हा खेळ भास-आभासाचा भाग एक

Sometime Truth Is Different Than We Think



वहिनी साहेब -"दिवाणजी रविराज आणि रमाला फोन करून बोलवून घ्या. दिवाळी जवळ आली आहे. प्रत्येक गोष्ट वेळेत झाली म्हणजे आम्ही निवांत." वहिनीसाहेब सूचक बोलल्या.

दिवाणजी -"वहिनीसाहेब मी काय म्हणतो, सगळ्याच गोष्टींची एवढी घाई कशाला? नाही म्हणजे एकदा का सार उघड झालं तर? मृत्युपत्रात काय लिहून ठेवलं आहे ते त्या ब्रह्मदेवाला आणि भावे वकिलांनाच ठाऊक!"

वहिनी साहेब -"दिवाणजी जे काही असो, आम्ही अन आमचं नशीब! पण काही गोष्टी योग्य वेळेतच व्हायला हव्यात."

"आई ग ही अर्धशिशी माझा जीव घेतल्याशिवाय जाणार नाही."


दिवाणजी -"वहिनीसाहेब आज परत आपलं पित्त खवळलं वाटतं! द्या मी आपले ॲक्युप्रेशर चे पॉईंट दाबून देतो."

दिवाणजींनी वहिनी साहेबांचे ॲक्युप्रेशर चे पॉईंट दाबल्याने, वहिनी साहेबांना थोड्या वेळासाठी का होईना आराम पडला.



********************************************


सीमा -"हे रे काय राज? मी किती वाट बघते आहे तुझी! आज छान तुझ्या आवडीचा मेनू पण केला आणि तू म्हणतोस उद्या येणार! अशी बाबा फारच वाईट आहेस तू, आता तो शाही पुलाव भरल्या वांग्यांची भाजी, रायतं कोण खाणार? मी ना बोलणारच नाही तुझ्याशी!

सीमा काहीशी फूरंगटून तिचा नवरा राजशी फोनवर बोलत होती.

राज -"अगं असं काय करतेस? आता वाढला माझा टूरचा एखाद दिवस तर काय मला फासावर देणार आहेस का?"


सीमा -"मी कोण बाबा तुला फासावर देणारी? पण ऐक ना! तू परत आला की, मी तुला एक मोठ्ठ सरप्राईज देणार आहे."


राज -"अच्छा काय आहे ते सरप्राईज?"

सीमा -"असं फोनवर सांगितलं तर मग त्या सरप्राईज ची गंमत काय राहणार?"


राज -"अरे तेही खरच की, राणी सरकार आता तर हे सरप्राईज काय आहे हे जाणून घेण्यासाठी मला उद्या नक्की यावं लागेल."

********************************************


रमा -"जय मला खरंच वाटत नाही रे की, आपण दोघं असे एकत्र! तु मला एवढं प्रेम दिलं की, या क्षणाला मृत्यू जरी आला तरी मी मरायला अगदी आनंदाने तयार आहे!"

जय -" ये वेडाबाई काय हे असं वेड, अभद्र बोलायचं!"


रमा -"तसं नाही रे या अनोळखी शहरात आपण दोघ एकमेकांना भेटतो काय! आपले विचार, आपली मन जुळतात काय!! आणि मग आयुष्यभरासाठी आपण एकत्र येतो काय! फारच विलक्षण! आणि त्यातही तुला माझा आजार माहिती असूनही तु मला स्वीकारलं म्हणून मला जास्तच हुरळून गेल्यासारखं वाटतंय! तुला माहिती आहे जय काही लोकांना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या स्वतःच्या हक्काचं असं काही मिळतच नाही. कायम दुसऱ्याच आश्रित म्हणून जगताना स्वतःच मन, भावना, आत्मसन्मान, इच्छा काय काय मारावे लागतं ते तुला नाही कळणार!

सारं तुमच्यासमोर असतं, पण तुमचा कशावरच हक्क नसतो, कुणी हक्काचं माणूस नाही, आई नाही, बाप नाही, मित्र नाही! एकटेपणा फार भयाण असतो रे!"

रमाचा व्यथित, कातर स्वर जयला नकोसा झाला होता.

जय -"रमा काय झालं एकदम एवढी हळवी का झालीस? असं वाटतंय कुणीतरी तुला तुझ्या मनाला, तुझ्या इच्छेविरुद्ध खूप त्रास दिला आहे."


रमा -(विषय बदलत)"छे रे! तू मला तुझ्या प्रेमाचा लायक समजलंस, तुझं नाव दिलं, छोटं का असेना हे घर, हे अंगण, घराच्या या भिंती आणि ही तुझी उबदार मिठी! सारं सारं माझ्या हक्काच आहे, फक्त माझ आहे. जय थँक्यू अँड आय लव यू."

जय -"बर चल आता जेवण करूया का? मला प्रचंड भूक लागली आहे."



©® राखी भावसार भांडेकर.


सदर कथानक संपूर्णतः काल्पनिक असून,           त्याचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही, तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

🎭 Series Post

View all