द डी.एन् ए. पर्व २ (भाग -२)

Marathi Thriller Story.
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सुयश सर आणि अभिषेक लागलीच त्या गावाकडे जायला निघाले. रस्त्यातून जाताना त्यांचा सारखाच विक्रमचा किंवा टीममधल्या कोणाचा फोन लागतोय का? हे प्रयत्न सुरूच होते. कसाबसा एकदा सोनालीचा फोन लागला.

"हॅलो सर. इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आम्ही सगळे डायनासोर होता त्या जागेपासून लांब आलो होतो पण पुन्हा तिथेच जातोय. तुम्ही काहीही काळजी करू नका. काही गोष्टी आमच्या लक्षात आल्यात." सोनाली सरांचं काहीच ऐकून न घेता बोलली.

तिला माहित होतं पुन्हा रेंज गेली तर जे सांगायचं आहे तेही राहून जाईल म्हणून तिने असं केलं. सुयश सर बोलायला जात होते पण तोवर फोन कट झाला.

"हॅलोऽ" सुयश सर बोलत होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

"काय झालं सर?" अभिषेकने विचारलं.

"अरे अभिषेक सगळे पुन्हा तो डायनासोर होता तिथेच जायला निघाले आहेत. त्यांच्या हाती काहीतरी लागलं आहे असं म्हणाली सोनाली. पुढे काही बोलणं होणार एवढ्यात फोन कट झाला." सुयश सर म्हणाले.

"सर त्या डायनासोरचे फोटो मी बघितले आहेत. किती भयाण आहे हे सगळं. एव्हाना आता संध्याकाळ होत आली आहे. रात्रीच्या अंधारात काही घात झाला तर? आपण नियतीने यावर काही तोडगा काढला आहे का हे बघूया आधी." अभिषेक म्हणाला.

लगेचच सुयश सरांनी नियतीला फोन लावून अॅंटीडोटबद्दल विचारलं.
***************************
इथे सगळे जंगलात डायनासोर होता तिथेच काही अंतरावर लपून बसले होते. विक्रमला कैलासने जे दिलं होतं त्यामुळेच ते तिथे गेले होते. त्याला कैलासने एक कागद दिला होता ज्यावर त्याने सी.आय.डी.ला कामी येईल अशी सगळी माहिती लिहिली होती.

'हा डायनासोर दुसरा तिसरा कोणीही नसून ऋषभ आहे. डॉ. विद्यावर्धन यांचा मुलगा! रॉबर्टने त्याच्यावर प्रयोग करून त्याची ही अवस्था केली आहे. आपल्या हातात जास्त वेळ नाही. मला फॉर्म्युल्याबद्दल जी काही माहिती आहे ती मी देतोय. लवकरात लवकर काहीतरी करा नाहीतर फक्त आपल्याच राज्याला नाही तर पूर्ण देशाला धोका आहे. रॉबर्ट बाहेरच्या देशाच्या लोकांना विकला गेला आहे. ऋषभच्या शरीरात एक चीप आहे त्यामुळे ते लोक त्याला हवा तसा कंट्रोल करू शकतात.' त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं.

त्यात जो फॉर्म्युला होता तो डॉ. विजयनी बघितला होता पण त्याच्या अॅंटीडोटसाठी त्यांना ऋषभला व्यवस्थित बघणं आणि त्याचे काही सँपल घेणं भाग होतं आणि कैलासने जरी त्या चिठ्ठीत तो ऋषभ आहे असं लिहिलेलं असलं तरीही सी.आय.डी.ला या गोष्टीत किती तथ्य आहे हे तपासून बघणं भागच होतं. म्हणूनच ते सगळेच पुन्हा तिथे आले होते. ऋषभ एकदम निपचित पडला होता.

'जर खरंच हा ऋषभ असेल तर त्याच्या आईवर खूप मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. बिचारी आपला मुलगा आपल्याला परत मिळेल या आशेवर जगतेय. जेव्हा तिला कळेल हे त्यांच्या एवढ्या जवळच्या माणसाने केलं आहे तेव्हा तर जयश्री मॅडमना खूप जास्त त्रास होणार आहे.' विक्रम डायनासोर बघत मनातच म्हणाला.

त्याला असं स्वतःच्याच विचारत हरवलेलं पाहून ईशा बोलू लागली; "सर! तुम्ही ऋषभच्या आईचा विचार करताय ना? जर टेस्टमध्ये हा ऋषभ आहे हे सिद्ध झालं तर त्यांच्यावर कोणता आघात होईल हेच ना?"

"हम्म. देव करो आणि यावर लवकरात लवकर अँटीडोट मिळो." विक्रम म्हणाला.

सगळ्यांनाच असं वाटत होतं. काही सेकंद अशीच गेली.

"तिथे ती पक्ष्याची पिसं पडली आहेत ती कदाचित या डायनासोरने खाल्लेल्या पक्ष्याची असावीत. त्यातून आपल्याला त्याच्या लाळेचे डी.एन्.ए. मिळतील. मी पटकन घेऊन येतो." डॉ. विजय एकदम हळू आवाजात म्हणाले.

"तुम्ही नाही मी जातो." विक्रम म्हणाला आणि कोणाचंही काहीही ऐकून न घेता पुढे जाऊ लागला.

एवढ्यात कोणाचीतरी दुरून चाहूल लागली आणि तो पुन्हा माघारी आला. सगळेच सावध होते. रॉबर्ट आणि त्याच्या सोबत ती माणसं आली होती.

"धिस इज युअर डायनासोर." रॉबर्ट स्वतःची कॉलर टाईट करत म्हणाला.

ते लोक सगळी पाहणी करत होते एवढ्यात त्या एका माणसाच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आलं. त्याने लगेचच स्वतःचा मोबाईल काढला. मोबाईलमध्ये बघताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदलले होते. त्याच्या सोबत असलेल्या माणसासोबत त्याचं काहीतरी बोलणं झालं. त्यांच्या वेगळ्याच भाषेत बोलणं होत असल्याने रॉबर्टला काहीही कळत नव्हतं आणि सी.आय.डी. टीम त्यांच्यापासून बऱ्याच अंतरावर होती त्यामुळे त्यांना काही ऐकूच जात नव्हतं.

"सर नक्की काय झालं असेल? चेहरा बघून तरी काहीतरी गडबड झाली असावी असा अंदाज येतोय." सोनाली म्हणाली.

"हम्म. रॉबर्टचा चेहरासुद्धा गोंधळलेला वाटतोय. त्याला काहीच कळत नसावं." विक्रम म्हणाला.

थोडावेळ असाच गेला आणि त्या लोकांनी रॉबर्टला कसलीतरी बॅग दिली आणि स्वतःच्या हातातील डायनासोरचा रिमोट हवेत उंचावून विकृत हसू लागले. पापणी लवायच्या आधीच त्यांनी डायनासोरला पुन्हा जागं केलं होतं.

"आता काही खरं नाही. जर हे लोक याला कुठे दुसरीकडे घेऊन गेले तर आपलं अँटीडोट बनवायचं बाजूलाच राहिल पण हा मुलगा नक्की ऋषभ आहे याची खात्रीही करून घेता येणार नाही." डॉ. विजय काळजीने म्हणाले.

"मला वाटतंय अता आपल्याला दोन हात करावे लागणार. सर तुम्ही फक्त ऑर्डर द्या." निनाद स्वतःची गन काढत म्हणाला.

"नाही! नाही निनाद. आपल्याला असा अताताईपणा करून चालणार नाही. तो डायनासोर म्हणजे खरा डायनासोर नाहीये हे विसरून चालणार नाही. शेवटी कोणत्यातरी मुलाच्या जीवाचा आणि त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. इतकंच नाही तर याचा उपद्रव काय होऊ शकतो याची आपण कल्पनाच केलेली बरी. संपूर्ण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असताना आपण असं काहीही करू शकत नाही. आपण प्रॉपर प्लॅन शिवाय त्यांना सामोरे जाऊ शकत नाही. हा बॉम्ब नाहीये तर वेगळंच काहीतरी प्रकरण आहे हे विसरू नकोस." विक्रम म्हणाला.

त्यालाही हे म्हणणं पटलं. नाहीतरी या अश्या जगावेगळ्या केसमध्ये पूर्ण तयारीनिशी न जाता जर जोशात काम करायला गेलं तर धोका खूप मोठा होता. सगळे आता समोर नक्की काय घडतंय हे बघत होते.
****************************
इथे लॅबमध्ये नियती त्या रामसिंग नाव सांगितलेल्या माणसाच्या पोस्टमॉर्टनची तयारी करत होती. खरंतर डॉ. विजय नसल्याने तिच्या एकटीवरच कामाचा जास्त ताण पडत होता. काही निर्णय तिला खंबीर होऊन स्वतःलाच घ्यावे लागत होते. एरवी डॉ. विजय सांगतील तसं काम करून त्यांना असिस्ट करण्याचं काम ती करायची पण अचानकच आता ही जगावेगळ्या केसची जबाबदारी तिच्यावर येऊन पडल्याने तिचाही थोडा गोंधळ उडायचा तरीही ती तिचं पूर्ण ज्ञान पणाला लावून काम करत होती. ही केस तिला समजल्यापासून एकतर ती रात्री खूप उशिरा घरी जायची किंवा कधी कधी घरीही न जाता तिथेच यावर काम करत बसायची. गेल्या दोन दिवसापासून ती घरी गेलीच नव्हती. आपलं काम खूप जोखमीचं आहे हे जाणून ती लॅबमध्येच थोडावेळ आराम करायची. आत्ताही तिचं काम एकदम व्यवस्थित सुरू होतं. ती रामसिंगची बॉडी स्कॅन करत होती.

'हे काय आहे? काहीतरी विचित्र वाटतंय.' तिने मॉनिटरमध्ये काहीतरी वेगळंच बघितलं आणि तिला कसलातरी संशय आला.

बॉडी स्कॅन करताना तिच्या लक्षात आलं होतं की त्याच्या हृदयाच्याजवळ काहीतरी वेगळं आहे.

'हे जे काही आहे ते काढून बघावं लागेल.' तिने स्वतःशीच विचार केला.

तिने सगळी तशी तयारी करून ठेवली आणि डॉ. विजयंशी काही संपर्क होतोय का? म्हणून तिने प्रयत्न करून बघितला.

'फोन लागत नाहीये. बहुदा अजून सगळी टीम जंगलात असावी. सुयश सरांना बोलावून घेते.' ती स्वतःशीच म्हणाली.

लगेचच तिने सुयश सरांना फोन लावला. तिच्या बोलण्यावरून नक्कीच काहीतरी हाती लागेल असं वाटत होतं म्हणून सुयश सरांनी अभिषेकला गाडी मागे घ्यायला लावली. थोड्याच वेळात दोघं लॅबमध्ये पोहोचले. तोवर नियतीने ऑपरेशन सुरू केलं होतं.

"काय झालं नियती? तुला काय सापडलं आहे?" सरांनी विचारलं.

"सर ही चीप." नियतीने ती चीप ट्विझरमध्ये धरून रक्ताने माखलेली चीप त्या दोघांना दाखवली.

"कसली चीप आहे ही?" अभिषेकने विचारलं.

"ही चीप या माणसाच्या ह्रदयाजवळ लावलेली होती. ही चीपच या माणसाच्या मृत्यू मागचं कारण आहे." नियती म्हणाली.

तिच्या या बोलण्याने दोघांनी तिच्याकडे चमकून पाहिलं. त्यांना पटकन बिच्छु गॅंगला पकडताना असाच जो मृत्यू झाला होता त्याबद्दल आठवलं.

"नियती तुला पूर्ण खात्री आहे? कारण या माणसाने काहीही संशयास्पद वागणूक केलेली नाही. या चीपने तिचं काम केलं कसं?" सुयश सरांनी विचारलं.

"हो सर मला पूर्ण खात्री आहे. मी या चीपवर काही टेस्ट करते म्हणजे आपल्याला कळेल की या चीपने नक्की काय आणि कसं काम केलं असेल ते." नियती म्हणाली.

लगेचच तिने ती चीप एका सॉल्युशनमध्ये घालून स्वच्छ केली आणि काहीतरी टेस्ट करू लागली. टेस्ट सुरू होत्या. सुयश सर आणि अभिषेक नक्की काय हाती लागेल या तणावाखाली तिथेच फेऱ्या मारत होते.

क्रमशः....

[टीप:- सदर कथेत बिच्छु गॅंगचा उल्लेख आलेला आहे. आपल्या जुन्या वाचकांना ते माहीतच आहे परंतु नवीन वाचकांना जर त्या संदर्भातील केस वाचायची असल्यास माझी "मिशन मुंबई" ही कथा तुम्ही वाचू शकता.]
******************************
सी.आय.डी. ला नक्की कोणता क्लू मिळेल? तिथे रॉबर्ट सोबत असलेल्या माणसांना कसलं नोटीफिकेशन आलं असेल? या रामसिंगच्या शरीरात कसली चीप लावलेली असेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all