Feb 24, 2024
जलद लेखन

आशेचा किरण भाग दोन

Read Later
आशेचा किरण भाग दोन


आशाच्या लग्नाच्या केवळ एक महिन्यानंतर आशाचे सासरे अचानकपणे हृदयविकाराचा झटका येऊन वारले आणि मुळातच कष्ट असणाऱ्या आशाच्या सासूला, आशाला छळण्यासाठी हातात आयतच कोलीत मिळालं. कधी हुंड्यावरून तर, कधी मानपानावरून, कधी आंधणा वरून तर, कधी लग्नाच्या पंक्तीतल्या जेवणावरून आशाची सासू तिला वाटेल तसे बोले. वेळ प्रसंगी तिच्यावर हातही उचले, पण आशा हे सगळं निमूटपणे सहन करत होती. बाळासाहेब सासू सुनांच्या भांडणात कधीच लक्ष घालत नव्हते. ते सतत राजकारण, बैठका, मोर्चे, आंदोलने, धरणे, उपोषण यातच व्यस्त असत. लग्न झाल्यावर आशाला दिवस गेले तिला फारच कडक डोहाळे लागले होते. अन्न काय, पोटात पाण्याचा थेंबही राहत नव्हता. सतत कोरड्या उलट्या व्हायच्या. पण तरीही सासू तिला घरची सगळी काम करायला लावायची. धुणी-भांडी, झाडू-पोछा, सडा सारवन. याशिवाय घरी आलेल्या पक्षाच्या वीस पंचवीस लोकांचा स्वयंपाक तर आशासाठी नित्याचीच गोष्ट होती.

एखादवेळी थकून गेल्यावर आशा आराम करताना दिसली तर सासूचे परत तोंड चालू होई…

सासू -"बाई बाई बाई काय आजकालच्या शिकलेल्या सूना! एक एक नाटकं नुसती!! आम्ही काय मुलं जन्माला घातले नाही? 40-50 जणांचं कुटुंबाचं केलं आम्ही गरोदरपणात, पण कधी दुपारी पाठ नाही टेकवली हो! काय तर म्हणे अशक्तपणा. ढोंगी कुठली. काम करणं जीवावर येतं म्हणून सगळा बनाव आहे हा, बनाव."

बिचारी अशा एक घोट पाणी पिऊन परत कामाला लागेल. आशाची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून तिच्या सासूने तिला अगदी शेवटच्या दिवसापर्यंत विहिरीतून पाणी काढण्यापासून ते झाडूपोछा, धुणी-भांडी करायला लावली.


सासू -"नुसतं बसून रहाशील तर सिजर करावं लागेल. काम करा! तेव्हाच नॉर्मल डिलिव्हरी होईल. सिजरचे दहा-पंधरा हजार नाहीत माझ्याकडे."

शेवटी नऊ महिन्यानंतर एका गोंडस परीने आशाला मातृत्वाचे सुख दिलं, पण त्या बातमीने बाळासाहेब मात्र हिरमुसले. त्यांना हवा होता त्यांचा वारस, कुलदीपक, त्यांचं नाव चालवणारा मुलगा.

पहिली मुलगी उमा झाल्यावर लगेचच दोन वर्षात गौरीचा जन्म झाला. आता मात्र बाळासाहेबांचा पारा फारच चढला आणि सासूचा संयम सुटला. सासूने बाळासाहेबांचे काम भरणे सुरू केले.


सासू -"बाळा अरे सोडून दे हिला. दे काडीमोड. अवदसा मेली. पांढऱ्या पायाची. आपल्या घराण्याचं नाव चालवायला मुलगा नको का?"

बाळासाहेब -"आई तू जरा शांत बस. अग मी एक धुरंदर राजकारणी आहे. असं बायकोला सोडून, काडीमोड देऊन कसं चालेल? समाजात माझी प्रतिष्ठा, माझी प्रतिमा खराब होईल. काहीही काय सल्ला देतेस? मला जरा विचार करू दे."

त्यानंतर वर्षभरातच आशाला परत तिसऱ्यांदा दिवस गेले, यावेळी बाळासाहेबांनी आशाची गर्भलिंग तपासणी केली आणि मुलीचा गर्भ असल्याने तिला तिथेच खुडली. असे एका मागोमाग आशाने नव्हे बाळासाहेबांनी गर्भात असणाऱ्या मुलींचे चार गर्भ पाडले.

ह्या सगळ्या गर्भपातांमुळे आशा फारच अशक्त झाली होती. पण त्याची बाळासाहेबांना चिंता नव्हती ना सासूला. सासूला नातू आणि बाळासाहेबांना आपल्या अनैतिक, अफाट संपत्तीचा वारसा होता.

आशाला परत दिवस गेले आणि यावेळी मात्र देव तिच्यासाठी धावून आला. आशाच्या गर्भात मुलाचे बीज असल्याने, बाळासाहेबांनी तिची जातींन काळजी घेतली. औषध-पाणी, नियमित तपासणी आणि मग तेजस चा जन्म झाला. आशाच्या घरात आनंदी आनंद झाला.


©® राखी भावसार भांडेकर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//