Feb 25, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

हा खेळ भास-आभासाचा भाग सात

Read Later
हा खेळ भास-आभासाचा भाग सात


दुपारी शारदा मुंजाचा नैवेद्य घेऊन गेली. राज, रमा आणि मासाहेब डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते.

"युवराज तुम्ही सुनबाईंना बोलवून घ्या, रमा तुम्हीही जावईबापूंना वाड्यावर यायचं आमंत्रण द्या. मृत्युपत्र वाचनाच्या वेळी ते दोघेही इथे हजर असायला हवेत." मांसाहेब बोलल्या.

"रमा, नवरा फारच प्रेम करतो वाटतं तुझ्यावर?" राज मिस्कील स्वरात बोलला.

"का रे?" रमाला राजचा रोख कळला नव्हता.

"अग तुझ्यासारख्या वेंधळ्या मुलीवर प्रेम करणारा बहाद्दरच म्हणावा लागेल!" राज हसत बोलला.

"हो का युवराज? आणि तुम्ही कोणती आसमान की परी आणली असेल याचा तर आम्हाला अंदाज सुद्धा करवत नाही!" रमाने टोला मारला.

"आधी स्वतःचं वजन बघ नंतर माझ्या बायकोचं नाव घे!" राज अजूनही रमाला चिडवत होताच.

"ए ढोल्या जरा स्वतःच्या पोटाकडे बघ, पृथ्वीच्या गोलाशी स्पर्धा करीत आहे ते." रमाने चिडून उत्तर दिले.

" हो का मिस काळी घार!" राजने परत रमाला चिडवले.

आता मात्र रमा रडकुंडीला आली होती.

"मां बघाना याला किती बोलतोय! जास्तच आगाऊ झाला आहे हा." रमा वैतागून बोलली.

"शहरात जाऊन जास्त अगाऊ मी नाही तुच झाली आहेस, किती चुरुचुरु बोलते आहेस तू." राजने प्रतिउत्तर दिले.

मां साहेब -"युवराज, रमा आता दोघेही शांतपणे जेवा, नाहीतर ठसका लागेल. जेवण झाल्यावर करा एकमेकांची मस्करी." मां साहेबांचे म्हणणं दोघांनीही निमूटपणे ऐकलं.

जेवण झाल्यावर मां साहेब, राज आणि रमा बैठकीत गप्पा मारत बसले होते.

मां साहेब -"रमा काल दुपारी त्या साडी वाल्याकडून जी बनारसी सिल्क घेतली आहे ना ती लक्ष्मीपूजनाला घाला तुम्ही."

रमा -"नाही, नाही ती साडी तुम्हीच घाला. तुम्हाला जास्त सुंदर दिसेल. मी तर मोरपंखी रंगाची पैठणी घालणार आहे, आणि राजच्या बायकोला आपण ती राणी कलरची प्युर सिल्क देऊ."

"बर बर ठीक आहे." मां साहेब बोलल्या.

"मी तुमच्यासाठी बकुळी हार काढून ठेवला आहे, तो तरी घालणार की नाही? सुनबाईंना मोहन माळ देईन म्हणते." मां साहेबांनी रमाला विचारले.


"हो नक्कीच! तुम्ही दिल्यानंतर मी का नाही घालणार? आणि वहिनीलाही आवडेल हो मोहन माळ. पण तुम्हीही लक्ष्मी हार घालायला हवा हां." रमाने होकार भरला.

राजने मग लहानपणीच्या आठवणी काढायला सुरुवात केली.

"रमा लहानपणी तू किती रडकी होतीस ग !सारखं काहीतरी मागायची आणि रडायची."

"हो का? आणि तू तर फारच गुणी मुलगा होतास रे! सारखा माझ्या खोड्या करायचास, माझ्या वेण्या ओढायचास, माझ्या बाहुल्या लपवायचास." रमा कृतकोपाने बोलली.

" रमा तुला आठवतं? आपण आमराईत आट्यापाट्या, लपाछपी खेळायचो. डब्बा गुलमध्ये तू नेहमी हरायचीस." राजच्या या वाक्यावर रमा गोड हसली.

राज पुढे बोलू लागला "नदीवर दगड मारण्याचा, भाकऱ्या खेळण्याचा आणि पाण्यावर दगडाचे जास्त टप्पे मारण्याचा खेळ खेळताना किती मज्जा यायची नाही?"

नदीचा विषय निघाल्या बरोबर रमा एकदम कावरी बावरी झाली. ती डोळे फिरवायला लागली, आणि ओरडत रडायला लागली.

"मी नाही मारलं नारूला. नाही नाही मला बॉल नको. नारू नको जाऊ, परत ये." आणि ती धाडकन जमिनीवर कोसळली. गणू ने शारदा आणि बकुळाच्या मदतीने रमाला तिच्या खोलीत नेले.

मांसाहेब-"युवराज तुम्ही तातडीने जावईबापूंना बोलवून घ्या! रमाचा आजार दिवसेंदिवस वाढतच आहे."

राजने जय ला फोन करून बोलावून घेतले. तेव्हाच त्यांने सीमालाही फोन केला.

राज -"हॅलो सीमा मघाशी फोन का नाही उचललास?"

सीमा -"अरे मला जरा बरं वाटत नाहीये! तुला माहितीये ना माझा पिरेडसचा त्रास! डॉक्टर कडे गेले होते, म्हणून नाही उचलला फोन."

राज -"बरं ऐक ना! उद्या गाडी पाठवतो आहे. तुला मां साहेबांनी वाड्यावर बोलावलं आहे."

खरं तर तब्येत ठीक नसल्याने सीमाला देवासला जाणे जीवावर आले होते परंतु \"आठ दिवसानंतर तो भामटा परत पैसे मागण्यासाठी येईल, त्यापेक्षा वाड्यावर गेलेलं बरं\" असा विचार करून सीमाने राजला होकार दिला आणि ती बॅग भरायला लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता सीमाला घ्यायला गाडी आली. गाडीचा नंबर सोसायटीच्या गार्ड़ने त्याच्या रजिस्टर मध्ये नोट करून घेतला. सीमा गाडीत बसली आणि तिचा वाड्याकड़चा प्रवास सुरू झाला. पण देवास पासून वीस-पंचवीस किलोमीटर अलीकडेच सीमाच्या गाडीचा अपघात झाला. तो अपघात इतका विचित्र आणि भीषण होता की ड्रायव्हर आणि सीमा जागेवरच गेले. गाडीच्या काचा सीमाच्या चेहऱ्यात गेल्याने तिचा चेहरा इतका विद्रूप झाला होता की, त्याकडे बघवतही नव्हते.

वाड्यावर ही बातमी पोहोचल्यावर राज तर अगदी सुन्न होऊन बसला होता. त्याला कळतच नव्हतं की, काय सुरू आहे? त्याचे मन आणि मेंदू दोन्हीही ही गोष्ट मान्य करायला तयारच नव्हते की, सीमाच्या गाडीला अपघात होऊन ती मरण पावली आहे.

दुसऱ्या दिवशी दुपारी सीमा चा शवविच्छेदन अहवाल (पोस्ट मार्टम रिपोर्ट) आला त्यामध्ये सीमा प्रेग्नेंट असल्याचे नमूद केले होते. आता मात्र राज पुरता वेडा झाला होता. तो मांसाहेबांना सांगत होता

राज -"मां साहेब अपघातात गेलेली बाई सीमा नाहीये. सीमा असूच शकत नाही."

मां साहेब -"तुम्ही एवढ्या आत्मविश्वासाने हे कसं म्हणू शकता युवराज?"

राज -"मां साहेब मी वाड्यावर आलो तेव्हा सीमाचे पिरेडस सुरू होते, आणि शवविच्छेदन अहवालात ती बाई गर्भवती असल्याचे नमूद केले आहे.  पिरेड्स मध्ये सीमाला खूप त्रास होतो, त्या करिता औषध घेण्यासाठी ती आमच्या नेहमीच्या डॉक्टर कडे गेली होती. मी डॉक्टरांशी बोलून तसं कन्फर्म केलं आहे

मांसाहेब -"बर ठीक आहे, आम्ही मान्य करतो तुमचे म्हणणे की, सुनबाई जिवंत आहेत. पण मग सध्या त्या कुठे आहेत?"

राजने त्याच्या सोसायटीच्या गार्ड़ला फोन करून विचारलं, तर त्याने सीमा त्याच दिवशी, त्याचवेळी राजने सांगितलेल्या नंबरच्या गाडीत बसून गेली होती. घरी फोन लावला तर फोनही ती उचलत नव्हती. तिचा मोबाईलही स्विच ऑफ येत होता.

जर सीमा जिवंत आहे तर ती सध्या कुठे आहे? आणि मग अपघातात मेली ती बाई कोण आहे?

©® राखी भावसार भांडेकर.


हे कथानक संपूर्णता काल्पनिक असून याचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास  निव्वळ योगायोग समजावा.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//