द एंड...!६

Kay asel inspector Viraj chi tapasachi pudhacha disha? Ti yenarya repotrs varch avlambun asel ki inspector Viraj itar prakarane ya prakarnacha chhada lavnyat yashasvi hoil?

अष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी तिसरी रहस्य कथा
शीर्षक - द एंड...!६


विहिरीतून काढलेल्या गाठोड्यातून निघालेले शीर पाहून खरंतर सारेच चक्रावले होते. गाठोड्यातून निघालेले कपडे, धारदार शस्त्र आणि ते मुंडके पाहून किती निर्घृणपणे ती हत्या केली गेली होती याची कल्पना येत होती.


तिथून दुर्गंधी येत असली तरी मुंडके  ओळख पटण्याच्या अवस्थेत होते.


जे काही घडत होते ते बघून श्रीधर आणि श्रीरंग हे दोघेही थक्क झाले होते. छाटलेले मुंडके बघून त्यांचे डोळे नकळतच पाणावले होते.


"हे बघा श्रीरंग आणि श्रीधर हे इथे पडलेले शीर तुमच्या वडिलांचेच आहे का? याची एकदा खात्री पटवून घ्या."


आपल्या वडिलांच्या  देहाला अशाही अवस्थेत बघावे लागेल असा विचार करून दोघाही भावांना अतिशय वाईट वाटत होते. पण तरीही धीर करून दोघेही ओळख पटवण्यासाठी सामोरे आले.


आणि ते शीर बघून विचित्र भाव त्या दोघांच्याही चेहऱ्यावर उमटले.

"नाही,.... नाही....!"अचानकच दोघे भाऊ ओरडले.

त्यांचं असं ओरडणं बघून सगळे भांबावून गेले.

"काय झालं श्रीधर आणि श्रीरंग विभुते? असं अचानक भूत दिसल्यासारखं का दचकलात?"इन्स्पेक्टर विराज ने विचारलं.


"इन्स्पेक्टर हे आमचे बाबा नाहीत....!"

"काय......? मग कोण आहेत हे...?"

"हा ,हा....ड्रायव्हर महेश साळुंखे......!"विभूते बंधूनी सांगितलं.

"काय ?महेश साळुंखे.....?"
आता मात्र इन्स्पेक्टर विराज पासून सगळेचजण चकीत झाले होते.


आतापर्यंत ज्याला आरोपी समजून तपासाची दिशा ठरवली जात होती तोच नेमका मेला आहे हे कळल्यानंतर जी अवस्था होईल ती अवस्था इन्स्पेक्टर विराज ची झाली होती.


"बापरे! प्रकरणाने किती वेगळी कलाटणी घेतली आहे ना."

"कुणीतरी जाऊन महेश साळुंखे च्या घरच्या लोकांना बोलवून आणा."
इन्स्पेक्टर विराज ने सूचना केल्या आणि एक जण महेश साळुंखे कडे निरोप द्यायला गेला.


इकडे श्रीधर आणि श्रीरंग विभुते हे इतके गोंधळून गेले होते की काय सुरू आहे तेच त्यांना कळत नव्हतं. शरीर बाबांचं ,डोकं महेश साळुंखे चं. म्हणजे नेमकं घडलं तरी काय..?


"कुणीतरी दोघांनाही मारलं असावं कां? नेमकं काय झालं असावं ?त्यांच्या बाबांचं डोकं कुठे गेले असावे?"अशा अनेक प्रश्नांनी त्या दोघेही भावांच्या मनात थैमान घातले होते.

इन्स्पेक्टर विराज ची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती. केसची गुंतागुंत अजूनच वाढत चालली होती. एखाद्या याच्यातून मार्ग निघते म्हणावं तर प्रकरण भलतीकडेच वळण घेत होतं त्यामुळे तपासाची दिशा ठरवण्यास फारच अवघड जात होतं.

तेवढ्यात एक शिपाई महेश साळुंखे ची पत्नी आणि मुलाला घेऊन आला.

आधी त्यांना महेश चे कपडे आणि चपला दाखवण्यात आल्या.

"हो साहेब हे कपडे आणि ह्या चपला यांच्याच आहेत."महेशच्या पत्नीने सांगितले.


" ताई आता थोडं मन घट्ट करा आणि याची ओळख पटवा....!"म्हणत ते धडा वेगळे शीर तिला दाखवण्यात आले.


"नाही..........."असा आर्त टाहो फोडत ती जागेवरच कोसळली.


महेश साळुंखे चा लेक आणि पत्नी दोघांचीही अवस्था अक्षरशः बघवत नव्हती.
ध्यानी ना मनी अतिशय विचित्र परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागला होता.

दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या आपल्या पतीचं अशा विचित्र प्रकारे दर्शन होईल याची कल्पनाच तिने केलेली नव्हती. ज्याचा कधी विचारही केला नव्हता ते अक्षरशः पुढ्यात वाढून ठेवले होते.


तिचं सांत्वन करत  तिला घरी पोहोचवण्याची व्यवस्था इन्स्पेक्टर विराजनी केली.


सगळ्या वस्तू एकत्र जमा करून ते पोलीस स्टेशन कडे आले.


आता इन्स्पेक्टर विराज ची जिम्मेदारी अजून वाढलेली होती. घटनास्थळी जे शिरविरहीन धड मिळाले होते ते नेमके कोणाचे होते? सध्या तपासात मिळालेले शीर आणि घटनास्थळी मिळालेले धड एकाच व्यक्तीचे म्हणजेच महेश साळुंखेचेच तर नव्हते ना? याही गोष्टीचा शहानिशा करणे आता जिकरीचे झाले होते. किंवा दिशाभूल करण्यासाठी आरोपीने एकाचे धड आणि दुसऱ्याचे शिर असा विचित्र संयोग तर करून ठेवला नव्हता? हे पडताळून बघणे गरजेचे होते.


इन्स्पेक्टर विराजनी आजच्या तपासात निष्पन्न झालेली सगळी माहिती आपल्या वरिष्ठांना सांगितली.

"सर मला वाटते की त्या दिवशी दफन केलेली बॉडी आणि आज सापडलेले शीर हे दोन्ही एकाच व्यक्तीचे आहेत की वेगळ्या वेगळ्या व्यक्तीचे आहेत हे तपासून बघणे आता गरजेचे झाले आहे."
सर मला ती बॉडी उकरून पुन्हा नमुने तपासण्यासाठी पाठवण्याची परवानगी द्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे सर."


वरिष्ठांनाही त्यांचे म्हणणे पटत होते. कारण तपासाची पुढची दिशा ठरवण्यासाठी हे कळणे गरजेचे होते.

आता पुढचे काम होते ते विभूते कुटुंबीयांना यासाठी राजी करण्याचे.


"हे बघा मिस्टर विभुते आज घडलेल्या घटनांनी आम्ही सारे चक्रावून गेलेले आहोत.आमच्या सोबत तुम्ही असल्याने तुम्ही या सगळ्याचे साक्षीदार आहातच. आता आज मिळालेले शीर आणि आणि त्या दिवशीच आपल्याला सापडलेली बॉडी हे एकच आहेत का हे तपासून बघण्याची वेळ आलेली आहे. मला माहित आहे भावनिक दृष्ट्या हे सगळे तुम्हाला आवडणार नाही पण पोलिसांच्या कार्यात सहकार्य म्हणून तुम्ही यासाठी परवानगी द्यावी असं मला वाटते."इन्स्पेक्टर विराजनी विभुते बंधूंना समजावण्याचा प्रयत्न केला.


तसेही श्रीधर आणि श्रीरंग विभुते दोघे ही शांत आणि समजदार होतेच. आज घडलेल्या सगळ्या घटना त्यांनी स्वतः अनुभवलेल्या होत्या. सगळे प्रकरणच इतके बुचकाळ्यात टाकणारे होते की असे करण्या वाचून पोलिसांकडे दुसरा पर्यायही नव्हता. आणि जर ती बॉडी आणि आज सापडलेले शिर यांचा जर सहसंबंध निघाला असता तर वडिलांच्या जिवंत असण्याची थोडीफार आशा ही त्यांच्या मनात पल्लवीत झाली होती. हा सगळा विचार करून दोघाही भावांनी यासाठी इन्स्पेक्टर विराजला संमती दिली.

वरिष्ठांची आणि विभुते कुटुंबीयांची संमती प्राप्त होताच इन्स्पेक्टर विराज ने पुढील कार्यवाहीला सुरुवात केली.


सगळ्यांच्या उपस्थितीत फोरेन्सिक विभागाचे लोक येऊन त्यांना हवे ते सगळे सॅंपल्स घेऊन गेले.


आता येणाऱ्या रिपोर्टवर पुढील तपासाची दिशा अवलंबून होती.


पण तोपर्यंत नुसते हातावर हात देऊन स्वस्थ बसणे इन्स्पेक्टर विराजला मंजूर नव्हते. त्यामुळे इतर अजूनही कोणत्या कोणत्या बाजूने यावर विचार करता येऊ शकतो, आणखी कोणत्या कोणत्या शक्यता यात असू शकतात या दृष्टीने  त्याने विचार करणे सुरू केले होते.


काय असेल इन्स्पेक्टर विराज ची तपासाची पुढची दिशा? ती येणाऱ्या रिपोर्ट वरच अवलंबून असेल की इन्स्पेक्टर विराज इतर प्रकाराने या प्रकरणाचा छडा लावण्यात यशस्वी होईल? हे सर्व जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.


© मुक्तमैफल
डॉ. मुक्ता बोरकर आगाशे.

🎭 Series Post

View all