संध्याकाळ

Time Between Day And Night

    मनमोहिनी, प्रणयिनी , कामिनी,  गजगामिनी म्हणजे संध्याकाळ. मिलनाचे प्रतिक, प्रणयाचे साधन, चंचल , उन्मादक ललना म्हणजे संध्याकाळ. विरह आणि मिलनाच्या मधल्या चार सोनेरी घटका म्हणजे संध्याकाळ. विजनवास आणि सहवास यांचे नाजूक नाते म्हणजे संध्याकाळ. संध्याकाळ-मग ती कुठल्याही ऋतू मधली असो सारखीच ओढ लावते आणि जीव कासावीस करते.

         दिवस आणि रात्रीच्या मिलनाचा क्षण, दिवसभराची धावपळ, दगदग , घालमेल सहन करून जेव्हा शिणलेला दिवस आतुर होऊन आपल्या प्रिय सखीची "रजनी" ची आतुरतेने निवांत वाट पाहतो तो क्षण म्हणजे संध्याकाळ.

            ही संध्याकाळ मोठी गुढ, विचित्र आणि तशीच विलक्षण असते. पश्चिम क्षितिजावर सूर्य मावळतीच्या रथात बसून आपल्या घराकडे परतत असतो, पक्षी आपापल्या घरट्याकडे परतत असतात, चिमण्या , कावळे आपल्या पिल्लांना चोचीने दाणा भरवत असतात , धुळीने माखलेल्या पायवाटांवर गाई -वासरं आपल्या गोठ्याच्या दिशेने चालू लागतात आणि चाकरमानी आपल्या घरच्या ओढीनं परततात तो क्षण म्हणजे संध्याकाळ.

   या यामिनीचं सारेच जण स्वागत करतात. पश्चिम क्षितिजावरून सूर्य आपले नाना रंग तिच्या वर उधळून आपला सोनेरी किरणांचा मुकूट तिला देतो , तर आकाश चांदण्यांच्या खडीची साडी तिला चढवतो , रात्रराणि आपल्या नाजूक फुलांनी तिच्यासाठी पायघड्या अंथरते, तर मोगरा,  गुलाब , सोनचाफा आपल्या सुगंधाचा खजिना तिच्यावर उधळतात . काजवे आपल्या चिमुकल्या दिव्यांनी तिच्यासाठी रांगोळी काढतात , तर झाडं -वेली तिच्या स्वागता करिता माना झुकवतात.

         अशाच संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून आजी- नातवंडांचे शुभंकरोती सुरू असतं, तर गृहिणी तुळशीवृंदावना जवळ फुलवातीच निरांजन ओवाळून सौभाग्याचं , भरभराटीचं,  संपन्नतेचं देवाकडे मागणे मागते. कुठे एखाद्या घरात लहानग्यांचा दंगामस्ती चा खेळ सुरू असतो , तर कुठे दिवेलागणीला थकून-भागून बाबा घरात आलेले असतात. एखाद्या घरात आईची स्वयंपाकाची घाई सुरू असते तर कुठे  मोठे ताई-दादा अभ्यासात नाक खुपसून बसलेली असतात, आणि  घरातले आजोबा देवळात आरतीला गेलेले असतात आणि त्याच वेळी गावाबाहेर भटक्यांच्या चुली धगधगलेल्या असतात.

              संध्याकाळ ओढ लावणारी, कासावीस करणारी,  स्पर्श , प्रेम,  माया , ओढ यांचे रसिक,  प्रणयी आणि मोहक रूप ,मिलनाचे प्रतिक ,मादक- मोहिनी, चैतन्यदायीनी,  जीवाला रुखरुख लावणारी , प्रियसीला कासावीस करणारी,  नवविवाहितेला गोड हुरहूर लावणारी , गृहिणीला घर -धन्याची वाट पाहायला लावणारी , आणि प्रणयोत्सुकांना अधीर करणारी, विरहिणी- कातरवेळ म्हणजे  यामिनी संध्याकाळ.






(सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)





(मंडळी तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा आणि तुमचे अमूल्य मत आणि अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत...........)

🎭 Series Post

View all