मृगजळ भाग एक (द्रौपदी)

द्रोपदीचे कुणावर प्रेम होते?
मृगजळ भाग एक


©® राखी भावसार भांडेकर



नदीचा खळखळणारा प्रवाह किंवा निळ्या आकाशाची अथांग निळाई, सूर्याचं प्रखर तेज किंवा अग्नीतली प्रखर ऊर्जा यांचं मोजमाप होऊच शकत नाही, मग एका स्त्रीच्या पतीनिष्ठेच मोजमाप कुठल्या निकषांवर करतात ही सारी पुरुष मंडळी?

आज या महाप्रस्थानात पांडवांसह मी-पांचालीही स्वर्गारोहणाला निघाली आहे. किती काळ आम्ही चालतो आहोत ते मला माहिती नाही. दिवस रात्रीचा हिशोब मांडणं तर शक्यच नाही. असं म्हणतात एकदा स्वर्गारोहणाला निघालं की, कुणी कुणासाठीच थांबायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही की, विश्रांतीसाठी कुठे क्षणभर विसावा घ्यायचा नाही. मला हे सगळं मान्य होतं की नाही हे मी आत्ता या क्षणी सांगू शकत नाही! आणि माझं म्हणणं उभ्या आयुष्यात ज्या माझ्या पतींना कळलं नाही ते तुम्हाला तरी कसं कळणार ना! पण मी स्वतःला स्वयंवराच्या दिवसापासून पांडवांशी एकरूप केलं, म्हणूनच त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात, आनंद-क्षोभात, मयसभा-वनवासात मी त्यांची सावली बनून राहिली. कदाचित म्हणूनच ज्यावेळी धर्मराजाने स्वर्गारोहणाचा मानस व्यक्त केला तेव्हाच इतर पांडवांसारखाच मीही त्याला होकार दिला.


पांडव हस्तीनापुर मधून निघून गेल्यावर माझ्यासाठी जगण्याचं काही कारण उरलं नव्हतं. माझे मुलगे अश्वध्याम्यांन कपटाने मारले, माझा बंधू आणि दृष्टद्युम्न तोही मारला गेला. म्हणूनच सहधर्मचरणी म्हणून, एकनिष्ठ पत्नी या नात्याने आणि विवाहितेच्या धर्मानुसार पतींच्या मागे जाणे माझे प्रथम कर्तव्य होते, नव्हे तो तर आर्य पत्नीचा धर्मच होता. पण तरीही या अखेरच्या प्रवासात धर्मराजाने माझ्यावर एवढा मोठा आरोप करावा? माझ्या पतीव्रता धर्माचा अपमान करावा? माझ्या पतीपरायणतेवर प्रश्नचिन्ह लावावे? पत्नीधर्म पूर्ण करण्यात जणू मी अपयशी ठरली असंच तर त्याला सुचवायचे नाही आहे ना?

शेवटची सर्व आवरासावर करून पांडवांसह मी शेवटच्या यात्रेला निघाली. गंगेचे खोरे ओलांडले. हिमालयाचा प्रदेश मागे पडला आणि एका निर्वृक्ष माळावर येऊन आम्ही पोहोचलो. इतस्तत: दगड पसरलेले होते. तिथे दुसरे काहीही नव्हते. महिनोन महिने आम्ही चालत होतो आणि एका एकी मी खाली पडले. मला असे पडलेले पाहून भीम म्हणाला "बघ रे……… ही पडली रे!" आणि त्याने धर्माला प्रश्न विचारला, "का बरे ती अशी पडली?" माझी ती अवस्था पाहून त्या पाचात भीमच सगळ्यात जास्त माझ्यासाठी व्यथीत झाला होता. "भीमा पुढे चल ती पडली कारण तिने सर्वात जास्त प्रेम अर्जुनावर केले." धर्माने पुढे जाता जाता मागे न पाहता उत्तर दिले, आणि आयुष्यभर मनात बाळगलेली खोल जखम उघडी करून दाखवली.

मला आठवतंय अगदी तेव्हापासून मला माझं असं जीवाभावाचं कधी कुणी मिळालंच नाही. माझं जन्म तरी कसा? यज्ञाच्या आहुतींच्या प्रचंड तेजाच्या लखलखणाऱ्या ज्वाळांमधून, द्रोणाचार्यांचा सूड घेण्याच्या भावनेतून, माझ्या पित्याने-द्रुपदाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञातून झालेला.

खरंतर पांचाल नरेशाला एक शूर योद्धा, द्रोणांनी केलेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शूर लढवय्या, युद्धकला निष्णांत पुत्र हवा होता. हो केवळ पुत्रच! पण त्यांना त्या शूर पुत्रासह मिळाली मी! याज्ञसेनी, नीलवर्णी, कुरळ्या केसांची एक कन्या! पुत्र कामेष्टी यज्ञाचे फलित असं काही असेल असा विचार ना माझ्या पित्याने केला होता, ना त्या यज्ञासाठी आलेल्या पुरोहितांनी.

यज्ञात शेवटची आहुती पडली आणि यज्ञ देवतेने आकाशवाणी केली.

देवता- "द्रुपदा तुला तुझे मनोरथ पूर्ण करणारा शूर लढवय्या पुत्र देताना प्रकृतीचे वरदान म्हणून एक पुत्रीही प्राप्त झाली आहे. लक्षात ठेव ही दोन्ही मुलं मानव जातीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यावर दूरगामी परिणाम करतील! तुझी तेजस्वी कन्या आर्यवर्ताचे वर्तमान आणि भविष्य कर्ती असेल."

त्या यज्ञदेवतेच्या आकाशवाणीने पांचाल नरेश द्रुपद आनंदित होते आणि चिंतामग्न देखील. कारण त्याकाळी कन्या म्हणजे एक अस्तित्व नसलेली वंशवेल वाढवणारी स्त्री असाही एक समाजमान्य विचार रूढ होता.

🎭 Series Post

View all