ती कुठे काय करते भाग चार

तिची कथा


ती कुठे काय करते भाग चार


माधव जेव्हा स्वतःचा भूतकाळ सगळ्यांना सांगत होता, तेव्हा राधा तिच्या खोलीत विचार मग्न बसली होती. दिवाणखान्यात सोफ्यावर नाना-माई सुतकी चेहरे करून, सगळं जड अंत:करणाने ऐकत होते. आपले वडील काय सांगत आहे? त्या बोलण्याचा नेहाला काहीच अर्थ लागत नव्हता. माधवचा आवाज तर नेहाच्या कानापर्यंत जात होता, पण त्या शब्दांचा तिला अर्थबोध मात्र होत नव्हता. माधवचे शब्द आशु मात्र निर्विकार पणे ऐकत होता. तसेही आशुला या सगळ्या प्रकाराने फारसा फरक पडला नव्हताच, पण त्याच्या वडिलांच्या या बेताल वागण्याने त्याची दुःखी झालेली आई त्याला बघवत नव्हती. खरंतर त्याच्या आईला होणाऱ्या मनस्तापाने तो जास्त व्यथीत झाला होता.

माधवचं बोलणं संपलं. काही काळासाठी दिवाणखान्यात जीवघेणी शांतता पसरली होती. कोणीच काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. काही काळानंतर नानांचा संयम संपला आणि ते बोलू लागले.

नाना -"अरे मघाशी तू काय बोलला ते तुला तरी कळले आहे का?" माधवने काहीच उत्तर दिले नाही. "जावई आला तुला! चार दिवसात सूनही येईल आणि स्वतःच्या स्वैराचाराची कथा तू तुझ्या मुलांसमोर आम्हाला काय सांगतोस रे? जनाची नाही, तर निदान मनाची तरी ठेव! नवरा-बायकोच्या प्रश्नात आम्हा म्हाताऱ्यांना का त्रास देताय रे?"

माधव -"नाना राधाला असे वाटते, म्हणजे तिची अशी इच्छा आहे की, सगळा झाला प्रकार जाणून घेण्याचा तुम्हाला आई-वडील म्हणून, आणि आशु-नेहाला आमची मुलं म्हणून अधिकार आहे." माधव अपराधी स्वरात बोलत होता.

नाना -"ती राधा एक बोलली आणि तू लगेच तिचं म्हणणं ऐकलं! माई तरी मी तुला म्हणत होतो की, त्या बाईशी जास्त घरोबा करू नको, माधवला चुकीच्या गोष्टीत पाठीशी घालू नको, पण तू माझं कधीच ऐकलं नाहीस! बघ आता त्याचे काय परिणाम झाले आहेत!!"

माई -"अहो असं काय करताय? मुलगा आहे तो आपला. उशिरा का होईना पण त्यानं सारं सांगितलं ना! जरा त्याच्या बाजूनेही विचार करा ना!"

नाना -"अग तेच म्हणतोय मी, आयुष्याच्या या मावळतीला यानं हे सारे आपल्याला सांगितलंच का? झाडाची पिकली पानं आपण, आज ना उद्या गळणारच! आयुष्याचे उरले-सुरले चार दिवस निवांतपणे जगू द्यायचं नाही असंच यानं ठरवलेलं दिसतंय!! अग बाहेर इतकी वर्ष यानं तोंड काळ केलं वरून आता आपल्याला सांगतोय! अरे आमचे संस्कार, घराण्याची ईभ्रत याचा तरी विचार करायचा होतास रे माधवा असं सांगण्यापूर्वी! आयुष्याच्या या मावळतीला हा तुझा स्वैराचाराचा भार मला सोसवत नाही रे!!" नाना हातबल होऊन स्वतःची अगतिकता माईंना आणि माधवला सांगण्याचा प्रयत्न करत होते.

माई -"ती मुलगी काही आता या जगात नाही. माधव आपल्या पोटचा गोळा आहे. त्याचे अपराध आपण पोटात घेणार नाही तर कोण घेणार?" माईंनी सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला. पण नानांनी मात्र दाद दिली नाही.

नाना माईंचं बोलणं तिथेच बाजूला बसलेल्या नेहाला सहन झालं नाही. ती रडतच तिच्या आई जवळ- राधा जवळ धावत गेली. नेहाने आईला आर्त हाक मारली "आssई." दोघी माय-लेकी एकमेकींच्या गळ्यात पडून हमसा-हमशी रडू लागल्या. अतिव दुःखानं नेहाने बोलायला सुरुवात केली.

नेहा -"आई मला पप्पांचं हे रूप, हे वागणं सहन होत नाहीये ग! माझे पप्पा त्यांच्या आयुष्यात असे वागलेच कसे याचच मला आश्चर्य वाटतंय. माझ्यावर प्रेम करणारे, मला \"माझी घाऱ्या डोळ्यांची छोटीशी परी\" म्हणणारे पप्पा, माझे पप्पा असं कसं करू शकतात? तू-मी-आशु आपला त्यांनी जराही विचार केला नाही? इतकी वर्ष ते केवळ आपल्यावर प्रेम करण्याचं, आमचे हट्ट पुरे करण्याचं केवळ नाटक करत होते! नाही, नाही माझं मन हे मान्यच करायला तयार नाही की, तुझ्याशिवाय त्यांच्या आयुष्यात अजूनही एक स्त्री होती. इतकी वर्ष ते आपल्याशी खोटेपणाने कसे वागू शकतात?" नेहा रडत, रडत स्वतःचा राग, चीड व्यक्त करत होती. राधा मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. तिला समजावत होती.

राधा -"हे बघ नेहा, तु-मी आपण कोणीही हे मान्य करू अथवा ना करू पण त्याने सत्य आणि वास्तविकता बदलणार आहे का? त्यामुळे आता शोक आवर, डोळ्यातले आसु पुस आणि खऱ्या परिस्थितीचा स्वीकार कर!"

नेहा -"पण आई तू हे इतक्या शांतपणे, संयमाने कसे घेऊ शकतेस? बोलू शकतेस?" नेहाला आश्चर्य वाटत होते.

राधा -"माझ्या आयुष्यातली 25 वर्ष काळाच्या उदरात गडप झाली आहेत. माझा केवळ एक साधन म्हणून, माझ्याच नवऱ्यानं वापर करून घेतला आहे. हे सत्य मी आता स्वीकारलं आहे. पण हा अपमान, अन्याय मात्र मी सहन करणार नाही! मी आणि तुझे बाबा आता एकत्र एका छताखाली राहू शकत नाही, त्यामुळे मी वेगळी होणार आहे."

नेहा -"काय? तू वेगळी होणार? घटस्फोट घेणार? आणि मग जाणार कुठे?"

राधा -"मी घटस्फोट घेणार असं म्हटले नाही! पण मी आता या घरात राहू शकत नाही. मी माझा वेगळा मार्ग शोधणार आहे."

नेहा -"अग पण आई, आता या वयात तू बाहेरच्या जगात काय करणार आहेस? माझ्या सासरचे काय म्हणतील? माझ्या नवऱ्याला मी काय सांगू? नाही आई, तू पप्पांशी अबोला धर, पण हे घर सोडू नकोस. माझा जरा तरी विचार कर."

राधा किंचित हसली "शेवटी तु ही निघालीस माझीच मुलगी! स्वतःपेक्षा, आईच्या दुःखापेक्षा, तुला सासरचीच काळजी वाटते! असो. यापुढे तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुलाच शोधावी लागतील. आयुष्यभर मी तुला पुरी पडू शकत नाही!" राधा ठामपणे बोलत होती. "नेहा तुला आठवते? आठ दहा महिन्यांपूर्वी तुला संशयाला की, तुझ्या नवऱ्याची त्याच्या सहकारी महिले सोबत काहीतरी भानगड सुरू आहे. तेव्हा तू रागा-रागाने घर सोडून इथे आली होतीस ना? लग्नाच्या केवळ एक-दीड वर्षात तुला तुझ्या नवऱ्याचं वागणं खपलं नाही! मग माझ्या आयुष्याच्या पंचवीस वर्षाचा हिशेब मी कसा मांडू सांग बरं?" राधाच्या या प्रश्नावर नेहा जवळ काहीच उत्तर नव्हतं. नेहा तिथून उठून तरातरा निघून गेली.

थोड्यावेळाने आशु राधा जवळ आला. माय लेकाची नजरा नजर होताच, दोघांनी खिन्न स्मित केले.

आशु -"मी काय बोलू? खरं तर मला काही बोलायचा अधिकार नाही, किंबहुना माझी तेवढी पात्रता नाही. हे आज जे काही आहे ते माझे यश, अस्तित्व, संपत्ती, संपन्नता केवळ तुझ्याच मुळे. तु मला घडवलंस, नाही तर दहावी नापास झालेला मी, बी.ई.ला विद्यापीठात पहिल्या पाचात आलोच नसतो. तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. मी सदैव तुझ्या सोबतच असेल. तुझ्या शिवाय मी स्वतःला शून्य समजतो. आई, तु ज्या वाटेने जाशील मी तिथे तुझ्या मागे मागे येणार आहे. मी स्वतःला तुझ्यापासून वेगळं करूच शकत नाही." बोलता बोलता तो शांतपणे टिपं गाळू लागला.

राधा आशुच्या डोक्यावरून हात फिरवत, त्याला समजावत होती "अरे आता मोठा झालास तू, उद्या लग्न होईल तुझं, मग मुलं होतील तुला, त्यामुळे तुला आता माझं बोट सोडावच लागेल! म्हणजे ते मीच आता सोडवून घेणार आहे. मलाच माझा मार्ग माहित नाही, त्यात तुझी फरपट नको. नाना-माई-तुझे बाबा यांची काळजी घेणारी माझ्याशिवाय दुसरी कोणीतरी व्यक्ती हवीच ना! नेहा आता तिच्या संसारात रमली आहे, त्यामुळे या घरचा लेक म्हणून ही जबाबदारी आता तुझीच!!" आशुतोष ने केवळ होकारार्थी मान डोलावली आणि राधा ने तिची बांधा बांध करायला सुरुवात केली.


©® राखी भावसार भांडेकर


🎭 Series Post

View all