ती कुठे काय करते अंतिम भाग

तिची कथा


कुठे काय करते अंतिम भाग


राधा महिला सदनमध्ये राहायला आली. कामकरी महिलांचं वसतिगृह होतं ते. सुरुवातीला राधाला तिथे करमेना, आजूबाजूचं वातावरण परकं-उपरं वाटे, पण तिचा नाईलाज होता. वसतीगृहात राहायला आल्यावर दुसऱ्याच दिवसापासून राधाने वर्तमानपत्रात नोकरी विषयीच्या जाहिराती शोधण्याचा धडाका लावला. दोन-चार ठिकाणी जाऊन पण आली. परंतु तिला नोकरी काही मिळाली नाही. राधाला परिस्थितीची जाणीव होती. तिच्याजवळ फारशी बचतही नव्हती, त्यामुळे राधाने नोकरी शोधण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू केले, पण यश मात्र तिला मिळत नव्हतं. लवकरच राधाच्या लक्षात आलं की तिने निवडलेला मार्ग खरंच खडतर आहे, पण राधाचा निर्धार मात्र पक्का होता. पाच-सहा दिवसांन नंतर गौरी राधाला भेटायला वसतिगृहात आली.

गौरी -"काय म्हणतय नवीन आयुष्य?"

राधा -"छान आहे. स्वतःचा शोध घेते आहे, म्हणजे नोकरी करता प्रयत्न सुरू आहेत, बघूया काय होतंय ते?"

गौरी -"मी इथे आले….. म्हणजे तुम्हाला….."

राधा -"गौरी अग जे झालं ते मी स्वीकारलं आहे. पण आता मला स्वतःला जोखयचं आहे. स्वतःच्या क्षमता तपासून बघायच्या आहेत."

गौरी -"आई घरी झालं ते मला आशुनं दुसऱ्याच दिवशी सांगितलं. त्याला असं वाटत होतं की, मी आता लग्नाला नकार देईन."

राधा फक्त शांतपणे गौरीचे म्हणणं ऐकत होती.

"आई मी आशूवर प्रेम केलंय. जे काही प्रश्न, वाद आहे ते पप्पांचे आणि तुमचे. त्यात आशुचा काही दोष नाही. एकदा समोरच्याला आपलं मानलं की, आयुष्यभर ते नातं जपायचं असं माझं तत्व. वस्तू बदलावी तसं आपण प्रेम नाही ना बदलू शकत! प्रेम असतं किंवा नसतं असो. मी एक सुचवू का?"

राधा -"कशाबद्दल?"

गौरी -"माझी एक मैत्रीण आहे. तिच्या बहिणीचा मुलगा दहावीत नापास झाला आणि त्यानंतर डिप्रेशन मध्ये गेला, त्यामुळे माझ्या त्या मैत्रिणींनं दहावी आणि बारावीत नापास झालेल्या मुलांसाठी काही विशेष वर्ग सुरू केले आहेत. त्या वर्गांमध्ये त्या मुलांचे कच्चे विषय पक्के केले जातात. पण त्या मुलांना खरी गरज असते प्रेमाची, विश्वासाची त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची. जर तुमची इच्छा असेल तर……"

राधा -"अग पण माझ्याकडे तसलं काही शिक्षण- प्रशिक्षण नाही आहे."

गौरी -"आई काही ठिकाणी शिक्षण-प्रशिक्षणापेक्षा जास्त गरज असते आत्मीयतेची. आशू दहावीला नापास झाला, पण तुमच्यामुळे तो बी.ई.ला विद्यापीठात पहिल्या पाचात आला. त्यामुळे तुम्ही जर हो म्हणाल तर मी मैत्रिणीकडे शब्द टाकू शकते."

राधाने आनंदाने हो म्हटले आणि तिला समूपदेशकची नोकरी मिळालीही. सुरुवातीला पगार कमी होता, पण राधा आता आत्मनिर्भर झाली होती.

त्या नंतर दोन एक महिन्यात माधवला अर्धांग वायूचा झटका आला. अति ताण आणि तब्येतीची हेळसांड केल्याचा तो परिणाम होता. आशू कडून ही बातमी राधाला कळली होती. राधाच्या मनात द्वंद्व सुरू झालं. तिने माधवला भेटायला जावं की नाही? त्याची सेवा सुश्रुषा करावी की नाही? पण राधातल्या पत्नीपेक्षा, स्त्री पेक्षा तिच्यातली माणुसकी जिंकली आणि ती माधवची सेवा करण्यासाठी तिच्या घरी परत गेली.

राधाने अगदी प्रेमाने, आनंदाने माधवची सेवा केली. राधाच्या सेवेनं माधव ठीक झाला, पण त्याच्या उजव्या हातावरचे नियंत्रण गेले होते. फिजिओथेरपी सुरू होती, पण सर्व पूर्ववत व्हायला काही महिन्यांचा काळ लागणार होता. राधाने मात्र स्वतःची नोकरी सुरूच ठेवली होती.

तेवढ्यात नेहानेही गोड बातमी दिली. नेहाचे लाड करायला, तिचे डोहाळे पुरवायला राधाला आता वेळ कमी पडत होता. मधल्या काळात आशु-गौरीचे लग्न पण थाटामाटात, उत्साहाने पार पडले.

योग्य वेळी नेहा प्रसूत झाली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. राधाने नोकरी सुरू ठेवून, माधव-नाना-माई यांची काळजी घेतली, मदतीला एक मदतनीसही ठेवली. राधाने स्वतःचा मार्ग स्वतःच शोधला. आता ती तिच्या परिवारासोबत नोकरी सांभाळून, स्वतःच्या आनंदासाठी जगते आहे.


वाचक हो बऱ्याच स्त्रियांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. एक गृहिणी म्हणून तिला घरातल्यांनी तर गृहीत धरलेलं असतंच,पण त्याशिवाय तिला स्वतःलाही आपण काही करू शकतो याचा आत्मविश्वासच नसतो. जे झालं ते काही जणी मूकपणे सहन करतात, तर काही आयुष्यभर जोडीदाराला बोल लावत, दोष देत राहतात. आयुष्य एक आव्हान आहे. येणारा प्रत्येक दिवस नवा आहे. चार चौघींसारखं धोपट मार्गावरून जाण्यापेक्षा, आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देत, स्वतःच्या क्षमता, मर्यादा आणि गुण प्रत्येकाने स्वतः तपासून पाहण्यात माझ्या मते काहीच हरकत नसावी. शेवटी प्रत्येकाला स्वतःचा आनंद स्वतःच शोधावा लागतो.


कथा कशी वाटली नक्की कळवा. तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत.


©® राखी भावसार भांडेकर.


बऱ्याचबऱ्याच

🎭 Series Post

View all