Login

ती कुठे काय करते भाग पाच

तिची कथा


ती कुठे काय करते भाग पाच 


राधाने माईंच्या खोलीच्या दरवाजावर टकटक केली.

माई -"कोण? राधा! ये आत."

राधा -"मी आत येऊ का माई?"

माई -"राधे आमच्या खोलीत येण्यासाठी तुला ग परवानगी कशाला हवी?"

राधा -"माई म्हणजे...." राधाला काय बोलावे सूचेना. "मी निघते आहे."

माई -"कुठे निघालीस? अग तुझा राग, चिडचिड मी समजू शकते. खरंतर मी माधवची बाजू नको होती घ्यायला, पण माझ्याच आतड्याचं कातड ग ते! त्याला एकटं कसं सोडू? आई आहे ना मी!! लेकरू चुकलं तर आई त्याला शिक्षा करू शकते पण त्याला सोडू शकत नाही , आणि आता या वयात काय शिक्षा देऊ मी त्याला?" माई व्यथीत स्वरात बोलत होत्या.

राधा -"माई मला तुमचं मन, भावना कळतात, पण आता मला या घरात राहावस वाटत नाही. माझ्या मनाला ते पटत नाही."

नाना -"राधा तुझं बरोबरच आहे ग! तू एक मानी, स्वाभिमानी स्त्री आहेस. नवऱ्याची प्रतारणा तुला खपणारच नाही. अग पण निदान आम्हा म्हाताऱ्यांचा तरी विचार कर. किमान आपल्या नात्याला तरी बघ. अग लेकी पेक्षा जास्त केलंस तू आमचं! कधी आई होऊन, कधी बहीण होऊन माझे पथ्य पाणी सांभाळलंस. माई पडली तेव्हा तिचं सगळं अगदी जागेवर होतं, तेही तु नीभावलस. माधवचं जाऊ दे, पण तुझं आणि आमचंही नातं आहेच की! निदान त्याचा तरी विचार कर."

राधा -"नाना तुम्ही पण मला वडिलांची माया लावलीत. आपल्या नात्याच्या रेशीमगाठी तशाच आहेत. त्यात कुठेही दुरावा आलेला नाही आणि येणारही नाही, पण मला आता या नात्यांच्या परीघा बाहेर जाऊन स्वतःला शोधायचं आहे. स्वतःचा वेगळा मार्ग निवडायचा आहे. माझी आई लवकरच गेली. सुरुवातीला माईंनी मला रागवलं, वेळ प्रसंगी फटकारल, पण नंतर आईच्या मायेने जवळही घेतलं. माझी आता कुणाबद्दल काहीच तक्रार नाही. पण मला अडवू मात्र नका." राधाच्या या बोलण्यावर माईंनी डोळ्याला पदर लावला. नानांचे हातही आशीर्वाद देताना थरथरले.

नाना -"राधे अग स्वतःचा शोध घ्यायला निघालीस तू! वाट खडतर आहे, अनेक अडथळे येतील मार्गात, जेव्हा केव्हा विसावा घ्यावासा वाटला, परत यावसं वाटलं तर हे तुझं हक्काचं घर आहे हे कधीच विसरू नको!! आम्ही असू नसू, पण या घरावर तुझाही हक्क आहेच. आणखी काय बोलू? तुला तुझा मार्ग निश्चित मिळेल. तुझ्या या प्रवासात आमचे आशिष तुझ्या पाठीशी आहेत. तुला तुझं ध्येय लवकर मिळो."

माई -"राधे अधे-मधे येत जा ग. गृहिणी शिवाय घराला घरपण नाही." दोघांनी राधाला मन भरून आशीर्वाद दिले.

राधा माधवकडे गेली. माळ्यावरच्या खोलीच्या खिडकीततुन माधव दूर कुठेतरी बघत होता.

राधा -"आत येऊ का?"

माधवने मागे वळून पाहिलं. "कोण राधा? अग तू मला आपल्या खोलीत येण्यास मनाई केली, मी नाही. ये, तू माझ्या खोलीत कधीही येऊ शकतेस."

राधा -"मी आता निघते आहे. दोन चार साड्या, माझं स्त्रीधन आणि माझी काही बचत सोबत घेतली आहे. या कपाटाच्या किल्ल्या, सगळी रोकड, माईँचे दागिने, घराचे आणि इतर कागदपत्र आतल्या खणात व्यवस्थित ठेवले आहेत. तुम्ही खात्री करून घेऊ शकता." राधाचा स्वर अपराधी झाला होता.

माधव -"राधा तुला आठवतं? नेहा सातवी आठवीत होती, तेव्हा माझ्या डोक्यात व्यवसाय करायचं खूळ घुसलं होतं. नोकरी सोडून मला व्यवसाय करायचा होता. नानांनी अनेकदा समजावून सांगितलं, अगदी फटकारलं तरीही मी माझा हट्ट सोडत नव्हतो. माईने हर तर्हेने माझी मनधरणी केली होती, पण मी कुणाचंच काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. \"नोकरी सोडून व्यवसाय करायचा\" या विचाराने मला पुरतं झपाटलं होतं. त्यावेळी तू शांतपणे माझ्या व्यवसायाच्या भांडवलासाठी तुझं स्त्रीधन मला न मागता दिलं होतं. त्या क्षणी मला न मागता तू दिलेली ती खंबीर साथ! त्यानंतर नोकरी सांभाळून मी केलेला तो पूरक व्यवसाय आणि आपल्या घराची झालेली भरभराट! तुझ्याच मुळे शक्य झालं. अग कपाटाच्या किल्ल्या मला देऊन काय उपयोग? मला जगाचा व्यवहार कळतो नात्यांचा नाही! तू सारं नेलस तरी मी भिकारी राहणार आणि सारं मला देऊन तू निघून गेलीस तरी माझी ओंजळी रिकामीच होणार!! बघ परत एकदा विचार कर."

राधा -"आयुष्य फार लहान असतं. आपल्या माणसासाठी काही करता आलं झिजता आलं तर झिजावं, निदान कठीण प्रसंगी त्याच्या बाजूने उभं राहावं. जीवनाचा प्रवास हा प्रत्येकाचा वेगळा असतो. इथे प्रत्येक जण एकटा, प्रत्येकाचा मार्ग निराळा, मला आता थांबवू नका! कुठलंही प्रलोभन देऊ नका!! माझा संयम सुटण्यापूर्वी, माझा विचार बदलण्यापूर्वी मला जाऊ द्या. दैवयोगाने परत भेट झाली तर छानच आहे. नाहीतर…………" राधाला पुढे बोलावलं गेलं नाही. ती शहरातल्या महिला सदन मध्ये राहायला गेली.