नानासाहेब इनामदार गेल्यानंतर काही दिवसातच बकुळा इनामदार यांच्या वाड्यावर मोलकरीण म्हणून रुजू झाली होती. आपल्या सालस वागण्याने ती वहिनी साहेबांच्या अगदी मर्जीतली आणि विश्वासू मोलकरीण झाली.
इकडे राजला मात्र सीमाच्या वागण्याचा अंदाज येत नव्हता. रात्री झोपताना राजने परत तोच विषय काढला
राज -"सीमा एक विचारू?"
सीमा -"काय रे आज अगदी परवानगी मागून सगळं विचारतो आहेस?"
राज -"तसं नाही ग! पण तुझं हे चहा पिणं, डावा हात सोडून जमत नसतानाही उजवा हात वापरण्याची धडपड! काही खास?"
सीमा -"अगदी तसेच काही नाही. पण तू परत यायच्या चार-पाच दिवस आधी देवासहून दिवाणजींचा फोन आला होता."
दिवाणजी -"मी देवास हून दिवाणजी बोलतो आहे, युवराज आहेत का?"
सीमा -"नाही ते कंपनीच्या टूर साठी बाहेरगावी गेलेत."
दिवाणजी -"परत कधी येणार?"
सीमा -"नक्की नाही, पण पाच-सहा दिवसात येतील."
दिवाणजी -"ठीक आहे त्यांना सांगा दिवाळी करता त्यांना देवासला बोलावले आहे वहिनी साहेबांनी."
सीमा -"बर ठीक आहे."
राज -"आणि तू मला हे आत्ता सांगते आहे?" (किंचित रागाने राज बोलला. राजच्या या वाक्याने सीमा फारच घाबरली. तिचं अगदी ततपप झालं.)
सीमा(पण सावरून ती म्हणाली) -"तसं नाही रे! तू वेळेच्या आधी घरी आलास! मी ही घरी नव्हते? एवढ्या दिवसांनी तु घरी आला आणि स्वयंपाकाची जेवणाची माझी काहीच तयारी नव्हती. त्या काळजीने मी जरा घाबरले आणि सांगायचं विसरले." सीमाने कशी तरी स्वतःची बाजू सावरली.
राज -"हत्त तीच्या एवढेच ना! खरं सांगू दिवाणजींनी मला मोबाईल वर मेसेज केला होता. मी फक्त तुझी गंमत केली, पण माझा मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. तू सांगितलं नाही चहा घेण्याचं आणि उजव्या हाताने काम करण्याचं कारण?
सीमाला (हायस वाटल) -"ते होय! अरे ते बाजूच्या देव काकु त्यादिवशी सोसायटीच्या पार्कमध्ये जोशी काकूंना सांगत होत्या.
सीमाला (हायस वाटल) -"ते होय! अरे ते बाजूच्या देव काकु त्यादिवशी सोसायटीच्या पार्कमध्ये जोशी काकूंना सांगत होत्या.
देव काकू -"काय बाई आमची सून नुसती वेंधळी. कामाचा अजिबात उरक नाही आणि अजून भर म्हणजे ती डावखुरी आहे."
जोशी काकू -"काय सांगताय?"
देव काकू -"हो ना हो! लिहिते डाव्या हाताने, गरम भांडी उचलते डाव्या हाताने, प्रसाद खाते डाव्या हाताने आणि कळस म्हणजे आरती पण उलटी ओवळते. जणू एखादी अवदसाच!"
जोशी काकू -"अरे देवा! मग आता?"
देव काकू -"आता काय? मी आहे ना खमकी! शिकवते आहे तिला."
जोशी काकू -"आणि ती?"
देव काकू -"शिकते आहे हळूहळू."
सीमा -"राज आपण तुझ्या घरच्यांच्या विरोधात हे कोर्ट मॅरेज केलं. त्यात तुझं घराणं खानदानी आणि सनातनी. त्या दिवशीचा दिवाणजींचा फोन, म्हणून मी सगळी खटपट करते आहे."
राज -"बर असू दे. पण मला तू डावखुरीच आवडतेस."
सीमा -"दिवाळी करता जाणार ना?"
राज -"हो गेलच पाहिजे?"
सीमा -"मी पण येऊ?"
सीमाचा जीव धाकधूक करत होता.
राज -"आत्ताच नको. आधी मला वाड्यावर जाऊन मासाहेबांचा अंदाज घ्यायला हवा, मग मागून मी तुला घेऊन जाईन."
सीमा -"बरं जशी तुझी इच्छा."
राज -"मग आता मी तुझ्या जवळ आलेलं तुला चालेल ना सीमा?"
खोलीतला दिवा बंद झाला आणि सीमा राज च्या मिठीत दुनिया विसरली. राजच्या मनात मात्र शंकेची टिटवी घिरट्या घालत होती.
दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना राजने सोसायटीच्या गार्डला काहीतरी विचारलं आणि गार्डचे उत्तर एकून राजच्या चेहऱ्यावर आठ्या पसरल्या.
©® राखी भावसार भांडेकर.
सदर कथानक हे संपूर्णतः काल्पनिक असून, त्याचा वास्तवात कुणाशीही कसलाही संबंध नाही. तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा