अभिसारिका भाग एक

Story Of Ajatshatru And Aamrpali
भारत भूमी अनेक वीरांगणाची भूमी आहे. इथे कैकयीने दशरथ राजाला युद्धात मदत केली होती, तर माद्रीने मद्र राजाचा रथ चालवला होता. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, चांदबिबी ह्या याच भारत भूमीच्या लेकी आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट अशाच एका देशभक्त राजनर्तकीची. आपल्या प्रियकरावर मनापासून प्रेम करणाऱ्या अभिसारिकेची. ही कहाणी आहे - आम्रपालीची!

आम्रपाली वैशाली गणराज्याची राजनर्तकी होती. दिसायला अतिशय देखणी, नितळगौर कांती, कमनीय बांधा, मृगनयनी डोळे, सुंदर धारदार नाक, विपुल काळा केश सांभार, नृत्य, गायन, आणि काव्य करणारी आम्रपाली जणू भुलोकीवर अवतरलेली स्वर्गातली साक्षात अप्सराच.


आज पासून सुमारे अडीच तीन हजार वर्षांपूर्वी भारत वर्षात वैशाली हे एक प्रमुख गणराज्य होते. म्हणजे विचार करा, लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या अमेरिका आणि ब्रिटनच्या हजारो वर्षाआधी आपल्या भारतातच लोकशाही शासन प्रणाली अस्तित्वात होती. तर झालं असं की, वैशालीच्या वसंतोत्सवात आधीची राजनर्तकी नृत्य सादर करत होती. आम्रपालीने त्या राज नर्तकीच्या नृत्यातली चूक दाखवली आणि स्वतः तिथे शास्त्रयुक्त बहारदार नृत्य सादर केले. वैशालीच्या नियमानुसार आम्रपालीची मग राजनर्तकी म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी नगरप्रमुखांनी आम्रपालीला विचारले…


प्रमुख -"मुली तुझी आई कोण?"

आम्रपाली -"वैशाली माझी माता आहे."

प्रमुख -"तुझ्या पित्याचे नाव काय?"

आम्रपाली -"वैशालीनेच माझे पालन पोषण केले आहे म्हणूनच वैशालीच माझे वडील आहेत."

प्रमुख -"तुझे नृत्यशास्त्रातले गुरु कोण?"

आम्रपाली -"माझे नृत्यशास्त्रातील गुरु आहेत कुलपती महानाम."

आम्रपालीच्या उत्तराने समस्त वैशालीचे नगरजन फारच प्रभावीत झाले आणि त्यांनी आम्रपालीच्या नावाचा जयघोष केला.

तिकडे मगधच्या राजवाड्याच्या गुप्तहेरांच्या बैठकीत राजा अजात शत्रू मात्र अस्वस्थ चकरा मारत होता.अजातशत्रूला काहीही करून कसेही करून वैशाली हे गणराज्य जिंकायचे होते पण, अनेक वेळा वैशालीवर आक्रमणे करून सुद्धा अजातशत्रूला यश मिळाले नव्हते. कदाचित त्यामुळेच राजा अधिकच क्रोधाग्नि मध्ये जळत होता.


राजा -"वैशाली एवढेसे गणराज्य आणि मगध एवढे मोठे साम्राज्य तरीही प्रत्येक वेळी आम्हाला पराजयाचे तोंड पहावे लागते."

सेनापती -"महाराज आपले सैनिक लढाया करून थकले आहेत. त्यांना आरामाची,विश्रांतीची गरज आहे."

राजा -"लढाई हेच सैनिकाचे जीवन आणि युद्धभूमी हीच सैनिकांसाठी विश्रांतीची जागा. प्रत्येक सैनिकांन हृदयाच्या अखेरच्या ठोक्यापर्यंत, शरीरातील शेवटच्या श्वासापर्यंत,अन रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढले पाहिजे. तीच त्याची मुक्ती. महामंत्री युद्धाची तयारी करा, यावेळी आम्ही स्वतः युद्धाचे नेतृत्व करू आणि वैशालीला जिंकू."

राजा अजातशत्रूने चिलखत, शिरस्त्राण असा सैनिकाचा वेश धारण केला. राजमातेला भेटायला ते गेले परंतु राजमातेला सुद्धा युद्ध अजिबात आवडत नसे. तसे त्यांनी आपले पती बिंदुसार आणि आता पुत्र अजातशत्रू यांना वारंवार सांगून, विनंती करूनही त्या दोघांनी राजमातेची विनंती धुडकावली होती.

राजा -"राजमाता यावेळी आम्ही स्वतः वैशालीवर आक्रमण करणार आहोत. आम्हाला विजयाचा आशीर्वाद द्या आणि राज तिलक लावून लढाईची संमती."

राजमाता -"महाराज वैशालीच्या सैनिकांना कमी लेखू नका. ते सैनिक एखाद्या साम्राज्यासाठी किंवा राजासाठी लढत नाहीत तर स्वातंत्र्यासाठी आणि स्वतःच्या सार्वभौमत्वासाठी लढतात. तुमच्या पिताश्री महाराजांनी पण वैशालीवर चढाई केली होती पण, विजय मात्र लिचवि सेनेचा झाला."

राजा -"माते आम्हाला माहित आहे वैशाली तुमची मातृभूमी आहे म्हणून, वैशाली बद्दल तुमच्या मनात गाढ श्रद्धा आहे. पण तुम्ही आता हे कदापि विसरू नये की, तुम्ही मगधची महाराणी आणि मगधच्या जनतेची राजमाता आहात. येतो आम्ही."

अजातशत्रूने वैशालीवर आक्रमण केले. वैशालीच्या नागरिकांना दवंडी पिटून मगधच्या आक्रमणा बद्दल सांगण्यात आले. वैशालीच्या सीमेवर तुंबळ युद्धाला सुरुवात झाली. रणभरी, नगारे, दुदुंभी, तुतारी,त्याचबरोबर तलवारींचे टणत्कार, हत्तींचे चित्कार,घोड्यांच्या किंकाळ्या, सैनिकांच्या आरोळ्या, किंचाळ्यांनी आसमंत निनादू लागला. या भयानक रणसंग्रामात अनेक सैनिक धारातीर्थी पडले. काही अपंग झाले, आणि मोडक्या तुटक्या शस्त्रांचा नुसता खच पडला होता. राजा अजातशत्रू गंभीररित्या जखमी झाला होता. मगधची सेना परत एकदा परास्त झाली होती. जीव वाचवण्यासाठी अजातशत्रूने वैशालीमध्ये प्रवेश केला. तिथेच त्याची भेट आम्रपालीशी झाली.

पुढच्या भागात बघू की आम्रपाली सैनिकाच्या वेशात असणाऱ्या वैशालीच्या शत्रूला म्हणजेच अजातशत्रूला ओळखून शासन करते की, स्वतःच त्याच्या प्रेमात गुंतून जाते?

तोपर्यंत कथा कशी वाटली ते नक्की कळवा तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत


©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.



*******************************************************

सदर कथा ही संपूर्णतः काल्पनिक असून केवळ वातावरण निर्मितीसाठी ऐतिहासिक घटना आणि पात्रांचा या कथेमध्ये उपयोग करण्यात आलेला आहे. इतिहास असाच घडला असेल असा लेखिकेचा दावा नाही.


🎭 Series Post

View all