यशची गोष्ट (सुटका)भाग दोन

A Story Of A Boy Who Escape From Kidnappers


पहिल्या भागात आपण पाहिलं की रमा आणि मीना दोघीजणी बगीच्या मध्ये मुलांच्या अपहरणाविषयी बोलत बसलेल्या होत्या आता बघूया पुढे काय होते ते…


संध्याकाळ झाल्यावर मीना आणि रमा आपापल्या घरी परतल्या. दुसऱ्या दिवशी मुलंही सकाळचं आवरून शाळेत गेली. पण शाळेतून परत येताना एक विचित्र घटना घडली. खरंतर राधा आणि यश दोघेही एकाच व्हॅनमध्ये शाळेत जायचे पण, त्यादिवशी घरापासून थोडं लांब अंतरावर त्या दोघांची व्हॅन बिघडली त्यामुळे,राधा आणि यश घर जवळच असल्याने चालतच घराकडे निघाले. तेवढ्यात रस्त्यात होंडावर एक व्यक्ती आली आणि ती यशला स्वतः सोबत चलण्याचा आग्रह करु लागली.


व्यक्ती -"अरे बाळा तुझ्या बाबांनी तुला लवकर बोलावलं आहे. तुला घ्यायला त्यांनी मला पाठवलेला आहे. चल लवकर चल."

यशला जरा आश्चर्यच वाटलं. \"घर जवळ असताना आणि मी व्हॅन मधून घरी येतो हे बाबांना माहिती असून सुद्धा त्यांनी या अनोळखी व्यक्तीला का पाठवलं?\"


यश -"काका मी तुम्हाला ओळखत नाही. मी तुमच्यासोबत येणार नाही."

व्यक्ती -"अरे पण असं काय करतो? मी तुझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये काम करतो. घरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून, त्यांनी मला तुला घ्यायला पाठवला आहे."


यश -"पण काका माझं घर इथून जवळच आहे. मी घरी जाऊन बघतो ना काय झाल आहे."

व्यक्ती -"अरे तू घरी जाऊन काय उपयोग? तुझ्या घराला तर कुलूप असणार आहे. तुझी आई पण तुझ्या बाबांसोबतच आहे. चल लवकर बस माझ्या गाडीवर."

तेवढ्यात राधा मध्येच बोलली,

राधा -"काका मी थोडं बोलू का?"

त्या व्यक्तीला वाटलं तिलाही सोबत घ्यावं.


व्यक्ती -"चल तू पण चल याच्याबरोबर,माझ्यासोबत."

राधा -"पण काका मी तुमच्याबरोबर का येऊ?"

व्यक्ती -"अगं तुझ्या घरी ही प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणून तुझ्या बाबांनी तुलाही सोबत आणायला सांगितल आहे."

राधा -"हो का खरंच! पण काका मी तुमच्यासोबत येणार नाही. माझ्या आईने सांगितलं आहे की, कोणीही अनोळखी व्यक्तीबरोबर बोलायचं नाही, आणि त्यांच्यासोबत कुठेही जायचं नाही."

व्यक्ती -"बरं राहू दे मग. मी यालाच घेऊन जातो. चल बाळा लवकर बस माझ्या गाडीवर."

राधा -"एक मिनिट काका, जर यशच्या बाबांनी तुम्हाला यशला घ्यायला पाठवलं असेल तर मग यश आणि काकांनी ठरवलेला कोडवर्ड सांगा बरं!"

ती व्यक्ती गोंधळली.

व्यक्ती -"कोडवर्ड कसला कोडवर्ड,कोणता कोडवर्ड ?"

तेवढ्यात यश बोलला..

यश-"काका माझ्या बाबांनी आणि मी ठरवलेल आहे जर घरात काही इमर्जन्सी आली असेल, आणि ते जर मला कुणाला घ्यायला पाठवतील तर त्या व्यक्तीला ते एक कोडवर्ड किंवा पासवर्ड सांगतील. चला सांगा बरं काय आहे तो कोडवर्ड? बाबांनी तुम्हाला सांगितलेला तो कोडवर्ड जर तुम्ही आम्हाला सांगितला तर, मी तुमच्या गाडीवर नक्की बसेन आणि तुमच्या सोबत येईल."

यशच्या या वाक्याने ती व्यक्ती गोंधळली आणि ती यशला जबरदस्तीने त्याच्या गाडीवर बसवण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात राधा जोरजोरात ओरडायला लागली.

राधा -"वाचवा, वाचवा वाचवा!"

आणि राधाने त्या व्यक्तीच्या हाताला एक कडकडून चावा घेतला. यशनेही मग स्वतःची नखं ओरबाडण्यासाठी वापरली. त्या व्यक्तीचे केस जोरात ओढले. या दोघांच्याही हल्ल्यामुळे ती व्यक्ती बावरली. तेवढ्या वेळात दोन-चार लोकही तिथे जमले. आजूबाजूला लोक जमत आहेत हे पाहून त्या व्यक्तीने तिथून लगेच पोबारा केला.


राधा आणि यश मग तिथून धावत धावत घरी पोहोचले.घरी पोहोचल्यावर दोघांनीही आपापल्या आयांना झालेला प्रसंग सांगितला.

ह्या प्रसंगातून आज जरी राधा आणि जय वाचले होते, तरीही हे संकट अजून टळल नव्हत.

********************************************


पुढल्या भागात बघूया यशच अपहरण होतं का,की राधा आणि यश त्या गुंडाच्या तावडीत सापडतात का? मग ती आपली स्वतःची सुटका कशी करून घेतात?

सदर कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.

©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.


🎭 Series Post

View all