कर्तव्य रीपोस्ट

Story Of A Housewife


(सदर कथा एक काल्पनिक कथा आहे. त्यातील घटना-प्रसंग आणि व्यक्तींचा वास्तवात कुणाशीही, कुठलाही संबंध नाही . तसा तो आढळल्यास केवळ एक योगायोग समजावा)एक रम्य सकाळ- पूर्व क्षितिजावर भास्कराने आपले घोडे चौफेर उधळलेले - सूर्याच्या कोवळ्या किरणांची अवनीला आलिंगन द्यावे यासाठी लागलेली स्पर्धा , तर दुसरीकडे दिनकराने केशरी , नारंगी , गडद लाल रंगांची पूर्व दिशेला केलेली मुक्त उधळण, गुलाबी थंडीची थरथर अनुभवत असलेली झाडं , झुडपं आणि दवबिंदुंची नथ सावरत दिमाखात उभा असलेला गुलमोहर, एकीकडे पक्ष्यांचे मधुर कूजन तर दुसरीकडे पांढरा , पिवळा, लाल आणि गेंदेदार जास्वंद - पाकळी- पाकळीतुन उमलताना मनाला आल्हाद देत होता. नाजूक कुंद कळ्या , पांढरा गोकर्ण , झुपकेदार अनंत आणि तगर आपापल्या डोळ्यांच्या कडांवर रश्मिरथी ची आतुरतेने वाट पाहत होते.


सकाळी सकाळी लवकर उठून आपल्या बंगालीच्या लाॅन समोर चालता-चालता सुधा मनाशीच अशा अनेक कल्पना करून त्या विश्वात रमत असे.


सुधा - दादासाहेब इनामदारांची सौभाग्यवती, अण्णासाहेब इनामदारांची ज्येष्ठ स्नुषा एवढीच ओळख आहे का आपली? गॅस वरचा वाफाळणारा चहा बघता-बघ सुधा मनात विचार करत होती. सकाळचा पहिला चहा सुधा स्वतःच बनवत असे, घरातली सगळी काम करायला नोकर माणसं असूनही आणि मग एकटीच निवांत लाॅन वर बसून त्याचा आस्वाद घेत असे,संपूर्ण दिवसात तेवढेच चार दोन क्षण तिचे हक्काचे,बाकी संपूर्ण दिवस इनामदार घरांण्याच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात निघून जात होता.


आपली फुलांची आणि झाडांची आवड जपण्यासाठी \"दामू माळ्या\" कडून सुधानं ही छोटीशी बाग खास तयार करून घेतली होती. तसेही रोजच्या घर कामाच्या व्यापातून तिला अजिबात सवड मिळत नसे.


दादासाहेब इनामदार - अमरावतीतील एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व. अत्यंत धडाडीचे, शिस्तप्रिय, वक्तशीर, आणि अतिशय कार्यक्षम राजनेता म्हणून त्यांचा लौकिक. त्यांच्यात असणाऱ्या नेतृत्व आणि धडाडी या गुणांमुळेच आणि त्यांनी गरिबांसाठी केलेल्या कामामुळे राजकारणात ते लवकरच प्रस्थापित झाले.


दादासाहेब इनामदारांच्या मनात सर्वसामान्य आणि गोर गरिबांनासाठी चे प्रश्न याविषयी नेहमीच तळमळ असे. सर्वसामान्यांचा नेता अशीच त्यांची राजकीय वर्तुळात ओळख होती. त्यामुळेच इनामदार वाड्यावर सतत कार्यकर्ते, लहान-मोठे उद्योजक, कारखानदार , प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य, आम गरीब जनता , यांचा सतत राबता असायचा. त्या सगळ्यांची उठबस आणि बडदास्त ठेवतात ठेवता , सर्व व्याप सांभाळता सांभाळता सुधाला स्वत:साठी मोकळा वेळच मिळत नसे.


चहा संपवून जेव्हा सुधा स्वयंपाक घरात गेली तेव्हा रामुकाकांनी नाश्त्याचा विचारलं-रती आणि राहुल साठी भेंडीची भाजी - पोळी, दादा साहेबांसाठी - भिजलेली उडदाची डाळ घालून केलेला उपमा , तर रवी साठी - बदामाचा , साजूक तूपाचा केशर घालुन केलेला शिरा. सुधानं रामुकाकांना आजच्या नाश्त्याचं सांगितलं आणि ती सकाळचं आवरून देवपुजे करता निघून गेली.सुमती येणार म्हणून खास तीच्या आवडीनिवडी चं जेवण सुधा आज स्वतः जातीनं बनवणार होती !


सुमती आज जवळजवळ दीड वर्षाने माहेरी आली होती. दादासाहेब इनामदारांनी मुद्दामच तिला फोन करून बोलावून घेतलेलं होतं........... दादासाहेब , सुमती , मीना आणि रवी यांचे बहीण-भावाचं नातं अगदी घट्ट.......... सुमती च्या लग्नाला आता जवळपास पाच वर्ष झाली होती ,रसायनशास्त्राची प्राध्यापक असल्याने आणि शिवाय पी .एच. डी.चं कामही सुरू असल्याने ती फार माहेरी येऊ शकली नव्हती.


सुधा - "सुमा यावेळी खुप दिवसानंतर आलीस ग!"


सुमा - "हो दादांनीच परवा फोन केला होता , म्हणूनच आली (आश्चर्याने) दादाने तुम्हाला काही सांगितलं नाही का? मी आज येणार आहे हे तुम्हाला माहित नव्हते का?"

सुधा - "(किंचित कपाळावर आठ्या पाडून) सकाळी मीटिंग ला जाताना सांगितलं होतं त्यांनी तू येणार आहे म्हणून, बरं चल तू आंघोळ करून, जेवून घे मग आपण निवांत गप्पा मारत बसू."

सुमा - "वहिणी इतक्या वर्षात तुम्हाला कधी तरी सवड मिळाली का गप्पा मारायला ? तुमचं तर कामच संपत नाही!"***********************************************

पुढल्या भागात बघूया सुधाला गप्पा मारण्यासाठी वेळ मिळतो की नाही आणि सुमा सुधा कुठल्या विषयावर गप्पा.


©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.


🎭 Series Post

View all