चौकट.......... काही अलक

Sometimes in our life, Life gives us a chance to break the frame Of social and Personal believes But should We really break that frames?

चौकट……काही अलक 



1. शांताबाई च्या घराजवळच्या मंदिरात आज भावकीतले आणि नात्यातले सर्वजण एकत्र जमले होते. शांताबाईंच्या नणंद - भावजया, त्यांना हाताने धरून हळू - हळू मंदिराकडे नेत होत्या. त्यांच्या मागोमाग पाच महिन्यांची गरोदर असलेली त्यांची सून- जानकी खाली मान घालून, आपल्या मोठ्या दोन बहिणींच्या आधाराने चालत होती.


              विठ्ठलाच्या मंदिराची एक एक पायरी चढताना जानकीला चांगलीच धाप लागत होती. गेल्या 13 दिवसात शांताबाईंच्या आणि जानकीच्या डोळ्याचं पाणी तुटलं नव्हतं. बिचाऱ्या दोघीच मंदिराच्या गाभार्‍यातल्या सतरंजीवर अंग चोरून कोपऱ्यात बसल्या.

              पंच- प्रमुखांनी शांताबाई च्या मुलाच्या शौर्याचा , धैर्याचा, देशाच्या सीमा रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा, आपल्या छोटेखानी भाषणात गौरव केला. आणि ते दुखवट्याला सुरुवात करणार, तेवढ्यात शांताबाई, बहिणीच्या आधारानं थरथरत उभ्या राहिल्या.


           त्यांनी उपस्थितांना एक कळकळीची विनंती केली.


           " माझा लेक देशासाठी शहीद झाला आहे, तो देशासाठी अमर झाला आहे. पण माझी हि सून पाच महिन्यांची गरोदर आहे. माझ्या मुलाच्या आणि सुने च्या लग्नाला केवळ सातच महिने झाले आहेत. माझा लेक गेला त्यात माझ्या सुनेची काय चूक? माझ्या सुनेला मी , माझी मुलगीच मानली आहे. आज मी, इथे या मंदिरात, विठ्ठलाच्या समोर कुणालाही माझ्या सूनेचा शेव काढू देणार नाही. एका विधवेच दुःख काय असतं ते माझ्या शिवाय आणखीन कोणाला समजणार आहे? गेले तीस वर्ष मी हे दुःख मनातल्या मनात साठवून माझ्या मुलासाठी खंबीरपणे उभी होती आणि आता माझ्या सूनेसाठी उभी आहे.                                               


.                उपस्थितांपैकी आहे का कोणी माझ्या सुनेला आपल्या पदरात घेणारं ? तिच्याशी लग्न करणारं ?


          शांताबाई च्या, या आवाहनाला साद देत शांताबाई च्या चुलत भावाने - महादेवने स्वतःहून जानकी चा हात आपल्या मुलाच्या - रामच्या हातात दिला. उपस्थित सर्व पंचपरमेश्‍वरांन च्या समोर रामने जानकी च पाणिग्रहण केलं.


             आज जुनाट विचारांची आणि प्रथांची जीर्ण चौकट शांताबाई, महादेव आणि राम ने आणि तिथे उपस्थित पंचपरमेश्‍वर यांनी झुगारून दिली होती.




2. एका मागास, छोट्याशा खेड्यातून आलेली ती. धावण्याच्या स्पर्धेत तिने अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय विक्रम केले, पण तिचे राष्ट्रीय विक्रम बाजूला राहायचे आणि तिच्या पुरुषी दिसण्याबद्दल, आणि तिच्या मुलांसारख्या असणाऱ्या आवाजाबद्दल जास्त चर्चा व्हायची. पण तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. एकदा तर तिला एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून अक्षरश: ट्रॅकवरून बाहेर जावं लागलं. पण निराश न होता तिने आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढा दिला - तो लढा ती जिंकली. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विक्रम करत , तिने तिची ट्रान्सजेंडर ॲथलिट ची नवी ओळख मिळवली.


                आपल्या खेळातील पराक्रमांनच तीनं स्त्री की पुरुष या लैंगिक भेदभावाची चौकट मोडून काढली.   



3. तिला कुकिंग करायला फार आवडायचं. केक कुकीज, नानखटाई तर तिची स्पेशालिटी. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या आणि फ्लेवर च्या ग्रेव्ही म्हणजे तिची स्वतःची अशी खास ओळख. पण या सगळ्या कुकिंग - बेकिंग च्या नादात तिचा खूप वेळ जायचा. आणि त्यामुळे कधीकधी फोनची बिलं, नळाची बिल आणि विजेचे बिल भरायला तिला तासन्तास रांगेत उभं राहावं लागायचं.       


             तिने स्वतःची अडचण नवऱ्याला सांगून पहिली. तर नवरा म्हणे "ऑनलाइन पेमेंट करत जा". पण तिला नवनवीन तंत्रज्ञान वापरताना फार भीती वाटायची.


                  मग एक दिवस तिनं ठरवलं ऑनलाइन पेमेंट करायला शिकून घ्यायचं, स्वयंपाक घरातही मायक्रोवेव, एअर फायर , फुडप्रोसेसर, व्हॅक्युम क्लिनर यांची मदत घ्यायची. रोजच्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान वापरून, ती तिच्या तंत्रज्ञानाबद्दल असलेल्या भीतीची चौकट आता मोडणार होती.




5. सुकळी गावचे सखा पाटील म्हणजे एकदम भला माणूस ! देवच जणू !! भुकेल्याला अन्न , निर्धानाला धन, आश्रिताला आसरा असा त्यांचा संपूर्ण पंचक्रोशीत लौकिक होता. मात्र त्यांच्या एकुलत्या एक मुलाने - माधवने जेव्हा दलित समाजातल्या तरुणीशी विवाह करण्याचा मानस घरी बोलून दाखवला , तेव्हा माधव ची आई, आजी, काकी, चुलत भावाची बायको - रमा वहिनी, आणि घरातल्या इतर महिलांनी त्याला कडाडून विरोध केला. पण सखा पाटील मात्र चिरंजीवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.




               जातीची चौकट सखा पाटलांनी मुलासाठी अगदी सहज मोडली, त्याच घरातल्या बायका मात्र, त्याच जातीच्या चौकटीत अडकून पडल्या होत्या.




6. तो भारतीय क्रिकेट संघाचा संघनायक आणि आघाडीचा फलंदाज. भारतीय संघासाठी खेळताना धावांचे डोंगर उभा करणारा, आणि मॅच विनर अशी त्याची ख्याती. क्रिकेटच्या दौऱ्यासाठी तो परदेशात गेला होता, परंतु बायकोची प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तो परदेशातला दौरा रद्द करून, पितृत्व रजा घेऊन मायदेशी परतला. तेव्हा समस्त समाज माध्यमांनी आणि नेटकाऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. अतिशय हीन आणि खालच्या दर्जाच्या भाषेत त्याच्या खेळाची आणि त्याची खिल्ली उडवली.



             कदाचित व्यक्ती कितीही मोठी असली, कर्तृत्ववान असली तरी समाज स्वतःच्या मानसिक विचारांची, पारंपारिक मान्यतांची चौकट मोडण्यास तयार नसतो हे परत एकदा सिद्ध झालं.






संदर्भ - फोटो साभार गुगल.


समाप्त




जय हिंद 



****************************************************



.