हा खेळ भास-आभासाचा भाग दोन

Sometime Truth Is Different Than We Think


दुसऱ्या दिवशी दुपारी दोन अडीच वाजता राज घरी आला पण घराला कुलूप होतं. दुपारी सीमा कधीच कुठे जात नसे. दुपारच्या यावेळी सीमा घरी नाही याचं खरंतर राजला आश्चर्य वाटलं. स्वतःच्या जवळच्या दुसऱ्या चावीने त्याने दरवाजा उघडला. घर तसंच होतं पण काहीतरी बदल झाला होता. त्याला लक्षात येत होतं पण नेमका काय बदल झाला हे मात्र त्याला कळेना! तो फ्रेश होऊन टीव्ही बघत होता आणि दहा पंधरा मिनिटातच त्याचा डोळा लागला.

साधारणतः दुपारी चार वाजता सीमा घरी आली.

सीमा मनाशीच विचार करत होती,(बरं झालं मी वेळेत घरी आले. साडेचार पाचला राज येणार तोपर्यंत आवराआवरी करायला हवी) दरवाजा जवळ आल्याबरोबर तिला टीव्हीचा आवाज आला. घरात यावेळी कोणी टीव्ही लावला असेल सीमाच्या चेहऱ्यावर मूर्तीमंत भीती उभी राहिली! तिने कीललि फिरवली पण दरवाजाही आतुन उघडाच होता, फक्त ग्रीलच दार बंद होतं. सीमाने बेल वाजवली पण तिचा जीव मात्र धडधड करत होता. राजने दरवाजा उघडला. राजला बघितल्याबरोबर सीमाला एकदम हायसं वाटलं आणि जरा भीतीही.


राज -"छान राणी सरकार! आम्हाला घरी बोलवायचं आणि स्वतः मात्र….."


सीमा (अगदी लाडात येऊन) असं रे काय करतोस? एक काम होतं म्हणून बाहेर गेले होते. आणि तू गेले पंधरा-वीस दिवस कंपनीच्या टूरवर असताना आम्ही इतक्या रात्री कशा काढल्या आम्हालाच माहिती?"


राज -"हो का? चल मग त्या सगळ्या रात्रींचा हिशेब पूर्ण करू." राजने सीमाला डोळा मारला.

सीमा -" चल चावट कुठला!"


राज -"सीमा मला एक सांग आजच नेमकं कोणतं काम आलं बुवा तुला?" राजचा स्वर बदलला होता.

सीमा -"आधी चहा घे मग बोलू."

राज -"बरं तू जसं म्हणशील तसं."

सीमा चहा करता करता विचार करत होती,

\"आता राजला काय सांगायचं, काय काम होतं म्हणून? पण काहीतरी सांगावं लागणार आणि तेही त्याला पटेल असं!\"

सीमा -"राज, चहा."

राज -"थँक्यू, दोन कप कोणासाठी? अजून कोणी येणार आहे का?"

सीमा -"अरे तेच तर सरप्राईज आहे. तुला चहा खूप आवडतो ना आणि माझी सोबतही! पण मी चहा घेत नाही आणि तुझ्या शब्दात सांगायचं तर लहान मुलांसारखे दूध पिते, पण श्रीमान राज साहेब इनामदार, मी आता रोज तुमच्या सोबत चहा घेणार आणि तुम्हाला सोबतही करणार!"

राज -"वाह क्या बात है सीमा!"

सीमा -"अजून एक मी एका व्यक्तिमत्व विकास आणि बॉडी लैंग्वेज डेव्हलपमेंट शिबिराला गेले होते आणि तिथेच एक ट्रेनिंग पण घेते आहे."

राज -"कसले ट्रेनिंग?"

सीमा -"अरे मी डावखुरी आहे ना! पण आता हळूहळू उजवा हात वापरायला शिकते आहे."

राज -"आज किती धक्क्यावर धक्के देणार आहेस?"


*********************************************

इकडे वाड्यावर मात्र वेगळीच घाई सुरू होती.

वहिनीसाहेब -"दिवाणजी काय म्हणाले रमा आणि रविराज?"

दिवाणजी -"रविराज…."

वहिनीसाहेब -"त्यांचं नाव आदबीन घ्या! युवराज आहे ते या इस्टेटीचे." वहिनी साहेबांचा स्वर करडा झाला होता.

देवाणजी -"माफ करा वहिनीसाहेब, युवराज येणार आहेत सुनबाईंना घेऊन!"

वहिनीसाहेब -"काय सुनबाई?"

दिवाणजी -"होय वहिनीसाहेब त्यांनी आठ-दहा महिन्यांपूर्वीच लग्न केलं आहे. प्रेम विवाह!"

वहिनी साहेब -"मूर्ख कुठला! घराण्याची परंपरा, रीत, वारसा कसालाही विचार केला नाही त्यानं! आपलाच दाम खोटा."

दिवाणजी -"एक बोलू वहिनीसाहेब?"

वहिनी साहेब -"बोला."

दिवाणजी -"एकादृष्टीने बरंच झालं म्हणायचं! इस्टेटीतला एक दावेदार कमी झाला." दिवाणजी सूचक हसले.

वहिनीसाहेब -"हो ते ही आहेच म्हणा! आणि रमा काय म्हणते येत आहे ना ती?"

दिवाणजी -"तीही गेली तिच्याच वळणावर! एका सामान्य मुलाशी तीनही लग्न केलं आहे. त्यालाही आता एक दीड वर्ष होत आहे."


वहिनी साहेब -"कार्टी गेली शेवटी आईच्याच वळणावर! आता एवढ्या मोठ्या इस्टेटिचे भवितव्य काय?"

दिवाणजी -"काय म्हणजे? तुम्ही समर्थ आहात सर्व सांभाळायला आणि मी आहेच तुम्हाला मार्गदर्शन करायला!"

वहिनी साहेब -"पण सगळं व्यवस्थित व्हायला हवं ना! अगदी जसं हवं असतं तसं!!"

वहिनी साहेबांच्या बोलण्यातला रोख दिवाणजींना कळला होता.

दिवाणजी -"तुम्ही काळजीच करू नका भावे वकील आहेतच आपल्याला कायदेशीर सल्ला द्यायला."


©® राखी भावसार भांडेकर.


 सदर कथानक हे संपूर्णतः काल्पनिक असून, त्याचा वास्तवात कोणाशीही कुठलाही संबंध नाही. तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

🎭 Series Post

View all