द लास्ट लाफ..

आणि ती हसली..


कथेचे शीर्षक: द लास्ट लाफ
विषय: आणि ती हसली..
फेरी: राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

द लास्ट लाफ

“गो बाय मांजे.. ये काय? देवा.. सोनसाकली..! यी कन्शी हानलिव? कमालुच करताव.. परवाचे दिस कानांच्या कुऱ्या हानल्याव.. नि आज डायरेक सोनसाकली? लाट्री लागली का काय! का खान गावली सोन्याची? मना नीट सांगा.. काय लफ्र्याचं काम बिम नाय नी करत?"

दागिन्यांच्या आनंदातून सावरत सुलभाने अशोकला विचारलं. पण तिचा हात मात्र अजून गळ्यातल्या साखळीवरच होता. ते पाहून अशोक हसतच म्हणाला,

“तुला काय कराचं हाय? माजी रानी हास नि तू.. माजे दिलाची रानी.. तूजेसाटी हानलंय ते बग नी.. तुम फकस्त आंबे खाव गो.. बाटे कायको गिनती हय?"

असं म्हणताच ती हसायला लागली. तशी त्याने तिला जवळ घेतलं. तिने लाजून त्याची मिठी सोडवण्याचा प्रयत्न करत पळून जाण्याचा बहाणा केला खरा पण त्याने तिला कंबरेत हात घालून पुन्हा आपल्याकडे खेचलं. आरशासमोर उभं करत त्याने तिच्या कंबरेला मागून आपल्या हाताचा विळखा घातला आणि मानेपाशी चुंबन घेत समोरच्या आरश्यात पाहिलं. दोघांची नजरभेट होताच ती पुरती लाजली आणि मान खाली घालून पटकन मागे फिरत त्याच्या मिठीत शिरली.

सुलभा आणि अशोक पाटील. अलिबागमधल्या रेवस गावातील एक अगदी साधारण निम्नमध्यमवर्गीय जोडपं. अशोक गवंड्याच्या हाताखाली काम करत. बापाची शेती भावकीने लाटली होती. घरी बेताची परिस्थिती असल्याने वरकमाईसाठी गावातील माणसांची पडतील ती कामं अशोक करत असे. त्याची बायको सुलभा एक सर्वसाधारण गृहिणी होती. त्याच्याप्रमाणेच गरीब घरातून आलेली. पतीला मदत व्हावी यासाठी चार घरची धुणीभांडी करून चार पैसे मिळवत होती. आणि अधून मधून अशोकच्या कामातही मदत करायची. आठदहा वर्षे उलटली होती लग्नाला पण अजून मूलबाळ नव्हतं. त्यामुळे कधीकधी तीही कुणी फुकटची पाजली तर अशोक खूप दारू प्यायचा पण कधी कुणाची चोरीमारी नाही की चहाडी नाही त्यामुळे दोघांनाही गावातल्या कोणत्याही घरात प्रवेश कधी नाकारला जायचा नाही.

गेले दोन चार दिवस मात्र अशोक थोडं वेगळं वागत होता. खासकरून ती इतकी मोठी रामदास बोट बुडाल्यापासून तर तो फारच विचित्र वागत होता. काम आहे सांगून कुठे कुठे बाहेर जायचा. हल्ली त्याच्याकडे बरे पैसेही दिसू लागले होते आणि आता तर थेट दागिनेच आणले होते त्याने बायकोसाठी! आता १९४८ चा तो काळ. त्या सुमारास सोनं काही फार महाग नव्हतं पण अशोकची आर्थिक परिस्थती दागिने घडवण्याची नव्हती आणि इतक्या जलद दोन दोन दागिने घडवण्याइतकी तर नक्कीच नव्हती. त्यामुळे आता काही म्हणाली नसली तरी सुलभाला मनात मात्र काळजी वाटू लागली होती. आज आणलेली सोनसाखळीही तिने आधीच्या कुड्यांप्रमाणे देव्हाऱ्यातल्या एकवीरा देवीच्या तसबिरीपाशी ठेवून हात जोडले.

“आय माऊले.. मना नाय समजे. मना नाय ठावे ये डागिने मांजा नवरा कन्शी हानतंय. काय चुकला माकला तर पदरान घे माऊले.. सादा हाय तो.. नजर ठेव आमचेवर..”

नमस्कार करायला जोडलेले हात नमस्कार करून तिच्याही नकळत मंगळसूत्राशी चाळा करु लागले होते. का कुणास ठाऊक पण मनातलं काहूर शांत होत नव्हतं. वास्तविक कळत्या वयापासून अठरा विश्वे दारिद्र्य पाहिलेल्या तिच्याही मनात दागिन्यांची स्त्रीसुलभ लालसा होणं स्वाभाविक होतं पण त्या दागिन्यांच्या मागची खरी गोष्ट कळल्याशिवाय तिला चैन पडणं मुश्किल होतं. स्वयंपाक करताना आज तिचं लक्ष लागत नव्हतं. सुक्या बोंबलांचं कांजी (कालवण) आणि गरमगरम भात केला. “भायेर जाऊन येतंय..” सांगून गेलेला अशोक परतला.

“सुले.. कांजी चांगलाच परमालला गो.. तये नायकांचे दाराशी येतंय वास..”

दारात चप्पल काढता काढताच तो म्हणाला. सुलभाने त्याच्याकडे हसून पाहिलं. हातातल्या कापडी पिशवीतून खाऊची पुडी काढत होता तो. तिला माहित होतं पुडीत गरमगरम भजी असणार ते. तिच्या आवडीची. खूप खुश असला की तो तिच्यासाठी नाक्यावरून तिच्या आवडीची कांदा आणि गोळाभजी घेऊन येत असे.

“बापया लय खुस हाय आज.. कांजी पुन आवरीचा हाय त्याचे.. मंजे डबल खुस.. रातच्याला बोलता यल डागिन्यांचा..”

सुलभा मनातल्या मनात म्हणाली.

तो हातपाय धुवून येईतोवर सुलभाने ताट वाढलं होतं. तो येऊन पुढ्यात बसला पण नुसताच तिला एकटक न्याहळत बसला. तिला इशारा कळला. तिने भजीची पिशवी घेतली आणि उघडून पाहते तर भजीसोबत शिराही होता. तिचा अत्यंत आवडता.. तेलाने माखलेला शिरा. म्हणजे आज अशोक तिच्यासाठी गावाबाहेरच्या मालूशेठच्या दुकानात जाऊन आला होता. तिथला तो तेलाने माखलेला पिवळा शिरा म्हणजे अगदी पंचक्रोशीत प्रसिद्ध! या गरिबांच्या वाट्याला क्वचितच कधीतरी यायचा. पण आज त्याने खास तिच्यासाठी आणला होता. आनंदाने तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं पण पुढच्याच क्षणी मनातलं काहूर उफाळून आलं. तिने आता काहीच न बोलायचं ठरवलं होतं.

“काय असोकशेट.. आज भलतेच रंगान दिसताव.. भजी आनी शिरा पुन.. तोव डायरेक मालूशेटचे दुकानांशी?”

मनातील चिंता लपवत ती त्याची गंमत करू पाहत होती. तो नुसता हसला. ती त्याच्या पुढ्यात जाऊन बसली आणि ताटात भजी आणि शिरा वाढला. तरीही तो फक्त तिच्याकडे पाहत बसला होता. आता मात्र ती लाजली. आज स्वारी भलतीच खुश आणि रंगात आलेली तिच्या लक्षात आलं. तिने अजून थोडा भात आणि कांजी ताटात वाढलं आणि घास कालवून त्याला भरवला. दोघं आज कितीतरी दिवसांनी एकाच ताटात जेवली होती.

जेवण आटोपलं तसं सुलभाने सगळी उचलपाचल केली. अंथरूण घातलं आणि अंगणात शतपावली करणाऱ्या नवऱ्याला हाक मारली. इतक्यात संध्याकाळपासून थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झाला. अशोक लगबगीने आत आला. खुंटीला टांगून ठेवलेल्या सदऱ्याच्या खिशातून त्याने गजरा काढला आणि नुकतंच अंग टाकलेल्या सुलभाकडे पाहत त्या गजऱ्याचा वास घेऊ लागला. तिच्या शेजारी अंथरुणात जाऊन तो पडला आणि तिला जवळ घेऊ लागला. तिने लटक्या रागाने नकार दिला. त्यावर त्याने हातातला गजरा तिच्या चेहऱ्याजवळ नेत अलगद गालावरून फिरवला. आता मात्र ती मनातून प्रचंड खुश झाली होती. तिला आठवतही नव्हतं शेवटचा आपला नवरा इतका खुश असल्याचं.. तोही दारु न पिता! ती कुशीवर वळत त्याच्या मिठीत शिरली. बाहेर पाऊस जोर पकडत होता. आपल्यावर इतकं प्रेम करणारा नवरा आहे या विचाराने ती बाकी सगळं विसरून त्याच्या मिठीत विरघळू पाहत होती. इतक्यात जोराची वीज कडाडली. ती प्रचंड घाबरली आणि का कुणास ठाऊक पण त्याच्या मिठीतून दूर झाली. तिच्या त्या वागण्याने तोही चक्रावला. ती उठून बसली आणि तिला पाहून तोही!

“काय गो सुले.. काय झैला? घाबरलीस काय आवरी?”

“तुमाना मांजी शपत हाय.. तुमी मना सांगा त्या कुऱ्या नि साकली कशी काय हानलिव? आवरा पैसा कुटून हानलाव? मना खरा खरा सांगा..”

मनातली भीती तिने एका दमात बोलून दाखवली. तिचा निक्षून विचारणारा आग्रही स्वर त्याने ओळखला आणि तो आणखी लपवू शकला नाही. एक दीर्घ श्वास घेतला आणि काहीशा गंभीर चेहऱ्याने त्याने सांगायला सुरुवात केली.

“सांगतंय.. पुन मांजी शपत हाय कोनाला कायव सांगु नको..”

“तुमची शपत..!”

“गेल्या मैन्यान गटारी आवशेला रामदास बोट बुरली ती.. चिक्कार लोका दर्यान बुरून मेली नी.. कतीतरी मुरदे लागले हुते.. ते देकवाला गेलतो तये फुऱ्यांचे मुरदे उचलून हानले सगल्या लोकांशी नि मंग ते लगेच जालले पुन.. मी बिशे दिस (दुसऱ्या दिवशी) तये परत गेलू ते.. राम्या कोली मना लांबच्या उच खरकान दिसला कायतरी करताना.. मी दरी (जवळ) जाऊन देकतंय तवशेर तो निस्ता आरडाला लागला.. धावात सुटला न परला तयेच खरकान.. डोका फुटला नि ये निस्ता रगात येतंय डोक्यांशी.. मी गेलो उचलाला तर देकला ते बेसुद झैलता.. पुन त्याचे हातान सोनसाकली, मोत्याची माल, कानांच्या कुऱ्या, नि अजून मोप (पुष्कळ) दागिने हुते.. मिनी फुरं जाऊन देकला ते एक मारवाडी बाय परली हुती तये खरकान.. निस्ती पिटासारकी गोरी.. निंगुत लगीन झाला आसन.. ई निस्ती दागिन्यांनी मरलेली.. जवल गेलो ते समाजलु मी का ती आदीच मेलेली.. बोटींशीच परून आये किनाऱ्याव लागली आसन.. मिनी बाजूला देकला ते कोनुच नाय.. आवरे डागिने देकले ते मांजा जीव निस्ता खाली वर.. मंग बोलू कोनतरी घेईनच ते आपुन घेऊ.. मिनी ते डागिने घेतले नि लिकवून ठेवले तयंच एके ठिकानी.. सगले एकदम हानले ते दिस्तिन नाय.. कोनला समजाला नको मनुन मिनी ठेवले. नि मंग राम्याला बाजूला नेला.. नि मंग तन्शी डाक्टरतये नेला.. मंग येक दिस जावून बाजूबन इकला नि पैसं हानलं. पुन साकली नि कुऱ्या बगुन मना तुजी याद आयली. मंगुन ते तुला हानले.”

विस्फारलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत सुलभा सगळं ऐकत होती. तिला काहीच कळत नव्हतं की या सगळ्या प्रकारावर कसं आणि काय बोलावं. ती काहीही विचार करू शकण्याच्या स्थितीत नव्हती. एकीकडे एका बेवारस स्त्रीच्या मृतदेहावरचे दागिने.. म्हणजे ते चोरले होते असंही नाही. उलट आधी एकाने घेतले पण तो कदाचित त्या दागिन्यांच्या अतिमोहाने वेडाचा झटका येऊन की काय पळता पळता जखमी झाला आणि संयोगाने तिथे असणाऱ्या तिच्या नवऱ्याला ते दागिने मिळाले. यात वावगं काय? असे अनेक विचार तिच्या मनात फेर धरू लागले. त्या विचारांतून बाहेर येत एक आवंढा गिळत भारावल्यागत तिने विचारलं,

“मंग फुरं? त्या बायचा काय झाला? आनी तो राम्या कोली कसा हाय आता?”

“त्या राम्याचा काय समजला नाय.. मोटे दवखान्यान आरमीट केला बोलतान.. पुन तिची बॉरी तयेच हाय अजून.. तिचे सगले डागिने नाय घेटा आलं मना त्या राम्याच्या नादान.. आनी बिशे दिस तय गेलतू पुन तवा तये पोलिस हुते..”

“पुन पोलिसांना गावली असती बॉरी ते अख्खे गावान समजला असता सगल्यांना.. का पोलिसांशीच डागिने घेटले असतीन?”

सुलभाने शंका काढली. विचारांचं काहूर माजलं असलं तरी तिच्या मनाचा कौल कुठल्या बाजूने आहे ते तिच्या या बोलण्याने स्पष्ट होत होतं. दागिन्यांची हाव बाकी कोणत्याही गोष्टीवर भारी पडत होती.

“मना नाय वाटे पोलिसांना गावली आसन ती.. तिचे अंगावर मातेरी रंगाची सारी नि काल्या रंगाची चोली व्हती.. आनी उच खरकान हाय नी.. तये पोलीस कनाला मराला जातान!”

अशोक हसतच म्हणाला. सुलभा सगळं व्यवस्थित ऐकून घेतेय आणि काहीच विरोध करत नसल्याचं पाहून त्याची भीड चेपली होती. किंबहुना आतातर दोघांची जोडी जमली होती.

“अष्टमीचे दिस सांच्याला भरती येल. आनी सोमेसराचे देवलान सप्ता हाय स्रावनाचा.. मंजे रातच्याला कोनुव नसल तये.. तवा जाऊन कारून घे बाकीचे डागिने.. रातचा दिसनारुव नाय तू कोनला.. आरामान ये..”

आतापर्यंत डोळ्यांत आणि मनात माजलेलं काहूर शांत झालं होतं. आता सुलभा शांतपणे तरी निश्चयाने त्याला बेत सांगत होती. तो ऐकून आता त्यालाही धीर आला होता. आतापर्यंत कुणालाच काही न सांगता सगळं एकटाच करत होता पण आता त्याची लाडाची बायको साथीला आल्याने त्याचं बळ वाढलं होतं.

अष्टमीला अजून दोन दिवस बाकी होते. एकेक क्षण जाता जात नव्हता दोघांनाही. वेळ जावा म्हणून ते स्वतःला सोमेश्वराच्या मंदिरात सुरू असलेल्या भजनी मंडळाच्या सप्ताहात गुंतवून ठेवत होते. दोघेही रात्रीचे मंदिरातच झोपत होते. एकीकडे सुलभा मंदिरात जमलेल्या लोकांसाठी चहापाणी आणि प्रसादाची सोय करण्यात रमली होती पण तिकडे अशोकचं मन मात्र किनाऱ्यावरच्या त्या उंच निर्जन खडकात गुंतून पडलं होतं. भजन सुरू असताना केवळ तोंडाने देवाचं नाव घेत होता तो पण डोळ्यांसमोर मात्र ती काळ्या साडीतील ती दागिन्यांनी मढलेली मारवाडी स्त्री दिसत होती त्याला.. कसाबसा एक दिवस एक रात्र काढली पण नंतर त्याचा मोह त्याला शांत बसू देत नव्हता. तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवळातून निघाला. बायकांच्या गराड्यात असलेल्या सुलभाला काहीच कल्पना नव्हती त्याची. तो भरभर वाट तुडवू लागला. ना रस्त्यात भेटणारी माणसं त्याच्या दृष्टीस पडत होती ना त्यांनी मारलेल्या हाका त्याच्या कानापर्यंत पोहचत होत्या. त्याची पावलं अगदी थेट किनाऱ्यावर जाऊन थांबली. सूर्य अस्ताला जाऊ पाहत होता.. पाऊस नुकताच पडून गेला होता त्यामुळे एकूणच तो किनाऱ्याचा परिसर अत्यंत मोहक दिसत होता पण डोळ्यांसमोर दागिन्यांची चमक इतकी होती की त्याला या सगळ्याकडे पहायला आणि त्याचा आस्वाद घ्यायला वेळच कुठे होता! सुरूच्या झाडांचं बन त्याला आडोश्यासाठी पुरेसं होतं. तिथे जाऊन तो काळोख पडण्याची वाट पाहत होता. सप्तमी असल्याने पाच-साडेपाचला पूर्ण भरती आली होती. आता हळूहळू पाणी ओसरायला लागेल आणि मग त्या उंच खडकापर्यंत जाता येईल.. या विचाराने तो अजूनच अस्वस्थ होत होता.. जसजसा काळोख पडत होता तसतसं त्याच्या मनात भीतीचं एक भलतंच काहुर दाटून येत होतं. तो खूप अस्थिर दिसू लागला. त्याच्या पावलांना खूप प्रयत्नपूर्वक तो थांबवत होता. तहानलेल्या जीवाची तहान पाणवठ्याच्या जवळ येताच अजून वाढते म्हणतात ते काय उगीच? हाताच्या मुठी वळून तो त्यावर हळूहळू फुंकर घालत होता. काळोख पडताच हवेतला गारवा अजूनच वाढला. इतकं असूनही अशोकच्या कपाळावर घामाचे थेंब जमायला लागले होते.

अखेर तो हळूच त्या सुरुच्या झाडांमधून बाहेर किनाऱ्यावर आला. तिथे आसपास भटकी कुत्री सोडल्यास अगदी कुणीच नव्हतं. ते पाहून त्याची पावलं आपोआप त्या खडकाच्या दिशेने चालू लागली. एव्हाना भरतीचं पाणी फिरून आत जाऊ लागलं होतं. खडकाच्या बाजूला आता थोडंच पाणी होतं. तो खबरदारी घेत इकडे तिकडे बघत पुढे जात होता. त्याचं अंग भावनातिरेकाने आता थरथरू लागलं होतं. बघता बघता तो त्या मुडद्यापाशी पोहचला. उंच असल्याने भरतीचं पाणी तिथे अगदी क्वचितच येत. एकवेळ समुद्र खवळला तरच तिथे समुद्राचं पाणी यायचं. त्यामुळे आता फक्त पावसाच्या पाण्याच अंश होता. आकाशात चंद्रकोर वर येत चालली होती. तिचा अंधुक प्रकाश पडला होता. त्याचे डोळे त्या सगळ्याला एव्हाना सरावले होते त्यामुळे तिथे तो व्यवस्थित पाहू शकत होता. वाऱ्याने पदराचा काही भाग तिच्या तोंडावर आला होता. त्याने कामाला सुरुवात केली. हातातल्या तीन-चार अंगठ्या काढायला घेतल्या. पाण्यात फुगलेल्या बोटांतून अंगठ्या पटकन निघत नव्हत्या. थरथरत्या हातांनी खूप प्रयत्न केल्यावर एकेक करून त्या अंगठ्या निघाल्या. कंबरेला बांधलेल्या मोठ्या रुमालात त्याने अंगठ्या ठेवल्या. एका हातातल्या बांगड्या त्याने आधीच नेल्या होत्या. डाव्या हातातल्या बांगड्या अजून तशाच होत्या. त्याने त्या काढायला सुरुवात केली. पाच बांगड्या होत्या. पण त्या काढताना त्याच्या घशाला कोरड पडली होती. आज का कुणास ठाऊक पण आधीपेक्षा जास्त भीती वाटत होती त्याला. बांगड्या काढताना त्याला कंबरेला एक पोटलीवजा जाड कापडी पिशवी दिसली. त्याने ती उघडून पाहिली तर भरपूर नोटा होत्या पण भिजून त्यांचा चोथा झाला होता. इतके दागिने हातात असतानाही त्याचा जीव तो चोथा पाहून हळहळत होता. त्याची हाव आता पूर्णपणे त्याच्यावर आरूढ झाली होती. त्याने तो चोथा अजून शोध घेण्यासाठी बाहेर काढला तर जणू आनंदाने चेकाळायचा बाकी होता. त्यात हिऱ्याची अंगठी आणि दोन जोड कर्णफुलं होती. त्या अंधुक प्रकाशातही त्या हिऱ्यांची चमक लपत नव्हती. आणि तीच चमक आता अशोकच्या डोळ्यांत उतरली होती. तो झपाटल्यासारखा अजून अजून शोध घेऊ लागला. इतक्यात त्याला कुणीतरी आपल्याला हाक मारतंय असं वाटलं. त्याने एक आवंढा गिळला आणि हळूच इकडे तिकडे पाहिलं. कुणीच नव्हतं. झालेला भास लक्षात येताच त्याचा जीव भांड्यात पडला. त्याने पुन्हा आपला मोर्चा शोधण्याकडे वळवला. एव्हाना चंद्रही आकाशात आणखी वर आल्याने त्या वाढीव प्रकाशात त्याचं लक्ष तिच्या कमरबंदाकडे गेलं. तो छान भरीव सोन्याचा कमरबंद साडीच्या काहीसा आत असल्याने त्याला दिसला नव्हता. त्याने हळूहळू तो साडीतून वर काढत पोटावर चढवला. पण पाणी पिऊन फुगलेल्या शरीरावरून ते सगळं उतरवताना त्याला खूप प्रयत्न करावे लागत होते. थोडंसं वर केल्यावर तो बंद उघडण्याची खटपट करु लागला. तोच त्याला पुन्हा कुणीतरी हाक मारल्याचा भास झाला. त्याने दचकून मागे पाहिलं.

कुणीच नव्हतं.. हुश्श!! थोडं हायसं वाटलं पण त्याला आता भीती वाटू लागली होती कारण हा भास दुसऱ्यांदा होत होता. आणि त्या क्षणाला डोकं ताळ्यावर आलं आणि त्याला आपण एका मुडद्याजवळ आहोत याची जाणीव झाली. भीतीने अंगावर एक काटा आला आणि सणाणत अंगभर नाचून गेला पण पुढच्याच क्षणाला त्याचे हात यंत्रावत तो कमरबंद काढायला लागले. अचानक त्याच्या लक्षात आलं की साडीच्या निऱ्यांमधला एक धागा त्यात गुंतला आहे. आणि निरखून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो साधासुधा धागा नसून सोन्याची जर होती. अतिहावेने बेभान झालेल्या अशोकने सरळ निऱ्यांना हात घातला आणि चटकन निऱ्या खेचल्या. इतक्यात त्याला कुणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. आणि आता आवाज जवळजवळ येत होता. त्याने पुन्हा घाबरून इकडेतिकडे पाहिलं पण कुणीच नव्हतं. आवाज वाढू लागला तसं त्याने समोर पाहिलं आणि समोर जे दिसलं त्याने त्याच्या अंगातलं रक्तच जणू सुकू लागलं. ते प्रेत हसत होतं आणि हळूहळू ते प्रेत हलायला लागलं. खदखदून हसायला लागलं. अशोकला वाटलं की आता त्याचं हृदय तोंडातून बाहेर पडेल. हातापायाचं सगळं त्राण गळून पडलं. तोंडातून शब्द फुटत नव्हता की पळून जाण्याचा विचार डोक्यात घोळत नव्हता. भीतीने तो फक्त जागच्या जागी थरथरत होता आणि ती त्याच्या समोर हसत होती. खदखदून हसत होती. त्याला काहीच सुचेनासं झालं आणि पुढच्या क्षणी तो जोरजोरात हसायला लागला. बेभान होऊन धावत सुटला. किनाऱ्यावर पोहचला आणि नुकतीच मासेमारी करून परतणाऱ्या लोकांना धडकून पडला आणि बेशुद्ध झाला. त्याच्याकडचे दागिने आणि त्याची ती अवस्था पाहून त्या माणसांनी गावकऱ्यांना गोळा केलं. डॉक्टर आणि पोलिस बोलावले गेले.

गावात लागलीच बातमी आणि भीती पसरली. चौकशी केल्यावर आधीच नवऱ्याची हालत पाहून घाबरलेल्या सुलभाने पोलिसांना सगळं खरं सांगून टाकलं. पंचनामा झाल्यावर सगळा घटनाक्रम लक्षात घेऊन डॉक्टरांनी घटनेचं खरं कारण समोर आणलं. त्या स्त्रीचं शरीर आतून सडू लागल्याने रासायनिक प्रक्रिया होऊन शरीरात वायू तयार झाले होते पण साडी आणि कमरबंदामुळे तो वायू अडकून राहिला होता. अशोकने दोन्ही गोष्टी सैल केल्या आणि परिणामतः प्रेताच्या शरीरात बनलेला वायू आणि आत गेलेलं पाणी तोंडावाटे बाहेर आलं. बाहेर येतानाचा वेग आणि त्याचा आवाज पाहून अशोकला ते प्रेत खदाखदा हसत असल्याचा भास झाला आणि तो घाबरुन पळत सुटला.

काही असलं तरी त्या प्रकाराचा धक्का इतका जबरदस्त होता की अशोकला वेड लागलं. त्यानंतर तो एकच वाक्य म्हणत सगळीकडे फिरत असे.

“ती बग ती हसतंय...”

*समाप्त*

© परेश रसिका यशवंत पवार ‘शिव’
संघ: रायगड रत्न
जिल्हा: रायगड रत्नागिरी