Feb 25, 2024
नारीवादी

अभिसारिका भाग तीन (अंतीम)

Read Later
अभिसारिका भाग तीन (अंतीम)

जलद कथा मालिका लेखन 

भारत भूमी ही संतांची भूमी आहे, महंतांची भूमी आहे. साधू, महात्मे, राजे, महाराजे, सरदार आणि सम्राटांची कर्तव्यभूमी आहे. या भूमीत अनेक राजे-राजघराणी उदयास आली आणि काळाच्या उदरात गडपही झाली. इथे अनेक युद्ध्ये झाली, लढाया लढल्या गेल्या. हिच्यावर आक्रमणे झाली. हिचे वैभव अनेकांनी दोन्ही हातांनी लुटले, तर अनेकांनी अनेक वर्षे इथे सत्ता उपभोगली. पारतंत्र्याचा आणि गुलामीचा एक मोठा कालखंड या भारतभूमीने सोसला आहे.

आज जगात सगळीकडे अशांतता,अराजकता आहे.अनेक युद्धे विनाकारण लढली जात आहेत. मोठ्या महासत्ता छोट्या,छोट्या देशांचा घास घेवू पाहत आहेत.पण त्याच वेळी माझी ही माय भूमी आज संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देत आहे.


**************************************************

मागच्या भागात आपण पाहिलं की आम्रपालीच्या प्रेमामुळे अजात शत्रूला स्वतःची खरी ओळख तिच्यापासून लपवता आली नाही. अजात शत्रूने स्वतःची खरी ओळख आम्रपालीला सांगितल्यानंतर बघूया या प्रेम कहाणीचा काय शेवट होतो तो…


आम्रपाली -"सैनिक तू एवढे दिवस कुठे गेला होतास? तुझ्याशिवाय एक एक क्षण युगांयुगानहून मोठा होता. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही."

राजा -"आम्रपाली मी सैनिक नाही."

आम्रपाली -"सैनिक नाही मग कोण आहेस? पुरे झाली आता गंमत. चल नौका विहारास जाऊ."

राजा -"अंबा ऐकना! मी वैशालीचा सैनिक नाही. मगधचा राजा अजातशत्रू आहे."

आम्रपाली -"तुझं आपलं काही तरीच. आता चेष्टा बंद कर आणि लवकर चल."

राजा -"अंबे अग तुझ्या गळ्याची शपथ. मी अजातशत्रू आहे. मगधचा सम्राट अजातशत्रू!"

आम्रपाली -"(रागाने) काय? म्हणजे एवढे दिवस तू माझ्याशी खोटे बोललास? माझ्या भावनांशी खेळलास? माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं? आम्रपालीने एका वैऱ्यावर, शत्रूवर प्रेम केलं? मला माझ्या प्रेमाची, स्वतःची घृणा वाटते. (राजाकडे बघून) निघून जा! माझ्या मनातून, आयुष्यातून, भवनातून, माझ्या वैशाली मधून निघून जा! निघून जा आणि परत कधी येऊ नकोस. आत्ताच्या आत्ता माझ्या जीवनातून चालत हो!!"

संतापाने आम्रपाली थरथरत होती. तिच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या वाक्यांनी,अजातशत्रूच्या शब्दांनी,आम्रपालीवर वज्राघात झाला होता. एकाच वेळी राग, संताप,आत्मग्लानिने आम्रपाली थरथरू लागली. संतापारितेकाने तिने अजातशत्रूला तिच्या भावनातून जाण्यास सांगितले.

ती नगर प्रमुखा कडे गेली. तिला स्वतःचा खूप राग येत होता. स्वतःविषयी तिच्या मनात घृणा उत्पन्न झाली आणि अजातशत्रू विषयी तिरस्कार.


आम्रपाली -"नगरप्रमुख मी राज नर्तकीपदाचा त्याग करते आहे."

नगरप्रमुख -"कारण तुझ अजातशत्रूवर प्रेम आहे म्हणून? तुला मगधची महाराणी व्हायचं आहे म्हणून?."

आम्रपाली -"नाही ! नाही!! हे साफ खोट आहे. त्याने मला दगा दिला आहे, अंधारात ठेवल आहे. माझं प्रेम फक्त माझ्या वैशालीवर आहे."

नगरप्रमुख -"आम्रपाली खोट बोलू नकोस! तुझ्या या गुन्ह्यासाठी नगरजनांनी तुला देहांत शासन करायचं ठरवलय."

आम्रपाली -"माझ्या वैशालीच भलं होणार असेल, माझ्या देहांत प्रायश्चीत्याने नगर जन सुखी होणार असतील तर, मला हे मान्य आहे."

आणि आम्रपाली त्या वधस्तंभाकडे जायला निघाली पण, तेवढ्यात अजातशत्रूने वैशालीवर आक्रमण केलं. त्याचे सैनिक आणि अजातशत्रू तिथेच आला जिथे आम्रपाली देहांत शासन घेत होती.


राजा -"थांब अंबे! थांब. अग मी जिंकलो. मी आज वैशालीवर विजय मिळवला. आता आपल्या दोघांमध्ये कोणीही येणार नाही."

आम्रपाली -"काय माझी वैशाली हरली? माझ्या वैशालीचा पराजय झाला? नाही!"

राजा -"तू म्हणाली होतीस ना तुला आजन्म वैशालीतच राहायचे आहे. आता तू वैशालीची राजनर्तकी नसून, मगध आणि वैशालीची महाराणी आहेस."

आम्रपाली -"माझ्यासाठी तुम्ही अजून काय काय करणार? माझे गणराज्य पडले, लिचवी सेना हरली, अमानुष रक्तपात झाला, शेकडो सैनिक मारले गेले, त्यांच्या विधवा स्त्रिया, अनाथ मुलं आणि वीर सैनिकांच्या मातांच्या आक्रोशाने, रुदनाने माझे हृदय पिळवटून निघाले आहे. मला प्रेम नको, मला राज्य नको, मला ही वेदना असहनीय होते आहे. मला शांती हवी आहे. चिरंतन शांती!"


आम्रपाली शांतीच्या शोधात, अहिंसेच्या शोधात भगवान बुद्धांजवळ पोहोचली.भगवान बुद्ध त्यावेळी वैशालीच्या सीमेजवळील एका विहारात प्रवचन देत होते. आम्रपाली आत्मग्लानीने आणि आत्मघृणेने त्यांच्या चरणी लीन झाली आणि तिच्यापाठोपाठ अजातशत्रू सुद्धा धम्मात समाविष्ट झाला. पुढे त्यांनी अनेक वर्षे संघाची आणि धम्माची सेवा केली आणि प्रचारही केला. हिंसेवर अहिंसेने विजय मिळवला.©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.

**********************************************

सदर कथा ही संपूर्णतः काल्पनिक असून केवळ वातावरण निर्मितीसाठी ऐतिहासिक घटना आणि पात्रांचा या कथेमध्ये उपयोग करण्यात आलेला आहे. इतिहास असाच घडला असेल असा लेखिकेचा दावा नाही.

*******************************************
संदर्भ

फोटो साभार गुगल.

1.एनसीईआरटी चे इतिहासाचे सहावीचे पुस्तक.

2.वैशाली की नगरवधू लेखक आचार्य चतुरसेन शास्त्री.

4.लेख टंडन दिग्दर्शित आम्रपाली सिनेमा.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//