हा खेळ भास-आभासाचा भाग सहा

Sometime Truth Is Different Than We Think


 सीमाला पिरेड्सचा त्रास होत होता. तिचे हात,पाय दुखत होते. अंगात जरा कणकणही वाटत होती. त्यामुळे इच्छा नसतानाही डॉक्टर कडे जाण्यासाठी राज गेल्यावर, ती घरातून बाहेर पडली. सोसायटीच्या गेटच्या बाहेरच \"तो\" उभा होता, जणू काही सीमाचीच वाट पाहत! त्याला पाहताच सीमा चपापली, तिला भीतीही वाटली आणि संतापही आला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून तीने एक ऑटो थांबवला. ऑटोत बसून ती डॉक्टर कडे निघाली. तोही दुसरा ऑटोतून सीमाचा पाठलाग करत होता. दवाखान्यासमोर सीमा ऑटोतून खाली उतरली, तेवढ्यात तो तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. सीमाला आता खूपच भीती वाटत होती.

"का माझा असा पिच्छा पुरवत आहेस?" सीमा रागाने बोलली.

"अग मला का तुझा पाठलाग करायची हौस आहे? जरा पैशाची नड होती म्हणून आलो!" तो विनवणाऱ्या सुरात बोलला.

" तुला काय वाटतं रे माझ्याकडे पैशाची खाण किंवा टाकसाळ आहे? गेल्या एक-दीड महिन्यात जवळपास 20 एक हजार नेलेत तू माझ्याकडून. आता एक छदामही मिळणार नाही तुला." सीमा चिडून बोलली.

"अग अशी चिडू नको." त्याने मानभावी पणाचा आव आणला. "तुझ्याकडे पैशाची खाण नसली तरी तुझ्या नवऱ्याला करोडोंची संपत्ती मिळणार आहे." तो छद्मी पणे हसून बोलला.

त्याच्या वाक्य सरशी सीमाच्या सर्वांगावर सर्कन काटा आला.

सीमाने चिडून, घाबरत त्याला विचारले, "तुला कसं माहिती? कोणी सांगितलं तुला हे?"

" कुणी सांगायला थोडेच पाहिजे! साऱ्या दुनियेची खबर असते माझ्याकडे. बघ आता इतक्या वर्षानंतर तुला शोधून काढलेच की?"

"काय पाहिजे तुला? का मला असं छळतोस? अरे सुखी संसार आहे माझा! खूप प्रेम करणारा नवरा मिळाला आहे मला! का माझ्या सुखात असा मीठाचा खडा टाकतोस? माझं घर मोडू नकोस रे प्लीज!" सीमा काकूळतीला येऊन बोलत होती.


"अग मी कुठे काय केलं? मला जरा पैशाची गरज आहे, तेवढी पुरी कर." तो बोलला.

"आतापर्यंत हजारो रुपये दिलेत मी तुला, आता नाहीत अजुन पैसे माझ्याकडे." सीमाने चिडून उत्तर दिले.

"अग समुद्रातून घडाभर पाणी काढल्याने का समुद्र आटतो?" तो खांदे उडवत बोलला.

" पैशांचा समुद्र माझ्या मालकीचा नाहीये ना! हे बघ मला आता तुला एक रुपयाही देता येणार नाही. वाट सोड माझी!" सीमा संतापाने बोलली.

"अगं जास्त नाही, फक्त पाच हजार दे. आठवडाभर पुरतील मला." तो अजूनही पैसे मागतच होता.

"अरे मराठी कळत नाही तुला? एकदा सांगितलं ना पैसे नाहीत माझ्याकडे!" सीमा रागाने लालेलाल झाली होती.

"बर ठीक आहे मग तुझ्या रात्री झोपेत चालण्याच्या आजारा विषयी राजला मी सगळं सांगतो." त्यांने ठेवणीतले शस्त्र बाहेर काढले.

"राज तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही." सीमा ठामपणे बोलली.

"पण त्यानंतर राजच्या तुझ्या वरच्या असलेल्या प्रेमाचं आणि विश्वासच काय?" त्याचा प्रश्न अगदीच चुकीचा नव्हता.

" तू कधीच सुधारणार नाहीस का रे? कुठल्या जन्माचे पाप आहे कोण जाणे तुझ्यासारखा जन्माचा वैरी  माझ्या नशिबी आला!" सीमा व्यथित हाऊन बोलली.

"अगं ह्याच जन्माचे पाप आहे मी  त्यामुळे गप्प बसून मला पैसे दे. तेवढेच तू करू शकते." त्याचा पैशासाठीचा तगादा सुरुच होता.

सीमाला आता काय करावे सुचेना. तिचा भूतकाळ या पद्धतीने तिच्या समोर येऊन तिच्या वर्तमानात आणि आयुष्यात धुडगूस घालेल असं तिला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं.

"हे बघ आता माझ्याकडे दोनच हजार आहेत हे घे आणि  जा इथून." सीमा हतबल होऊन बोलली.

त्यांने पटकन तिच्या हातातले पैसे हिसकावले आणि तो शिळ वाजवत निघूनही गेला. सीमाच्या  हाता पायातले त्राणच निघून गेले होते. कशीबशी स्वतःला सावरत ती दवाखान्यात गेली आणि औषध घेऊन घरी परतली.

********************************************

वाड्यावर पोहोचल्यावर बकुळान राजला भाकर-तुकड्याने ओवळ्ले. राजने मांसाहेबांना नमस्कार केला.

मांसाहेब-"युवराज प्रवास कसा झाला? काही त्रास नाही ना झाला?"

राज -"मांसाहेब ही मोलकरीण कोण."

मांसाहेब -"आपली जुनी बाई होती ना, शांताबाई तिचीच मुलगी आहे ही. शांताबाईंवर नानासाहेबांचा फार विश्वास होता. पण ती आता म्हातारी झाली. महामारीत बकुळाचा नवरा गेला. मुल-बाळही नाहीये तिला. मीच ठेवून घेतले मग."

राज -"अस्सं का! बर बर. रमा आली का?"

मांसाहेब -"हो ती कालच आली आहे. तिच्या खोलीत आराम करते आहे."

राज -"मां एक बोलू?"

मांसाहेब-"अगदी नि:संकोचपणे बोला."

राजने मग वाड्यावर येताना प्रवासात घडलेला प्रसंग मांसाहेबांना सांगितला.

मांसाहेब-"हा भाग जरा जंगलाचा आहे ना त्यामुळे घडतात असे प्रसंग! तुम्हाला काय वाटतं?"

राज -"मी काय सांगू?"

मांसाहेब-"चला तुम्ही आंघोळ करून घ्या. दुपारी जेवण करीता परत भेटूच!"

राज त्याच्या खोलीत गेला आणि मांसाहेबा अभ्यासिकेत.

दिवाणजी -"वहिनीसाहेब दोन्ही पाखरं आलीत की पिंजऱ्यात!"

मांसाहेब-"पण एक मात्र गरजेपेक्षा जास्तच हुशार आहे."

दिवाणजी -"एकदा सावज जाळ्यात अडकलं की त्याच्या हुशारीचा काहीच उपयोग नसतो."

तिथेच बकुळा साफसफाई करत होती

दिवाणजी -"बकुळा तुला किती वेळा सांगितलं, मांसाहेबांच्या परवानगीशिवाय अभ्यासिकेत यायचं नाही. जा पिंपळाच्या झाडाखाली मुंज्याचा नैवेद्य ठेवून ये."

दुपारी एक दीड वाजता शारदा हातात जेवणाचे ताट घेऊन निघालेली, राजन पाहिलं. तो हॉलमध्ये पुस्तक वाचत बसला होता. बाजूलाच वहिनीसाहेब ही होत्या. राजन ते ताट पाहिलं आणि कुतूहालांना काय म्हणून विचारलं.

मांसाहेब -"युवराज तुम्ही अगदी लहान होता साधारण बारा वर्षाचे आणि रमा दहा वर्षाची. त्यावेळी तुमच्या काका साहेबांचा नारायण 14 वर्षाचा वगैरे असेल. तुम्ही तीघ नदीवर खेळायला गेला होता. रमाचा बॉल खेळता-खेळता नदीत पडला आणि रमान भोकाड पसरलं. रमा काका साहेबांची फार लाडाची, पण त्यांची अनौरस मुलगी. नारायण मात्र त्यांचा सख्खा मुलगा. रमा झाल्यानंतर रमाची आई लगेच देवा घरी गेली, त्याचा राग काकासाहेब स्वतःच्या बायकोवर म्हणजेच नारायणच्या आईवर आणि नारायण वर काढायचे. ते नारायणच्या आईला छडीने झमाझम मारायचे. लाथा, बुक्क्या, शिव्या. तिला जीव नको होई, पण नारायण कडे पाहून ती जगत होती. रमाला हे काही समजत नव्हतं. आई विना ती पोर दिवसेंदिवस हट्टी होत चालली होती.

त्यादिवशी तिचा बॉल पाण्यात पडण्याचे निमित्त झालं आणि रमान भोकाड पसरलं. हवेमुळे बॉल नदीवर तरंगत दूर गेला होता. नारायणला वडिलांचा राग आठवला आणि त्याने बॉल आणण्यासाठी नदीत उडी मारली, पण त्याला पोहताच येत नव्हतं, त्यामुळे नारायणच्या नाकात तोंडात पाणी जाऊन, त्याला जलसमाधी मिळाली. नारायणची आई या धक्क्याने वेडी झाली आणि काका साहेबांना हृदयविकाराचा झटका येऊन तेही स्वर्गवासी झाले.

या घटनेमुळे गावात सर्व ग्रामस्थ रमाकडे विचित्र नजरेने पाहू लागले आणि काही बाही बोलू लागले. तिच्यामुळेच नारायणचा जीव गेला अशी वदन्ता गावात उठली. झालेल्या प्रसंगाने रमा भेदरली होती. ती रात्री अपरात्री किंचाळू लागली, आरडाओरडा करत होती. तिला वेडाचे झटके येत. ती बरळे, रडे.

\"माझा बॉल, मी नारुला नाही मारलं!\" असं रात्रभर तिचं चालत राही. झाल्या प्रकाराने तुम्हीही घाबरले होतात म्हणूनच, मग नानासाहेबांनी तुम्हाला आणि रमाला शहरात बोर्डिंगात घातले. पुढे कॉलेजही तुम्ही दोघं तिथेच शिकलात. रमाला जपण्यासाठी मी अन नानासाहेब उन्हाळ्यात तुम्हाला आणि रमाला शहरातच भेटायला यायचो."

राज -"पण रमाच्या आईला इथं आणलं कोणी?"

मांसाहेब-"तुम्ही अगदी लहान होता. वर्ष दीड वर्षाचे तेव्हा तुमच्या आईचे देहावसान झाले
आणि मी या घरात आले. तुम्हाला दूध पाजण्यासाठी यमुनाला बोलावलं होतं. रमाची आई यमुनाची धाकटी बहीण होती. रमाच्या आईचं रूप आणि अल्लड सोळा-सतरा वर्षाचं वय. काका साहेबांसोबत सूत जुळवायला तिला वेळ लागला नाही, पण तुमच्या नाना साहेबांनी या नात्याला मात्र कधीच परवानगी दिली नाही. काका साहेबांनी कधी नारायणला प्रेमाने वागवले नाही, नारायणला वडिलांचे प्रेम दिले नाही पण तोच नारायण मेल्यानंतर मात्र ते स्वतःही जगू शकले नाही. नारायणची आई केवळ नारायण कडे बघून जगत होती. नारायणच्या मृत्यूला ती रमाला जबाबदार समजते. नारायणच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दररोज नदीवर भर दुपारी बारा वाजता हे ताट पाठवलं जातं."

राज -"मला तर हे काहीच आठवत नाही."

मांसाहेब -"पण रमाच्या मनात कुठेतरी या आठवणी खोल दडल्या आहेत आणि कधी कधी त्या वर येतात. दिवाळं सण झाला की, भावे वकील मृत्युपत्राचे वाचन करतील, मग तुम्ही आणि रमान इथे येण्याचं काहीच कारण नाही."

मांसाहेबांनी एक उसाचा टाकला आणि त्या जेवणाच्या तयारी करिता स्वयंपाक घराकडे निघून गेल्या.

©® राखी भावसार भांडेकर.


हे कथानक संपूर्णता काल्पनिक असून याचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

🎭 Series Post

View all