काहीही बोलतोस...", ती हळुवार लाजत म्हणाली.

राधा निघून गेली. तिच्या विश्रामाची आणि संध्याकाळी भेटीच्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था सेवकांना करायला सांगितलं.

तलावाकाठी असलेल्या शंकराच्या मंदिरामध्ये सायंकाळच्या वेळी दोघांची भेट झाली. समुद्रापासून काही दूर अंतरावर असलेल्या जागेवर शांतता लाभावी म्हणून कृष्णाने हे मंदिर, आणि तलाव बांधून घेतला होता. चहूबाजू वृक्ष राईंनी वेढलेल्या असल्यामुळे समुद्राची गाज इथपर्यंत पोहोचत नव्हती. मंदिराच्या दगडी पायऱ्यांवर कृष्णाच्या शेजारी राधा बसली होती.

"राधे..."

"हं..."

"सकाळी तू विचारलं होतंस ना कि, मी पुन्हा गोकुळात का नाही आलो ते?"

"त्याच्यासाठीच तर एवढ्या दूर आले नं मी."

"राधे... गोकुळातला कान्हा साऱ्या जगासाठी श्रीकृष्ण झाला होता. कसं यायचं मी गोकुळात राधे? इथपर्यंत येण्यासाठी तुला किती कष्ट पडले असतील. पण तुला भेटल्याशिवाय असं अपूर्ण आयुष्य घेऊन मी तरी कसं दिगंताचा प्रवास करणार होतो."

"सगळ्यांना गोकुळात भेटायला पाठवायचास. सगळ्यांची विचारपूस करायचास. नंदबाबा-यशोदाकाकी तुझी वाट पाहून थकून गेले. मग का रे? यायचं ना एकदा तरी!"

"राधे... नियतीच्या पुढे मी सुद्धा हतबल होतो. मी एकदा जरी आलो असतो तर पुन्हा माघारी जाऊ शकलो नसतो. विधात्याला माझ्या हातून ज्या गोष्टी करायच्या होत्या, त्या झाल्या नसत्या. निसर्गाचं संतुलन बिघडून कसं चालेल!"

"आभाळाएवढं उंच आणि प्रगल्भ बोलणं रे तुझं! आम्हाला कसं कळणार?"

"नाही गं राधे... विधात्याने ज्या कामासाठी मनुष्याला पृथीतलावर जन्म दिला. ते कर्म कधी चुकत नाही."

"अजूनही तसंच गंभीर आणि विचार करणारं बोलतोस. मला नाही ऐकायच्या तुझ्या त्या गप्पा... "

"हं...", तो तलावामधील जलविहार करणाऱ्या बदकांच्या जोडीकडे पाहत होता.

"कान्हा... तुझी बासरी ऐकून वर्षे उलटली रे. ऐकवतोस एकदा?"

"आत्ता?"

"हो."

"पण आत्ता माझ्याकडे नाहीये गं बासरी."

तिने तिच्या झोळीतून एक लाकडी संदूक बाहेर काढली. त्याच्या समोर धरत म्हणाली,
"घे... हीच ना? आता वाजवशील ना रे?"

त्याचे थरथरतच ती संदुक उघडली. गोकुळातून निघताना कदंब वृक्षाखाली राधेला शेवटचं भेटलो, तेव्हा तिच्याकडे दिलेली बासरी! तिने अजूनही जपून ठेवली होती. त्याबरोबर होतं एक सुंदर मोरपंख! तिने ते हळूच उचलून घेतलं. त्याच्या डोक्यावरच्या सोनेरी वलयांकित मुगुटात खोसलं.

"कान्हा... तुझी बासरी ऐकतंच आता, शेवटचा श्वास घ्यावा असं वाटतेय रे...!"

त्याच्या खांद्यावर तिने अलगद मान टेकवली. त्याने बासरीतून मधुर ताण छेडायला सुरुवात केली. तीतून निघणारे मधुर मंजुळ स्वर ऐकून राधा पुन्हा एकदा भान हरपून ऐकू लागली. एक प्रहर, दोन, तीन, चार प्रहर उलटून गेले. कृष्ण बासरीमधून संगीताचे सूर छेडतच होता. राधाही तल्लीन होऊन ऐकत होती.

पहाट होऊ लागली. पाखरांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला. मधूनच मोराच्या आरवण्याचा आवाज येत होता. राधा कृष्णाच्या खांद्यावर मान टेकवून बसली होती. त्याने बासरी थांबवली. राधेच्या पांढऱ्या झालेल्या केसांवरून प्रेमभराने हात फिरवला.

"राधे...", त्याने तिला आवाज दिला.

"अगं... उठ... पहाट झाली बघ..."

राधा शांत निजली होती. दिगंताचा प्रवास करण्यासाठी तिची प्राणकुडी कधीच निघून गेली होती. एक निरोप कृष्णाने गोकुळातून निघताना राधेचा घेतला. आणि एक निरोप राधेनं दिगंताचा प्रवास करण्यासाठी कृष्णाचा घेतला! जणू त्याच्या अगोदर जाऊन त्याचं स्वागत करण्यासाठीच! तिची कृष्णरुपता पूर्णत्वाला पोहोचली होती.

"राधे... राधे... नको ना गं अशी सोडून जाऊस मला... जीवनाचा अखेरचा प्रवास मला एकट्यानेच करायला लावशील का? गोकुळ सोडल्यापासून मी एकदाही भेटीला नाही आलो. पण असा एक दिवसही माझ्या आयुष्यातला नाही, जेव्हा तुझी आठवण झाली नसेल. राधे.... माफ करशील ना गं मला...!", तिच्या देहाला घट्ट मिठीत घेऊन कृष्ण हुंदके देऊन आक्रंदत होता.

राधेचा देह सरणावर होता. कृष्णाच्या डोळ्यांतून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून त्याने हात फिरवला. कमरेची बासरी त्याने तिच्या जवळ ठेवली ती कायमचीच! पुन्हा कधीही न वाजवण्यासाठी!

राधेचं आणि कृष्णाचं लग्न कधीही झालेलं नव्हतं. त्याच्या लग्नाच्या खऱ्या आठ पत्नी तर ज्यांना पत्नीचा मान देऊन द्वारकेमध्ये राहण्यासाठी परवानगी दिली त्या होत्या सोळा सहस्त्र स्त्रिया. ज्यांना नरकासुराने बंदीवान केलं होतं. लग्नाच्या आठ पत्नी असूनही कृष्णाच्या नावाबरोबर नाव घेण्याचा मान मिळाला तो फक्त राधेला.

"राधा" - मोक्षासाठी धडपडणारा जीव! जिचं संपूर्ण जीवनच कृष्णमय झालंय.
"कृष्ण" - साऱ्या जगाला कर्माचं आणि धर्माचं ज्ञान, महत्व सांगणारा! ज्याचं जीवन राधे शिवाय पूर्ण न होऊ शकणारं!
"राधा - कृष्ण" - विश्वाच्या अंतापर्यंत कधीही अलग होऊ न शकणारे. विशुद्ध, वासनारहित, निकोप प्रेमभाव.

कृष्ण अवतार संपून चार पाच हजार वर्षे उलटून गेलेली आहेत. पण तरीही अजून राधा आणि कृष्ण यांचे नेमके नाते काय होते, ते आजतागायत कुणीही छातीठोकपणे सांगू शकलेले नाहीये. कोण म्हणतं, राधा केवळ त्याची भक्त होती. कोण म्हणतं, प्रेयसी होती तर कोण म्हणतं ती त्याची पत्नीही होती. पत्नी होती की नाही? याबद्दल मात्र नक्कीच खूप वाद विवाद आहेत.

आता, महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे मर्यादा, पावित्र्य! म्हणजे नेमंक काय? तर ज्याला स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांतला फरक कळतो, त्याला मर्यादा आणि पावित्र्य सांभाळायला जमतं. ज्या व्यक्तिंना या मर्यादेचं भान असतं. त्यांना कोणतंही नातं जबाबदारीने सांभाळता येतं.

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी राधा किंवा कृष्ण असतो. किंवा असं असावं अशी इच्छा तरी असते. ज्याच्यापाशी आपण आपलं मन मोकळं करता यावं. भरभरून बोलता यावं. सुख दुःख आपल्या सोबत असावं आणि कठीण परिस्थितीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. मनाच्या गाभाऱ्यात कुठेतरी ते लपलेलं असतं. अशा प्रेमाचा, नात्याचा आदरपूर्वक सन्मान करता आला पाहिजे आणि जपता आलं पाहिजे. हीच खरी राधा - कृष्ण यांच्या प्रेमाची आणि भक्तीची पूजा ठरेल!

संदर्भ -
कृष्ण किनारा - अरुण ढेरे
युगंधर - शिवाजी सावंत
कृष्णवेध - गो नि दांडेकर
पुरुषोत्तम - म वि गोविलकर