Feb 25, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

हा खेळ भास-आभासाचा भाग पाच

Read Later
हा खेळ भास-आभासाचा भाग पाच
त्या बाईचं असं भयाण रूप आणि किंचाळण बघून रमा ची भीतीने अक्षरशः गाळण उडाली. रमा ओरडतच हॉलमध्ये मांसाहेबांच्या कुशीत शिरली. रमा भीतीने थरथरत होती, मांसाहेबांच्या कुशीत असुनही तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता.

मांसाहेब -"काय झालं रमा?"

रमा -" ती खिडकीजवळ आहे.मला ..मला म्हणत होती…" रमाला नीट काहीच सांगता येत नव्हत. तिचे शब्द विसंगत येत होते.

मांसाहेब -"कोण आली? काय झालं? शांत हो रमा. बकुळा पाणी आण ताई साहेबांसाठी."

पाणी पिल्यानंतर रमाला जरा बरं वाटलं.
मांसाहेब - "रमा आता तुला बरं वाटत आहे का सांग बरं मला आता काय झालं ते?"

रमा -"मांसाहेब, माझ्या खोलीच्या खिडकीत एक भयंकर बाई होती. ती मला म्हणत होती की ती मला सोडणार नाही. माझं नारू दे. मला भीती वाटली फार!"

मांसाहेब -"दिवाणजी आजकाल तुमचं वाड्याकडे अजिबात लक्ष नसतं! यानंतर ती वेडी वाड्याच्या आसपास फिरकता कामा नये आणि ही चूक परत क्षमा केली जाणार नाही हे ध्यानात असू द्या!"

दिवाणजी -"जी वहिनीसाहेब."

मांसाहेब-"रमा सावर स्वतःला. मी आहे, वाड्यावर इतकी माणसं आहेत नको घाबरू. बकुळा आज रात्री तू रमासोबत तिच्या खोलीत झोप."

बकुळा -"जी वैनीसाब."

*********************************************

राज पण त्याच्यासाठी पाठवलेल्या गाडीत बसला आणि सीमाचा जीव भांड्यात पडला. राज गेल्यावर, सीमा परत दुपारी घराबाहेर पडली. रमाचा प्रवास जसा सुखा सुखी झाला तसा राजचा मात्र झाला नाही. देवास कडे जाताना मध्य प्रदेशाच्या सीमवर, जंगलात प्रवेश केल्यावर एका आदिवासी बाईने राजच्या गाडीला हात दाखवून थांबवले आणी लिफ्ट मागितली.

बाई-"ओ साब माया पाय मुरगल्ला. जरा मैल-दोन मैल गाडीत सोडा की!"

ड्रायव्हरने राजकडे पाहिले. राजने अनुमती दिल्यावर, ती बाई कारच्या मागच्या सीटवर बसली. राज चालत्या गाडीतून रस्त्याच्या दुतर्फा असलेलं जंगल न्याहाळत होता, पण थोड्या वेळातच गाडीच्या काचातून राजचं लक्ष त्या बाईकडे गेलं, त्यानं निरखून पाहिलं तर ती बाई हुबेहूब सीमा सारखी दिसत होती, फक्त रंग मात्र काळा होता. राजने मागे वळून पाहिल्याबरोबरच ती ओरडली..

बाई -"थांबा थांबा हितच थांबा."

ड्रायव्हर -"काय झालं बाई?"

बाई -"मला हितच सोडा. जातो म्या!"

राजला मात्र ही गोष्ट फारच विलक्षण वाटली, पण त्याने तिकडे काना डोळा केला. त्याला मांसाहेबांचे शब्द आठवले.

\"युवराज एक गोष्ट लक्षात ठेवा! आपल्याला जे दिसतं ते नेहमीच सगळच खरं नसतं!"

गाडी पुढे धावत होती देवास पासून दहा-पंधरा किलोमीटर अलीकडे ड्रायव्हरने एका ठिकाणी चहासाठी गाडी थांबवली. त्या हायवे वर चहाच्या तीन चार टपऱ्या होत्या. पण ड्रायव्हर चहा घेण्यासाठी राजला एका झोपडी वजा घरात घेऊन गेला.

ड्रायव्हर -"छोटे मालक हे माझं घर. या आत या."

राज -"नको मी बाहेरच ठिक आहे."

ड्रायव्हरने त्याच्या बायकोला चहा करायला सांगितला. ड्रायव्हरची बायको चहा घेऊन जेव्हा राज समोर आली तेव्हा राजला परत एकदा धक्का बसला, कारण तिचाही चेहरा अगदी हुबेहूब सीमाच्या चेहऱ्यासारखा होता. आता मात्र राजचा जीव धडधडायला लागला. त्याने ड्रायव्हरला तिथून चालण्यास घाई केली.

राजची घाबरलेली अवस्था ड्रायव्हरच्या नजरेतून सुटली नाही. ड्रायव्हर गालातल्या गालात सुचक हसला….


©® राखी भावसार भांडेकर.


सदर कथानक हे संपूर्णतः काल्पनिक असून, त्याचा वास्तवात कुणाशीही कसलाही संबंध नाही, तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//