हा खेळ भास-आभासाचा अंतीम भाग

Sometime Truth Is Different Than We Think


राज आणि सीमा वाड्यावर जायला निघाले. थोडे अंतर गेल्यावर राजच्या लक्षात आलं की, मागून एक कार त्यांचा पाठलाग करते होती. वाड्यावर लवकर पोहोचण्यासाठी राजने त्याच्या गाडीचा वेग वाढवला, पण नंतर त्याला कळून चुकले की, त्याच्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते. आता राज मनातून प्रचंड हादरला होता. सीमाला राजची अस्वस्थता कळत होती.

सीमा -"काय झालं? एनी प्रॉब्लेम?"

राज -"एक कार आपला पाठलाग करते आहे, आणि गाडीचे ब्रेक पण फेल झाले आहेत."

सीमा -"काssय?" (ती भीतीने ओरडली).


बरेचदा पोलिस स्टेशनच्या वार्या झाल्याने राजला एव्हाना तो रस्ता पाठ झाला होता. इन्स्पेक्टरनेही सावध राहायला सांगितले होते. म्हणूनच राजने गाडीतून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.

राज -"घाबरू नको समोर एक आडवळण आहे. मी हळूहळू स्पीड कमी करतो. त्या वळणावर आपण गाडीतून खाली उतरु आणि गाडी खाली दरीत ढकलून देऊ. ठीक आहे?"

सीमा -"तू जर सोबत असशील तर गाडीतूनच काय मी पहाडावरूनही उडी मारेल."

ठरल्याप्रमाणे राजने त्या आडवळणावर गाडीची स्पीड कमी करुन, सीमासह खाली उडी मारली. डाव्या बाजुच्या जंगलातला पालापाचोळा अंगावर घेऊन ती दोघ झाडाच्या पानांच्या खाली लपली. राजची गाडी पुढे जाऊन खाली दरीत कोसळून ती जळत होती. ज्या क्षणी राजने सीमाचा हात हातात घेऊन खाली उडी मारली त्या क्षणी त्या स्पर्शात राजला काही तरी आपलेपणा जाणवला. पाठलाग करणारी कार दहा-पंधरा मिनिटात तिथे पोहोचली. त्या गाडीने पाच मिनिटे तिथे थांबून राजच्या गाडीची कंडीशन बघितली आणि ती सर्कन पुढे निघून गेली.

थोड्यावेळाने तिथे पोलिसांची गाडी आली. राज आणि सीमा डोंगरा आडून कुणाच्या तरी मदतीची वाट पाहत होते. अर्ध्या तासाने तिथून पोलिसांची गाडी जात होती.राजने हात दखवुन ती गाडी थांबवली.

इन्स्पेक्टर -"तुम्ही दोघे ठीक आहात का?"

राज -"हो, सीमा जरा घाबरली आहे."

इन्स्पेक्टर -"बर आता पटकन गाडीत बसा. आपल्याला लवकरात लवकर वाड्यावर गेलं पाहिजे. बकुळान तसा निरोप पाठवला आहे. मला पण घातपाताचा संशय येतो आहे."

राज -"बकुळा?"

इन्स्पेक्टर-"हो ती आमची सहकारी आहे."

इकडे वाड्यावर जेव्हा सकाळी राज परत पोलीस स्टेशनला गेला, त्यानंतर दिवाणजी, मां साहेबांकडे आले.

दिवाणजी -"वहिनी साहेब, ती रमा रात्रभर किती गोंधळ घालत होती? तिचा काहीतरी इलाज करावाच लागेल!"

मां साहेब-"पण आता आपण तरी काय करणार? युवराजांनी त्या साधू बाबांना तर घालून लावले, तीच्या वर औषधांचा ही काही परिणाम होत नाहीये."

दिवाणजी-"घालवून लावले तर परत बोलावता येइल."

मां साहेब -"पण ते येतील?"

दिवाणजी -"न यायला काय होतंय? तुम्ही सांगा मी बोलवुन आणू का त्यांना?"

मां साहेब-"ठीक आहे! आमच्यासाठी रमाचं बरं होणं जास्त महत्त्वाचं आहे. बाकी सगळं दुय्यम आहे."

दिवाणजींनी, साधूची गयावया केली आणि त्याला वाड्यावर घेऊन आले. आदल्या दिवशी प्रमाणेच त्या साधूने पूजा मांडली. धुपारण्यात गौरी पेटवली. वाड्यावरची सगळी नोकर माणसं, मां साहेब, दिवाणजी हात जोडून पूजा बघत होते. साधूने रमाला खाली आणायला सांगितलं, पण ती खाली येईना! शेवटी गोड, गोड बोलून मां साहेब तिला खाली घेऊन आल्या. साधूने तिला रिंगणाच्या मधोमध बसवले आणि मोठमोठ्याने मंत्र म्हणण्यास सुरुवात केली.

सगळी मंडळी श्रद्धा ने डोळे मिटवून तिथे उभी होती. साधने पेटत्या गौरीवर कसलीशी पूड टाकली आणि सारेच मूर्च्छीत झाले. पण रमावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. कदाचीत अती औषधांचा मारा झाल्याने असेल.

रमावर काहीच परिणाम होत नाही असे पाहुन साधूने त्याचे संम्मोहन तंत्र सुरू केले. एव्हाना संध्याकाळ उलटून गेली होती.

साधू -"रमा तू खूनी आहेस, तू मला मारलस, मी पण आता तुला मारणार! चल माझ्याबरोबर,नदीवर चल!"

रमा -"मी नाही मारलं तुला! मी नाही येणार नदीवर. जा इथुन."

साधू -"तू माझं ऐकत नाहीस." तो रमाला मारु लागला. रमा ओरडत होती कींचाळत होती,

साधू -"बोल मारला की नाही तू नारुला? बोल?\"

रमा -"हो, हो मीच मारलं! पण तु मला मारू नकोस. प्लीज! मला मारू नकोस."

साधू -"चल मग आता तुझ्या वरच्या खोलीत, चल."

रमा -"हो चलते."

रमा जीना चढून तिच्या खोलीकडे जाऊ लागली. खोलीत अंधार होता. रमा खोलीत पोहोचली.

साधू -"जा! आता त्या खिडकीत जा आणि उडी मार खाली. उडी मार म्हणतो ना!"

रमा -"खिडकीकडे जाऊ लागली. ती खिडकीत उभी राहिली."

साधू -"उडी मार खाली. उडी मार लवकर."

रमा खाली उडी मारणार, एवढ्यात कुणीतरी रमाला मागे खेचले आणि पोलिसांनी साधूच्या मुस्क्या बांधल्या.

साधू -"सोडा मला! कोण आहे? सोडा म्हणतो ना!"

तेवढ्यात राजने लाईट लावला. जयने साधूला धरून ठेवले होते.

राज -"इन्स्पेक्टर कोण आहे हा साधू?"

इन्स्पेक्टर -"सांगतो आधी खाली चला. सगळ्यांना शुद्धीत येऊ द्या!"

दुसऱ्या दिवशी सगळे शुद्धीत आले. वाड्यावर पोलीस बघून सर्व जण चपापले. शारदा आणि गणू पळून जायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

इन्स्पेक्टर -"राज हे बघा! हा साधू दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या आत्याचा नवरा आहे."

मां साहेब-"सखाराम तू?"

साधू -"हो मीच!"

इन्स्पेक्टर -"गुन्ह्याची कबुली दे!"

साधू - "मी गरीब घरचा होतो, म्हणून मग मी माझ्या प्रेमाचं जाळ इनामदाराच्या बहिणीवर टाकलं. इनामदारांना आमचं लग्न मान्य नव्हतं, पण तरीही बहिणीच्या मर्जी खातर त्यांनी आमच्या लग्नाला मान्यता दिली. इनामदारांनी मला हिशोबाची जबाबदारी दिली होती, परंतु इनामदारांच्या दुसऱ्या लग्नाच्या वेळी मी पैशाचा खूप मोठा अपहार तर केलाच, शिवाय नवीन वहिनी साहेबांशी गैरवर्तनही केले, त्यामुळे इनामदारांनी सगळ्या गावासमोर मला अपमानित करून तुरुंगाची हवा खायला पाठवले. हा धक्का माझ्या बायकोला सहन झाला नाही आणि तिने आत्महत्या केली. मला आता इनामदारांच्या संपत्तीतला एक पैसाही नको होता, पण मला त्यांचा बदला घ्यायचा होता. त्यानंतर तुरुंगात माझा अनेक मातब्बर गुन्हेगारांशी संबंध आला. मी गुन्हे करत होतो आणि तुरुंगात जात होतो. मधल्या काळात माझी ओळख सीमाच्या चुलत भावाशी झाली. तोही लहान मोठे गुन्हे करून तिथे पोहोचला होता. सीमाच्या वडिलांनी सीमाच्या चुलत भावाला संपत्तीतला एक छदामही दिला नव्हता. त्यामुळे तोही माझ्या कटात सामील झाला. तो सीमाला वारंवार पैसे मागत होता. इथे आल्यावर मला कळलं की इनामदार तर जिवंत नाहीत म्हणून, मग मी राज आणि रमाचा जीव घ्यायचा मागे लागलो. जंगलातली ती आदिवासी बाई आणि ड्रायव्हरची बायको ही एकच व्यक्ती होती. तिने सीमाच्या चेहऱ्याचं मास्क लावलं होतं. त्या मुलीचे आणि सीमाच्या भावाचे अनैतिक संबंध होते. ती सीमाच्या भावाला वारंवार पैसे मागत होती, म्हणून मग आम्ही तिचाही काटा काढला. सीमाच्या ऐवजी तिला गाडीत बसवून त्या गाडीचा आम्ही अपघात घडवून आणला. माझ्या सांगण्यावरून शारदा आणि गणू वेळोवेळी रमाला हॅलोसिनेट करत होते. तिच्या गोळ्या बदलवून तिला हॅलोसिनेशनच्या गोळ्या देत होते."


इन्स्पेक्टर -" इथली सगळी खबरबात मला पोलीस स्टेशनला बकुळा देत होती. बकुळा ही आमची सहकारी आहे. खरंतर संपत्तीसाठी काहीतरी घातपात होणार असा संशय भावे वकिलांना आधीच आला होता, म्हणून त्यांनी मला आधीच दक्ष राहायला सांगितले होते. खरा गुन्हेगार पकडण्यात वहिनी साहेबांनीही आमची बरीच सहाय्यता केली. त्यांच्यामुळेच आजचा होणारा अनर्थ टाळाला. खरे गुन्हेगार आता आमच्या ताब्यात आहेत. आमचं काम संपलं येतो मी."

इन्स्पेक्टरने गावच्या मंदिरातून सीमाच्या चुलत भावाला आणि सखारामच्या इतर सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन तिथून निघून गेले.

राज-सीमा, जय-रमा यांनी वहिनी साहेबांचे आशीर्वाद घेतले. वाड्यावरचं एक मोठं संकट आता टळल होतं.


©® राखी भावसार भांडेकर.

काही गोष्टी ह्या केवळ चित्रपट आणि कथांमध्येच घडतात, त्यामुळे राज आणि सीमा चालत्या गाडीतून उतरू शकले.


हे कथानक संपूर्णता काल्पनिक असून याचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही. तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. लेखिका कुठल्याही अंधश्रद्धेला पूरक असलेल्या गोष्टींचे समर्थन करत नाही.





🎭 Series Post

View all