आशेचा किरण अंतिम भाग

Story Of A Daughter Who Saves Her Father's Life


आशा च्या मुली सरकारी शाळेत शिक्षण घेत होत्या, त्यातही सासूच आपलं मुलींना घर काम सांगणं सुरू होतं. तेरा वर्षाची उमा सगळं घर काम करून दुपारी साडेअकराला शाळेत जात होती. बाळासाहेबही घरात अजिबात लक्ष देत नव्हते. पण तेजस मोठा झाल्यावर बाळासाहेबांनी त्याला महागड्या इंग्रजी शाळेत घातलं. मुलं मोठी होत होती. बघता, बघता उमा बी.ए. झाली आणि बाळासाहेबांनी लगेचच तिचे लग्न लावून दिले. त्यांना डोक्यावर ओझं नको होतं. उमाचा नवरा यथातथाच होता. सतत घरकाम केल्याने उमाला अभ्यास करायला फारसा वेळ मिळत नव्हता. पण गौरी मात्र हुशार होती. दहावी, बारावीला बोर्डात ती अनुक्रमे पहिले आणि तिसरी आली होती, त्यामुळे तिने बाळासाहेबांकडे हट्ट करून एम.बी.बी.एस. ला प्रवेश मिळवलाच. पण आशाच्या सासूला ते सहन झालं नाही. सासूची मुक्तफळ उधळण सुरूच होतं.


सासू -"काय करायचं म्हणते मी एवढं शिकून? चूल आणि मूल का बाईला कधी सुटलं आहे? नुसती सोंग आहेत. काम चूकार मेल्या! आईच्याच वळणावर गेल्या आहेत."


गौरी -"आजी मला शिष्यवृत्ती मिळाली आहे आणि डॉक्टरची गव्हर्मेंटची सीट. मी काही बाबांना पैसे मागत नाही आहे माझ्या शिक्षणासाठी. मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते, मी डॉक्टर होणार म्हणजे होणारच!"

कधी नव्हे ते यावेळी मात्र आशा अगदी ठामपणे गौरीच्या पाठीशी उभी राहिली.


आशा -"हो गौरी तु शिक मी आहे तुझ्या पाठीशी. मी भरेन तुझी फी. तू शिकून मोठी हो!"

आणि गौरी डॉक्टर झाली. तिला एम.डी. करायचं होतं, त्याकरता ती एंट्रन्स ची तयारी करत होती. तेजस मात्र काठावर पास, तर कधी नापास होत, कसाबसा इंजिनियर झाला. तशीही त्याला कुठल्याच डिग्रीची आवश्यकता नव्हतीच.

आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तोही बाळासाहेबांप्रमाणेच राजकारणात गेला. आताशा बाळासाहेबांचे वय झालं होतं आणि तब्येतीच्या छोट्या-मोठ्या कुरबुरी सुरू झाल्या होत्या. तशातच एक दिवस बाळासाहेब एका मोठ्या सभेत भाषण करत असताना उभ्या उभ्या कोसळले. तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सर्व तपासण्या झाल्या. बाळासाहेबांच्या तपासण्यांमध्ये लक्षात आलं की बाळासाहेबांच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्या होत्या.


आता मात्र मोठाच पेच निर्माण झाला होता. उमाला स्वतःच्या वडिलांना किडनी द्यायची होती परंतु ती गरोदर असल्याने किडनी देऊ शकत नव्हती. चार ते पाच गर्भपात झाल्याने आशाला तब्येतीच्या असंख्य तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तिचीही किडनी चालणार नव्हती आणि ज्या मुलासाठी बाळासाहेबांनी चार कळ्या गर्भातच कुस्करल्या होत्या त्याला त्याच्या बापाला किडनी द्यायची नव्हती.

शेवटी गौरीनेच बाळासाहेबांना किडनी दिली. बाळासाहेबांचे प्राण वाचवले. काही महिन्यानंतर बाळासाहेब ठणठणीत बरे होऊन घरी परत आले. गौरीचाही एम.डी.ला नंबर लागला.

गौरीची एम.डी. ची परीक्षा झाल्यानंतर गौरीला तिच्यासोबत शिकणाऱ्या मित्रानं लग्नाची मागणी घातली होती. गौरीने आपली  एक किडनी स्वता:च्या वडिलांना दिली हे त्या मित्राला  माहिती होते  आणि गौरी लग्न होऊन सासरी गेली.

घराण्याला वारस पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे असणाऱ्यांना, गर्भातच मुक्या कळ्यांना मारणाऱ्यांना शेवटी एका पणतीनेच, लेकीनेच आशेचा किरण दाखवला होता.


समाप्त.