द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -८)

Story About Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -८)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
डॉ. विजय आणि नियती फॉरेन्सिक लॅबमध्ये आले होते. नियती डॉ. विजय जेव्हा तिथे नव्हते तेव्हा काय काय घडलं आणि तिने नक्की काय आणि कशी प्रोसेस केली आहे हे त्यांना सांगत होती.

"आपल्याला आत्ता प्रथमदर्शनी हे सगळं बरोबर वाटत असलं तरीही एकदा कैलास सोबत सविस्तर चर्चा करायला हवी." डॉ. विजय म्हणाले.

"हो." नियती म्हणाली.

"बरं मला सांग निनादने तुला सँपल आणून दिले होते ना? तू टेस्ट केल्यास का? तो मुलगा ऋषभच आहे का?" त्यांनी विचारलं.

"मी आज टेस्ट करणार आहे. ब्युरोमध्ये आज जयश्री मॅडम आल्या होत्या तेव्हा ईशाला मी हळूच खूण केली होती. तिने त्यांच्या पाठीवर पडलेला त्यांचा केस मला दिला आहे आता आपल्याला कळेल." नियती म्हणाली.

"गूड. लवकर कामाला लाग. तो कैलास सांगतोय हा ऋषभच आहे ते पण आपल्याला त्याच्या आईला हे सिद्ध करून दाखवायला लागेल म्हणून हा एवढा प्रपंच!" डॉ. विजय म्हणाले.

"हम्म. बरं तुम्ही सगळे तिथे अडकला होतात तेव्हा या माणसाची बॉडी इथे आलेली. याच्या हृदयाच्या जवळ एक चीप होती." नियती म्हणाली आणि तिने त्या चीपबद्दल डॉ. विजयना सगळं सविस्तर सांगितलं.

"हे सगळं तंत्रच पुढचं आहे. आता बघितलं ना आपल्याला स्वप्नात सुद्धा वाटलं होतं का? की, हे डायनासोर वैगरे पुन्हा अस्तित्वात येतील ते?" डॉ. विजय म्हणाले.

"हम्म. मला तर याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की, तो कैलास एवढी वर्ष तिथे कसा तग धरून राहिला? कसं त्याने हे अँटीडोटचं देखील मॅनेज केलं असेल?" नियती म्हणाली.

"ते आहेच. त्याने एवढं सगळं केलं आहे आणि इतक्या विश्वासाने त्याने तो फॉर्म्युला आपल्या स्वाधीन केला म्हणजे आता आपली जबाबदारी वाढतेय. लवकरच आपल्याला यातून मार्ग शोधायचा आहे." डॉ. विजय म्हणाले.

दोघं काम करता करताच बोलत होते आणि त्या दोघांनाही कैलासने एवढी वर्ष तग धरला होता त्याबद्दलच अप्रूप वाटत होतं.
*******************************
इथे ब्यूरोमध्ये सोनाली आणि ईशा तिथे काय काय घडलं होतं हे सुयश सरांना डिटेलमध्ये सांगत होत्या. कैलासने विक्रमला दिलेली चिठ्ठी, त्याच्यासोबत जे काही बोलणं झालं ते आणि तिथे जे चिनी लोकं आले होते त्यांच्याबद्दल देखील दोघींनी मिळून सरांना सगळं सांगितलं.

"दिवसेंदिवस यांच्या कुरापती वाढतच चालल्या आहेत. विक्रम म्हणाला होता त्याला त्या दिवशी भेटलेली बाई येणार आहे. ती एकदा आली तरी अर्ध्या प्रश्नांची उत्तरं सापडतील." सुयश सर म्हणाले.

"सर तोवर काय करायचं? असं हातावर हात ठेवून तर बसता येणार नाही." अभिषेक म्हणाला.

"तू आणि निनाद त्या लॅबमध्ये पुन्हा जा. मला खात्री आहे तो रॉबर्ट तिथे नसणार." सुयश सर म्हणाले.

"बरोबर म्हणालात सर." गणेश ब्यूरोमध्ये येत म्हणाला.

सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं.

"सर मी त्या पत्रकाराचा पाठलाग केला. तो तोतया होता. त्याने रस्त्यातून जाताना कोणालातरी फोन लावला होता आणि फोनवर त्याने इथे जे घडलं ते थोडक्यात सांगितलं." गणेश म्हणाला.

"पण आता आपल्याला कळेल कसं त्याने कोणाला फोन केलेला?" ईशा म्हणाली.

"डोन्ट वरी मॅडम! त्याचाही बंदोबस्त केला. त्याचे सगळे कॉल रेकॉर्ड काढून आणले आहेत." गणेश म्हणाला.

"कसे?" सोनालीने विचारलं.

"मी त्याचा पाठलाग करत होतो तेव्हा रस्त्यात मला एक लहान मुलगी दिसली तिच्या मदतीने मी हे केलं. म्हणजे तिला माझा एक दुसरा नंबर लिहून दिला आणि सांगितलं त्या काकांच्या फोनवरून मला फोन लाव. तिनेही अगदी हुशारीने हे केलं. झालं! मला त्याचा नंबर मिळाला आणि त्याचे हे कॉल रेकॉर्ड." गणेश सुयश सरांच्या हातात रेकॉर्ड देत म्हणाला.

"हा तर रॉबर्टचा नंबर आहे." सुयश सर म्हणाले.

"येस. आणि त्यानेच आपल्या टीमच्या पुढच्या हालचाली काय आहेत हे जाणून घेण्यासाठी त्या माणसाला पाठवलं होतं." गणेश म्हणाला.

"आता तर माझी पूर्ण खात्री आहे तो रॉबर्ट लॅबमध्ये नक्कीच नसणार. निनाद जाऊन कैलास सोबत बोल आणि तिथून डॉ. विजयना व्हिडिओ कॉल कर. त्यांनाही त्याच्याशी काहीतरी बोलायचं आहे ते मगाशी म्हणाले होते." सुयश सर म्हणाले.

"येस सर." तो म्हणाला आणि तिथून निघाला. अभिषेक देखील त्याच्या सोबत जात होता पण सरांनी त्याला थांबवून घेतलं.

या सगळ्यात साधारण एक तास होऊन गेला होता. विक्रम देखील पुन्हा ब्यूरोमध्ये आला होता. सी.आय.डी. टीमला जराही कल्पना नव्हती की दोन तासात काहीतरी होणार आहे. आता शत्रूला यांच्या हालचालीचा थोडा अंदाज आलेला आहे म्हणून अजून सावधतेने यांना काम करायचं होतं. सगळे त्यांच्या त्यांच्या कामाला लागले होते. सुयश सरांना सतत वरिष्ठांचे फोन येत होते त्यामुळे ते त्यात बिझी होते. सुशांत त्याची स्पेशल टीम त्यांच्या मदतीसाठी घेऊन आला होता आणि त्यांना बाकीची सी.आय.डी. टीम केस समजावून सांगत होती.

"सर आत येऊ?" एक बुरखाधारी बाई दारात आली होती आणि तिनेच असं विचारलं.

"हो या. काय झालं?" अभिषेकने विचारलं.

"मी तुमची मदत करायला आलेय." तिने सरळ मुद्द्याला हात घातला.

"आमची मदत? कशा संदर्भात?" त्याने मुद्दाम विचारलं.

या केसमध्ये प्रत्येक पाऊल हे फुंकून फुंकून टाकावं लागणार होतं आणि म्हणूनच अभिषेक आणि बाकी सगळ्यांना कल्पना असली तरीही ते काहीही माहिती नाहीये असं दाखवत होते.

"या सरांना चांगलंच माहितेय मी कशाबद्दल बोलतेय ते." ती विक्रमकडे बोट दाखवून म्हणाली.

"हो! पण यावेळी आधी तुम्हाला तुमची खरी ओळख दाखवावी लागेल. तुम्हाला ही सगळी माहिती कुठून आणि कशी मिळतेय हे सांगावं लागेल." विक्रम तिच्या समोर उभा राहत म्हणाला.

एवढ्यात सुयश सर त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. त्या बाईने तिच्या चेहऱ्यावर असलेला बुरखा काढला. धारदार नाक, अगदी गोल नाही आणि अगदी उभा नाही असा चेहरा, साजेसे ओठ आणि काळे डोळे असं काहीसं त्या बाईचं रूप होतं. साधारण मुलगीच वाटत होती ती.

"मी पूजा! मी जिथे काम करते तिथेच हा सगळा कट रचला गेल्याने मला ही सगळी माहिती आहे." ती म्हणाली.

सगळे आता ती काय माहिती सांगतेय याकडे लक्ष देऊन होते.
******************************
इथे लॅबमधून रॉबर्ट बाहेर पडून त्याची जिथे सोय झाली होती तिथे आला होता. त्या विदेशी लोकांसोबतच तो थांबला होता. एकूण साधारण चार ते पाच माणसं आणि रॉबर्ट असे सगळे तिथे होते. त्या लोकांना आता फक्त दोन तास पूर्ण होण्याची वाट बघायची होती. दुसऱ्या एका सामसूम जागी असलेल्या बंगल्यावर सगळे थांबले होते. सामसूम आणि मोठी जागा असल्याने तिथे ऋषभला ठेवणं त्यांना सोईचं होतं. आता दोन तास पूर्ण व्हायला फक्त पंधरा मिनिटं राहिली होती.

"ओन्ली फिफ्टीन मिनिट्स. रॉबर्ट यू डीड ऑल प्रोसेस प्रोपरली?" त्यातल्या एका माणसाने विचारलं.

"येस सर." तो म्हणाला.

सगळेच एकदम असुरी हसत होते. त्यांनतर त्यांच्या भाषेत त्यांनी काहीतरी बोलणं केलं. रॉबर्टकडे तिरकस पण कुत्सित नजर टाकून ते लोक बोलत होते मात्र रॉबर्टच्या डोळ्यांवर तर फक्त त्याच्या प्रसिद्धीची आणि पैश्यांची पट्टी बांधली गेली होती त्यामुळे त्याला ते दिसतच नव्हतं.

'माझं स्वप्न आज पूर्ण झालंय. आता सगळ्या जगात फक्त आणि फक्त माझं नाव गाजणार. त्यात या लोकांना कुठे माहितेय यांचाच कसा काटा काढणार आहे मी ते! मूर्ख लोकं स्वतःला जास्त शहाणे समजत आहेत.' तो मनातच म्हणाला.

त्यांनतर त्यांनी त्या अंड्यावर ज्या प्रक्रिया सुरू केल्या होत्या त्याबद्दल बोलणं सुरु केलं. जवळ जवळ देशाला पूर्ण वेठीस धरण्याचा त्यांनी प्लॅन केलेलाच होता.

क्रमशः.....

नमस्कार वाचकहो!
आजच्या भागात तुम्ही सी.आय.डी.ला मदत करण्यासाठी आलेली पूजा पाहिलीत ती म्हणजे आपल्या उत्कृष्ठ वाचक पूजा आडेप या आहेत. मध्यंतरी तुम्ही सर्वांनी पोस्ट बघितली असेलच कथेत पुढे काय होणार आहे? याबद्दल अनुमान लावायचे होते आणि त्या वाचकाला कथेत येण्याची संधी मिळणार होती तर त्यावर पूजा मॅडमनी छान कल्पना विलास केला. कथेच्या गरजेनुसार त्यात थोडे बदल केलेले आहेत.
अभिनंदन पूजा मॅडम.
**********************************
पूजा आता काय सांगेल? रॉबर्टच्या मनात नक्की काय सुरू असेल? सी.आय.डी. या सगळ्यातून देशाला आणि पर्यायी ऋषभला कसं वाचवेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all