रमाचा जन्म मूळ नक्षत्रा वर, त्यातच अमावस्येला झालेला, त्यामुळे जसजशी अमावस्या जवळ येत होती तस तशी ती बेभान, बेफाम होत होती. रारात्रभर तिचं किंचाळणं, रडणं, ओरडणं सुरू राही. सोबत आणलेल्या गोळ्याही तिने घेतल्या नव्हत्या. रमाचा अवतार बघून कुणालाही वाटे की, एकतर आता ही मरेल नाहीतर कुणाला तरी मारेल. तिला वरच्या खोलीत बंद केले होते.
सीमाच्या अपघाताची बातमी आली त्याच संध्याकाळी जय ही वाड्यावर पोहोचला. तिथे त्याला सीमा आणि रमाची हकीकत कळली. जय रमाच्या खोलीत गेला. ती फारच भयानक दिसत होती. जयला पाहून ती एकदम जयच्या अंगावर धावून गेली.
रमा -"जा इथून. जा म्हणते ना! मी नारूला मारलं! आता तुझा नंबर!! ये, इकडे ये."
जय -"रमा, रमा अग मी आहे जय."
रमा -"जय? कोण जय? मी नाही ओळखत तुला! जा इथून."
जय -"रमा, रमा माझ्याकडे बघ. माझ्याकडे!"
जय रमाला दोन्ही हातांनी पकडून गदा गदा हलवत होता. पण रमा त्याच्या चेहऱ्याकडे बघायचं टाळत होती. मग एकदम ती जयच्या मिठीत शिरून रडू लागली.
रमा -"जय, जय मी खुनी नाही. मी नारुला नाही रे मारलं! पण नारू येतो, मला त्रास देतो. म्हणतो चल नदीवर जाऊ. मला नाही जायचं नदीवर! मी नाही जाणार. जय, जय काल त्यांना मला खूप मारलं. हे बघ माझ्या पाठीवर वळ." रमाच्या पाठीवर खरंच वळ उमटले होते.
"मला मारतो तो! साप, विंचवाची भीती दाखवतो. मी नाही भिणार त्याला. जय, जय जाऊ नको रे तू! जय जय……." म्हणत रमा खाली कोसळली.
तीन दिवसात रमा फार अशक्त झाली होती. तिचा कृषदेह, डोळ्याखालची काळी वर्तुळ, अस्ताव्यस्त कपडे आणि केस, ती फारच भयानक दिसत होती. रमाच्या खोलीत जयला औषधांचं एक रॅपर दिसलं. त्यावरचं नाव वाचून जयच्या कपाळावर आठी पडली.
इकडे शारदा मांसाहेबांशी बोलत होती.
मांसाहेब -"शारदा गेले तीन दिवस तुझं कामात अजिबात लक्ष नाहीये! तू रोज संध्याकाळी कुठे जाते? वाड्यावर काम नाहीत का तुला?"
शारदा -"वहिनी साब गावात एक साधू आलय. लय सिद्ध पुरुष हाय. साऱ्यांच भूत, भविष्य,वर्तमान सारं सांगतात. म्या बी तिकडे गेलो होतो. तुम्ही बी एकदा ताई साबले घेऊन जा तिथं! ताईसाहेब नक्कीच ठीक व्हतील."
मांसाहेब-"काहीतरीच काय बोलतेस ग?"
दिवाणीजी -"पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे?" दिवाणजी सूचकपणे बोलले.
मांसाहेब-"अहो पण रमाला खोली बाहेर काढणे म्हणजे केवढा मोठा धोका! पोरीन काही कमी जास्त केलं म्हणजे?"
दिवाणजी -"मग साधूलाच वाड्यावर बोलवू."
मांसाहेब-"हो हेच ठीक होईल, शारदा तू दिवाणजींना साधू बाबांकडे घेऊन जा आणि आमच्या वतीने वाड्यावर यायचं आमंत्रण दे."
दिवाणजी आणि शारदा साधु महाराजांना आमंत्रण द्यायला देवळाकडे गेले. जय मां साहेबांशी बोलायला अभ्यासिकेत आला.
जय -"मां साहेब मला रमाच्या खोलीत राहण्याची परवानगी द्या."
मां साहेब-" रमाला तुम्ही पाहिलंच आहे! तिने तुम्हाला काही कमी जास्त केलं तर? ती पूर्ण बेफाम झाली आहे."
जय -"मी तिच्या आजाराच्या गोळ्या आणल्या आहेत. दोन दिवसातच फरक दिसेल."
मां साहेब -" जावईबापू गावात एक सिद्ध पुरुषले आहेत. आम्ही त्यांना रमाच्या इलाजा करिता वाड्यावर बोलावलं आहे."
जय -"मां साहेब तुम्हाला असं वाटतंय का की,
रमाला भूताने झपाटलं आहे आणि तुम्ही तांत्रिक-मांत्रिकाला बोलवून, तो तीच भूत काढेल? मला हे अजिबात मान्य नाही. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत."
रमाला भूताने झपाटलं आहे आणि तुम्ही तांत्रिक-मांत्रिकाला बोलवून, तो तीच भूत काढेल? मला हे अजिबात मान्य नाही. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत."
मां साहेब-"हे बघा आम्ही सगळे प्रयत्न करून थकलो आहोत, त्यामुळे हा शेवटचा पर्याय करायला काय हरकत आहे? शेवटी रमा आमचीही जबाबदारी आहे. आणि या वाड्यावरचे निर्णय फक्त आम्ही घेतो आणि ते शेवटचे असतात." मां साहेब ठामपणे बोलल्या.
जय -"ठीक आहे. आता तुम्ही ऐकायलाच तयार नाही तर मी काय बोलणार? पण मी रमाच्याच खोलीत राहणार."
मां साहेबांनी जयच म्हणणं मान्य केलं.
राजची अवस्था फारच दयनीय झाली होती. एकतर सीमाचा कुठलाच मागमुस लागत नव्हता. रमाची तब्येतही दिवसेंदिवस खालावत होती. राज खीन्नपणे वऱ्हांड्यात बसला होता. तेवढ्यात मां साहेब तिथे आल्या.
मां साहेब -"युवराज आम्ही काय म्हणतो, यावेळी दिवाळी आपण साधेपणाने साजरी करूया! दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मी भावे वकिलांना बोलावते आणि मृत्युपत्राचे वाचन करायला सांगते. नानासाहेबांची तीच शेवटची इच्छा होती."
राज -" मी काय बोलू? मी काही बोलण्याच्या, निर्णय, घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. तुम्हाला जे योग्य वाटेल तसं तुम्ही करा."
अगदी साधेपणाने दिवाळी साजरी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी मां साहेबांनी भावे वकिलांना मृत्युपत्र वाचनासाठी बोलावून घेतले.
जयने रमाला औषध दिलं होतं आणि ती तिच्या खोलीत वर आराम करत होती. खाली दिवाणखान्यात मां साहेब, जय आणि राज बसले होते. दिवाणजी बाजूला अदबीन उभे होते. भावे वकिलांनी मृत्युपत्र वाचलं. त्यात असं स्पष्ट नमूद केलं होतं की, \"नानासाहेबांची संपूर्ण संपत्ती राज आणि रमाला अर्धी-अर्धी वाटून द्यावी. मां साहेबांसाठी केवळ चोळी-बांगडी आणि दरमहा वीस हजार रुपये तनखा देण्यात यावा.\"
मृत्युपत्रात पुढे असेही म्हटले होते की, जर राज किंवा रमा यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर ती संपूर्ण संपत्ती मां साहेबांना देण्यात यावी.
मृत्युपत्राचे वाचन करून भावे वकील निघून गेले. मिळालेल्या संपत्तीमुळे राजला आणि जयला काही फारसा फरक पडला नव्हता, पण मां साहेब मात्र कमालीच्या चिडल्या होत्या.
तेवढ्यात राजचा फोन वाजला आणि तो फोन घेण्यासाठी बाहेर गेला. जय ही रमाच्या खोलीत निघून गेला.
अभ्यासिकेत जाऊन मासाहेबांनी आगपाखड करणं सुरू केलं.
मां साहेब-"शेवटी म्हाताऱ्याने डाव साधलाच! काय मिळालं मला त्या थेरड्याशी लग्न करून? ना ऐश्वर्या उपभोक्ता आलं, ना तारुण्याचा उपभोग घेता आला. सगळी संपत्ती तर वाटून दिली त्या दोघांत आणि मी जगणार आता त्यांच्या तुकड्यांवर."
दिवाणजी -"वहिनीसाहेब जरा सबुरीन घ्या. मृत्युपत्रातलं शेवटचं वाक्य विसरल्या वाटतं तुम्ही?" दिवाणजी छद्मीपणे बोलले.
"म्हणजे? आम्ही नाही समजलो?" मां साहेब.
"एकदा भूतान झपाटलेला माणूस कधीतरी बरं झालाय का वहिनीसाहेब? त्या भुताचा इलाज करावाच लागेल!" दिवाणजी सूचकपणे बोलले, आणि वहिनी साहेबांचे डोळे आशेने चमकले.
तेवढ्यात राज तिथे आला.
राज -"मां साहेब पोलीस स्टेशन मधून फोन आला होता. इन्स्पेक्टर साहेबांनी मला बोलावलं आहे. काहीतरी महत्त्वाचं काम आहे. मी जाऊन येतो."
"ठिक आहे." मां साहेब.
राज पोलीस स्टेशन कडे जायला निघाला आणि वरून रमाचा परत आरडाओरडा ऐकायला येऊ लागला. रमा हातात येईल ती वस्तू जयला फेकून मारत होती, किंचाळत होती, ओरडत होती. रमा जयच्या जीवावर उठली होती. जय घाबरा घाबरा खाली आला.
जय -"मां साहेब तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. एकदा भूतबाधा झालेली व्यक्ती कधीच बरी होऊ शकत नाही. माझे प्रयत्न संपलेत आणि धीरही. येतो मी! तुम्ही तुमच्या पद्धतीने रमाचा इलाज करू शकता." जय तिथून निघून गेला.
©® राखी भावसार भांडेकर.
हे कथानक संपूर्णता काल्पनिक असून याचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. लेखिका कुठल्याही अंधश्रद्धेला पूरक असलेल्या गोष्टींचे समर्थन करत नाही.