चोकटी

There are so many frames Around us, are those frames necessary for our daily

                     चौकटी



          

                आपल्या आजूबाजूला किती चौकटी असतात ना ! काही दिसणाऱ्या, काही अदृश्य. काही जाणवणाऱ्या, काही टोचणाऱ्या, काही बोचणाऱ्या, काही काही अगदी धाक दाखवणाऱ्या - रूढी-परंपरांच्या, नात्यांच्या, संस्कारांच्या , सामाजिक संकेतांच्या - मान्यतांच्या आणि काही नुसत्याच चौकटी.


             काही चौकटी काळाच्या तडाख्याने जीर्ण झालेल्या पण, केवळ समाज मान्यतेमुळे टिकून असलेल्या, काही बुरसटलेल्या विचारांच्या, काही जीव गुदमरवणाऱ्या, काही आपली क्षमता आणि मर्यादा दोन्ही दाखवून देणाऱ्या चौकटी.


               काही जातींच्या, काही धर्मांच्या, काही लिंगभेदाच्या, तर काही वर्णाच्या, गरज नसतानाही समाजाने उराशी अगदी घट्ट कवटाळून ठेवलेल्या चौकटी.



               एखाद्याने ह्या चौकटीत तोडण्याचा, मोडण्याचा किंवा ओलांडण्याचा प्रयत्न केलाच तर समस्त मानव प्राणी निर्मित समाज त्याच्यावर अगदी तुटून पडतो. पण खरच या चौकटी एवढ्या गरजेच्या आहेत का? काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवत मनुष्यप्राणी अधिक उन्नत, प्रगतीशील आणि आरामदायक जीवन जगत आहे . मग या काल बाह्य चालीरीतींच्या चौकटींची त्याला गरज आहे का?



              हो मान्य आहे चौकटी असाव्यात - समाजात, जगात, एकंदरीतच जगण्यात नीटनेटकेपणा आणण्यासाठी, जीवन सुसह्य करण्यासाठी, असाव्यात काही चौकटी - प्रेमाच्या, आदराच्या, निखळ , निर्भेळ आनंदाच्या , मनुष्य जीवन सुखकर आणि अधिक संपन्न करणाऱ्या. पण कालबाह्य जीर्ण, शीर्ण चौकटी नकोच. आणि आपण जरी या चौकटी सांभाळायचा, जपायचा अगदी आटोकाट प्रयत्न केला ना! तरी कालचक्र मात्र या चौकटी नक्कीच ध्वस्त करेल हो ना?





******************************************

     


संदर्भ - फोटो साभार गुगल 

           लेख कसा वाटला नक्की कळवा तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत.


जय हिंद