द एंड...!४

Pudhe nemke kay ghadle asel?kharech tya vihiridware tapasacha marg gavsel ki ajunch guntagunt badhel?

अष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी तिसरी रहस्य कथा
शीर्षक - द एंड...!४


      शिपायाच्या मागे मागे इन्स्पेक्टर विराज श्वान पथकाकडे केले. टीम लीडरशी हस्तांदोलन करून इन्स्पेक्टर ने त्यांना पूर्ण प्रकरणाची माहिती दिली.


श्वानाला पहिले घटनास्थळी नेण्यात आले. आदल्या दिवशी झालेली बघ्यांची गर्दी बघता आणि लोटलेला जनसमुदाय बघता श्वान  पथकाला काही हाती गवसेल ही शक्यता थोडी धूसरच होती.


हा सगळा विचार करून श्वानाला ड्रायव्हर महेश साळुंखे हा नेमका कुठे कुठे गेला असेल याचा माग काढण्याच्या दृष्टीने महेशच्या घरापासूनच सुरुवात करण्याचे ठरले.


महेशच्या घरी जाऊन महेशच्या दैनंदिन वापरातली वस्तू श्वानाला हुंगण्यास देण्यात आली.


ती वस्तू हुंगल्या नंतर हळूहळू श्वान पुढे पुढे आणि बाकी लवाजमा मागे मागे असे ते पथक माग घेत चालले होते. गर्दीत चौरस्तात आल्यानंतर श्वान थोडे घोटाळले. पण काही वेळ घुटमळल्यानंतर त्याने गावाबाहेर निघणारा आणि शेतशिवाराकडे जाणारा रस्ता पकडला. हुंगत हुंगत माग घेत घेत ते श्वान मयत सदाशिवराव विभुते यांच्या शेतावरील घरी सगळ्यांना घेऊन आले. तिथे सुद्धा ते काही वेळ घुटमळले. एक रिकामी पडलेली मोठी दारूची बॉटल तिथे पडली होती. सोबतीला दोन ग्लास.


म्हणजे ड्रायव्हर महेश साळुंखे हा घरून सदाशिवराव विभुते यांच्याकडेच आला हे जे त्याच्या घरचे सांगत होते त्यात तथ्य आहे हे निदर्शनास आले होते.
म्हणजे आतापर्यंत एकंदरीत निष्कर्ष असा होता की मयत सदाशिवराव विभुते यांनी फोन करून ड्रायव्हर महेश साळुंखेला बोलावलं. त्याला बोलवल्यानंतर तो सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शेतावरच्या घरी दाखल झाला.

तिथे पडलेल्या मोठ्या दारुच्या बॉटल आणि ग्लासांवरून दोघांनी यथेच्छ 
दारू ढोसली असावी असा एक अंदाज त्यांनी बांधला. दारू प्यायल्या नंतर कोणत्यातरी कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली असावी आणि त्याचेच पर्यवसान पुढच्या घटनेत झाले असावे असा एक अंदाज इन्स्पेक्टर विराजने मनात बांधला.


तेवढ्यात श्वानपथक आले आणि त्याचा माग घेत सगळे त्यांच्या शेताकडे गेले असे कळताच श्रीरंग आणि श्रीधर हे दोघे विभुते बंधू ही तिथे आले.

इन्स्पेक्टर विराजने आतापर्यंत श्वानाने त्यांना कुठे कुठे नेले हे सांगत समोर पडलेली मोठी दारूची बॉटल आणि ग्लास त्यांना दाखवले.


"इन्स्पेक्टर साहेब इकडे येताना श्वान दारूच्या दुकानाकडे गेला होता का?"श्रीधर ने विचारले.


"नाही मिस्टर श्रीधर ,श्वानाने चौकातून सरळ इकडलाच रस्ता धरला. याचा अर्थ असा होत आहे की ही दारूची बॉटल आधीच आणून ठेवलेली होती."इन्स्पेक्टर विराज ने सांगितले.


"हे आम्ही मान्य करतो की बाबा दारू घ्यायचे पण कधीच एका पेगच्यावर नाही आणि एवढी मोठी बॉटल? आश्चर्यच वाटतंय मला..!"श्रीधर बोलला.


"आमचं असं म्हणणं च नाही आहे की तुमच्या बाबांनी खूप दारू प्यायली असावी पण ड्रायव्हर महेश साळुंखेच्या घरी विचारल्यानंतर असे कळले की यावेळी महेश यायला तयार नव्हता पण तुमच्या बाबांनी जास्त पैसे देण्याचे आमिष दिल्याने तो तयार झाला कदाचित त्याला खुश करण्यासाठी त्यांनी ही आणून ठेवली असावी."इन्स्पेक्टर विराज बोलले.


"हो साहेब पण एवढी दारू डोसल्यानंतर ड्रायव्हर गाडी चालवणार कसा ना?"श्रीधर ने विचारले.


"आम्हाला दोन शक्यता वाटत आहेत एकतर खूप जास्त दारू ढोसल्यामुळे
त्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली असेल किंवा इतक्या नशेत असल्यामुळे ड्रायव्हरच्या हातून हा अपघात घडून गेला असेल आणि त्यानंतरही त्याने इथून पोबारा केला असेल. पण ह्या सगळ्या शेवटी शक्यताच आहेत आणि आपण त्या पडताळून बघतोय एवढेच. अजून कोणत्याही निष्कर्षापर्यंत आम्ही आलेलो नाही."इन्स्पेक्टर विराजनी श्रीधरला समजावून सांगितले.


त्यांनी सांगितलेले थोडेफार श्रीधरलाही पटत होते. कारण, कारण त्यानंतर घडलेली घटनाच तेवढी विचित्र होती.

इकडे या दोघांचे बोलणे सुरू असतानाच श्वान तिथून अजून समोर निघून जिथे ते मशीन ठेवलं राहायचं तिकडे गेला आणि त्यानंतर तिथून तडक घटनास्थळाकडे तो वळला.


अखेर सारा लवाजमा घटनास्थळी पोहोचला मघाशी गोंधळल्यासारखा वाटणारा श्वान आता सुद्धा पुन्हा गोंधळतो की काय असे वाटत होते पण शांत पणे तिथेच फिरून पुन्हा पुन्हा माग घ्यायचा प्रयत्न करत होता.


इन्स्पेक्टर विराज सुद्धा मनात विचार करत होता  श्वानाने जर कोणता मार्ग काढला किंवा एखादी दिशा पकडली तर गुन्हा घडल्यानंतर महेशने कोणत्या दिशेने पळ काढला असावा याचा थोडा माग घेता येईल. तो मनातच प्रार्थना करत होता की श्वानाला योग्य दिशा गवसावी.


अगदी देवाने इन्स्पेक्टर विराजची प्रार्थना ऐकावी अशा प्रकारे श्वानाने काही वेळ तिथे घुटमळल्यानंतर एका वेगळ्याच दिशेने चालायला सुरुवात केली . पुन्हा समोर श्वान आणि मागे मागे सगळा लवाजमा असा प्रवास सुरू झाला. पण श्वान एवढ्या विचित्र आणि नीट रस्ता नसलेल्या ठिकाणावरून जात होता की तिथून चालताना सगळ्यांचीच तारांबळ उडत होती.


योग्य दिशेनेच नेत असेल ना हा की आपली दिशाभूल तर नाही होणार. मनातच इन्स्पेक्टर विराज विचार करत होता. हो पण हेही खरेच अपराध किंवा गुन्हा घडल्यानंतर माणूस राजरस्त्याने जाणार कसा ना. त्याला असेच लपत छपत खाच खळग्यांच्याच वाटेने जावे लागेल. खरंच लोकं अशी कामं कां करत असतील बरं ज्यासाठी त्यांना अशी लपाछपी खेळत जावे लागावे? हो पण सगळेच असे सन्मार्गाने चालले तर आपल्याला देखील काय काम उरणार ना? स्वतःच्याच विचारांवर इन्स्पेक्टर विराजला हसू आले. पुन्हा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करत त्याने श्वानाला अनुसरणे सुरू केले.


अजून तशाच भयानक रस्त्याने  श्वान चालत राहिले,चालत राहिले अन् बाकी त्याला अनुसरत गेले.

"अजून किती दूर?कुठे नेत असेल हा आपल्याला . आपण याच्या मागे मागे वेड्या सारखे तर नाही चाललो ना?नाही तर खोदा पहाड  और निकला चूहा असे व्हायचे.पण उम्मिद पे दुनिया जिती है हा विचार करत तो पुन्हा कामाला लागला.


काहीवेळ तसेच चालत राहिल्यानंतर  दुरूनच एका पडक्या विहिरीचे दर्शन  झाले सगळ्यांना. अन् ते  श्वान नेमके त्याच विहिरीजवळ येऊन थांबले.म्हणजे या विहिरीशी त्या घटनेचा नक्कीच काहीतरी संबंध होता हे निश्चित झाले होते. 

विहिरीत वाकून पाहिले असता विहीर वरून कोरडीच दिसत होती पण आता नेमके काय होते की ते श्वान त्यांना तिथे घेऊन आले होते.

पुढे नेमके काय घडले असेल ? खरेच त्या विहिरी द्वारे पुढचा तपासाचा मार्ग गवसेल की अजूनच काही गुंतागुंत वाढेल ? हे जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.

© मुक्तमैफल
डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

🎭 Series Post

View all