द एंड...!२

Kay zale asel pudhe? Mahesh Salunkhe sadashiv ravansobat gela asel kay? Ya ghatnechya darmyan to sobay asel kay?

अष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी तिसरी रहस्य कथा
शीर्षक - द एंड...!२

इकडे पोलिसांचा पंचनामा सुरूच होता. आधी ज्याला हे सगळं दिसलं त्याचे जबाब नोंदवले जात होते. मग एक एक करत प्रत्यक्ष दर्शींचे जबाब नोंदवले गेले.

"बरं, या मशीन चे मालक कोण आहेत? " असं पोलिसांनी विचारताच कुणीतरी श्रीरंग कडे बोट दाखवले.

आता ते  श्रीरंग कडे आले. "हे मळणी ,कापणी यंत्र तुमच्या मालकीचे आहे काय? " पोलिस

" हो."

" हे  इथे कोण घेऊन  आले?" पोलिस

" हे इथे शेतावरच्या घरीच असते साहेब, जेव्हा काम असते तेव्हा एखादा ड्रायव्हर बघून आम्ही  त्या कामाच्या जागी हे मशीन घेऊन जातो." श्रीरंग पोलिसांना सांगत होता.

" आज कोणाच्या कामावर गेले होते हे? पोलिस


" माहीत नाही सर, मी आज सकाळीच कामासाठी दुसऱ्या गावाला गेलो होतो. संध्याकाळी घरी आलो  तर बाबा घरी नव्हते  मग मी त्याच भानगडीत राहिलो. पण आज निदान मी तरी कुणाच्याच कामावर ह्याला पाठवले नव्हते."


श्रीरंग पुन्हा तिथेच तसाच  उभा राहिला.
"त्याचे विचार चक्र पुन्हा सुरू झाले. हे नेमके बाबाच असतील का? त्यांचा एक्सीडेंट झाला असेल की कोणी त्यांना जीवानिशी मारलं असेल?
आणि नेमकं बॉडीचं डोकं गेलं कुठे?"
एकंदरीत स्थिती बघता त्याला तो एक्सीडेंट कमी आणि हत्याच जास्त वाटत होती. पण इतका निर्घृण खून.....! तोही माझ्या बाबांचा, कुणाचं काय वाकडं केलं होतं त्यांनी? कोणी इतक्या निष्ठुरपणे त्यांना मारावे असं त्यांचं व्यक्तिमत्व नव्हतंच.
विचार कर करून त्याचं डोकं शिणायला आलं होतं.


"दादा हे आपले बाबाच असतील का रे?" लहान श्रीधर श्रीरंगला विचारत होता.

"माहित नाही रे श्रीधरा ,ते नसतील तर खूपच चांगलं होईल पण बाबांचं कालपासून घरी नसणं आणि समोर दिसत असलेली बॉडी त्यावरचे कपडे याचा साधारण  संबंध बघता ते बाबाच असावेत."हे सगळं सांगतानाही श्रीरंग चे डोळे भरून येत होते.

तेवढ्यात पोलिसांनी त्यांना आवाज दिला.

"बॉडीची ओळख पटवायची होती, तुमचेच नातेवाईक ना हे....?"

"हो."म्हणत दोघेही भाऊ बिचकतच समोर गेले.

"दादा, बाबांना मानेजवळ तीळ होता बघ." श्रीधर

"हो रे छोटू बरं आठवलं तुला...!"म्हणत श्रीरंगनेही त्याला दुजोरा दिला.
त्यांच्या  मनात खरी ओळख पटवण्यासाठी आशा पल्लवीत झाली.


मग कुणीतरी माने कडला तीळ बघायला गेले.
"मुश्कील आहे हो साहेब, इथं काहीही दिसणं मुश्किल आहे. विशेषतः माने जवळचा भाग तर  इतका चेंगरलेला आहे की की इथे तीळच काय शिंग जरी असते ना तरी अजिबात दिसले नसते.

बॉडीची ओळख पटवण्याची एक आशा पुन्हा मावळली होती.....

पुढचा उपाय म्हणून कपड्यांचे खिसे तपासले गेले.
खिशातून एक मोबाईल आणि श्रीरंगच्या बाबांचे पैसे ठेवायचे पॉकिट निघाले. आता तर ही बाबांची च बॉडी हा विश्वास ठेवण्या वाचून गत्यंतरच नव्हते.


मनातली उरली सुरली अशाही  मावळली होती. सगळा विचार कर करून डोकं बधिर आणि सुन्न झालं होतं दोघाही भावांचं.
संवेदनाहीन मनाने दोघेही जे घडत होतं ते बघत होते.


पोलिसांचं काम उरकत आलं पंचनामा झाला आणि बॉडी आता पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आली. ब़ॉडीला डोकं नसल्याने किंवा ते चेंगरले सारखे असल्याने एक्सीडेंट पेक्षा तो घातपातच जास्त वाटत होता.


काही जुजबी चौकशी आणि कंप्लेंट लिहायसाठी दोघाही भावांना इन्स्पेक्टर ने पोलीस स्टेशन वर यायला सांगितले.


"अहो गायकवाड, तो बॉडी जवळ मिळालेला मोबाईल आणा बरं इकडे."
इन्स्पेक्टर पाटलांनी पोलीस शिपायाला सांगितले.


इन्स्पेक्टर विराज पाटील नव्या दमाचे तरुण इन्स्पेक्टर एखादे वर्षा आधीच इथल्या पोलीस स्टेशनला रुजू झाले होते. वर्षभरातच गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी त्यांची ख्याती पसरली होती. अतिशय कर्तव्यदक्ष आणि तडफदार अशा या इन्स्पेक्टरने भल्या भल्यांना वठणीवर आणले होते. नुकताच निदर्शनास आलेला अपघात/घातपात हा त्यांच्याच पोलीस स्टेशनच्या  हद्दीत घडल्याने हे प्रकरण त्यांच्याकडे होते.

स्विच ऑफ झालेल्या मोबाईलची बॅटरी चार्ज झाल्यानंतर इन्स्पेक्टरांनी मोबाईलची कॉल हिस्ट्री चेक केली. श्रीरंगचे  खूप सारे मिस 
कॉल्स दिसत होते फोनवर. श्रीरंगच्या बाबांनी म्हणजेच सदाशिव विभुते यांनी केलेला शेवटचा कॉल हा साडेतीन वाजेच्या दरम्यानचा होता. तो कॉल होता ड्रायव्हर महेश  साळुंखे ला.


"आता हा महेश साळुंखे कोण, ओळखता का तुम्ही याला?"इन्स्पेक्टर ने विचारले.


"आधी आमच्या कामावर यायचा हा ड्रायव्हर, पण हा इतका दारुड्या आहे की त्यामुळे त्याची काहीच गॅरंटी नसते. म्हणून आम्ही याला कामावरून काढले होते पण अडीनडीला याला बोलवायचो. चांगली मजुरी दिली की तो यायला नेहमीच तयार असतो."श्रीरंग ने सांगितले.

"असेही असू शकते इन्स्पेक्टर साहेब त्या दिवशी एखादे काम आले असेल मी घरी नव्हतो त्यामुळे  बाबांनी त्याला फोन करून विचारले असेल."श्रीरंग ने अजून माहिती पुरवली.


कॉल हिस्टरी शी  संबंधित इतरही लोकांना फोन करून त्या दिवशी बद्दल विचारणा केली गेली. ज्यांना ज्यांना फोन केले गेले त्यांनी  दिलेली उत्तरं समाधान कारक वाटल्याने इन्स्पेक्टर साहेब पुढे जात गेले. ड्रायव्हर महेश साळुंखे याला मात्र अजूनही फोन लागत नव्हता. त्याच्या फोनवर एक तर स्विच ऑफ नाहीतर आऊट ऑफ कव्हरेज एरिया एवढेच सांगितले जात होते.


नेमके काहीच कळत नव्हते. सदाशिवरावांचे महेश साळुंखे शी काही बोलणे झाले होते किंवा त्याला काही कामाबद्दल सांगितले होते कां?तो गाडीवर यायला तयार झाला होता का ?किंवा ज्यावेळी एक्सीडेंट झाला त्यावेळी गाडीचा ड्रायव्हर तोच होता का? या सगळ्या प्रश्नांचा खुलासा होण्यासाठी महेश शी कॉन्टॅक्ट होणे जरुरी होते. पण काही केल्या महेश चा फोन लागत नव्हता.


दरम्यान इन्स्पेक्टर पाटील यांनी श्रीरंग आणि श्रीधरला घरी जाण्याचे परवानगी दिली आणि पुढील तपासासाठी काही गरज पडली तर त्यांना बोलवण्यात येईल असं सांगण्यात आलं. अजून बॉडी पोस्टमार्टम  होऊन वापस यायची होती. आणि पोस्टमार्टम झाल्यानंतर अंतक्रियेचा कार्यक्रमही पार पाडायचा होता. इतर नातेवाईकांनाही निरोप द्यावे लागणार होते. एव्हाना घरापर्यंत खबर पोचली असण्याची शक्यता जास्त होती त्यामुळे घरी काय परिस्थिती असेल याचाच विचार श्रीरंगच्या डोक्यात घुमत होता.


श्रीधरनेही आतापर्यंत घरी फोन करून परिस्थिती सांगितली होती त्यामुळे श्रीधरची पत्नी सुद्धा लहान लेकराला घेऊन तिच्या भावासह इकडे निघाली होती. वडील गेल्याचे दुःख ते वेगळेच पण ज्या प्रकारे , ज्या अवस्थेत त्यांचे पार्थिव मिळाले होते त्यामुळे दोघे भावांच्या मनावर फार आघात झाला होता.


आपल्या बाबांसोबत असे कां व्हावे? त्यांचा एवढा विचित्र प्रकारे मृत्यु कां व्हावा? हा प्रश्न पुन्हा पुन्हा दोघाही भावांना छळत होता. हे सगळे विचार डोक्यात घेऊनच यांत्रिक पणे दोघेही पुढच्या कार्यासाठी घराकडे परतले होते.


काय झालं असेल पुढे? महेश साळुंखे सदाशिवरावांसोबत गेला असेल का? या घटनेच्या दरम्यान तो सोबत असेल का? हे सगळे जाणून घ्यायला वाचा कथेचा पुढचा भाग.


© मुक्त मैफल
डॉ .मुक्ता बोरकर -आगाशे

    

🎭 Series Post

View all