द एंड...!५

Kay zale asel pudhe?tithech ajun kahi clue milale astil ka tapasacha drushtikonatun?he janun ghyayche asel tar vacha pudhacha bhag.

अष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी तिसरी रहस्य कथा
शीर्षक - द एंड...!५

सगळा लवाजमा त्या पडक्या विहिरीपाशी पोचला.वरून विहीर कोरडी वाटत होती पण श्वान मात्र तिथेच भुंकत थांबले होते. ते पुढेही जाईना आणि मागेही जाईना...! 

विहिरीत डोकावून अजून अजून त्याचे तसेच भुंकणे सुरू होते.


प्रत्येकाने थोडे फार विहिरीत डोकावून पाहिले पण कुणालाच तिथे काही विशेष दिसले नव्हते.

पण कुत्रा विहिरीत डोकावून डोकावून भुंकत होता याचा अर्थ घटनेशी निगडित काहीतरी तिथे असावे याला बळ मिळत होते.


वरून नीटसा काही अंदाज न आल्याने आत मध्ये उतरून बघणे जरूरी होते. पण आत उतरणार तरी कोण? तिथे उपस्थित असलेले कुणीच विहिरीत उतरायला धाजवत नव्हते.

शेवटी इन्स्पेक्टर विराज ने 
" मिस्टर श्रीधर या कामासाठी तुमच्या माहितीतला एखादा व्यक्ती असेल तर त्याला बोलावून घ्या प्लीज." म्हणत विनंती केली.


श्रीधर ने मग  दोन तीन लोकांना फोन लावले त्यातील एक अतिशय मिनतवारिने एक जण यायला तयार झाला.


"आज घटनेचा तिसरा दिवस आहे पण अजून काही म्हणावे तसे गवसले नाही हाती.आता ह्या कुत्र्याच्या माध्यमातून काही क्लू मिळेल का ?"याचा विचार मनातच इन्स्पेक्टर विराज करत होते.


तेवढ्यात एक जण तिथे पोहोचला.
"कशासाठी बोलावलं हो भाऊ? काय काम पडलं आमच्याशी?" म्हणत त्याने श्रीधरला प्रश्न विचारला.


श्रीधर ने त्याला सविस्तर काय झाले ते समजावून सांगितले.

"हे बघा भाऊ, पण मला या बाकीच्या काही झंझटीत पडायचे नाही."
बाजूला असलेले पोलीस आणि कुत्रा वगैरे प्रकार पाहून तो बिचकतच श्रीधरला म्हणाला.

"अरे नको काळजी करू तू."श्रीधर

इन्स्पेक्टर विराजच्या हे लक्षात येताच
"हे बघा तुम्ही पोलिसांची मदत करताय  ना मग  मी तुम्हाला यात गुंतवणार कसे? हां जर तुम्ही मदत नाही केली तर मात्र मी तुमच्यावर कारवाई करू शकतो, घाबरू नका आम्ही तुम्हाला काहीच त्रास देणार नाही."इन्स्पेक्टर विराज ने अश्वस्त करताच तो विहिरीत उतरायला तयार झाला.


कमरेला एक दोर बांधून आणि नाकावर एक रुमाल वजा फडके बांधून त्याने विहिरीत उतरायची सिद्धता केली.

"मी दोराला दोन हिसडे मारले की मला वर ओढून घ्यायचे.एक हिसडा मारला की मी काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय याकडे लक्ष द्यायचं."असं सांगून तो इसम विहिरीत उतरला.

एक एक कपारीवर पाय ठेवत त्या मोडक्या तोडक्या विहिरीत उतरणे तसं खरंतर जीवावरचं काम होतं आणि स्वतःच्या जीवावर उदार होऊन तो माणूस ते काम तयार करायला तयार झाला यासाठी इन्स्पेक्टर विराज मनातून त्याला अनेक धन्यवाद देत होता.

तो इसम खाली खाली उतरत होता. वरचे त्याचे साथीदारही हळूहळू दोर पकडून आणि योग्य तेवढी दोराला ढील देत त्याची मदत करत होते.


"देवा सगळं नीट होऊ दे रे बाबा, हा इसम आपलं काम करून सुखरूप वापस बाहेर येऊ दे."  विहिरीत उतरल्यावर विषारी वायू मुळे गुदमरून  मृत झालेल्या लोकांची आठवण येऊन इन्स्पेक्टर विराजने मनोमन देवाला हात जोडले.


काही वेळाने दोराला एक हिसडा त्याने मारला.
बाहेरचे त्याचे साथीदार आणि सगळे आत वाकून तो काय म्हणतो याकडे लक्ष देऊ लागले.
"इथे आत एका मोठ्या फडक्यात काहीतरी गुंडाळलेला दिसतंय, काय करू? वास पण येतोय त्याचा."
तो खालून सांगत होता.

"तुम्ही एक काम करा आणखी काही आहे का तिथे त्या व्यतिरिक्त अजून ?काही नसेल तर ते फडके घेऊन तुम्ही वर या आम्ही दोराने तुम्हाला सपोर्ट करायचा प्रयत्न करतो किंवा याच्यातलं सामान आम्ही दुसरा दोर टाकतो त्याला बांधून वर पाठवा."


"हो साहेब लवकर टाका इथे दुर्गंधी असह्य होत आहे."त्याने सांगितले.


लगेच एक दुसरा दोर आत मध्ये टाकण्यात आला त्या इसमाने खालचे गाठोडे त्या दोराला बांधले. तो दोर वर खेचण्यात आला.


काही वेळातच पाठोपाठ आतला इसम सुद्धा विहिरीच्या बाहेर आला.


ते गाठोडे वर येताच वातावरणात एक वेगळीच दुर्गंधी पसरली. सगळ्यांनी  आपल्या नाकाला रुमाल लावले . विहिरीतून वर आलेला इसम आधीच त्या वासाने अस्वस्थ झाला होता.


काही वेळ तसाच गेला. ते गाठोडे वर येतात श्वानाचे भुंकणे परत सुरू झाले. त्याच्या भोवती फिरून फिरून पुन्हा तो तिथल्या वस्तू हुंगु लागला.

श्वानाचे वर्तन पाहून नक्कीच या गाठोड्याचा झालेल्या घटनेची संबंध आहे हे इन्स्पेक्टर विराज च्या लक्षात आले होते.


काय असेल गाठोड्यात ? आता त्याच्याही मनात कुतूहल जागृत झाले होते.
पण ही इतकी दुर्गंधी नेमकी कशाची असावी? हाही प्रश्न त्याच्या मनाला पडला.


आता तर ते गाठोडे उघडून पाहणे जरुरी झाले होते. पंच म्हणून सोबत असलेले लोक होतेच.

मग एकाने हळूच नाकाला रुमाल बांधून गाठोडे सोडायला सुरुवात केली. पुन्हा एक दुर्गंधीचा उग्र दर्प वातावरणात पसरला. थोड्या वेळासाठी सगळेच थोडे बाजूला झाले. वासाची तीव्रता कमी झाली आणि एक शिपाई आतील वस्तू हळूहळू बाहेर काढू लागला.
चपला, पॅन्ट,  कॉलर वर रक्ताळलेला शर्ट, एक धारदार वार करायची आरी, एक छोटे खानी मोबाईल आणि शेवटची वस्तू पाहून तो शिपाई गांगरलाच.

"सर ,सर...., बघाना...!"शिपायाची अवस्था बघून

"काय झाले मोरे, काय आहे आत?"इन्स्पेक्टर विराज ने विचारले.

आता मात्र मोरेनी गाठोड्यात हात न घालता डायरेक्ट गाठोडे उलटे केले.......

गाठोड्याच्या आतून जे काही निघाले ते पाहून सगळ्यांचेच डोळे अगदी विस्फारले गेले.

असे काय होते त्यात? की सगळ्यांच्याच प्रतिक्रिया अशा होत्या.

दुर्गंधीचा असह्यदर्प आणि सगळ्यांचे विस्फारलेले डोळे नक्कीच काहीतरी अनपेक्षित अन् भयावह  पाहिल्याची साक्ष देत होते.


हो कारण गाठोड्यातून निघालेली वस्तू भयावहच होती. कारण तिथे होते एका व्यक्तीचे छाटलेले मुंडके....!

नक्कीच या गाठोड्याचा त्या घटनेची संबंध होता. कारण घटनेच्या स्थळी जे धड होते ते शिरविहीन होते.

म्हणजे मयत व्यक्तीचे मुंडके आता मिळाले होते.
वरील सगळ्या वरून इन्स्पेक्टर विराज या निष्कर्षावर आला होता की वरवर अपघाताचा बनाव केला असला तरी. सध्या मिळालेले पुरावे बघता तीक्ष्ण हत्याराने शीर धडा वेगळे करून नंतर ते गाडीखाली टाकून अपघाताचा बनाव केला गेला होता.

पण हे सगळे नेमके कोणी केले होते व का केले होते? हे मात्र अजूनही अनुत्तरितच होते.


काय झाले असेल पुढे? तिथेच अजून काही क्लू मिळाला असेल का तपासाच्या दृष्टिकोनातून?हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा कथेचा पुढचा भाग.

© मुक्त मैफल
डॉ. मुक्ता बोरकर आगाशे

🎭 Series Post

View all