द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -९)

Story About Human Dinosaurs
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -९)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सी.आय.डी. ब्यूरोमध्ये पूजा जे काही सांगतेय त्याकडे सगळे लक्ष देऊन होते. काही पॉइंट्स नोट करून घेत होते. तिला या केस मधल्या बऱ्याच गोष्टी माहिती होत्या ज्याची मदत सी.आय.डी.ला होणार होती.

"तू म्हणालीस की तू जिथे काम करतेस तिथेच हा कट रचला जात होता. जे लोकं एवढ्या शिताफीने वागत होते त्यांनी तुझ्यासमोर कसा हा कट रचला?" विक्रमने विचारलं.

"सर त्यांनी मलाही यात सामील करून घेतलं होतं. त्यांची प्रोसेस मी जवळून बघितली आहे." पूजा म्हणाली.

"पूजा तुला एवढं सगळं माहिती होतं तर आधीच का नाही आमच्याशी कॉन्टॅक्ट केला?" सुयश सरांनी विचारलं.

"सर तेव्हा ते शक्य नव्हतं. मला आधी वाटलं होतं की, हे असं काही होणार नाही, डायनासोर वैगरे तर शक्यच नाहीये पण जेव्हा याची तीव्रता समजली तेव्हा याच्या मुळाशी जायचं मी ठरवलं." ती म्हणाली.

"म्हणजे? यात कोण कोण सामील आहे? यावर उपाय काय?" सुयश सरांनी विचारलं.

"सर बाकीचं मी नंतर सांगते. आत्ता या क्षणाला आपल्याला त्या डायनासोरला कंट्रोल करायचं आहे. त्या लोकांचा प्लॅन असा आहे की, सगळ्या देशात डायनासोर धुमाकूळ घालेल. ही बातमी आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल आणि याचा उपाय फक्त आणि फक्त चीनकडे असेल. त्याच्या जोरावर ते लोक भारत बळकवणार आहेत आणि असंच हळूहळू बाकी जग! चीन किती विस्तारवादी धोरण अवलंबत असतो हे आपल्याला माहिती आहेच." पूजा म्हणाली.

"हम्म. याचाच अर्थ त्या लोकांकडे अँटीडोट आहे?" सुयश सरांनी विचारलं.

"नाही सर. ते लोक त्याला रिमोटच्या सहाय्याने कंट्रोल करणार. त्यांचं ध्येय साध्य होईपर्यंत तो डायनासोर कंट्रोलच्या बाहेर जाईल आणि मग त्याचा अंत कसा करायचा याचं धोरण त्यांनी आखून ठेवलं आहे. मला जेवढी माहिती आहे त्यानुसार तो कोणत्यातरी शास्त्रज्ञांचा मुलगा आहे. जर सगळं त्यांच्या मनाप्रमाणे घडत गेलं तर तो मुलगाही जिवानिशी जाईल आणि सत्ताही चुकीच्या हातात जातील." पूजा म्हणाली.

"पण मग त्या लोकांनी डायनासोरच्या पुढच्या पिढ्यांची व्यवस्था का केली आहे?" अभिषेकने विचारलं.

"कायम जगाला वेठीस धरता यावं म्हणून. सगळ्यांना ब्लॅकमेल करून स्वतःचीच सत्ता गाजवता यावी म्हणून." पूजा म्हणाली.

"ठीक आहे. त्यांचाच वार आपण त्यांच्यावर उलटवू. या केसमध्ये आम्हाला तुझी मदत लागेल. तू पूर्ण तयार आहेस?" सुयश सरांनी विचारलं.

"येस सर." ती म्हणाली.

"मग ठीक आहे. फक्त एक लक्षात घे यात थोडी जोखीम आहे. म्हणजे आम्ही सगळे तर तुझ्या सोबत असूच पण तुला जे करायला सांगणार आहोत ते सगळं व्यवस्थित निभावून नेणं ही तुझी जबाबदारी असेल. नक्की तुझ्या मनाची पूर्ण तयारी आहे?" सुयश सरांनी विचारलं.

त्यांनी हे विचारल्या बरोबरच पूजाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

"काय झालं?" सोनालीने तिला विचारलं आणि खांद्याला धरून खुर्चीवर बसवलं.

"काही नाही. सर मूळची मी भारतीयच आहे पण माझ्या आयुष्याची जवळ जवळ पंधरा वर्ष चीनमध्ये गेली. आपल्या देशाला वाचवण्यासाठी मला माझ्याच कर्मभूमीच्या विरोधात जावं लागणार आहे. जे पूर्वी घडलं तेच आता होणार आहे." पूजा म्हणाली.

"पूर्वी?" ईशाने आश्चर्याने विचारलं.

"हम्म. ते सगळं नंतर सांगेन एवढं काही विशेष नाहीये. आता मी काय करायचं आहे ते सांगा." ती डोळे पुसत ठामपणे म्हणाली.
********************************
इथे निनाद लॅबमध्ये पोहोचला होता. या सगळ्यात दोन तास झाले होतेच. कैलास लॅबमध्ये दोन तास झालेत तर आता काय घडेल? याचा विचार करत त्या लहान खिडकीजवळच येऊन उभा होता.

"सर तुम्ही आत्ता? काय झालं?" कैलासने त्याला बघितल्या बघितल्या काळजीने विचारलं.

"अरे आमचे फॉरेन्सिक डॉक्टर आहेत, डॉ. विजय त्यांना तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून आलो." निनाद म्हणाला.

"सर त्याआधी एक विचारायचं होतं; बाहेर काही घडलं नाहीये ना? ऋषभबद्दल काही बातम्या येत नाहीयेत ना?" त्याने पुन्हा काळजीने विचारलं.

"नाही. जनतेत अजून तरी हे काही माहिती नाहीये. तू का असं विचारतो आहेस पण?" निनादने विचारलं.

"सर तो रॉबर्ट इथून दुसरीकडे कुठेतरी गेला पण जाताना काहीतरी बोलत होता की, दोन तासात माझं नाव देशातल्या लहान मुलांना पण माहिती झालेलं असेल." कैलास म्हणाला.

"काय? पण असं का बोलला तो?" निनादने विचारलं.

"सर ते लोकं बहुतेक ऋषभला सगळा विध्वंस करायला सोडून देणार असतील." कैलासने त्याचं मत सांगितलं.

"एक मिनिट म्हणजे आता सगळ्यांना अलर्ट केलं पाहिजे. दोनच मिनिटं." निनाद म्हणाला आणि तो सुयश सरांना फोन लावू लागला.

"सर आधी ऐकून घ्या. एक मिनिटं." कैलासने त्याला अडवलं.

निनाद लगेचच फोन लावायचा थांबला.

"सर मला ज्या दिवसापासून समजलं की इथे ऋषभ आहे आणि त्याला डायनासोरमध्ये हा परावर्तित करणार आहे त्या दिवसापासून मी वेगळ्याच एका केमिकलवर देखील काम केलं आहे. ऋषभची शारीरिक वाढ जरी डायनासोरप्रमाणे दिसत असली तरीही त्याच्यातला हिंस्रपणा वाढू नये म्हणून मी काम करत होतो. जर माझं काम योग्यरीतीने पूर्ण झालेलं असेल तर नक्कीच आपल्याला पुढचं काम करणं सोपं जाईल. त्याच्यातला माणूस जिवंत रहावा म्हणून मी प्रयत्न केले आहेत. ते कितपत यशस्वी झाले असतील देव जाणे पण मी माझे शंभर टक्के दिले आहेत." कैलास म्हणाला.

"ग्रेट. खरंच तू खूप ग्रेट आहेस पण तुला एक कळतंय का? जेव्हा रॉबर्टच्या हे लक्षात येईल तेव्हा तो चवताळून पुन्हा इथेच येणार आहे." निनाद म्हणाला.

"हो सर माहीत आहे. आत्तापर्यंत या देवानेच योग्य काय ते करून घेतलं यापुढेही तोच सगळं व्यवस्थित करून घेईल." कैलास एकदम विश्वासाने म्हणाला.

त्याच्या बोलण्याने निनादला आत्तापर्यंत जो अस्वस्थपणा जाणवत होता तोही गेला. त्याने लगेचच हातात वेळ कमी आहे हे जाणून डॉ. विजयना व्हिडिओ कॉल लावला. कैलास आणि त्यांच्यात बरंच टेक्निकल बोलणं झालं आणि निनाद तिथून निघाला.

'हा कैलास किती ग्रेट आहे. आपल्याला तर असं काही सुचलं देखील नसतं. इतकी वर्ष एकाच ठिकाणी बंदिस्त राहून देखील त्याचं मनोबल जराही खचलं नाहीये. आज जर हा बाहेर असता तर कदाचित एक उत्कृष्ठ वैज्ञानिक म्हणून संपूर्ण जगात याचं नाव गाजलं असतं.' निनाद मनातच विचार करत होता.

त्या जंगलातून बाहेर आल्यावर तिथे जे घडलं ते त्याने सुयश सरांना फोनवर सांगितलं आणि त्यांच्याच ऑर्डरनुसार रॉबर्ट पुन्हा तिथे येतोय का? आणि काय घडतंय हे पाहण्यासाठी तो तिथेच थांबला.
*****************************
इथे रॉबर्ट त्या लोकांसोबतच होता. ऋषभला घेऊन ते सगळे बंगल्याच्या बाहेर आले होते. त्या लोकांच्या हातात रिमोट होता आणि आता शहराच्या दिशेने ऋषभला घेऊन जाण्याचा त्यांनी प्लॅन केलेला. सगळं काही त्यांच्या प्लॅनप्रमाणे सुरू होतं.

"हिअर वी आर गोइंग टू अचिव अवर ड्रिम. हा.. हा.. हा.." त्यातला परदेशी माणूस असुरी हसत म्हणाला.

ऋषभला कंट्रोल करत ते घेऊन चालले होते. बराचवेळ होऊन गेला होता आणि ऋषभच्या पोटात काहीच नव्हतं त्यामुळे एकदा शहरात गेल्यावर त्याचा विद्रोह हा सगळ्यांना दिसणार होताच. थोडं अंतर पार केल्यावर त्या लोकांनी ऋषभचा मोर्चा रॉबर्टकडेच वळवला.

"सर, व्हॉट आर यू डुईंग?" तो घाबरत घाबरत म्हणाला.

त्याच्या या वाक्याने ते लोक हसू लागले. एकमेकांकडे बघून हसत हसतच त्यातला एक माणूस रॉबर्टला इंग्लिशमध्ये म्हणाला; "जो माणूस स्वतःच्या देशासोबत धोका करू शकतो तो आमच्या सोबत राहून देखील धोकाच करणार. मग कशाला आम्ही तुला जिवंत ठेवायचं? मूर्ख माणसा! तुला एवढीही अक्कल नाहीये आम्ही फक्त आणि फक्त तुझा वापर करून घेतला."

त्याच्या या बोलण्याने रॉबर्ट खूपच चिडला आणि त्याने त्याच्या कोटच्या खिशातून काहीतरी काढलं. कोणालाही काही कळायच्या आत आता ऋषभ त्या लोकांवर चाल करुन जात होता.

"यू डीच अस." ते लोक चिडून म्हणाले आणि स्वतःच्या रिमोट कंट्रोलने त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू लागले.

मात्र आता जो रिमोट कंट्रोल रॉबर्टकडे होता तोच काम करत होता. आत्ता त्या लोकांकडे स्वतःचा जीव वाचवून पळण्याखेरिज दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. रिमोट कंट्रोलची बटणं दाबतच ते लोक पळत होते. त्यामुळे रॉबर्टचा देखील ऋषभवरचा कंट्रोल सुटला.

'जे व्हायला नको होतं तेच झालं. आता या ऋषभला कंट्रोल करणं माझ्याही हातात नाहीये. चीप असून आता काहीच उपयोग होणार नाही. ऋषभ आता चीपमुळे कंट्रोल होणारच नाही. तो त्या लोकांच्या मागे जातोय तोवर मला इथून निसटलं पाहिजे.' रॉबर्ट मनातच म्हणाला आणि मागच्या मागे विरूद्ध दिशेने दूर जाऊ लागला.

क्रमशः.....
******************************
पूजाच्या मदतीने सी.आय.डी. आता काय करणार असेल? रॉबर्टने देखील ऋषभवरचा कंट्रोल गमावला आहे. आता तो शहरात जाऊन विध्वंस घडवेल का? कैलासने जे प्रयत्न केले आहेत ते यशस्वी झाले असतील? जयश्रीला जेव्हा हे समजेल तेव्हा काय वाटेल तिला? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all