श्रद्धा...!

#Faith #Peace # Positive Thursday

#श्रद्धा. 

कधी कधी आयुष्यात सर्व निरस वाटायला लागते. सर्व काही असून पण काहीतरी मिसिंग असल्यासारखी भावना मनात सतत त्रास देत असते. काय करावं काय करावं समजण्यापलीकडे असते. तेव्हा आठवतात आपल्याला आपले श्रद्धास्थान. व्यक्तीपरत्वे हे श्रद्धास्थान बदलत जाते. देव या कन्सेप्टला मान्य करणं सोपं आहे. पण तो कन्सेप्ट समजून घ्यायला मात्र अवघड आहे. मला आठवतात शेगावी निवास करणारे माझे श्रद्धास्थान. त्यांच्या नगरीत पोहोचल्यावर हेच ते डेस्टिनेशन असावं ज्याच्या आपण भिरभर नजरेने शोधात होतो.

       श्रींच्या नामस्मरणात तल्लीन झालेले, आयुष्यात कठीण काळासोबत सामना करणारे, काहींनी श्रींच्या आशीर्वादाने अनेक मोठ्या समस्यांना पराजीत केलेलं म्हणून धन्यवाद द्यायला आलेले, तर कोणी मनःशांतीचा शोध घेत सततच्या धावपळीच्या आयुष्यातून क्षणभराचा विसावा शोधत आलेले श्रद्धाळूंचे जत्थे दृष्टीस पडतात. त्या गर्दीतही श्रींचं आपल्यावर लक्ष असेलच अशी भाबडी समज मनात ठेवून मंदिराकडे मार्गस्थ होण्याची ओढ मनात प्रचंड असते. अशी काय जादू असते त्या मंदिरात कि दोन तीन तासांनी श्रींचे मुखदर्शन घेण्याची संधी मिळणार हे माहिती असूनही हातपाय किंवा शरीराचा कुठलाही अवयव अगदी शब्दानेही तक्रार करत नाही. बस्स. फक्त एकच आस असते मनात कि कधी त्या शांत, जीवंत भासणाऱ्या श्रींच्या मुर्तीसमोर मी माझ्या मनावरचं ओझं एकदाचं आदळून खाली टाकतो. केलेल्या असंख्य चुकांसाठी त्यांची क्षमा मागतो. जे काही भरभरून सदैव त्यांनी आपल्याला दिलं त्याबद्दल स्वच्छ मनाने आभार मानतो. डोळेभरून त्यांचं रूप पुढच्या अज्ञात काळासाठी साठवून ठेवतो. हीच सर्व आस मनात असते. त्यादिवशी त्या तेवढ्या दोन तीन तासांच्या काळात आपल्याला इतर गोष्टींसोबत अजिबात घेणंदेणं उरत नाही. मनात सतत श्रींचं नामस्मरण अविरत सुरु असूनही कसलाही क्षीण त्यादिवशी आपल्याला जाणवत नाही. मग प्रदीर्घ काळाच्या संयमानंतर तो एक सोनेरी क्षण आपल्या आयुष्यात येतो. रांगेत आपल्यापुढे कितीही जण असो पण आपल्याला दिसतात ते फक्त आणि फक्त प्रसन्न चेहऱ्यांचे, मी सर्व नीट करतो, मी तुझ्या सोबतच आहे, तुला चुका सुधरवायला परत संधी देतोे हा विश्वास आपल्या नयनांनी जणू आपल्याला देत असलेले संत श्री गजानन महाराज दिसतात. डोळे काही क्षणासाठी आपोआपच मिटल्या जातात. एका क्षणात सर्व मोह, अहंकार,पद, प्रतिष्ठा, मान सर्व सर्व सर्व गळून पडते. आतून खूप हलकं हलकं वाटायला सुरुवात होते. महाराजांनी जणू आपल्यातील सर्व गर्वाचे हरण करून आपल्या आयुष्याचा तो काउंटर ,बटन दाबून रिस्टार्ट केला असावा अशी प्रचिती मनाला होते. शब्दात वर्णू शकणार नाही असा तो अनुभव ज्याचा त्याला येतो. प्रत्येकालाच तो अनुभव येणारच. फरक फक्त एवढाच असेल कि माझा अनुभव तुम्ही अनुभवू शकणार नाही. तुमचा अनुभव मला कधीच येणार नाही. ऊर्जेचा संचार जाणवतो. आशेचा किरण दिसतो कि मी आता लढणार. परिस्थितीला शरण अजिबात जाणार नाही. महाराज माझ्या सोबत आहेत. अशातच निरोपाची वेळ येते. सेवकांचे "माऊली पुढे चला" हे प्रेमळ शब्द ऐकू येतात. डोळे उघडल्यावर प्रसन्नतेचा वलय चेहऱ्यावर जाणवतो. मनोभावे परत एकदा नमस्कार करून लवकरच परत भेटीला येईल हा शब्द देऊन आपण दारातून एग्झीट घेईपर्यंत श्रींच्या चेहऱ्याला डोळ्यात साठवून ठेवण्याचा भोळा भाबडा प्रयत्न करत करतच बाहेर पडतो. अशी काय दिव्यशक्ती आहे त्या गाभाऱ्यात, त्या परिसरात कि मोठ्या मोठ्या मेट्रोसिटीतून आलेल्या यंगस्टर्सनाही तिथे बसून पारायण करण्याचा मोह आवरत नसावा ? अतिचंचल असलेली आमची पिढी कुठेतरी स्तब्ध बसू शकते का तर या प्रश्नाचंं होकारार्थी उत्तर हा परिसर मंद स्मित करत देतो. हे मंदिर जरी असलं तरी याला आपल्या आयुष्याचा रिस्टार्टिंग पॉईंट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लाईफचं रिस्टार्ट बटन हळूच प्रेस करून आपल्या चुकांबद्दल ब्र अक्षरही न काढता, त्या सामावून घेऊन परत एक संधी देण्याचं काम हे मंदिर शांतपणे करत असते. बरं फक्त काही मोजक्याच लोकांच्या नाही. तर दररोज येणाऱ्या असंख्य श्रद्धाळूंच्या आयुष्याचं रिस्टार्ट बटन प्रेस करण्यासाठी हे मंदिर तत्परतेने कार्यरत असते. हा सर्व जरी, माझी महाराजांवरची श्रद्धा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न असला तरी मी तुम्हाला सांगेल कि हे माझ्याच मनाचं मनोगत नाही. तर या तुम्हा सर्वांच्या मनातील भावना आहे. मी फक्त निमित्त आहे. तुम्ही सर्व एकच काम करा. या लेखात तुमच्या श्रद्धास्थानाचे नाव टाकून त्यांच्या मंदिराचा  परिसर इमॅजिन करा. माझ्या जागी स्वतःला पाहा. मी गॅरंटी घेतो तुम्हाला या लेखातील शब्द आणि शब्द खरा वाटेल. कारण आपली श्रद्धास्थाने भलेही भिन्न असतील. पण त्या श्रद्धास्थानाबद्दल सर्वांच्या मनात असलेली श्रद्धा ही शुद्ध पाण्यासारखी निर्मळ असते म्हणूनच तुम्हाला कदाचित हा लेख तुमचा स्वतःचाच अनुभव असल्यासारखा वाटेल थोड्याफार फरकाने. आज माझ्या श्रद्धास्थानांना सद्गुरु श्री गजानन महाराजांना ही शब्दसेवा समर्पित..! 
-अजिंक्य देशमुख ©