आशेचा किरण भाग एक

Story Of A Daughter Who Saves Her Father's Life

जलद लेखन 


विषय आशेचा किरण 

आपल्या समाजात स्त्री-पुरुष गुणोत्तरांमध्ये स्त्रियांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेल आहे. घराण्याचं नाव चालवण्यासाठी, घरच्या संपत्तीला वारस म्हणून सर्रासपणे मुलीचा गर्भ जन्माण्या आधीच संपवून टाकला जातो. पण हीच मुलगी जेव्हा बापाच्या जीवावर बेतते तेव्हा मागचा पुढचा विचार न करता बापासाठी काहीही करू शकते. अशाच एका पापा की परीची ही कथा.


ऑपरेशन थिएटर च्या बाहेर आशा आपल्या मोठ्या मुलीचा-उमाचा हात हातात घेऊन, मनात देवाचा धावा करत होती. बाजूलाच तिचा मुलगा तेजस अस्वस्थ चकरा मारत होता. वऱ्हांड्यात त्याचे अनेक कार्यकर्ते जमा झाले होते. तर तिची सासू आणि तेजसची आजी एकसारखं हॉस्पिटल मधल्या गणपतीला आपल्या मुलाच्या जीवनाचं साकड घालत होती, अनेक नवसही बोलत होती.

जवळपास सहा ते आठ तासानंतर बाळासाहेब देशमुख यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं होतं. डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन \"सगळं व्यवस्थित आहे काळजी करण्याची काहीच गरज नाही. पेशंट आणि किडनी दाता दोघेही स्वस्थ आहेत\" असं सांगितल्यावर बाहेर बसलेल्या सगळ्यांच्या जीवात जीव आला.


घरी आल्यावर आशाने आंघोळ केली. देवा जवळ दिवा लावून, वाटीत साखर ठेवली. तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज तिच्या कानावर पडला.

सासू -"झाली त्यांची सोंग सुरू. पांढऱ्या पायाची मेली. लग्न होऊन या घरात काय आली आमच्यावरची संकट संपायचं नावच घेत नाही. आल्या आल्या माझ्या नवऱ्याला खाल्लं."

आशासाठी ही बडबड आता काही नवीन नव्हती. ती गेली 25-30 वर्ष ती हेच ऐकत आली होती. पण यावेळी मात्र आशाला असह्य झालं होतं. शेवटी न राहून ती बोललीच…

आशा -"सासुबाई प्रत्येक वेळी घरावर संकट आलं की, तुम्ही माझंच नाव घेता, पण उमाच्या वडिलांच्या दोन्ही किडन्या निकामी व्हायला मी कशी काय जबाबदार आहे?"

सासू -"जास्त बोलू नको. जा काम कर आपलं. आली मोठी मला अक्कल शिकवायला."

तेवढ्यात तेजस तिथे आला आणि त्याच्या कानावर हा संवाद पडला, त्यामुळे तोही वैतागला.

तेजस -"आजी पुरे आता. आणि आई तू का ग आजीच्या नादी लागतेस? तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव तरीही? साला माणसाला कुठे सुख नाही. बाहेर दिवसभर मरमर करा आणि घरात आलं की ह्यांची बाचाबाची. बाबा पण तुमच्या दोघींमुळे कंटाळले होते. छ्या मी बाहेर जातो आहे. कृपया घरात जरा शांतता ठेवा."

तेजस त्याच्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकी करता निघून गेला.


तर ही आहे कथा आशा देशमुख, बाळासाहेब देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची. बाळासाहेब देशमुख एक बडे राजकीय प्रस्थ आणि उत्तम राजकारणी. सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेद काहीही आणि कुठल्याही थराला जाऊन करण्याचा त्यांचा स्वभाव. तर आशा मात्र एक सरळ, साधी, नाकासमोर जगणारी गृहिणी. स्वतःचा संसार, मुल-बाळ, कुटुंब यातच रमणारी.

अगदी सुरुवातीला जेव्हा आशा आणि बाळासाहेब यांचे लग्न झालं, तेव्हा बाळासाहेब केवळ एक सरपंच होते. पण त्यांच्यातील नेतृत्व गुण, धडाडी आणि दांडगा जनसंपर्क बघून पक्षश्रेष्ठींनी त्यांना आधी नगरसेवक, मग आमदार, नंतर खासदार, प्रदेशाध्यक्ष आणि कालांतराने पक्षाची सत्ता आल्यावर मुख्यमंत्री केलं होतं.

आशा मात्र एक हाती स्वतःचा संसार आणि कुटुंब चालवत होती.


©® राखी भावसार

🎭 Series Post

View all