हा खेळ भास-आभासाचा भाग नऊ

Sometime Truth Is Different Than We Think


राज पोलीस स्टेशनला पोहोचला. इन्स्पेक्टर त्याचीच वाट पाहत होते.

राज -"नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. तुमचा फोन आला होता, काही विशेष?"

इन्स्पेक्टर -"हो बसा ना! एक बाई आली आहे पोलीस स्टेशनला, तिचं म्हणणं आहे की, ती तुमची बायको आहे."

राज -"नाव काय सांगितलं तिने?"

इन्स्पेक्टर -"सीमा." नाव ऐकून राजला एकदम धक्काच बसला. पण तरीही त्याचे मन हे मान्य करायला तयार नव्हते की, सीमा इथे देवासला येईल.

इन्स्पेक्टर -"काय झालं मिस्टर इनामदार."

राज -"एक बोलू का?"

इन्स्पेक्टर -"हो, बोला ना!"

राज -"सर मी जेव्हा पहिल्यांदा देवासला येत होतो, तेव्हा मला एका आदिवासी बाईने लिफ्ट मागितली, मी तिला लिफ्ट दिली पण तिचा चेहरा अगदी हुबेहूब माझ्या बायकोच्या-सीमाच्या चेहऱ्यासारखा होता. फक्त रंग सावळा होता."

इन्स्पेक्टर (गंभीर विचार केल्यासारखे) -"अस्स!"

राज -"हो ना! आणि जो ड्रायव्हर गाडी चालवत होता, त्याने चहा पिण्याचा बहाना करून त्याच्या घरी गाडी थांबवली, तर त्याच्या बायकोचा चेहरा ही अगदी…."

इन्स्पेक्टर -"तुमच्या सीमा सारखाच होता."

राज(आश्चर्याने) -"हो."

इन्स्पेक्टर -"मि. इनामदार मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे. मला संशय येतोय की एक मोठा कट शिजतोय. तुम्ही सांभाळून राहायला हवं. आजूबाजूच्या घटना, लोकं यांच्याकडे बारकाईने लक्ष द्या! डोळे, कान, बुद्धी, उघडे ठेवून वागा."

तेवढ्यात राजचा फोन वाजला.

जय -"हॅलो मी जय बोलतोय."

राज -"हा बोला ना! काय झालं? तुमचा आवाज एवढा घाबरा घाबरा का येतोय?"

जय -" आज मां साहेब घरी एका साधूला बोलवून रमाचं भूत उतरवणार आहे. मी विरोध केला, पण त्यांनी माझं काही एक ऐकलं नाही. प्लीज तुम्ही ते सर्व थांबवा. माझी विनंती आहे तुम्हाला, तिकडे वाड्यावर रमा पण बेफाम झाली आहे."

राज -"काssय! बर बर मी लगेच वाड्यावर पोहोचतो. तुम्ही कुठे आहात? वाड्यावर नाहीत का?"

जय -"मी तुम्हाला आत्ता काहीच सांगू शकत नाही, पण माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, माझ्या रमाला वाचवा! प्लीज!!"

राज -"इन्स्पेक्टर साहेब, मला तातडीने वाड्यावर जावे लागेल, तिकडं फार गोंधळ सुरू आहे. मी उद्या परत येतो!"

इन्स्पेक्टर -"बर ठीक आहे. गाडी जपून चालवा."

इकडे मोठ्या थाटामाटात त्या साधु महाराजांचं वाड्यावर आगमन झालं. वाड्यात पाय ठेवताचक्षणी ते एकदम ओरडले.

साधू-"आहे! तो इथेच आहे. तो कोणालाच सोडणार नाही. बम बम बम बम बम!"

दिवाणजी -"महाराज काहीतरी स्पष्ट सांगा. काही इलाज आहे का याला?"

साधू -"अरे पाखंडी बाजूला हो! आणा तिला! आणा इथे!! आता मी त्याला बाहेर काढतो आणि पळवून लावतो. तो इथून गेल्याशिवाय मी ही जाणार नाही. त्या पोरीचा जीव धोक्यात आहे आणा, आणा तिला."

वाड्यात प्रवेश केल्याबरोबर साधु महाराजांचे हे वाक्य ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वाड्यावरच्या नौकर माणसांनी तर अगदी हात जोडून साधू महाराजांच्या पायावर लोटांगण घेतलं. मां साहेबांनाही ही आश्चर्य वाटलं.

मां साहेब-" साधु महाराज आपण आत चलाव आणि मग आमच्या रमाचा इलाज करावा."

साधू -"इलाज, तो तर मला करावाच लागेल! त्या पोरीचाही आणि इथल्या सगळ्यांचाही." साधू महाराजांचे हे शब्द ऐकून दिवाणजी आणि मां साहेब दोघेही एकदम चपापले.

हॉलमध्ये एक प्रचंड मोठं वर्तुळ आखण्यात आलं. त्यात काही-बाही चिन्ह आणि वस्तू ठेवण्यात आल्या. महाराजांनी गौरी पेटवली त्यावर धूप टाकून ते मोठमोठ्याने मंत्र म्हणत होते आणि मग त्यांनी रमाला बोलवायला लावलं.


राज वाड्यावर परत आला. वाड्यावरचे ते दृश्य पाहून त्याला फारच संताप आला.

राज -"मां साहेब, मां साहेब." (तो मां साहेबांना रागारागाने बोलवत होता.)

मां साहेब-"काय झालं युवराज?"

राज -"हे काय सुरू आहे? हा कसला तमाशा मांडला आहे? बंद करा हे सगळं! ही पूजा, हे तंत्र-मंत्र! रमाला योग्य उपचारांची गरज आहे. तुमच्या या ढोंगी साधू आणि तंत्र मंत्रांची नाही!"

राजने ती सगळी पूजा उलथवून टाकली. राज त्या साधूला उद्देशून बोलला.

राज -"खबरदार परत वाड्यावर दिसलास तर!यादराख!अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांना आणि पोलिसांना बोलवून, तुझा कायमचा बंदोबस्त करेन." राज रागाने लालबुंद झाला होता. राजच्या त्या रुद्र रूपाकडे पाहण्याचं बळ मां साहेब, दिवाणजी, कोणातच नव्हतं.सगळी पांगापांग झाली.

मां साहेब आणि दिवाणजी अभ्यासिकेत कसली तरी मसलत करत बसले होते. इकडे रमा तिच्या खोलीत वेड्यासारखं काहीतरी बरळत होती, वस्तू फेकत होती, किंचाळत होती.

राजला झोप येत नव्हती. त्याच्या डोक्यात सतत विचार सुरू होते, \"मघाशी पोलीस स्टेशनमध्ये जर सीमा होती, तर ती तिथे कशी पोहोचली? इतके दिवस ती कुठे होती? जंगलातली ती बाई? ड्रायव्हरची बायको? या सगळ्या सीमा सारख्या कशा काय दिसत होत्या? जय वाड्यावर नाही तर मग कुठे गेला असेल?\" विचार करता करता राजचा डोळा लागला. सकाळी त्याला परत इन्स्पेक्टर चा फोन आला.

इन्स्पेक्टर -"मिस्टर इनामदार तुम्ही फक्त एकदा पोलीस स्टेशनला या महिलेची ओळख पटवा. प्लीज!"

राज -"ठीक आहे. येतो मी लगेच."

राजने मां साहेबांना सांगितले की, तो पोलीस स्टेशनला जात आहे. मां साहेबांनी मानेनेच होकार दिला.

इन्स्पेक्टर -"मला वाटतं तुम्ही एकदा त्या मुलीशी बोला आणि तिला सांगा की, ती तुमची बायको नाही."

राज -"ठीक आहे."

राज आणि सीमा मध्ये अर्धा एक तास प्रश्नोत्तरे सुरू होती. राजच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सीमा अगदी चोख,अचुक आणि बरोबर देत होती.
तिची उत्तरे ऐकून, राज ही मनातल्या मनात थक्क झाला. एक वेळ त्याला वाटले की, \"ही आपलीच बायको सीमा आहे.\" पण दुसऱ्याच क्षणी त्याला मागच्या सगळ्या घटना आठवल्या! त्याच्या मनाचा निर्णय पक्का होत नव्हता. त्याच मन म्हणत होतं \"ही, समोरची बाई त्याची बायको सीमाच आहे, तर त्याची बुद्धी आणि मेंदू म्हणे हा सगळा बनाव आहे. ही बाई दुसरीच कुणीतरी आहे.\"

राज -"तुम्ही जर सीमा आहात तर इतके दिवस कुठे होतात?"

सीमा -"माझ अपहरण झालं होतं."

राज -"कोणी केलं तुमचं अपहरण? का केलं? फोन कुठे आहे तुमचा?"

सीमा -"मला माहिती नाही! मी तुम्ही पाठवलेल्या गाडीत बसले आणि अर्ध्या रस्त्यातच रोडवर, अडथळा निर्माण करून माझे अपहरण करण्यात आले. त्या लोकांनी मला एका लाकडाच्या वखारीत कोंडून ठेवले होते, पण एकदा मला संधी मिळाली आणि मी तिथून निसटले. जीव वाचवत इथपर्यंत आले."

राज -"मी तुम्हाला सीमा का मानू?"

सीमा -"कारण मीच सीमा आहे!"

राज -"याला पुरावा काय?"

सीमा -"मी स्वतः सांगते आहे ना की, मी सीमाच आहे. तरीही तुम्हाला पुरावा हवा आहे."

राज -"काही विशिष्ट खूण, एखादा सबळ पुरावा असल्याशिवाय मी तुम्हाला माझी बायको सीमा म्हणू शकत नाही."

सीमा(काहीतरी आठवल्यासारखं करून)-"माझ्याजवळ लॉकेट आहे! ज्यात आपल्या दोघांचा फोटो आहे."

राज -"दाखवा ते लॉकेट!"

सीमा -(गळ्यात लॉकेट चाचपडून पाहते, पण लॉकेट तिथे नव्हते.)\"लॉकेट कुठे गेले? कदाचित रस्त्यात पडलं असेल! अपहरण कर्त्यांनी काढून घेतलं असेल! पण मीच सीमा आहे!! माझ्यावर विश्वास ठेवा." तेवढ्यात इन्स्पेक्टर तिथे आले.


इन्स्पेक्टर -"मॅडम लॉकेट माझ्याजवळ आहे."

इन्स्पेक्टरच्या हातात ते लॉकेट होते.सीमा लॉकेट घ्यायला एकदम पुढे झाली आणि लॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न केला पण इन्स्पेक्टरने तत्परतेने हात मागे घेतला.

सीमा -"राज हे लॉकेट तुम्ही मला दिले होते, पण हे लॉकेट तुमच्याजवळ कसे आले?" सीमाने इन्स्पेक्टरला उद्देशून प्रश्न विचारला.

इन्स्पेक्टर -"हे लॉकेट त्या मृत महिलेच्या गळ्यात होते."

सीमा -"राज माझा विश्वास करा, हे लॉकेट माझे आहे! मी सीमा आहे! हा माझ्याविरुद्ध काहीतरी बनाव रचलेला आहे." आणि ती रडायला लागली.

इन्स्पेक्टरने राजला एका कोपऱ्यात नेले आणि काहीतरी समजावून सांगितले.

इन्स्पेक्टर -"हे बघा मिस्टर इनामदार, कदाचित अपहरणाच्या वेळी हे लॉकेट त्या लोकांनी, ह्या बाईच्या गळ्यातून काढून, त्या मृत बाईच्या गळ्यात घातले असेल, ओळख पटावी म्हणून. मला असं वाटतं याच सीमा आहे. तुम्ही त्यांना घरी घेऊन जा."

राज -"पण इन्स्पेक्टर साहेब, माझं मन अजूनही मानत नाही कि ती बाई माझी बायको सीमा आहे."

इन्स्पेक्टर -"कधी कधी इच्छा असो वा नसो प्राप्त परिस्थिती स्वीकारल्याशिवाय पर्याय नसतो."

राज -"ठीक आहे."


राज आणि सीमा वाड्यावर सुखरूप पोहोचू शकतील का? रमाचं पुढे काय होईल. ते पुढच्या भागात पाहू


©® राखी भावसार भांडेकर.


हे कथानक संपूर्णता काल्पनिक असून याचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. लेखिका कुठल्याही अंधश्रद्धेला पूरक असलेल्या गोष्टींचे समर्थन करत नाही.

भाग नऊ.


🎭 Series Post

View all