Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

ती कुठे काय करते भाग तीन

Read Later
ती कुठे काय करते भाग तीन


ती कुठे काय करते भाग तीन


राधाची अवस्था माधवला बघत नव्हती. गेल्या दोन दिवसांपासून राधानं काहीही खाल्लं नव्हतं. स्वतःला त्यांच्या खोलीत कोंडून घेतलं होतं. माधवलाही त्या खोलीत जायला राधाने मनाई केली होती. तिची घुसमट माधवला सहन होत नव्हती. माधवने राधाच्या विनावण्या केल्या, हजारदा माफी मागितली, पण त्याचा राधावर काही एक परिणाम झाला नाही. तिसऱ्या दिवशी राधा खोलीच्या बाहेर आली, ते बघून माधवला जरा हायसं वाटलं. दोन दिवसाचं जागरण आणि रडल्याने तिचे डोळे सुजले होते, चेहऱ्यावरची पार रया गेली होती. थकलेल्या पावलांनी जीवाच्यावर झालेलं ओझ ओढत न्यावं तशी ती स्वतःला ओढत हॉलमध्ये आली आणि सोफ्यावर मुटकन खाली बसली. पिंजारलेले केस, शून्यात हरवलेली नजर आणि नेहमी हसतमुख असलेल्या चेहऱ्यावर आता भेसूर शांतता दिसत होती. माधव डायनिंगच्या खुर्चीवरून तिच्या जवळ आला. तिच्या पायाशी बसून, त्यानं तिचा हात हाती घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या स्पर्शाने तिचं अंग रागानं थरथरलं. अंगावर पाल पडावी तसा तिने माधवचा हात एकदम झटकला.

"मला स्पर्श करू नका." ती चीडुन बोलली.

माधव -"राधा शांत हो! सावर स्वतःला. अग मी माधव, तुझा नवरा." माधवने राधाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

राधा -"माझा नवरा तुम्ही? नाही. तुम्ही ते नाहीतच. मी माझे जीवन सर्वस्व ज्याच्या चरणी वाहिलं. माझं आयुष्य, अस्तित्व ज्याच्यावर ओवाळून टाकलं, तो असा तुमच्यासारखा विश्वासघातकी कदापी नाही. जा इथून तुम्ही! माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीत आणि आता माझी मनधरणी करताय?"

माधव -"राधा माझं चुकलं. मी फार मोठा अपराध केलाय तुझा, तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे, पण मला असं झिडकारू नकोस! तू बोल, रागव माझ्यावर! पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस."

राधा -"मला होणाऱ्या त्रासाची तुम्हाला कधीपासून एवढी काळजी वाटायला लागली? गेल्या दोन अडीच दशकांच्या आपल्या वैवाहिक जीवनात, मला होणारा त्रास कधीही तुमच्या खीजगणतीत नव्हता आणि राहणार ही नाही. मी, माझं सारं आयुष्य तुमच्यासाठी, आपल्या संसारासाठी वेचले, गृहस्थीची गाडी एका हाती सांभाळली,पै-पाहुणा, सणवार, नातलग, सासू-सासर्‍यांची सेवा, मुलांचे संगोपन सारं मी एकटी करत राहिले, या घरासाठी, घरकुलासाठी क्षणा-क्षणानं, कणाकणानं झिजत राहिले आणि आज तुम्ही म्हणताय की, गेल्या 25 वर्षापासून एक बाई तुमच्या आयुष्यात होती. सांगा कसं सहन होईल हे मला? मी आपल्या नात्यासाठी, मुलाबाळांसाठी, स्वतःला विसरून सर्वस्व समर्पित केलं आणि तुम्ही मात्र बाहेर….. शी:. मला बोलवत सुद्धा नाही."

माधव -"राधा मी तुझा गुन्हेगार आहे. मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. तुला जे शासन करायचं ते कर."

राधा -"मी तुम्हाला काय शिक्षा देऊ? माझ्या प्रेमाचा, त्यागाचा, समर्पणाचा अपमान केला तुम्ही! आपल्या नात्याचा 25 वर्षांपूर्वी खून केलात आणि आता त्याची कबुली देताय? लग्न संस्थेचे गुन्हेगार आहात तुम्ही! माझ्या एकनिष्ठतेची हत्या केली आहे तुम्ही." राधा बोलत होती. माधव खाली मान घालून निमुटपणे सारं ऐकत होता.

राधा -"त्या दुसऱ्या घरी पण मुलं-बाळं आहेत का तुम्हाला?"

माधव -"अं काय?"

राधा -"तिकडे मुलं-बाळं किती?"

माधव -"नाही. मुल-बाळ नाही."

राधा -"इतक्या वर्षानंतर आत्ताच का सांगितलं हे?"

माधव -"ती गेली. मला सोडून कायमची. जिथून कोणीही परत येत नाही अशा ठिकाणी."

"म्हणून आता तुम्हाला रडायला माझा खांदा हवाय?" राधाचा खडा सवाल.

माधव -"तसंच काही नाही. पण गेल्या दोन महिन्यांपासून माझीच घुसमट होते आहे. तुला इतकी वर्ष अंधारात ठेवलं, पण आयुष्याच्या या टप्प्यावर मला हा भार आता सोसवेना म्हणून… तिची ही शेवटची इच्छा हिच होती."

राधा -"म्हणून स्वतःच्या खांद्यावरच विश्वासघाताचं ओझं तुम्ही माझ्या मनावर, आत्म्यावर टाकलं?"

माधव -"तसं नाही. राधा मला समजून तरी घे." माधव विनवणीच्या स्वरात बोलला.

राधा -"काय समजून घेऊ? का समजून घेऊ? की, तुम्ही फार मोठे मन करून मला सगळं सांगितलं, म्हणून तुमचे आभार मानून की, तुमच्या सच्चेपणाबद्दल तुमची आरती ओवाळू?"

माधव -"माझ्या आयुष्यात जे काही घडलं, माझा भूतकाळ, इतिहास यावर तुझा हक्क आहे. माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा कोपरा मी तुला सांगितला कारण माझी बायको म्हणून तो तुझा अधिकार आहे."

राधा -"अधिकार, हक्क एवढ्या मोठ्या शब्दांचा आसरा घेऊ नका! बाहेर माती खाल्लीत आणि आता इथे महान व्यक्ती बनण्याचा, माझ्या नजरेत थोर होण्याचा प्रयत्न करू नका!"

माधव -"हे बघ राधा जरा समजुतदारीने घे. अग उशिरा का होईना,पण मी तुला सर्व सांगितलं ना?"

राधा -"का सांगितलं?" राधा संतापारीतेकने रडायला लागली. "मला अंधारातच ठेवायचं होतं, एवढी वर्ष जसं ठेवलं तसं! तुम्हाला काय वाटलं प्रत्येक वेळी मी माघार घेते, आपला संसार वाचावा म्हणून, माईंचा पाणउतारा, नानांचे खोचक बोलणे, मीनाताईंचे टोमणे, निमूट सहन करते, तुमचा बेफिकीरपणा, आपल्या नात्यातली तुमची उदासीनता मी इतकी वर्ष सहज पचवली, म्हणजे ही तुमची दगाबाजी पण मी मान्य करेन का? चुकीचा समज आहे हा तुमचा! मी आता हे काही एक मान्य करणार नाही. इतकी वर्ष सगळं सहन करता करता माझा जीव आता गुदमरायला लागला आहे, आणि वरून त्यात तुमचे हे प्रताप! मला आता या घरात रहावसं वाटत नाही. मी इथे राहणार नाही."

माधव -"इथे राहणार नाही म्हणजे? हे घर सोडून जाणार तू? घराण्याच्या अब्रूच काय? अग लोक काय म्हणतील? मुलांचा तरी विचार कर!"

राधा -"बाहेर रंग उधळलेत तेव्हा तुम्ही केलात का लोकांचा विचार? घराण्याची इज्जत, मुलांचा विचार, सगळं मी सांभाळायचं आणि बाहेर तुम्ही….शी:" राधा निर्धारने बोलत होती. "दोन दिवसांनी नाना-माई तीर्थयात्रेहून परत येत आहेत. मी नेहा आणि आशुलाही बोलावलंय."

माधव -"का? कशासाठी?"

राधा -"कशासाठी म्हणजे? जे पाप तुम्ही गेली 25 वर्ष पोटात दडवून ठेवलंत, ते आता या घरातल्या प्रत्येक सदस्याला कळायलाच हवं."

माधव -"राधा अग जरा सारासार विचार करून वाग ना! जे झालं तो केवळ आपल्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे. घरातल्या सर्वांसमोर तमाशा करून तुला आता काय मिळणार आहे? आणि मुख्य मुद्दा म्हणजे मिळवायचं तरी काय आहे?"

राधा -"तुम्हाला काय मिळालं 25 वर्ष माझ्या प्रेमाचा असा घात करून? नवरा बनून केसानं गळा कापलात तुम्ही माझा आणि तमाशाचे म्हणाल, तर तो तुम्हीच केलाय आपल्या घराचा, संसाराचा! मी फक्त सत्य सगळ्यांना सांगणार आहे आणि काय म्हणाला तुम्ही मला काय मिळणार? मला आता काहीच मिळवायचे नाहीये, पण या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी झटले आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचा माझ्यावर आणि माझ्या त्यांच्यावर अधिकार आहे! लग्न झाल्यावर प्रत्येक स्त्रीच नातं केवळ नवऱ्यासोबत राहत नाही, तर घरातल्या प्रत्येकाशी ती नव्या नात्याने जोडली जाते. वैयक्तिक प्रश्नच म्हणाल तर नाना-माई तुमचे आई वडील आहेत आणि आशु-नेहाचे आपण! त्यामुळे कुठलाही प्रश्न आता आपल्या दोघांचा वैयक्तिक असूच शकत नाही. निदान "हा" प्रश्न तर नाहीच नाही!"

तर ही कथा आहे राधा नावाच्या मध्यमवर्गीय मध्यमवयीन गृहिणीची. इतर चार चौघींप्रमाणेच तिचं घर, तिचा संसार हेच तिचं विश्व होतं, पन्नाशीच्या घरात असलेली राधा, निगूतीने संसार करत होती. सासू-सासर्‍यांची मर्जी सांभाळत, नवऱ्याच्या आवडीप्रमाणे, इच्छेप्रमाणे तिने स्वतःला घडवलं होतं. शिकलेली असूनही संसारासाठी तिनं गृहिणी पद सांभाळले होते.

राधा 23 - 24 वर्षाची असताना तिचं लग्न झालं आणि संसार सुरू झाला. सासरच्या चालीरीती समजावून घेत, चुकत माकत, संसारात रुळताना, नेहाचा जन्म झाला आणि दोनच वर्षात आशुही राधाच्या घरात रांगू लागला. मुलांच्या संगोपनात, सासू-सासऱ्यांच्या सेवेत आयुष्यातली किती वर्ष राधानं खर्च केली त्याचा हिशेब तीने कधी मांडला नाही, तशी तिला कधी गरजही पडली नाही. तिने स्वतःच विश्व नवरा, मुलं यांच्याभोवतीच विणुन घेतलं होतं.

दोन वर्षांपूर्वी नेहाच लग्न झालं आणि तीन महिन्यापूर्वी आशुचा साखरपुडा. या सगळ्या आनंदातच माधवने त्याच्या आयुष्यातलं एक कटू सत्य राधाला सांगितलं आणि राधा कोलमडली. पुढल्या भागात पाहूया राधा या सगळ्या घटनेचा कशा रीतीने सामना करते ते.


©® राखी भावसार भांडेकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//