आम्रपाली अजातशत्रूला स्वतःच्या महालात घेऊन गेली.
आम्रपाली -"सैनिक नाव काय तुझं?"
राजा -"सैनिकाला नाव नसतं, असत फक्त कर्तव्य, माझ्यासारखे कितीतरी अनाम सैनिक लढयांमध्ये स्वतःच्या राष्ट्रासाठी प्राणांची आहुती देतात. युद्ध किंवा मरण हेच त्याचे जीवन."
आम्रपाली -"सैनिक तू माझ्या वैशालीसाठी लढलास, माझ्या मातृभूमीसाठी तू जिवाची बाजी लावली, माझ्या मातृभूमीसाठी तू स्वतःच रक्त सांडल आहे. तू वंदनीय आहे. तू पूजनीय आहे. तू महान आहेस सैनिक.
दासी या वीर योद्ध्याची काळजी घ्या. वैद्य राजांना बोलवा. माझ्या वैशालीसाठी जिवाची बाजी लावणाऱ्या सैनिकाचा जीव वाचलाच पाहिजे."
( दासी अजात शत्रूला चिकित्सालयात वैद्य राज्यांकडे घेऊन गेल्या.)
आम्रपाली स्वतः जातीने अजातशत्रूची काळजी घेत होती.
घायाळ अजातशत्रूची सेवा करता करता आम्रपाली त्याच्या प्रेमात घायाळ झाली होती. अजातशत्रूसारखा देखणा, राजबिंडा वीर पुरुष, देशभक्त, स्वाभिमानी आम्रपालीला आवडला नसता तरच नवल! अजातशत्रू पण आम्रपालीच्या आरसपानी सौंदर्यावर भाळला होता. परंतु अजातशत्रूंने घातपाताच्या भयान स्वतःची खरी ओळख आम्रपालीला सांगितलीच नाही. आम्रपाली सैनिकाच्या प्रेमात आकन्ठ बुडाली होती. तिला त्याच्याशिवाय काही सुचेना, तिचं जगणं, श्वास घेण, नृत्य, गायन, सर्व सर्व तिच्या प्रिय सैनिकासाठी होतं. अजातशत्रूही आम्रपालीच्या प्रेमाचा स्वीकार करत तिच्यावर जीव टाकायला लागला होता. पण म्हणतात ना फुलाचा सुगंध, नदीचा प्रवाह आणि प्रेमाची धग कितीही लपवली तरी लपत नाही.
वैशालीच्या प्रत्येक नागरिकाच्या तोंडी आम्रपाली आणि सैनिकाची प्रेम कहाणी होती. नगर प्रमुखाने आम्रपाली आणि अजातशत्रूला भेटायला बोलावलं..
नगरप्रमुख -"आम्रपाली, सैनिक मी जे ऐकलं ते खरं आहे का?"
आम्रपाली -"होय, हा आपल्या वैशालीचा वीर सैनिक आहे आणि माझं ह्याच्यावर प्रेम आहे.
नगरप्रमुख -"तुझं काय म्हणणं आहे सैनिक?"
राजा -"प्रेमाला कबुली द्यावी लागत नाही. हवा दिसत नाही परंतु ती असते. तसेच प्रेमाचे आहे."
नगरप्रमुख -"आम्रपाली तु जा मला सैनिकाशी एकट्यात बोलायचं आहे, सैनिक तुला माहिती आहे तू अगदी अजातशत्रूसारखाच दिसतोस!"
राजान कुठलंच उत्तर दिलं नाही.
नगरप्रमुख -"मी तुला बंदी बनवून मगधला घेऊन गेलो तर?"
राजा -"निशस्त्र सैनिकावर वार करणं युद्धनीती नव्हे!"
नगरप्रमुख -"पण राजनीति तर आहे ना!"
राजा तिथून निघून मगधला परत गेला. इकडे आम्रपाली सैनिकाच्या विरहात पोळून निघाली. तिला अन्न गोड लागेना, तहान-भूक, रात्रीची झोप,दिवसाची दिनचर्या सगळं सगळं ती विसरली. प्रेमातूर आम्रपालीला केवळ आणि केवळ सैनिकाचा ध्यास लागला होता. ती विरहिणी झाडा-वेलींना, पाना-फुलांना तीच्या दासी-सख्यांना सांगत होती. वारंवार पटवून देत होती की, \"प्रेमा इतकी दुसरी कुठलीच भावना उदात्त नाही. प्रेम माणसाला दुसऱ्यासाठी जगायला शिकवत, त्याग, समर्पण, विनम्रता करूणा, दया या भावना मग आपोआपच त्या व्यक्तीच्या अंतर्मनात फुलून येतात.\"
काही दिवसांनी राजा-अजातशत्रू वैशाली नगरात आम्रपालीला भेटायला परत आला.आम्रपालीने त्याच्याकरता सुंदर नृत्य केलं. त्याच्या विरहातील तिने स्वतःची मनोवस्था त्याला निवेदन केली. पण यावेळी मात्र अजातशत्रूला आम्रपालीशी खोटे बोलवत नव्हते. तिच्या निस्सिम प्रेमाची तो प्रतारणा करतो आहे, अशी बोच त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. न राहून शेवटी अजातशत्रूंने स्वतःची खरी ओळख आम्रपालीला करून दिली.
अजात शत्रुने स्वतःची ओळख मगधचा सम्राट अशी करून दिल्यावर आम्रपाली ची प्रतिक्रिया काय होईल? ती अजात शत्रूवर पूर्वीप्रमाणेच निस्सीम प्रेम करेल की, वैशालीचा शत्रू म्हणून त्याला ठार करेन? बघूया पुढल्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत…
©® राखी भावसार भांडेकर.
जय हिंद.
**********************************************
सदर कथा ही संपूर्णतः काल्पनिक असून केवळ वातावरण निर्मितीसाठी ऐतिहासिक घटना आणि पात्रांचा या कथेमध्ये उपयोग करण्यात आलेला आहे. इतिहास असाच घडला असेल असा लेखिकेचा दावा नाही.