निराहार एकादशी

What we do at the day of fast We have to concentrate on God rather than on Meal

निराहार एकादशी…….





 मीरा - " हॅलो रामा कुठे बिझी असतेस ग आज काल? " "फोन नाही तर नाही मेसेजला तरी रिप्लाय द्यायचा ना!"


 रमा -" अगं इथे श्वास घ्यायला उसंत नाही. फोन करणे तर दूरच, दोन दिवस झाले फोनला साधा हातसुद्धा लावलेला नाही . "


 मीरा - "अग हो तेच म्हणते आहे! एवढं काय झालं बाई? मोबाईल शिवाय जगण्याचे प्रयोग सुरू आहेत का तुझे?"


 रमा - "छे ग बाई, असं काही नाही. अगं मागच्या रविवारची एकादशी चांगलीच घडली नाना - माईना, (सासू-सासर्‍यांना). आणि त्यांच्यामुळे आम्हाला."


मीरा -" म्हणजे नक्की काय झालं ते तरी सांग!"


रमा. - " अगं मागच्या रविवारी आषाढी एकादशीला मी अहोंना म्हंटलं, तुम्ही करणार का आज उपवास? तर ते म्हणाले….


अहो - " नेकी और पूछ पूछ!"


रमा - "पण सध्या तुमचे डायटिंग सुरु आहे ना!"


अहो - " अगं म्हणूनच तर मी आज उपवास करणार आहे!"


रमा - "बरं मग उपवासाच काय बनवून देऊ खाण्याकरता? तळलेले चिप्स, पापड, साबुदाण्याचे वडे तर तुम्ही खाणार नाही मग भगर बनवू का?"


अहो - " हे बघ माझ्या खाण्याची काळजी तु करु नको, माझं आधीच ठरलं आहे."


 अहोनी असं म्हटल्याबरोबर एक क्षण मला वाटलं की, ते निर्जला एकादशी करणार की काय ? माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून ते लगेच बोलले….


अहो - " मी सकाळी एक पेला दूध पिणार आहे आणि चार खजूर खाणार आहे. दुपारी भगर आणि आमटी, रात्री केवळ फलाहार. "


मीरा - " किती ते कडक डायट ! किती तो खाण्यावर संयम !! किती मनोनिग्रह !!!"


रमा - " कसलं डोंबलचं डाएट! गंमत तर पुढेच आहे…. मुलाचा एकादशीचा मनोनिग्रह ऐकून माई (माझ्या सासूबाई ) लगेच अहोंच्या हो ला हो करायला लागल्या…

सासुबाई दिवसभर केवळ फळं  आणि भगर खाऊन राहू शकत नाही हे मला चांगल्याने माहिती होतं. "


रमा - "मला एक क्षण खूप आश्चर्य वाटलं. माझा जीव भांड्यात पडला. एक क्षण आनंदही झाला. म्हटलं, चला आज आपली स्वयंपाक घरातून लवकर सुटका ! इतकं बरं वाटलं मला!

 पण सकाळी साडेसातला दूध - खजूर खाल्लेल्या सासूबाईंना , साडेनऊच्या बीपीच्या गोळीसाठी दूधात चार केळी कुस्करून हव्या होत्या…. तेवढ्यात नानांच्या हॉलमधल्या अस्वस्थ येरझाऱ्या मला काहीतरी खुणावत होत्या म्हणून मग मीच कानोसा घेतला तर नाना म्हणाले…     


नाना -" रमा, उगाच माझ्या एकट्यासाठी कशाला स्वयंपाक करत बसतेस, मी पण उपास करीन म्हणतो. फक्त दुपारी भगरी ऐवजी राजगीरा- शिंगाडा पिठाचे धिरडे नाहीतर थालीपीठ करशील का? म्हणजे बघ माझ्याने जास्त उपाशी राहवत नाही ना! बीपी लो होतो म्हणून म्हटलं!!"


 रमा -" मग मी पामर काय बोलणार? भगरीचा बेत रद्द करून राजगिरा- शिंगाडा पिठाचे धिरडे, दही शेंगदाणा चटणी आणि आलूच्या काचऱ्या केल्या… तर चिरंजीव चिडले!"


मिहीर - "माते आज आदितवार, त्यात उपवास आणि खायला काय तर शिंगाड्याचे धिरडे. जरा काही चमचमीत बनवना! जसे की साबुदाणा वडा , उपवासाची भेळ, उपवासाची पाणीपुरी……


रमा - " चिरंजीव यांची यादी न संपणारी आणि स्वयंपाक घरात माझा जीव घेणारी…"





फोटो साभार गूगल.

***********************************************




©® राखी भावसार भांडेकर.

🎭 Series Post

View all