Mar 03, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

द एंड...!८ (अंतिम भाग)

Read Later
द एंड...!८ (अंतिम भाग)

़औअष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी तिसरी रहस्य कथा
शीर्षक -द एंड...!८(अंतिम भाग)

 


     मालती तिथून जे थेट निघाली ते जमेल त्या वाहनाने तडक तिच्या गावी पोहोचली. तिला सुखरूप परत आलेली बघून शेजारी पाजारी ही समाधान व्यक्त करू लागले. "ती अशी अचानक कुणालाच न सांगता कां निघून गेली? " म्हणून सगळे तिला विचारत होते.


पण तिने तेच जुने कारण सांगून" त्या अवस्थेत तिला काहीच न सुचल्याने ती तशी चालली गेली. " असे सांगून वेळ मारून नेली.


तिथून आल्यानंतर मनावरचे सर्व मळभ झटकून मालतीने आपल्या जुन्या आयुष्याला पुन्हा प्रारंभ केला.


एखादा दिवस असाच गेला असेल. दुपारी मालती घरात एकटीच असताना पुन्हा कोणीतरी घरी आले. तीने मालतीला आपली ओळख दाखवताच मालती तिच्यासोबत गेली.

यावेळी जाताना मात्र ती शेजारी " मी थोडी बाहेर जाऊन येते ."हे सांगायला विसरली नाही.


कुठे चालली होती मालती?कुणालाच कळले नव्हते. सोबतीला कोण होते? तेही कुणाला माहित नव्हते.


पण दोन-तीन तासानंतर मालती जशी गेली होती तशी परतही आली होती.
शेजाऱ्यांनी विचारल्यावर "थोडे कागदपत्रांचे काम होते, ते करायला गेली होती." असे मोघम उत्तर तिने दिले.

 

इकडे मात्र इन्स्पेक्टर विराज रिपोर्ट येईल त्यानंतर निर्णय घेऊ असा विचार करत स्वस्थ बसले नव्हते. त्यांचे डोके वेगवेगळ्या अँगलने त्या प्रकरणाचा तपास करत होते. त्या घटनेच्या बाबतीत असणाऱ्या सगळ्या शक्यता त्यांनी पडताळून पाहिल्या होत्या. या प्रकरणात जिथे जिथे कुठे काही लुपहोल्स दिसत होते त्या प्रत्येक बाबीवर त्यांनी गांभीर्याने विचार केला होता. या घटनेशी संबंधित वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांनी पाळत ठेवली होती.

अगदी सदाशिवराव विभुते, महेश साळुंखे या दोघांचेही व्यक्तिमत्व, त्यांचे कुणाशी उठणे बसणे होते, त्यांच्याशी निगडीत लोकं, त्यांच्या जगण्याने किंवा मरण्याने कोणाचे असलेले हितसंबंध या सगळ्याच बाबींचा विचार विराज पाटलांनी केला होता.


आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दोघाही कथित मयत लोकांचे फोन इन्स्पेक्टर विराजने हस्तगत केले होते. त्यावरून त्यांच्या संपर्कात असणाऱ्या मंडळींपर्यंत पोहोचणे इन्स्पेक्टर विराजला सोपे गेले होते.


आणि अशाच या तपासातून इन्स्पेक्टर विराजला काही व्यक्ती संशयित वाटायला लागले होते. त्या त्या व्यक्तींचा माग सातत्याने त्यांची माणसं घेत होती आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची खबरबात त्याला पोहोचवत होती.


तितक्यात इन्स्पेक्टर विराज चा फोन वाजला,"सर आम्हाला तो इसम सापडला आहे, त्याला बेड्या घालून घेऊन यायचं का?"


"हे बघा जाधव, अजूनही आपल्यासाठी तो संशयित आहे, गुन्हेगार नाही. त्यामुळे त्याला फक्त दमदाटी करून पण बेड्या न घालता जिथे आहात तिथून इथल्या पोलीस स्टेशनला घेऊन या."

दुसऱ्या दिवशी जाधव आणि त्यांची टीम त्यांना सापडलेल्या संशयिताला घेऊन इन्स्पेक्टर विराजच्या समोर दाखल झाली होती.


इन्स्पेक्टर विराजची भेदक नजर बघून तो समोरचा इसम चुपचाप मान खाली घालून उभा होता.


"तुम्हाला इथं असं कां आणलं गेलंय , याची तुम्हाला कल्पना आहे?"


समोरचा इसम काही न बोलता फक्त निःशब्दपणे मान खाली घालून उभा होता.

" आठ-दहा दिवसाआधी या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जी अपघात सदृश्य घातपाताची घटना घडली त्या घटनेमागे तुमचा हात आहे. असा आम्हाला दाट संशयच नाही तर खात्री आहे. तुम्हाला तुमचा गुन्हा मंजूर आहे?"


पुन्हा इन्स्पेक्टर विराजची भेदक नजर त्याच्याकडे वळली. त्या नजरेचा सामना करण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती.


"मी तुम्हाला पुन्हा विचारतो, त्या घटनेच्या मागे तुमचा हात आहे का? तुम्ही बऱ्या बोलाने आणि सरळ सरळ उत्तर दिलं तर ते तुमच्यासाठी आणि आमच्यासाठीही चांगलं असेल अन्यथा अन्य मार्गांचा वापर करण्याची वेळ आमच्यावर येईल. तेव्हा बऱ्या बोलाने सांगा तुमचा गुन्हा तुम्हाला मंजूर आहे काय?"


इन्स्पेक्टर च्या आवाजातली जरब अन् आता घटनेनंतर झालेली उपरती म्हणा की अजून काही,
"हो साहेब त्या गुन्ह्यात माझाच हात आहे, तो गुन्हा मीच केला हे मान्य करतो........, तुम्हाला वाटेल ती शिक्षा मला द्या साहेब...!"म्हणत तो तिथेच खाली बसला आणि स्फुंदुन स्फुंदुन रडू लागला.


इन्स्पेक्टर विराज ने इशारा करताच जाधव पोलीस त्या इसमाला आत घेऊन गेले.

इकडे इन्स्पेक्टर विराजने नंबर डायल करून त्यावर फोन लावला.

"हॅलो मिस्टर श्रीरंग, तुमच्या वडिलांचा खुनी सापडला आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्यांना येऊन बघू शकता."


"हो साहेब मी काही वेळात येतोच माझ्या भावाला घेऊन."

ते दोघे भाऊ येईपर्यंत इकडे इन्स्पेक्टर विराज मात्र आतापर्यंत घडलेल्या नाट्यमय घटनांचा विचार करत बसला होता.


श्वानपथक आल्यानंतर साऱ्या घटनेची दिशाच बदलली होती.
हे असं घडण्यामागे एखादे स्त्री पात्र, अनैतिक संबंध किंवा एखाद्याचे हितसंबंध तर कारणीभूत नसतील ना या दृष्टिकोनातूनही विचार करणे त्यांनी सुरू केले होते.

त्यामुळे सगळ्या संबंधितांवर त्यांनी गुप्तपणे पाळत ठेवली होती.
दोघांच्याही फोन मधील कॉल हिस्टरी चेक करताना एका फोनवर एक नंबर दिवसातून एकदा तरी डायल केला जायचा असे निदर्शनास आले होते.

तपासात तो नंबर मालती नामक एका स्त्रीचा आहे हे कळले. आणि ती स्त्री त्याच जवळपासच्या परिसरातील एका गावात राहते असे कळले. पण जेव्हा मालतीचा शोध घेतला गेला तेव्हा जवळपास घटनेच्या दिवसापासूनच मालती बेपत्ता असल्याचे लक्षात आले होते. आणि ती कुठे गेली ते कुणालाच माहीत नव्हते.


दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी केलेल्या फोनवरून तिचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला असता. ती कोल्हापूर वरून बोलत असल्याचे समजले. त्यानंतर मात्र तीने तिचा फोन स्विच ऑफ केल्याने पुढचे काही समजले नव्हते.


इन्स्पेक्टर विराजने मग कोल्हापूर पोलीस स्टेशनला फोन करून. अशा प्रकारचे दोघेजण तिथे कुठे वास्तव्यास आहेत का? याचा शोध घेण्याची विनंती केली.


पण अचानकच एक दिवस ही मालती नामक महिला तिच्या घरी परत आल्याची माहिती मिळाली.


दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनची महिला शिपाई साध्या वेशात जाऊन आणि आपली ओळख दाखवून मालतीला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आली.


आधी गप्प गप्प असलेली मालती, तिच्याबद्दल कोणाला काहीच कळू देणार नाही याची ग्वाही देताच  घडलेले सगळे इन्स्पेक्टर विराजला सांगून मोकळी झाली.


तिच्याकडूनच त्या इसमाचा सध्या वापरात असलेला नंबर पोलिसांना प्राप्त झाला. मालतीच्याच फोनवरून पुन्हा त्या इसमाला  फोन करून. पोलिसांनी त्याचे एक्झॅक्ट लोकेशन शोधून काढले
 आणि त्याला चतुर्भुज केले.


इन्स्पेक्टर विराज आपल्याच विचारात गढला असताना, श्रीरंग आणि श्रीधर विभुते गडबडीने तिथे आले.


"कोण आहे तो आरोपी इन्स्पेक्टर? कोण आहे आमच्या बाबांचा हत्यारा?"

"थांबा ,थांबा विभुते बंधू मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच त्याला भेटा."

इन्स्पेक्टर विराज पाटील त्यांना स्वतः कोठडी कडे घेऊन गेला.

पाठमोरे असलेल्या त्या इसमाला बघून, श्रीधर बोलला,

"का केला तुम्ही आमच्या बाबांचा खून? काय बिघडवलं होतं त्यांनी तुमचं?
आणि आता असे तोंड लपवून बसलाय.....!"

श्रीरंगने हलकेच श्रीधरच्या खांद्यावर थोपटून त्याला शांत राहण्यास सांगितले.


जसे जाधव शिपायांनी त्या व्यक्तीला पलटवून श्रीरंग आणि श्रीधर च्या समोर उभे केले.

"तुम्ही.......?"असे म्हणत दोघांचेही डोळे विस्फारले गेले. श्रीधर चा चेहरा तर अगदी पांढरा फटक पडला होता.

"नाही इन्स्पेक्टर ,हे कसं शक्य आहे...? नक्कीच काहीतरी घोळ झाला आहे."

"जे तुमच्या समोर आहे हे वास्तव आहे. तुम्ही नाकारा अथवा स्वीकारा पण जे आहे ते सत्य आहे. स्वतः आरोपीने हे सत्य स्वीकारलं आहे तर मग तुम्ही कां त्याला नाकारताय?"इन्स्पेक्टर विराज एवढ्या ठामपणे बोलत होते की ते स्वीकारण्यावाचून पर्याय नाही हे श्रीरंग आणि श्रीधर या दोघाही भावांना कळले होते.


आतापर्यंत मूकपणे सगळे पाहत असलेला श्रीरंग मात्र आता त्या इसमाला विचारत होता.....
"का केलं बाबा तुम्ही असं? असं काय कारण होतं की तुम्हाला खुनासारखा गुन्हा करावा लागला?"

हो श्रीरंग बोलत होता ते सत्यच होते. तो इसम ,तो आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून दस्तूर खुद्द सदाशिवराव विभुते हाच होता.

पश्चात्तापा ने दग्ध झालेल्या सदाशिवराव विभुतेच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. खाली मान घालून अश्रू गाळण्याशिवाय दुसरा मार्गच त्याच्याकडे नव्हता.

घडलेला घटनाक्रम असा होता की, कर्तव्यदक्ष सद्गृहस्थ असलेल्या सदाशिवरावांनी पत्नीच्या मृत्यूनंतरही आपल्या मुलांना प्राधान्य देत त्यांनाच आपले आयुष्य मानत दुसरे लग्न न करता नेटाने त्यांचे संगोपन केले होते. जोपर्यंत मुलांचे लग्न व्हायचे होते, शिरावर जबाबदाऱ्या होत्या तोपर्यंत त्यांना त्या गोष्टीचे काही वाटत नव्हते. पण दोन्ही लेकरांचे लग्न झाले, दोन्ही लेकरं कर्तेधर्ते झाले आणि सदाशिवरावांना आयुष्य शून्यवत वाटू लागले. अशातच एका कार्यक्रमादरम्यान मालतीबाई आणि त्यांची ओळख झाली. एकटे पणा आणि विरह हा समान धागा त्या दोघांना जवळ आणणारा दुवा ठरला. मनातून दोघांनाही एकमेकांविषयी वाटायचे. पण आतापर्यंत आपल्या आयुष्याचे स्वत्व जपणाऱ्या मालतीनी दोघांच्याही नात्याला नाव दिल्याशिवाय पुढे पाऊल टाकणार नाही हे स्पष्टच सदाशिवरावांना सांगितले होते.
आता मुला बाळांची लग्न झाल्यानंतर आयुष्याच्या या टप्प्यावर स्वतःच्या लग्नाचा विषय काढणे सदाशिवरांना फार अवघड जात होते. पण त्यांच्या मनाचा मालतीकडे असलेला ओढा काही केल्या कमी होत नव्हता. म्हणून त्यांनी स्वतःलाच संपवायचा निर्णय घेतला. तशातच त्यांचा जुना ड्रायव्हर महेश साळुंखे याला या प्रकरणाची कुण कुण होतीच त्यामुळे तो त्यांना नेहमीच ब्लॅकमेल करायचा. त्यामुळे सदाशिवरावांनी प्लॅन करून त्याला बोलावले त्याला भरपूर दारू पाजली आणि त्या दारूच्या नशेतच त्याला मारून पुढचा प्लॅन बनवला.

"काय केलं बाबा तुम्ही हे? एकदा तर आम्हाला विचारायला हवं होतं....!
तुमच्या आनंदासाठी आम्ही काहीही केलं असतं. तुम्ही एक नाही दोन नाही तर तीन खून केलेत बाबा. एक आपला, दुसरा महेश साळुंखेचा आणि तिसरा आमच्या भावनांचा......!"

श्रीरंगचे बोलणे सदाशिवरावांचे काळीज कापीत गेले. कुठून दुर्बुद्धी झाली आणि हे असले कृत्य मी केले.या एका कृत्याने माझी आजवरची प्रतिमा मलिन करून टाकली ,नाही... हे कुठेतरी थांबायला हवे असा विचार त्यांच्या डोक्यात आला....
अगदी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी बाजूलाच उभ्या असलेल्या सब इन्स्पेक्टर च्या खिशातली बंदूक काढली आणि स्वतःच्याच डोक्यात गोळी घालून या प्रकरणाचा  त्यांच्या कडून *द एंड* केला.

सदाशिवरावांनी जरी या प्रकरणाचा *द एंड* केला असला तरी त्याचे पडसाद श्रीरंग आणि श्रीधर या त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर उमटल्याशिवाय राहणार नव्हते.

या सगळ्या घटनेत महेश साळुंखे निष्कारण मारला गेला होता. दारुडा असला तरी तो त्याच्या घराचा आधारस्तंभ होता.

मात्र मालतीला या प्रकरणाची झळ पोहोचू नये याची सगळ्यांनी खबरदारी घ्यावी याची विनंती मात्र स्वतः इन्स्पेक्टर विराजनी केली होती.

शेवटचा दिस गोड व्हावा. असं जर वाटत असेल. तर आयुष्यातील प्रत्येकच निर्णय सारासार विचार करूनच घ्यावा  हेच खरे.

धन्यवाद!

© मुक्त मैफल
डॉ. मुक्ता बोरकर -आगाशे

 

 

 

 

 

 

 

 

 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mukta Borkar- Agashe

Private Practitioner

मी एक खाजगी वैद्यकीय व्यावसायिक असून मला कथा आणि कविता लिहिण्यात अभिरुची आहे.

//