दी लास्ट बस

At the last it always stays what you give.

"बाबा, मी निघालेय ओ." आज जरा उशीरच झाला खरा. ती मुलगी आजही असेल का तिथेच? दिवसभरात किती माणसं भेटतात पण आजकाल त्या मुलीला पाहिल्याशिवाय काही चैनच पडत नाही. विचारात समृद्धी निघाली खरी पण तिच्या जीवाची घालमेल काही थांबली नाही.

समृद्धी. आबासाहेब देशपांडे यांची एकुलती एक कन्या. जन्म झाला आणि आई सोडून गेली. आईविना पोर. दुसरं लग्न केलं तर मुलीला सावत्र आईचा त्रास होईल ह्या भीतीने आबासाहेबांनी दुसरं लग्न केलं नाही. मुलीला अगदी आईच्या मायेने जपलं. समृध्दी म्हणजे त्यांचा जीव की प्राण होती अगदी. समु नुकतीच पुरातत्व खात्यात नोकरीला लागली होती. वडील शिक्षक त्यामुळे गावातील एक प्रतिष्ठीत घराणं म्हणून त्यांचा नावलौकिक होता. समृद्धी शिकून तिच्या पायावर उभी राहिली आणि आबासाहेब निवृत्त झाले. पण त्यांनी सुट्टी मात्र घेतली नाही. सतत कोणासाठी तरी स्वतःला कामात व्यस्त करून घेण्याची त्यांना सवय लागली होती. कधी गावकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तर कधी मुलांच्या शिक्षणाबाबतीत सतत नवी जबाबदारी घेणं त्यांना अगदी सवयीचं होतं. सोबतच गावातील व गावाबाहेरील गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांना घरातच शाळा सुरु केली होती. अश्या या एकूण परिस्थितीत वाढलेली समृद्धी अतिशय कष्टाळू पण तितकीच धाडसी होती.

           समृद्धी धावत पळत स्टेशनवर पोहोचली आणि समोर त्या मुलीला पाहून तिची कळीच खुलली. स्टेशनवर मोगऱ्याचे गजरे विकणारी ती एक नऊ दहा वर्षाची पोर. वयाने नसली तरीही परिस्थितीने बरंच मोठं केलं होतं तिला. समृद्धी तिला रोज पहायची. एवढ्या लहान वयात एवढं शहाणपण कसं आलं असेल याचा विचार करायची. आज समु कामावर पोहोचली व कामाला सुरुवात केली. टेकडीवरच्या एका मंदिरात एक चोरदरवाजा सापडला होता. साधारण ४००-४५० वर्षांपूर्वीच्या त्या वास्तुचं निरीक्षण करण्यासाठी समृद्धी निघाली. अगदी जुने अवशेष असणारं ते मंदिर. आतमध्ये बऱ्याच मुर्त्या व दागदागिने सापडले ज्यातील काही भाग तो दरवाजा शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यातील एक होती नलिनी व तिच्यासोबत तिचा प्रोजेक्ट पार्टनर अमित. समु मुद्दामच नलिनी व अमितला भेटायला आली. तेव्हा तिच्या बोलण्यातून समुला समजलं की एखाद्यासाठी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहून यश कमावणं आयुष्यातील सगळ्यात मोठं ध्येय असू शकतं.आपल्याला जे मिळालं आहे त्याबद्दल माणसाने नेहमी कृतज्ञ असावं. तिच्या मनात राहून राहून त्या मुलीबद्दल विचार येत होते. तिने मनाशी ठरवलं आज त्या मुलीसाठी काहीतरी करायचंच. समृद्धी जरा घाईतच तेथील सर्व काम पार पाडून निघाली. पुन्हा कामावर न जाता ती घराच्या दिशेने निघाली. स्टेशनवर ती मुलगी तिथेच होती. सकाळपेक्षा मोगरा थोडासा कोमेजला होता पण तिची धडपड अगदी तशीच होती. समु अगदी ठरवून तिच्या शेजारी जाऊन थांबली. काही वेळ तसाच जाऊ दिला. थोड्या वेळाने समुनेच सुरुवात केली. कसा दिलास गं गजरा? पाच रूपयाला एक ताई. बघ ना सुगंध कसा दरवळतोय. किती देऊ? समुने तिला शेजारच्या एका बाकडयावर बसवलं आणि विचारलं. शाळेत जातेस की नाही? मी नाही पण सोनू जातो ताई. माझा छोटा भाऊ. तिचं नाव गौरी होतं. गौरी अगदी उत्साहात म्हणाली. सोनू शाळेत जातोय याचा भलताच अभिमान तिच्या डोळ्यात दिसत होता. तू का नाहीस जात मग?समुने विचारलं. मी जात होते पण माझे बाबा दूर गेले आमच्यापासून दुसऱ्या गावाला. आई कामाला जाते पण माझी आज्जी आजारी आहे मग माझ्या आणि सोनुच्या पुस्तकांसाठी पैसेच नव्हते म्हणून मीच आईला बोलले की आपण सोनूला शाळेत पाठवू मग तो खूप मोठा माणूस होईल. एवढ्या लहान वयात परिस्थितिची एवढी जाण असणं हे केवळ न पटण्यासारखं होतं. काही वेळात गौरी उठली आणि म्हणाली ताई मी निघते माझ्या गावी जाणारी शेवटची बस निघून जाईल आई माझी बसजवळ वाट पाहत असेल. समु देखील तिच्या सोबत निघाली. गौरी पळत पळत जाऊन एका बाईला बिलगली जिचं वय जेमतेम २६ वर्षे असेल.तिच्या हातात देखील गजऱ्यांची मोठी टोपली होती. समुने गौरीला दुरुनच निरोप दिला व ती घरी निघाली.

         समु प्रवासात पुर्ण वेळ तिच्यासाठी काय करता येईल याचा विचार करत होती. बाबांशी ती आजच या विषयावर बोलणार होती. ती घरी पोहोचली तेव्हा बाबा ग्रामपंचायत कार्यालयात निघाले होते त्यांना यायला उशीर होईल असं ते सांगून लगेच निघाले. आता ह्या बाबतीत बाबांशी बोलणं देखील तितकंच गरजेचं होतं. समुने सगळं आवरलं आणि ती बाबांची वाट पाहत तिथेच घराच्या माजघरात पहुडली. साधारण ९:३० च्या सुमारास दारावर टकटक झाली आणि समुला जाग आली. डोळा कसा लागला हे तिचं तिलाच समजलं नाही. ती उठली आणि दरवाजा उघडला. समोर बाबा होते. समुने बाबांना आत येण्याचा इशारा केला व ती पाणी घेऊन बाहेर आली. बाबा म्हणालेच "काय समुबाळ मला वाटलं झोपला असाल. आजकाल कामामुळे दमता ना तुम्ही की काही खास आहे आज?" " काय ओ बाबा सतत मस्करी करत असता. मला बोलायचं होतं थोडं तुमच्याशी. समु म्हणाली. " बोला की, कोणती गोष्ट त्रास देतेय." समुने बाबांना तिने गौरीला पाहिल्यापासून ते आजपर्यंत संपुर्ण हकीकत सविस्तर सांगितली. त्यावर बाबा म्हणाले. " खरंतर समुताई मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुमचे विचार खरोखर मी गेल्यानंतरही मला जिवंत ठेवतील ही गोष्ट पटली मला. कारण मी ज्या गोष्टी केल्या त्या मी तुमच्यावर लादल्या नाहीत. तुम्ही तेच कराल जे तुम्हाला योग्य वाटतं.पण आज माझे संस्कार जिंकले बघा. आपण उद्याच गौरीला भेटतोय आणि तिच्या विषयी एखादा चांगला निर्णय घेऊ. अगदी तुम्हाला पटेल तो."

हे ऐकून समु बाबांना बिलगली. बऱ्याच दिवसांनी तिचं मन जरा शांत झालं पण तरीही उदयाच्या दिवसाची ओढ मनाला लागली होती. सकाळी नेहमीप्रमाणे समु तयार झाली बाहेर बाबा ही आवरुन बसले होते. दोघे लगेचच स्टेशनच्या दिशेने निघाले. गौरी आजही तिथेच उभी होती. समु तिच्या जवळ गेली व तुझ्या आईकडे जायचं आहे घेऊन जाशील का? असं विचारलं.   " नाही गं ताई. आई मला सकाळी इथे सोडते व संध्याकाळी स्टॉपवर भेटते. दिवसभर ती कुठे असते मला माहीत नाही" गौरी म्हणाली. म्हणजे आता नवी परीक्षा. पण आज ह्या मुलीची ह्या धकाधकीच्या आयुष्यातून सुटका करायचीच हे ठरवून आलेली समु तिला म्हणाली " माझ्यासोबत येशील आपण तुला नवीन कपडे घेऊयात." समु म्हणाली. " नको ताई. आता माझा वाढदिवस येईल ना तेव्हा आई मला कपडे घेणार आहे आणि आईने सांगितलं आहे कोणाकडून काहीच घ्यायचं नाही आणि ही जागा सोडून कुठेच जायचं नाही" गौरीने आपलं म्हणणं समुला पटवून देण्याचा प्रयत्न केला ज्यात आईची काळजी देखील जाणवली. शेवटी बाबांनी समुला आपण इथेच थांबुयात हिच्यासोबत असं सांगितलं जे अगदी समुच्या मनात होतं. त्या दोघांनी दिवस तिच्याच सोबत घालवला. दुपारी तिने तिच्या छोट्याश्या पिशवीतून एक कागदाची सुरळी काढली ज्यात एक भाकरी होती ज्यावर तिखट माखलं होतं. हे पाहून समुच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आलं. आवडीची भाजी नाही म्हणून रडणाऱ्या आजकालच्या मुलांसमोर ही अकाली मोठी झालेली पोर ती डोळे भरून बघत होती. बघता बघता संध्याकाळ झाली. तिच्या शेवटच्या बसची वेळ झाली. बाबा व समु तिच्यासोबत स्टॉपवर आले. तिची आई तिथेच थांबली होती रोजच्याच जागी. गौरी पळत जाऊन तिला बिलगली.  समुच्या बाबांनी तिच्या आई बरोबर बोलायला सुरुवात केली. "खूप लाघवी आहे ओ पोर तुमची आणि एवढ्या लहान वयात इतकी समज कशी काय?आबासाहेब. "काय करणार साहेब, लग्न होऊन १० वर्ष झाली आन आता हिचा बाप भरला संसार सोडून एका बाईकडे निघून गेला. घरातला कमावता तोच होता आता स्वतःसाठी नाही ह्या पोरांसाठी तरी हातपाय हालवायला लागणार होते म्हणून हे सगळं." ती बाई उत्तरली. "आणि मग हिच्या शिक्षणाचं काय? ती जन्मभर हेच करेल? समुचे बाबा. " मी माझ्या रोजच्या कमाईतून काही रक्कम बाजूला ठेवतेय दादा ज्यामुळे ही पुढच्या वर्षी नक्की शाळेत जाऊ शकेल बघा." आईच्या मनाची होणारी घालमेल अगदी स्पष्ट दिसत होती. समुचे बाबा म्हणाले "आजपासून आमच्या घरी रहायला याल. तसं खूप मोठं नाही पण जेमतेम ५-६ माणसं राहतील एवढं घर आहे आमचं. मी पेशाने शिक्षक होती. काही दिवसांपूर्वी निवृत्त झालो पण शिक्षणकार्य सुरुच ठेवलंय. त्यामुळे गौरी देखील शिकेल आणि माझ्या समुला एक मोठी बहिण मिळेल जिची तिला कायम गरज होती. हे ऐकून ती बाई निःशब्द झाली. परिस्थिति कितीही बिकट असली तरीही कष्ट करणारा, लढणारा कधीच मागे पडत नाही हेच खरं. "दादा माझ्या घरी सासुबाई आहेत. माझा छोटा मुलगा आहे. त्यांच्याशी बोलते मग सांगेन. पण तुम्ही इतकी काळजी करताय त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. इतक्यात समु म्हणाली. ताई आम्ही गाडी घेऊन आलोय गं आपण लगेचच तुमच्या घरी जाऊन आईंना व सोनूला आपल्या घरी घेऊन जाऊ. समुच्या आनंद अगदी स्पष्ट दिसत होता. इतक्यात गौरी ओरडली, "आई.. ती बघ आपली शेवटची बस निघाली.. चल लवकर." इतक्यात समुचे बाबा म्हणाले "गौरी बाळा तुझ्या शेवटच्या बसला शेवटचं एकदा डोळे भरून पाहून घे गं." जी शेवटची बस गौरी आणि सर्वांच्याच कायम लक्षात राहिली.

©श्वेता कुलकर्णी♥️