Feb 24, 2024
माहितीपूर्ण

वसंत पंचमी माहिती आणि महत्त्व

Read Later
वसंत पंचमी माहिती आणि महत्त्व
वसंत पंचमी        वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीला आज श्री पंचमी किंवा ज्ञान पंचमी असेही म्हणतात. वसंत ऋतु ला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे.


       भारतात साधारण: मकर संक्रांती नंतर खरे तर 21 डिसेंबर नंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी ही खास करून या दिवशी, नृत्य आदी कला शिकविणाऱ्या संस्था ,विद्येची देवता सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमी पासून वसंत ऋतु सुरू झाला असे समजले जाते. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही काम देवाच्या पूजेसाठी ही ओळखली जात असे. सुफी परंपरेतील चिष्टी संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलिया चे शादी अर्थ पिवळ्या फुलांच्या रंगात बुडवलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात. मध्ययुगात या दिवशी "सुवसंतक" नावाचा उत्सव होत असे.

         वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात.


           देवी सरस्वती जयंती

           सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मदेवांनी जीव आणि मनुष्य यांची रचना केली. मात्र निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहिल्यावर ती निस्तेज असल्याचे त्यांना जाणवले. वातावरण अतिशय शांत होते. त्यात कुठलाही आवाज वा वाणी नव्हती. यामुळे ब्रम्हादेव उदास आणि निराश झाले. विष्णू देवाच्या आज्ञेवरून ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूतील पाणी पृथ्वीवर शिंपडले. भूमीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीकंप पावली आणि एक अद्भुत शक्ती च्या रूपात चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकटली. त्या देवीच्या एका हातात वीणा दुसऱ्या हातात वर मुद्रित आणि इतर दोन हातात पुस्तके आणि माळ होती. ब्रम्हदेवाने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. विणीच्या सुधारणांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना मनुष्याला वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. सरस्वती देवी ने वाणी सह विद्या आणि बुद्धी सर्व जीवांना दिली. माघ महिन्यातील पंचमीला ही घटना घडल्यामुळे सरस्वतीचा जन्मोत्सव रूपात ही पंचमी साजरी केली जाते, अशी मान्यता आहे. या देवीला बागेश्वरी, भगवती ,शारदा ,वीणावादिनी ,आणि वाग्देवी अशी अनेक नावे आहेत. संगीता ची उत्पत्ती केल्यामुळे संगीता ची देवी म्हणूनही तिचे पूजन केले जाते. विद्या बुद्धी देणाऱ्या सरस्वती देवीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी केली जाते.


        वसंतोत्सव
    

     वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. वसंत पंचमी पासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. वसंत ऋतुच्या आगमनाने प्रित्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव, असे उत्सव करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. या निमित्ताने नृत्य , संगीत, वनविहार ,जलक्रीडा , आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात. वसंताचा उत्सव हे आशावादाची प्रतीक आहे. वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाफ आहे. कल्पना व वास्तवता यांचा सुगम समन्वय आहे.


        महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णाने हे गीतेत या ऋतूला "कुसुमाकर" असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो. काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून ,रंगांची उधळण करून ,वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत ऋतु मध्ये वृक्ष लता ना नवी पालवी फुटते. ते पानाफुलांनी बहरतात. निसर्गाच्या या बदलत्या स्वरूपामुळे मनुष्याची मनोवृत्ती ही उत्साही व आनंदी होते. हा उत्सव या संक्रमण स्थितीचा द्योतक आहे.  पेशव्यांच्या काळात हा उत्सव महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होत असे ,असा उल्लेख ब्रोटन यांनी केला आहे. या दिवशी स्त्री पुरुष आपल्या नातेवाईकांना फुलांचा अथवा हिरव्या देठाचा धान्याचा कणसांचा गुच्छ भेट म्हणून देत. डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत. याच दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची ही पद्धत होती. फुले, फळे ,मिठाई यांची देवाणघेवाण होत असे. वसंत ऋतुची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.

        बाजीराव पेशवे यांच्या काळात सरदारांस सोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंगाची उधळण केली जात असे. ब्राह्मण, शास्त्री, आणि अन्य सन्माननीय व्यक्तींना भोजन आणि कलावंतीणिंचे असे नृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे.


             वसंत पंचमीचा दिवस हा कुंभमेळा प्रसंगी विशेष पवित्र मानला जातो या दिवशी कुंभमेळ्यात शाहीस्नान होते.

     बिहार राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव नावाच्या गावातील सूर्य मंदिरात असलेली देवतेची मूर्ती ही वसंत पंचमीच्या दिवशी स्थापन झाली असे मानले जाते या दिवशी देवतेला स्नान घालतात आणि तिला जुनी वस्त्रे काढून नवी लाल वस्त्रे नेसवतात भाविक मंडळी या दिवशी गीत संगीत नृत्य यांचे सादरीकरण करतात.
 

        मथुरा येथील बांके बिहारी मंदिरातील 40 दिवसीय होळी उत्सवाचा प्रारंभ या दिवशी केला जातो. प्रेम भावनेचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात. या दिवशी आंब्याची पाणी गुंफलेली फुलांची माळ, गजरे इत्यादी घालण्याची प्रथा आहे.लोक या दिवशी राधाकृष्ण तसेच मदन आणि रति यांच्या प्रेमाची गीते गातात.


            भारताच्या विविध प्रांतातील वसंत पंचमी उत्सव


          मथुरा वृंदावन राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती इंद्र शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही केल्या जाते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्ती गीते म्हणत प्रभातफेरी काढतात.


          पश्चिम बंगालमध्ये या दिवशी सर्वजण पिवळी वस्त्रे परिधान करून सरस्वतीची पूजा करतात. देवीच्या पायाशी पुस्तके व लेखन या ठेवून देवीचा आशीर्वाद घेतात. काही लोक उपवासही करतात. सरस्वतीला फुले वाहतात. याला "पुष्पांजली" असे म्हणतात. या दिवशी लहान मुलांच्या पाठीवर पहिली मुळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करतात.


        राजस्थान मध्ये पिवळा पोशाख घालून ,गोड जेवण करून, पिवळ्या रंगाच्या फुलांची घराची सजावट करून ,हा उत्सव साजरा करतात राजस्थानात मोगऱ्याच्या फुलांच्या माळा गळ्यात घालणे आवश्यक मानले जाते.
          कुमाऊ पर्वतीय प्रदेशात या दिवशी महिला अपिवले वस्त्र परिधान करतात पुरुष डोक्याला पिवळी टोपी अथवा रुमाल बांधतात.


        लोचन सिंह बक्षी यांच्या मतानुसार 12 व्या शतकात भारतीय सुफी मुस्लिम व्यक्तींनी हा हिंदू उत्सव स्वीकार केल्याचे दिसते. चिष्टी संप्रदायानुसार अमीर खुसरो यांनी एका हिंदु महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धत स्वीकारली असे मानले जाते.
          वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणून शीख संप्रदायात हा दिवस उत्सव म्हणून साजरा करतो. गुरुद्वारा मध्ये सामाजिक उत्सव म्हणून या दिवसाचे आयोजन करण्याची पद्धत महाराजा रणजीत सिंग यांनी सुरू केली. या उत्सवाचा भाग म्हणून पतंग उत्सव करतात. या उत्सवाची सुरुवात अमृतसर मधील हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून झाली होती. महाराजांच्या दरबारातील विशेष कार्यक्रम या दिवशी होत असे आणि त्या दिवशी त्यांचे मंत्री आणि सैनिक पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करीत असत.        भारताबाहेर साजरी होणारी वसंत पंचमी

         भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबात सुद्धा वसंत पंचमी ही पतंग उत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. शेतातील सरसों म्हणजेच मोहरीची फुले पिवळीजर्द झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी केशर घातलेला गोड भात खाण्याची पद्धत आहे.


         बाली मध्ये "हरी राया सरस्वती" या नावाने हा उत्सव साजरा होतो. मंदिरे शिक्षण संस्था सार्वजनिक ठिकाणी येथे सकाळपासून दुपारपर्यंत प्रार्थना म्हटल्या जातात. नेहमीच्या पोषाखा पेक्षा विद्यार्थी व शिक्षक गडद रंगाचे पोशाख परिधान करतात. मंदिरात आणि देवळात पक्वान्ने प्रसाद म्हणून दिली जातात.

       अशा प्रकारे केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही वसंत पंचमी चा हा वसंतोत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
माहिती , संदर्भ आणि फोटो साभार गुगल
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//