Feb 25, 2024
नारीवादी

कर्तव्य अंतीम भाग

Read Later
कर्तव्य अंतीम भाग


मागच्या भागात आपण पाहिलं की सुमा रवीला लग्नाविषयी समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण रवी तिच्यावरच चिडतो या भागात बघूया रवी अखेर काय निर्णय घेतो……


************************************************सुमा - "रवि तसं नाही आहे रे ! पण तू जरा शांतपणे विचार कर ना, दादांनी आपल्यासाठी , या घरासाठी खूप काही केलं आहे. शिवाय त्यांचं समाजातलं स्थान,त्यांचा मान, आपलं घराणं, कुठे तरी याचा विचार करावाच लागेल ना!"रवी - "मान्य आहे की मी वेड्यासारखा वागलो ! आधी मीरा वर प्रेम केलं आणि मग राधिकाला लग्नासाठी होकार दिला. पण अगं माझं खरंच मीरा वर खूप प्रेम आहे. मी राधिकेला नाही खुश ठेवू शकणार, आणि दादाचा मान म्हणतेस तर डॉक्टर देशपांडे हे या शहरातले प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आहेत . ते काही रस्त्यावर बसून जडीबुटी नाही विकत. त्यांचे समाजात काही ना काही स्थान आहेच ना!अण्णांनी घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी, दादाला त्याच्या मनाविरुद्ध लग्न करायला भाग पाडलं,आणि तोच इतिहास आता माझ्यासमोर पुन्हा येऊन उभा ठाकला आहे! लग्नाच्या बाबतीत अण्णांनी दादा वर जो अन्याय केला आहे ना! दादा तीच पुनरावृत्ती माझ्याबाबतीत करत आहेत. दादाला त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करता आलं नाही म्हणून तोच नियम ते आता मला लावत आहे. मीरा, डॉक्टर देशपांडे यांची अनौरस मुलगी आहे यात मीराचा काय दोष?"


सुमा - "रवी मीराच्या वेळी आणि मग राधिकेच्या वेळी वहिणी तुझ्याशी काहीच बोलली नाही का रे?"रवी -"नाही त्या कधीच स्वतःहून काहीच बोलत नाही! पण माझ्या प्रत्येक गोष्टीची त्या काळजी करतात. मी आत्ता बाहेरून आलो तर उद्या सकाळी माझे प्रॅक्टिकल आहे याची त्यांनी मला आठवण करून दिली. दादा पण त्यांच्याशी कधीच काही मसलत करताना मला दिसला नाही,आणि त्याही आपलं मत मांडताना कधी मी बघीतलं नाही. सगळ्यांचं सगळं करतात त्या ! पण तरीही अगदी अलिप्तपणे,कशातच आणि कुणातच त्या कधीच गुंतत नाही,विचित्र आहे नाही!"


दुसऱ्या दिवशी जेवणाच्या टेबलवर सगळे एकत्र जमले होते ..... त्यावेळी दादासाहेब सगळ्यांच्या समोर परत रवी च्या लग्नाचा विषय काढला ........

दादासाहेब - "राधिकाच्या वडिलांचे दोन-तीन फोन येऊन गेले आहेत लग्न बस्त्याची खरेदी केव्हा करायची?ते विचारत आहे."

रवी -"मी लग्नाच्या खरेदी करता येणार नाही! तुम्हाला जे वाटते जसं वाटते ते करा !! हे लग्नच मुळी माझ्या मनाप्रमाणे होत नाही आहे !!! मग बाकीचे सोपस्कार कशाला?"


(तिथून उठून रवी रागारागाने जायला निघाला......)


सुधा - "रवी, थांब रवी!! हे काय सुरू आहे? तुझं तुला तरी कळत आहे का, तू काय बोलतो आहेस ? तू काय वागतो आहेस?"यापूर्वीही जेव्हा घरात मीराचा विषय निघाला, तेव्हा सुद्धा सुधा कधीच कोणाच्या मध्ये बोलली नाही, आणि राधिके च्या वेळेस तर तिला काही बोलण्याची गरजही नव्हती. पण आता हे जरा जास्तच झालं होतं.....


सुधाच्या आवाजातली जरब आणि निर्धार दादासाहेब , सुमती आणि रवी सगळ्यांनाच कळला होता.....


सुधा परत बोलू लागली, -"रवी तुला काय वाटतं? लग्न म्हणजे पोरखेळ आहे का? एखाद्यावर प्रेम करावं ते शेवटच्या श्वासापर्यंत करावं,आणि जर कोणाला वचन दिलं तर ते माणसाने मरेपर्यंत पूर्ण करावं, अशीच आपल्या घराण्याची शिकवण आहे ना ! तू सारं विसरलास !! तू जर राधिकेला वचन दिलं असेल तर छाती ताणून घोड्यावर चढुन लग्नाला तयार हो!!! आणि तुझं जर मीरा वर खरचं प्रेम असेल तर राधिकेला भेटून स्पष्ट सांग, आणि मीरेचा हात धरुन जे होईल त्याला सामोरे जाण्याची हिम्मत ठेव."

रवी - "मी काय करू वहिनी मला काहीच कळत नाही?"


सुधा -"मी काय करू,म्हणून मला काय विचारतोस रवी? मीरेवर प्रेम करताना तू माझी परवानगी घेतली होतीस? राधिकेला लग्नासाठी होकार देताना मला एका शब्दाने विचारलं होतं?"


रवी - "राधिकेला हो म्हणताना मी केवळ माझं कर्तव्य पूर्ण करत होतो."


सुधा -"कर्तव्य! या घराण्यांचं आता हेच ब्रीद वाक्य झालय. राधिकेला घरी आणल्यावर तिच्याशी चार शब्द बोलशील तरी ना? कि तेही कर्तव्य म्हणूनच, तुला मुलं होतील तेही कर्तव्य म्हणूनच!पूर्णआयुष्य काय तू असंच कर्तव्य म्हणून घालवणार आहेस का?"दादासाहेब सुधा कडे रागारागाने पाहत होते..........


दादासाहेब - "सुधा तुझं डोकं फिरलय का ? तु ही काय वायफळ बडबड करते आहेस?"

सुधा - "मी ज्यावेळी लग्न करुन या घरात आली होती, तेव्हा तुम्हीही हेच म्हटलं होतं ना ! सुधा मी हे लग्न कर्तव्य म्हणून कलं आहे! फक्त अण्णांच्या इच्छे करिता !!! अजून किती सुधांचा बळी घेणार आहे हे घर?"


"गेल्या अठरा वर्षात माझ्या भावनांचा, माझ्या इच्छांचा कधीतरी तुम्ही विचार केला आहे का? तुम्ही माझ्याशी केवळ कर्तव्य म्हणून प्रत्येक वेळी नातं निभावलं ! मला काय वाटतं याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही , तुमचं घर सांभाळायला तुम्ही केवळ एक बिन पैशाची मोलकरीण घेऊन आलात!!! पण आता या घरात येणारी मीरा असो किंवा राधिका तिच्या नशिबी हे कर्तव्य नसावं एवढेच माझे प्रयत्न आणि इच्छा!"


सुधाच्या या वाक्यावर सगळे जण अवाक झाले आणि सगळीकडे शांतता पसरली ........

©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//