अष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी तिसरी रहस्य कथा
शीर्षक -द एंड...!७
इकडे हा सगळा घटनाक्रम सुरू असताना. जवळपासच्या च दोन चार गाव पुढे असलेल्या गावातील एक महिला जी एकटीच राहायची ती अचानक दोन तीन दिवसांपासून कुठे गेली होती ते कुणालाच कळत नव्हते.
आदल्या दिवशी रात्री जी बाई आपल्याशी बोलली ती अचानक दाराला कुलूप लावून कुठे गेली असेल? हा प्रश्न शेजाऱ्या पाजाऱ्यांना पडला होता.
दुसऱ्या दिवशी कोणीतरी तिला फोन लावून विचारले तेव्हा तिने रात्रीच तिचा दूरचा भाऊ मेल्याने ती सकाळीच अचानक निघून आली असे तिने सांगितले . पण त्यानंतर मात्र तिचा कोणाशीच संपर्क होऊ शकला नाही. नंतर मात्र तिचा फोन नॉट रीचेबल किंवा स्विच ऑफ च यायचा.
कोण होती ही बाई?
ही होती मालती. बारा वर्षांपूर्वी तिचे पती मरण पावले होते. मुल बाळ नव्हते. नवऱ्याची तुटपुंजी पेन्शन होती आणि थोडेफार काम करून ती सुद्धा काही मिळवायची व त्यावरच तिची गुजराण चालायची.
दोन-चार दिवसांआधी सगळीकडे सामसूम झाल्यावर अचानक कुणीतरी मालतीच्या घराचा दरवाजा ठोठावला.
"कोण आहे बाहेर..?"
"मालती, मी आहे दार उघड.....!"ओळखीचा आवाज ऐकून मालतीने दार उघडले.
"तुम्ही एवढ्या रात्री....?"त्याला अशा अपरात्री घरी बघून मालतीने प्रश्न विचारला.
कुणी आजूबाजूला बघत तर नाहीयेत ना याचा कानोसा घेतला आणि आणि त्या व्यक्तीला घरात घेत दार बंद करून घेतले.
" आज एवढ्या रात्री इथे कसे काय आले?"तिने त्याला विचारले.
"तुझ्यासाठी मालती, फक्त तुझ्यासाठी....!"तो म्हणाला.
"बघ तुझा विश्वास नव्हता ना, पण तुझ्यासाठी मी सगळं मागे सोडून आलो आहे, कायमचा."
"काहीही नका सांगू,...!"ती
"अग खरंच, हे बघ उद्याच्या ट्रेनचे दोन तिकीटं. इथून आपण उद्या पहाटेच ट्रेनने कोल्हापूरला जायचे आणि तिथे अंबाबाईच्या मंदिरात लग्न करून नवीन आयुष्याला सुरुवात करायची."
"खरं बोलताय तुम्ही, खरच माझ्याशी लग्न करणार का तुम्ही?"तिच्या बोलण्यात फारच आश्चर्याचे भाव होते.
"अगदी खरं मालती, विश्वास ठेव माझ्यावर, तुझ्यासाठी मी सगळं सोडून आलो आहे कायमचे. चल लवकर तयारी कर आपल्याला आता रात्रीच निघावं लागेल तेव्हा कुठे पहाटेची ट्रेन आपल्याला मिळेल." तो.
मालतीचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तो खरच तिच्याशी लग्न करेल असे तिला अजिबात वाटले नव्हते पण तो तर तिच्यासाठी सगळं काही सोडून आला होता कायमचे.
खुशीतच मालतीने तयारी केली आणि ती त्याच्यासोबत निघाली.
पहाटेच्या ट्रेन ने त्यांनी कोल्हापूर कडे प्रयाण केले. तिथे पोहोचल्यावर मंदिरात जाऊन लग्न केले. दिवसभर मनसोक्त भटकून घेतले. बाहेरूनच जेवण खाण करून दोघे रात्री त्यांच्या हॉटेलच्या खोलीवर परत आले.
दोन-चार दिवस असेच मौज मजा करण्यात गेले. एकमेकांच्या सहवासात दोघे फार आनंदात होते. आपल्यासारख्या विधवा बाईच्या आयुष्यात हा क्षण पुन्हा कधी येईल याचा मालतीने विचारच केला नव्हता पण त्याच्या रूपाने तिच्या आयुष्याचे पुन्हा एक नवे सुवर्ण पर्व सुरू झाले होते.
तो सुद्धा खूप खुश होता. त्याचे मालतीवर प्रेम होतेच पण या नात्याला नाव दिल्याशिवाय पुढे पाऊल टाकायचे नाही ही तिची अट होती.
ती अट पूर्ण करणे त्याच्यासाठी खूप कठीण होते. अनेक जबाबदाऱ्या , त्याचे पहिले कुटुंब त्याच्याबद्दलही असलेला त्याचा जिव्हाळा. पहिल्या पत्नीवर आणि त्या कुटुंबावर सुद्धा त्याचे तितकेच प्रेम होते त्यामुळे ते सगळे बंध तोडून मालती कडे येणे त्याच्यासाठी वाटते तितके सोपे नव्हते.
कितीतरी दिवस तो पहिले कुटुंब की मालती...? या दोलायमान अवस्थेत तो झुलत होता. कितीतरी दिवस त्याने त्याच्यावर विचार केला पण शेवटी मालती च्या प्रेमाचे पारडे जड झाले आणि सगळं सोडून तो तिच्याकडे आला होता.
मालतीची सुद्धा अवस्था कुठे वेगळी होती? लग्न झाले तरी बरेच दिवस होऊनही तिची कूस उजवली नव्हती. एवढे कमी होते की काय एका छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन तिचा नवराही तिला कायमचा सोडून गेला.
नवऱ्याची थोडी थोडकी असलेली पेन्शन, सोबतीला इकडचे तिकडचे काम करून ती आपली गुजराण करत होती. लोकांच्या नजरा, विधवा स्त्रीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण. तिचे निपुत्रिक असणे . सारे सारे तिने सोसले होते. आपले आयुष्य असेच कायम वैराण वाळवंट आहे असे वाटत असताना अचानक मागच्या दोन-तीन वर्षात तो तिच्या आयुष्यात आला होता. तरी त्यांनी त्या दोघांच्या नात्याला संयमाच्याच कोंदणात ठेवले होते.
हे नाते असेच मनोमनी च राहणार असे वाटत असताना तो अचानक तिच्यासाठी सुख स्वप्न घेऊन आला होता.
आणि त्याच सुखसागरात ती सध्या डुंबत होती.
"मला मला वाटलं नव्हतं तुम्ही माझ्यासाठी सगळं सोडून याल म्हणून."ती
"पण आलोच ना मी तुझ्यासाठी सगळं सोडून, मालती मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो......
तुला खरं नाही वाटणार पण तुला भेटण्यासाठी मी अक्षरशः मुडदे पाडून आलोय."
"अहो काय सांगताय काय......?"एक आश्चर्य अन् भय मिश्रित कंप मालतीच्या आवाजात होता.
"नाही, खोटं बोलताय तुम्ही हे सगळं...!" ती
"नाही मालती नाही, मी अगदी खरं सांगतोय......, हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलंय फक्त तुझ्यासाठी.......!"
तो तिला सांगत होता अन् ती सुन्न होऊन सारं ऐकत होती.
त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने बनवलेली नवी आयडेंटिटी त्याने घेतलेला नवीन सिम सगळे सगळे तो तिला सांगत होता.
तो रसभरीत वर्णन करत होता अन् ती भयाने थरथरत होती....
"खुनी आहात तुम्ही ,खुनी आहात....!"ती बोलली आणि त्याच्यापासून दूर जाऊन उभी राहिली.
आता तिथे फक्त एक निःशब्द शांतता नांदत होती.
रात्रभर तिच्या डोळ्याला डोळ्याला लागला नाही. कोणाचा खून केला असेल याने? आज एकाचा खून केला उद्या दुसऱ्याचा करेल नंतर माझा नंबर नसेल कशावरून....?
नाना विचार तिच्या डोक्यात थैमान घालत होते.
"एखाद्याच्या मढ्यावर उभा केलेला संसार कधीच सुखकर असणार नाही . मला सुखी व्हायचं होतं पण अशाप्रकारे नाही."तिचं मन तिला ग्वाही देत होतं.
थोडीफार दारू घेतल्याने त्या नशेत बडबडत तो तिला सांगत होता पण मालती मात्र आपल्या भविष्याचा विचार करत सुन्नपणे बसली होती.
अखंड बडबड करून तो आता झोपला होता .
तिने मात्र पक्का निश्चय केला होता आता, घरी परत जाण्याचा, पुन्हा तेच आपले जुने आयुष्य जगण्याचा.....!
त्याला तसाच झोपलेला ठेवून, कागदावर त्याच्यासाठी दोन शब्द रखडून मालतीने त्याचा कायमचा निरोप घेतला होता....
सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तिथे तो एकटाच होता. काल रात्री घडलेले त्याला धुसर धुसर आठवत होते....
बाजूला पडलेली तिची चिट्ठी बघून त्याने मात्र कपाळावर हात मारून घेतला होता.
जिला प्राप्त करण्यासाठी त्याने एवढे खेटे घातले होते, मुडदे पाडले होते तीच त्याला सोडून गेली होती....
त्याच्या जीवनाची अक्षरशः शोकांतिका झाली होती....!
कोण असेल तो? इन्स्पेक्टर विराज तपास करत असलेल्या घटनेशी त्याचा काही संबंध असेल कां? की अजून काही वेगळे प्रकरण असेल? हे सर्व जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.
© मुक्तमैफल
डॉ. मुक्ता बोरकर- आगाशे