Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

ती कुठे काय करते भाग एक

Read Later
ती कुठे काय करते भाग एक


ती कुठे काय करते भाग एक


माधवराव संध्याकाळी वॉक करून घरी परतले होते, पण नेहमीप्रमाणे आज राधाताई त्यांची वाट पहात तुळशी वृंदावना जवळ दिवा लावताना त्यांना दिसल्या नाहीत. घरात आल्यावरही नेहमीप्रमाणे चहाबरोबर काहीतरी खायचं तयार करून राधाताईं त्यांच्या स्वागतासाठी हॉलमध्ये नव्हत्या, म्हणून मग माधवरावच राधाताईंना शोधण्यासाठी घरभर फिरले. स्वयंपाकघर, झोपायची खोली, भांडारघर, अगदी मागच्या अंगणातही राधाताई कुठेच नव्हत्या, त्यामुळे माधवरामांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्याला कारणही अगदी तसंच होतं. अगदी काही तातडीचं किंवा खूपच जरुरीचं काम असल्याशिवाय राधाताई माधवरावांना न सांगता कधीही कुठे जात नसत. अगदी भाजी आणायची असली किंवा देवळात जायचं असलं तरी राधाताई माधवरावांना सांगितल्याशिवाय घराचा उंबरठा देखील ओलांडत नसत. त्याविरुद्ध माधवराव, त्यांनी आधीही म्हणजे लग्न झाल्यावर अगदी तरुणपणी आणि आताही राधाताईंना कुठे जातोय हे सांगण्याची कधीही तसदी घेतली नव्हती, त्यामुळेच आज राधाताई त्यांना न सांगता कुठे गेल्या याचा अंदाज माधवरावांना काही केल्या येईना. शेवटी अगदीच न राहून ते माळयावरच्या खोलीकडे वळले, आणि त्यांचा अंदाज अगदी अचूक ठरला.

माळयावरच्या खोलीत राधाताई जुन्या साड्या, फोटोंचा अल्बम आणि काय, काय पसारा घेऊन बसल्या होत्या.

माधव -"राधा, ये राधा!"

राधाताई दचकून बोलल्या "अग बाई! केव्हा आलात तुम्ही? माझं लक्षच नाही. किती वाजलेत?"

माधव -"सात वाजत आहेत. मी तुला साऱ्या घरभर शोधलं आणि तू इथे बसली सगळा पसारा मांडून!" माधवरावांना घरात पसारा अजिबात आवडत नाही हे राधाताईंना चांगलच माहिती होतं, त्यामुळे आपल्या भोवतालचा पसारा पाहून राधाताई जरा ओशाळल्या.

राधाताई भरभर पसारा आवरू लागल्या "आत्ता आवरते मी हा पसारा. जुन्या आठवणीत रमतांना मला मेलीला वेळेचे भानच राहिलं नाही." राधाताई दिलगिरीच्या सुरात बोलल्या. "थांबा पटकन चहा आणि काहीतरी खायला करून आणते तुमच्यासाठी."

माधव -"अग असू दे. एखाद दिवशी चहाला सुट्टी."

राधा -"असं कसं? चहाला सुट्टी देऊन कशी चालेल? तुम्हाला जर मी चहा नाही दिला तर…….."


राधाताई चहा करायला गेल्या. चहासोबत राधाताईंनी माधवरावांसाठी मक्याच्या दाण्यांचा उपमा पण बनवून आणला.

माधव -"राधा एखाद दिवशी संध्याकाळचा चहा-नाश्त्याला सुट्टी दिली तर काही जगबुडी होणार नाही." उपमाखात माधवराव बोलले.

राधा -"हे तुम्ही म्हणताय? तुम्हाला आठवतंय आपलं नवीनच लग्न झालं होतं अगदी महिना दोन महिनेच झाले असतील, त्या दिवशी दुपारच्या कामांच्या नादात मी संध्याकाळचा चहा विसरले, तर माईं-राधाताईंच्या सासूबाईं, मला किती बोलल्या होत्या आणि चहासाठी मीना वन्सनी अगदी थयथयाट केला होता. त्यावर कळस म्हणजे नानानी- राधाताईंचे सासरे, तुम्हाला सक्त ताकीद दिली होती की, आपल्या घरचे सगळे नियम तुम्ही मला व्यवस्थित समजून सांगायचे."

माधव -"आता त्या इतक्या जुन्या आठवणी काढून काय उपयोग?"

राधा -" या आठवणीच असतात हो, एखाद्या सुंदर क्षणाच्या मुक साक्षीदार आणि या आठवणीच भरली जखम पुन्हा कुरतडून ओली करतात. माणसं, नाती काळानुरूप मागे पडतात, पण आठवणी मात्र आपला आयुष्यभर पाठलाग करत असतात."

माधव -"काय झालं राधा? आज तुझा नूर काही वेगळाच दिसतोय! अग मला वाटलं नाना-माई तीर्थयात्रेला गेले, नेहा पण पुढल्या आठवड्यात येणार, आशु तर सगळं तुलाच सांगतो, त्यामुळे हा शांत निवांत वेळ आपण एकमेकांसह घालू या!"

राधा -"हो. पण तुम्ही गेले वॉकला निघून, मग वेळ घालवण्यासाठी मी माळ्यावर गेले. जुने फोटो, साड्या, दागिने, एक एक प्रसंग, एकेक क्षण, एकेक आठवण ताजी होत गेली. मग मला मेलीला कळलच किती वेळ मी ते सगळं आठवत होती ते. वेळेचे भानच राहिले नाही."

माधव -"असं काय म्हणतेस? तुझ्यामुळेच आपला संसार आहे. हे घर आहे आणि स्वतःला काय दुषणं देतेस?"

राधा -"हो तेही आहेच म्हणा! तुम्हाला एक गोष्ट सांगू? आशुची होणारी बायको-गौरी हो! मला फार आवडली."

माधव -"खरं की काय?"

माधवरावांना जरा शंकाच होती. आशुने त्याच्या मनाप्रमाणे मुलगी निवडली म्हणजे आशु प्रेमविवाह करणार होता. ते राधाताईंना पसंत पडेल की नाही? आवडेल की नाही?

राधा -"हो अगदी खरं! आता साक्षागंधा नंतर दिवाळी करता, मागल्या आठवड्यात ती आली होती ना तेव्हाची गोष्ट, माईंनी तीला दागिन्यांचा डबा दिला आणि म्हंटलं \"हवे ते दोन दागिने तुझे!\" तर ती म्हणते कशी-

गौरी -"माई मला दागिन्यांचा सोस नाही. खूप दागिने घालायला आवडतही नाही आणि माझ्या नोकरीत ते बरही दिसत नाही. लक्ष्मीपूजनासाठी म्हणाल तर मी माझे मॅचिंग दागिने आणले आहेत." अगदी स्पष्ट आणि खरं उत्तर दिलं गौरीनं, पण माई हट्ट सोडेनात म्हणून डोक्याला लावायची सोन्याची पिन तेवढी घेतली पोरींन. शिकलेली असून, लक्ष्मीपूजनाच्या पूजेची, नैवेद्याच्या स्वयंपाकाची सगळी तयारी करू लागली मला. अंगणात रांगोळी, दाराला झेंडूच्या फुलांच तोरण, सगळं अगदी हौसेने केले तिने. लोभस आहे हो! मला आता माझ्या आशुच काहीच टेन्शन नाही. गौरी नीट सांभाळेल त्याला!"

पण माधवरावांचं राधाताईंच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ते कुठल्यातरी गहन विचारात हरवले होते.

राधा -"रात्रीच काय खाणार?"

माधव -"अं काय?"

राधा -"म्हटलं रात्रीच काय करू खायला?"

माधव -"राधा माझ्या मनात तुला एक सांगायचंय आहे. मला समजून घे, म्हणजे इतकी वर्ष तु मला समजूनच घेतलंय! पण तरीही….

राधा -"अहो एवढी काय प्रस्तावना करताय? नमनालाच घडा भर तेल! तुमचा एक शब्द तरी मी कधी खाली पडू दिला आहे का? बोला अगदी मनमोकळं बोला! काही हातच राखून ठेवू नका."

माधव -"राधा गेली  वीस-पंंचवीस वर्ष मी दुहेरी आयुष्य जगतोय, म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहेच! तु मला समजून घेतेस, माझ्या मनातलं कधी कधी न सांगताही तुला लगेच समजतं, पण तरीही मी तुझा गुन्हेगार आहे."

" मी तुला आत्तापर्यंत अंधारात ठेवलं, त्याकरता तु मला माफ करशील, याची मला शाश्वती आहे. मी चुका करणार, तुला गृहीत धरणार आणि तू माझ्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम करून मला सावरणार, याच विश्वासावर मी तुला हे सांगतो आहे. राधा मी.. मला.. म्हणजे गेले वीस वर्ष एक स्त्री… माझी बाल मैत्रीण… आम्ही सोबत होतो.

"म्हणजे असं बघ, ती आणि मी! आमचं प्रेम होतं एकमेकांवर. पण नानांनी नाही म्हटलं लग्नाला. तू माझ्या आयुष्यात आली, त्या नंतर वर्षभरात तिचंही लग्न झालं, पण एक वर्षात ती विधवा झाली. तिच्या आईचा आणि माईंचा घरोबा होता. मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली, आधीच प्रेम होतच, पण मी… म्हणजे… मी आमच्या नात्याला नाव देऊ शकलो नाही, आणि तिला टाकूही शकलो नाही. इतकी वर्ष आम्ही सोबत राहत होतो. जसं तू आणि मी राहतो तसं." माधवरावांनी शब्दांची जुळवाजवळ करत स्वतःच्या अपराधाची, अनैतिक संबंधांची कबुली राधाताई जवळ दिली.


पुढल्या भागात बघूया राधाताई या घटनेवर कशी प्रतिक्रिया देतात ते.©® राखी भावसार भांडेकर


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//