द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -१)

Story About Rushbh Who Turns Into Dinasore.
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -१)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
मागच्या पर्वात आपण पाहिलं; सी.आय.डी. टीम कैलासपर्यंत येऊन पोहोचली आहे. त्या सगळ्यांना या मागे रॉबर्ट आहे हे समजलं आहे. अभिषेक रॉबर्ट नक्की कुठे जातोय? आणि कोणाला भेटतोय? हे शोधण्याच्या मोहिमेवर असताना रॉबर्टनेच त्याला एका गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलं आहे. याबद्दल त्याने सुयश सरांना देखील फोन करून धमकी दिली. विक्रम आणि बाकी टीमने डायनासोर प्रत्यक्ष बघितल्यामुळे त्यांना परिस्थितीचा अंदाज आला आहे. रॉबर्ट त्याची मीटिंग करून त्या लोकांना त्याच्या सिक्रेट लॅबमध्ये घेऊन येतोय. आता पुढे.....

घुर्र घुर्र असा कसला तरी आवाज संपूर्ण आसमंतात पसरला होता. ऋषभरुपी डायनासोर एका झाडाखाली शिकार करण्याच्या पूर्ण तयारीत बसला होता. संपूर्ण शांतता असलेल्या जंगलात त्याच्या या आवाजानेच एक दहशद पसरली होती. एव्हाना आता मध्यंतरी बराच काळ गेल्याने त्याला भूक लागणं साहजिक होतंच. लंबगोलाकार हिरव्या डोळ्यांनी तो संपूर्ण परिसर न्याहाळत होता. तो जिथे बसला होता तिथेच त्याला कसलीतरी चाहूल लागली आणि काही कळायच्या आतच त्याने काहीतरी तोंडात टाकलं होतं. आजूबाजूला पडलेल्या पिसांवरून नक्कीच कोणत्यातरी पक्ष्याची शिकार त्याने केली आहे हे लक्षात येत होतं. एवढ्या मोठ्या डायनासोरचं मात्र फक्त एका पक्ष्याने काय होणार म्हणा? तो अजुनही घात लावून बसला होता. थोडावेळ यात गेला आणि अचानक विजेचा झटका लागावा असा तो खाली कोसळला आणि निपचित झोपला.

"हा.. हा... हा... माय प्रोजेक्ट इज फुल्ली सक्सेसफुल. हा.. हा.. हा..." रॉबर्ट त्याच्या लॅबमध्ये हे सगळं दृश्य त्याच्या इन्वेस्टर्सना दाखवत एकदम भयाण हसत होता.

कैलासला सांगून त्याने ऋषभ ट्रेस झाल्यावर त्या जागी ड्रोन पाठवला होता आणि त्याचंच शूट हे सगळे बघत होते. ऋषभला अचानक जो झटका लागला होता त्यामागे देखील हा विकृत रॉबर्ट होता हे सांगायला नको. खरंतर या रॉबर्टनेच ऋषभमध्ये जी चीप लावली होती त्याचा वापर करून त्याच्या मेंदूवर ताबा मिळवला होता आणि त्याला जो झटका लागला होता त्यामागे हेच कारण होतं.

'हा रॉबर्ट तर ध्येयाच्या खूप जवळ पोहोचला आहे. जर लवकरात लवकर काही झालं नाही तर आपल्या देशावर खूप मोठं संकट आहे.' कैलास मनातच म्हणाला.

त्याच्या मनात हे विचारचक्र सुरू असतानाच रॉबर्टने त्या डायनासोरचा रिमोट त्या लोकांच्या हवाली केला देखील होता. रिमोट हाती येताच त्या लोकांच्या डोळ्यात एक वेगळीच नशा दिसत होती. त्यांचं त्यांच्याच भाषेत काहीतरी संभाषण झालं. रॉबर्टच्या चेहऱ्यावर तर असुरी आनंद फाकला होता. ज्या दिवसाची तो वाट बघत होता तो आज आलेला पण त्याला कुठे माहित होतं काहीतरी वेगळंच घडणार आहे ते. रिमोट घेऊन त्या लोकांनी डायनासोरला प्रत्यक्ष बघण्याची इच्छा व्यक्त केली. रॉबर्टने देखील मागचा पुढचा विचार न करता कैलासला लॅबमध्येच बंद केले आणि त्या लोकांना घेऊन तो जंगलाच्या दिशेने निघाला.

'देवा! तू तर सगळं बघतोयस. नक्कीच त्या माणसांच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजतंय. या मूर्ख आणि विकृत रॉबर्टला स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीच दिसत नाहीये. काहीतरी कर देवा. सी.आय.डी. इथवर तर आली पण पुढे काय? मी कसं पुन्हा त्यांना सावध करू? अजूनही जे ऑफिसर्स इथे आले होते ते जंगलात असतील का? काहीतरी कर देवा.' कैलास मनोमन प्रार्थना करत होता.
*****************************
इथे अभिषेकला रॉबर्ट आणि त्याच्या काही माणसांनी एका बंद गोडाऊनमध्ये बांधून ठेवलं होतं तो आता शुध्दीवर येत होता.

'रॉबर्ट हातातून निसटला. नक्कीच काहीतरी मोठं घडणार आहे. जेवढं मला आठवतंय त्यावरून तरी हा रॉबर्ट कोणाशी तरी इंग्लिशमध्ये फोनवर बोलला. नक्कीच ही माणसं कोणत्यातरी विकसित देशाची असणार. त्याशिवाय का त्यांना असल्या विचित्र प्रयोगांमध्ये पैसा ओतायला जमतो आहे?' अभिषेकने सगळा विचार केला.

त्याच्या डोक्यात मागच्या बाजूला जखम झाली असल्याने त्याला त्रास होत होता. मध्येच त्याचे डोळे गुंगी आल्यासारखे मिटत होते पण आत्ता या क्षणी देश महत्वाचा होता. त्याला बांधून ठेवलेल्या खुर्चीवरून तो स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत होता. बळ कमी पडत होतं पण समोर आ वासून उभं असलेलं संकट दिसत होतं. त्याचे प्रयत्न सुरू असतानाच कसलातरी आवाज आला. नक्कीच कोणीतरी बाहेरून येतंय हे अभिषेकने ओळखलं होतं. आपण अजून बेशुद्धच आहोत असं दाखवत तो पुन्हा डोळे मिटून पडून राहिला.

"अभिषेकऽ" त्याच्या कानावर एक ओळखीचा आवाज आला.

'सुयश सर. हो त्यांचाच आवाज आहे.' त्याने व्यवस्थित आवाज ऐकून खात्री करून घेतली.

हळूच डोळे कीलकीले करून त्याने बघितलं. गणेश त्याच्या हातापायाला बांधेलेल्या दोऱ्या सोडवत होता आणि सर त्याच्या समोरच उभे होते. दोन माणसांना त्यांनी पकडून ठेवलं होतं.

"अभिषेक तू ठीक आहेस ना?" त्यांनी विचारलं.

"हो सर. पण सर तो रॉबर्ट..." अभिषेक म्हणाला.

"हो आपला संशय खरा आहे. त्याला तर आपण पकडूच त्याआधी या दोघांकडून जी माहिती मिळतेय ती घेऊ." सर म्हणाले आणि त्यांनी दोघांना एकाच वेळी समोरच्या भिंतीवर आपटलं.

"बोला लवकर. रॉबर्ट कुठे गेला आहे? कोणासोबत गेला आहे?" त्यांनी विचारायला सुरुवात केली.

मारून, समजावून अगदी सगळ्या पद्धतीने विचारून झालं तरीही ते दोघं मात्र तोंड उघडायला तयारच नव्हते.

"सर तुम्ही थांबा मी या दोघांना माझ्या पद्धतीने विचारतो." अभिषेक म्हणाला आणि दोघांच्या कॉलरला धरून त्यांना बाहेर घेऊन आला.

"सर तुम्ही काय करणार आहात?" गणेशने विचारलं.

"तेच जे यांच्यासाठी योग्य आहे. दोघांना गाडीच्या पुढे बांध." अभिषेक म्हणाला.

"सर पण.." गणेश बोलत होता त्याला मध्येच तोडत सुयश सर बोलू लागले; "गणेश तो सांगतोय तसं कर. आता हा कोणाचंच ऐकणार नाही. यांच्या नशिबात आजचा दिवस शेवटचा असावा."

झालं! जसं अभिषेकने सांगितलं तसंच त्या दोघांना सी.आय.डी.च्या गाडीच्या पुढे पोटावर बांधण्यात आलं. अभिषेक जाऊन गाडीत बसला. त्याच्या डोक्याचा मार अजूनही दुखत होता पण जो स्वतःची पर्वा करेल तो सी.आय.डी. ऑफीसर कसला? त्याने गाडीत बसताच गाडी जोरात सुरू केली आणि कचकन ब्रेक दाबला.

"लास्ट चांस आहे तुमच्या दोघांकडे. काही बोलायचं असेल तर लवकर बोला, नाहीतर समोर ती दरी दिसतेय ना? तिथेच दोघांच्या डेड बॉडी सुद्धा सापडणार नाहीत याची काळजी मी घेईन." अभिषेक गाडीचा आवाज करतच म्हणाला.

दोघांनाही चांगलाच घाम फुटला होता पण लगेचच बोलतील ते मुरलेले गुंड कसे? थोडावेळ झाला तरीही कोणी काही बोलत नाही हे बघून अभिषेकने गाडी पुढे घ्यायला सुरुवात केली. दरीपर्यंत त्याने एकदम स्पीडमध्ये गाडी आणली आणि टोकावर कचकन ब्रेक लावून गाडी थांबवली.

"सर... सर... जाऊदे ना.. सोडा..." दोघं आता गयावया करू लागले होते.

"आधी खरं काय ते सांगायचं आणि मगच जाऊ देईन." अभिषेकने पुन्हा गाडी हलकीच पुढे घेत सांगितलं.

"सांगतो.. सांगतो.." त्यातला एक माणूस म्हणाला.

आता अभिषेकने गाडी थोडी मागे घेतली आणि तो खाली उतरला. त्याने दोघांना सोडवलं. तोवर मागून गणेश आणि सुयश सर आलेच होते.

"सर आम्ही दोघं तर फक्त या निर्जन ठिकाणी लोकांना फसवून, धमकावून आणि घाबरवून फक्त चोऱ्या करतो पण आज सकाळी अचानक अनोळखी नंबरवरून एक फोन आला आणि ते लोक सांगतील तसं केलं तर आम्ही आयुष्यात जेवढे पैसे कमावू शकत नाही तेवढे मिळतील असं आम्हाला सांगितलं. आम्ही दोघांनी विचार केला असं झालं तर पुन्हा चोरी करायची गरजच पडणार नाही. सगळं त्या लोकांनी सांगितलं तसं होत होतं पण जेव्हा ते लोक म्हणाले तुम्ही सी.आय.डी. मधून आहात तर आम्हालाही आधी भीती वाटली पण त्यांच्या माणसांनी तुम्हाला बेशुद्ध करून गोडाऊनमध्ये आणून बांधलं. आता आमचं काम फक्त तुमच्यावर लक्ष ठेवण्याचं होतं. सर आम्ही हे पैश्यासाठी केलं. प्लीज आम्हाला सोडा." एक माणूस गयावया करत म्हणाला.

"ए चूप! ही सगळी तुझी कहाणी नाही ऐकायची आम्हाला. तो रॉबर्ट कुठे गेला? आणि त्याने कोणासोबत मीटिंग ठेवली होती? त्याबद्दल सांग." अभिषेक चिडून म्हणाला.

"नाही माहीत सर. तुम्हाला सगळ्यात आतल्या बाजूला बांधून ठेवलं होतं तिथेच होतो मी. त्या लोकांची मीटिंग गोडाऊनच्या सगळ्यात बाहेरच्या भागात चालू होती." तो माणूस म्हणाला.

दुसरा माणूस मात्र काहीच बोलत नाही आणि एकदम जग जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर आहे हे सगळ्यांनाच जाणवत होतं.

"तुला नक्कीच काहीतरी माहीत आहे. बोल काय माहित आहे तुला?" अभिषेकने त्याची कॉलर धरून त्याला विचारलं.

एवढं होऊनही तो काहीच बोलत नव्हता. आता सुयश सरच पुढे आले आणि त्यांनी त्याच्या जोरात कानशिलात लगावली. त्याच्या डोळ्यासमोर तारेच फिरतायत असं त्याच्या एकंदरीत हालचालीवरून जाणवलं. एक मिनिटभर त्याने फक्त गाल चोळला.

"तुम्हाला आत्ताच काय कधीच कळणार नाही सरांचं प्लॅनिंग. आता तुम्ही सगळे फक्त बातम्या बघा देशात कसा विद्रोह होतोय ते बघायला. एव्हाना गावागावात, शहरात किंचाळण्याचे आवाज घुमत असतील." तो एवढं बोलला आणि अचानक खाली कोसळला.

अभिषेक आणि गणेशने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो केव्हाच हे जग सोडून गेला होता.

"सर हा तर आत्ता व्यवस्थित होता. आपल्या समोर तर याने काहीच वेगळं केलं नाही. अचानक हा मेला कसा?" अभिषेकने गोंधळून विचारलं.

"ते आता फॉरेन्सिक रिपोर्टवरून समजेल. गणेश बॉडी घेऊन जायची व्यवस्था कर आणि यालाही घेऊन जा." सुयश सर म्हणाले.

"सर हा माणूस जे काही बोलत होता ना त्यावरून तरी रॉबर्टने पूर्ण तयारी केलेलीच आहे हे समजत होतं. विक्रम सर आणि बाकी टीम अजूनही जंगलात असेल तर त्यांना सावध करायला हवं सर." अभिषेक म्हणाला.

"हो. कोणाचाही फोन लागत नाहीये. आपल्यालाच तिथे जावं लागेल. गणेश आपल्याला इथले अपडेट्स देत राहील. मला तरी असंच वाटतंय हा रॉबर्ट पुन्हा त्या गावात गेला असणार. ज्याअर्थी या माणसाने सांगितलं की देशात काहीतरी घडायला सुरुवात झाली असणार त्याअर्थी हा रॉबर्ट त्या डायनासोर जवळच असला पाहिजे." सुयश सर म्हणाले आणि दोघं त्या गावात जायला निघाले.

एवढ्यात त्या दुसऱ्या माणसाने त्यांना थांबवलं.

"सर मला एक गोष्ट सांगायची आहे." तो म्हणाला.

दोघंही पुन्हा मागे फिरले. काहीतरी हाती आलं तर नक्कीच रॉबर्टचा डाव फिस्कटेल ही एक आशा होती.

"सर याने याचं नाव रामसिंग सांगितलं होतं. साधारण दोन महिने आधीच तो या एरियात आला आणि माझ्या बरोबर चोऱ्या करत होता. हा आल्यापासून माझं काम सोपं झालं होतं. गाडीतून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून हा इंग्लिशमध्ये त्यांच्याशी बोलायचा तोवर मी डल्ला मारायचो. रस्त्यात एकदम सूट बूट घालून हा उभा असायचा त्यामुळे सहसा कोणालाही याच्यावर संशय यायचा नाही. आजही तुम्हाला बांधून ठेवलं होतं तेव्हा हा थोडावेळ बाहेर गेला होता. याला सतत कोणाचेतरी फोन यायचे तेव्हा कोणत्यातरी वेगळ्याच भाषेत हा बोलायचा. नेपाळी भाषा तर नक्कीच नव्हती ती." तो म्हणाला.

"ठीक आहे. अजून काही आठवलं तर यांना सांग. तुझी शिक्षा आम्ही कमी करू." सुयश सर गणेशकडे हात करून म्हणाले.

क्रमशः.....
*******************************
रामसिंग नाव सांगितलेला माणूस अचानक कसा मेला असेल? रॉबर्ट ज्या लोकांना डायनासोर प्रत्यक्ष दाखवायला घेऊन गेला आहे ती लोकं नक्की काय करणार असतील? कैलास आता काय करेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all