आदर्श माता,जिजामाता! (भाग २)

About Jijamata



"रयतेसाठी लढ पोरा असा
ज्या आईचा आवाज होता।
क्रांतीचे स्फुरण माय जिजाऊ
सुपुत्र जिचा शिवराय होता।।"

जिजाऊ बुद्धिनिष्ठ होत्या.अंधश्रद्धाळू मुळीचं नव्हत्या . सती न जाता प्रशासन,राज्यकारभार करून त्यांनी भारतीय महिलांपुढे एक आदर्श घालून दिला. पतीला परमेश्वर मानून पतीची पूजा करत बसण्यापेक्षा पतीला सक्षमपणे साथ देणाऱ्या जिजाऊ कुशल राजकारणी होत्या.भारतीय महिलांपुढे सातत्याने खोट्या,निराधार, काल्पनिक ,अविज्ञानवादी अशाचं कथा ठेवण्यात आल्या आहेत . या सर्व मानवनिर्मित तथाकथित निती नियमांना खोटे ठरवित जिजाऊंनी आपले व्यक्तीमत्व साकारले . शिवबाला घडवित असताना अंधश्रद्धाळू प्रकार करण्याऐवजी जिजाऊंनी आपल्या विचार शक्तीचा वापर केला. एक माता आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर ,स्वकर्तृत्वावर हवं तसं घडवू शकते , हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. आदर्श मातृत्वाचं उदाहरण म्हणून जिजाऊंकडे पाहिलं जातं. हिऱ्याला पैलू पाडण्याचं कठीण काम जिजाऊंनी केलं.

मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजांच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या . या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाबाईंच्या आयुष्यातील एकच एक इच्छा \" आपलं मराठ्यांच स्वतंत्र राज्य व्हावं \" ही त्यांच्या अलौकिक पुत्राने पूर्ण केली. संपूर्ण समाजाला सुख ,समृद्ध आणि भरभराटीचे दिवस यावेत यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केले. अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्याची स्थापना करण्यास शिवबाला प्रेरित केले.जिजाऊंचा लढा हा अखंड मानवजातीसाठी , शोषकांच्या विरोधात ,शोषितांच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा होता.
जिजाऊ म्हटले की त्या शहाजीराजांच्या महाराणी ,शिवरायांची माता ,संभाजी राजांची आजी अशीच ओळख नाही तर जिजाऊ या स्वतः कर्तृत्ववान,निर्भिड, न्यायी,कार्य धुरंधर अशा स्वयंभू होत्या. बालशिवबाला स्वराज्याचे बाळकडू पाजून जनतेचे,लोकांचे राज्य निर्माण करणारी जिजाऊ लोकमाता होती. जिजाऊंमध्ये असणारे नैसर्गिक गुण,प्रभावी व रूबाबदार व्यक्तिमत्त्व, करारीपणा ,आत्मविश्वास, ममता,वात्सल्य, करुणा, मुत्सद्दीपणा, निर्णयक्षमता ,दृढनिश्चयी स्वभाव, संघटन कुशलता ,महत्त्वकांक्षा ,
त्याग,निःस्वार्थवृत्ती यातून जिजाऊ घडत गेली आणि शिवाजी राजांना घडवून स्वराजाचे स्वप्न साकार केले.
अत्यंत प्रतिकूलतेतही पाच पातशाह्यांचा निःपात करून हिंदवी स्वराज स्थापणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खरे तर हिंदूचे प्रेरणास्थान! ३५० वर्षांनंतरही छत्रपतींचे केवळ नावही घेतले तरी नसानसांत हिंदूत्व संचारते,अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण होते, अशा युगपुरूषाला ज्यांनी घडवले , त्या राजमाता जिजाऊ खरोखरचं धन्य आहेत!

राजमाता ,राष्ट्रमाता ,स्वातंत्र्यदेवता जिजाऊ मातेचे स्मरण केल्याशिवाय स्वातंत्र्यसूर्य ,छत्रपती शिवरायांचे नवयुगनिर्माणकर्ते चरित्र सांगणे कठीणचं नव्हे तर अप्रस्तुतही ठरते.

थोर विचारवंत न्या. रानडे म्हणतात,
" थोर पुरुषांचा थोरपणा जर आईच्या शिकवणीमधील स्फूर्तीवर अवलंबून असेल तर शिवाजींच्या कामगिरीत जिजाबाईंचा वाटा अव्वल दर्जाचा मानावा लागेल. त्यांच्या बळाचे जिजाबाई हेचं प्रमुख कारण होते.\"

शिवचरित्र घडविण्यात जिजाऊंचे महत्त्वाचे योगदान ठरते.पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची,प्रोत्साहनाची ,मार्गदर्शनाची फुंकर घालत त्यांना राजसिंहासनावर अधिष्ठित झालेले बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. स्वतः च्या कर्तृत्वाने अगर थोर पती मिळाल्याने ज्यांचे आयुष्य कीर्तिवंत ठरले अशा नामवंत स्त्रिया पुष्कळ आहेत . पण मुलगा अत्यंत थोर व कर्तबगार जन्मल्यामुळे जिच्या मातृत्वाची कीर्ती चहूकडे वर्षानुवर्षे गाजत राहिली अशी भाग्यवती म्हणजे राजमाता जिजाबाई!
राधा माधव विलास चंपू या काव्यात्मक ग्रंथामध्ये जयराम पिंडे या समकालीन कवींनी जिजाऊसाहेबांचे वर्णन केले आहे.

" जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई।
भलीशोभली ज्यास जायख जिजाई।।
जिचे कीर्तीचा चंबु जंबुद्विपाला।
करी सावली माऊलीशी मुलाला।।"

मराठी रक्तात जन्मतःच असणारं शौर्य आणि धैर्य आऊसाहेबांच्या रक्तात होतं.एका बखरकारांनी लिहून ठेवलयं की,"जिजाऊ सारखे कन्यारत्न ईश्वरानेचं निर्माण केले."
कितीही कठीण संकटं पुढं आली, तरी तिळमात्रही डगमगता धैर्याने तोंड देणारी होती ही मराठ्यांची मुलगी.आऊसाहेबांना आपला शिवबा उदात्त, उत्कट आणि उत्तुंग यशाचा मानकरी करायचा होता. याचं द्योतक म्हणजे शिवाजीराजांची तयार झालेली राजमुद्रा

प्रतिश्चंदालेखे वधिर्रष्णुविश्ववंदिता साहसूनो
शिवस्येषा मुदा भदाय राजतं

शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले.
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य,संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता! हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती ह्याचं मातेने घडविले ,ह्या मातेस कोटी कोटी प्रणाम ।

"शिवबाची एक एक कथा
तीच आहे जिजायन गाथा
म्हणून आजही झुकतो भारतीयांचा
जिजाऊ चरणी माथा।।

जिंवतपणा, जागेपणा, बाणेदारपणा, ईश्वरार्पणवृत्ती याच गुणसमुच्चयाचं सगुणरुप असलेल्या जिजाबाईंचे पोटी जन्म घेऊन असं एक हिंदवी स्वराज्य शिवराय आपण आम्हांला दिलतं की,
" बैराग्याची छाटी हाच जिथला झेंडा होता।
हर हर महादेव हाचं जिथला महामंत्र होता।
सह्याद्रीच्या कुशीतील गोरगरीब मावळे हेचं जिथलं बळं होतं।
हे राज्य हाचं जिथला अढळ विश्वास होता।
आणि महाराष्ट्र धर्म वाढविणं हाचं जिथला कर्मयोग होता।।