द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -७)

Story About Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
कैलासच्या मनात फक्त आणि फक्त ऋषभ वाचावा आणि या रॉबर्टला वेळीच आळा बसावा म्हणून अजून काही करता येईल का? याचेच विचार सुरू होते. त्याला रॉबर्टने मृत्यूची धमकी दिलेली असली तरीही त्याला त्याची भीती अजिबातच नव्हती. त्याला त्याच्या देवावर पूर्ण विश्वास होता.

"हे काय? तुला मी काय म्हणतोय त्याचा अर्थ बहुदा कळलेला नाही." रॉबर्ट त्याचा एकदम शांत चेहरा पाहून म्हणाला.

"समजलाय सर अगदी व्यवस्थित, पण त्यात काय एवढं? हे एक ना एक दिवस होणार मला माहित होतं." कैलास एकदम निर्विकार चेहऱ्याने म्हणाला आणि त्याचं काम करू लागला.

रॉबर्टने याकडे जास्त लक्ष न देता त्याला पुढच्या सूचना दिल्या आणि तो तिथून निघाला.

"सर मला तुमची गरज पडू शकते. मी काय करू तेव्हा?" कैलासने मुद्दाम तो कुठे जातोय हे विचारण्यासाठी असं विचारलं.

"तुला एवढं डोकं तर नक्कीच आहे. सगळं काही सांगितलं आहे तसं कर." रॉबर्ट म्हणाला.

"पण सर एक प्रश्न आहे." कैलास बिचकत म्हणाला.

"बोल लवकर." रॉबर्ट त्याच्या अंगावर खेकसत म्हणाला.

"सर तुम्ही म्हणताय की तुमच्यावर सी.आय.डी.ला संशय आला आहे जर त्यांच्या टीम पैकी कोणी इथे तुमचा शोध घेत आलं आणि हे सत्य बाहेर पडलं तर?" कैलासने विचारलं.

"आले तरी येऊ दे. त्यांना यायला जितका वेळ लागणार आहे ना तोपर्यंत माझं नाव देशाच्या लहान मुलांनासुद्धा माहीत झालेलं असेल. फक्त दोन तास वाट बघ." रॉबर्ट म्हणाला आणि तो तिथून निघून देखील गेला.

'देवा! नक्की काय सुरू आहे काहीच कळत नाहीये. मी जो प्रयोग ऋषभवर केला आहे त्याचा आत्तापर्यंत परिणाम दिसायला हवा होता. देवा, ते बरोबर झालं असेल ना? याबद्दल फक्त तुलाच माहितीये रे. काहीतरी संकेत दे.' कैलास मनापासून हात जोडून देवाशी बोलत होता.
*******************************
इथे ब्यूरोमध्ये विक्रमला कोणती महत्त्वाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे हे सगळे ऐकत होते.

"सर आम्ही गावात अजून चौकशी करत होतो तेव्हाची ही घटना आहे." विक्रम म्हणाला आणि त्याने थोडा ब्रेक घेतला.

नाही म्हणलं तरीही त्याला बोलताना आता थोडा त्रास होत होता त्याचा कान थोडा दुखत होता.

"विक्रम तू ठीक आहेस ना? नाहीतर आधी डॉक्टरकडे जाऊन ये मग बोलू." सुयश सर काळजीने म्हणाले.

"हो सर. जास्त काही त्रास नाही. हे आधी महत्वाचं आहे. तर मी सांगत होतो की, ज्या दिवशी मी तुम्हाला डायनासोरचे फोटो पाठवले होते त्यादिवशी आम्ही कैलासला भेटलो पण नंतर आम्हाला माघारी वळावं लागलं होतं. एक रात्र आम्ही पुन्हा त्या जंगलाच्या बाहेर काढली होती. त्या रात्री मी सगळ्या केसचा विचार करत करत पुन्हा त्या ढाब्याजवळ गेलो होतो." विक्रम म्हणाला.

पुन्हा त्याच्या कानात एक चमक आल्याने तो थोडावेळ थांबला.

"तिथे मला त्या मुलाचा शोध घ्यायचा होता जो ड्रोनने जंगलात जेवणाचे आणि गोळ्यांचे पार्सल टाकत होता. मला सारखं वाटत होतं रात्री तो तिथे असणार म्हणूनच मी गेलेलो. तिथे कोणीच नव्हतं. थोडावेळ असाच गेला आणि मी माघारी वळणार एवढ्यात एक बुरखाधारी बाई माझ्या समोर आली. एवढ्या रात्री त्या सामसूम जागी ही एकटी बाई काय करतेय? म्हणून मला प्रश्न पडला होता पण तिची यात खूप मदत झाली." विक्रम म्हणाला.

"म्हणजे?" सुयश सरांनी विचारलं.

"त्या बाईला त्या लोकांची खडा अन् खडा माहिती होती सर. ईशा, सोनाली! तुम्हाला आठवतंय मी म्हणालो होतो की, जर आपण इथले लेझर क्यूब हलवले तर ते ब्लास्ट होतील?" विक्रमने विचारलं.

"हो सर." दोघी म्हणाल्या.

"तेही मला तिनेच सांगितलं होतं." विक्रम म्हणाला.

"अरे विक्रम पण ती नक्की कोण होती? तिला याबद्दल सगळं कसं माहिती?" सुयश सरांनी विचारलं.

"नाही ना माहिती सर. ते काही समजलंच नाहीये. आधी ती माझ्या समोर आली तेव्हा तिने सरळ मुद्द्याला हात घालून बोलायला सुरुवात केली. आधी मला तिच्यावरच संशय आला पण तिने स्वतःला सिद्ध केलं. तिच्याकडे कोणतंही हत्यार नव्हतं. का माहीत नाही पण मला तिच्यावर विश्वास ठेवावा वाटला. तिने मला दुसऱ्या दिवशी काय होऊ शकतं हे सांगितलं होतं आणि अगदी तसंच होत होतं. म्हणजे बघा आम्ही तिथे गेलो, रॉबर्ट काही लोकांना घेऊन तिथे आला, डायनासोरला त्यांच्या हवाली केलं आणि आमच्यावरच पलटवार झाला. तिने सांगितलं होतं तसंच घडलं." विक्रम म्हणाला.

"हे कसं शक्य आहे पण? विक्रम तू नक्की स्वप्न नव्हतं ना बघितलं?" डॉ. विजयनी विचारलं.

"नाही सर. अहो काही क्षण तर मीही भांबावून गेलो होतो. त्या बाईची मी उलट तपासणी करायला सुरुवात केली तरीही ती तिच्या मतावर ठाम होती आणि जर तिच्यामुळे आपला वेळ वाया गेला असं वाटलं तर शिक्षा भोगायला तयार आहे हेही तिने सांगितलं." विक्रम म्हणाला.

"अरे पण ती नक्की कोण होती?, कुठून आलेली? हेही आपल्याला माहीत नाहीये." सुयश सर म्हणाले.

"सर ती आज ब्यूरोमध्ये येणार आहे. तिची खरी ओळख तर आज समजेल पण तिच्याकडे काहीतरी आहे जे तिला आपल्याला द्यायचं आहे." विक्रम म्हणाला.

"बरं. अजून काय घडलं?" सुयश सरांनी विचारलं.

"तिने फक्त त्या दिवसापुरतं सावध केलं होतं बाकी डिटेल्स ती आज ब्यूरोमध्ये येईल तेव्हा सांगेलच." विक्रम म्हणाला.

"ठीक आहे. अभिषेक! तू विक्रम सोबत डॉक्टरकडे जा नाहीतर हा काही जाणार नाही. बाहेर काहीतरी काम करत राहील." सुयश सर म्हणाले.

लगेचच अभिषेक आणि विक्रम डॉक्टरकडे जायला निघाले.

"नियती तू सांग काय काय प्रोग्रेस आहे?" डॉ. विजयनी विचारलं.

"सर निनादने मला अर्धा प्रोसेस केलेला फॉर्म्युला आणून दिला होता त्यावरच मी काम केलं आणि बहुतेक आता काही तासात तो पूर्ण होईल." नियती म्हणाली.

"ओके. मला एकदा त्या कैलास सोबत सविस्तर बोलायचं आहे कारण डायनासोरला कोणताही अँटीडोट देऊन चालणार नाही कारण शेवटी त्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे. आपण जे करतोय ते एकदम बरोबर आहे याची खात्री करून घ्यायला हवीच आहे." डॉ. विजय म्हणाले.

एवढ्यात ब्यूरोमध्ये जयश्री आली. आधी पेक्षा आता ती खूपच खंगलेली आणि आजारी वाटत होती. साहजिक होतं तिला ज्या दिवसापासून समजलं होतं की, ऋषभ आपल्यात आहे पण अजूनही तो सापडत नाहीये त्यामुळे तिची अशी अवस्था झाली होती. ती फक्त जगण्यासाठी अन्न घेत होती आणि त्यामुळेच तिच्या अंगाला ते लागत नव्हतं. सततच्या विचारांनी आणि ऋषभच्या काळजीने तिची तब्येत खालावत चालली होती.

"सर केसची प्रोग्रेस कुठवर आहे? माझा ऋषभ आहे ना? तुमची खात्री पटली आहे ना आता?" ती आल्या आल्याच म्हणाली.

"मॅडम तुम्ही आधी बसा." ईशा तिला धरून बसवत म्हणाली.

"सर सांगा ना." ती पुन्हा म्हणाली.

"हो मॅडम आमचा शोध सुरूच आहे." सुयश सर म्हणाले.

"सर अजून किती वेळ? आधीच माझा मुलगा माझ्यापासून इतकी वर्ष लांब राहिला आहे. प्लीज तुम्ही समजून घ्या ना." ती म्हणाली.

"हो मॅडम मी अगदीच समजू शकतो. ऋषभ जिवंत आहे म्हणूनच आपण केस ओपन केली आहे ना? अजून थोडे दिवस थांबा." सुयश सर म्हणाले.

"सर आधीच मी एवढी वर्ष थांबली आहे. त्यात तुम्ही रॉबर्ट सरांवर संशय घेतला त्यामुळे आता त्यांचही घरी येणं कमी झालं, नाहीतर त्यांची मदत झाली असती ऋषभला शोधायला." ती भावूक होत म्हणाली.

सगळ्यांनी फक्त एकमेकांकडे बघितलं. जयश्री अजूनही या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होती. तिची तब्येत आणि भावनिक बाजू बघता अजून तरी तिला सत्य सांगणं उचित नाहीये हेच सगळ्यांना वाटत होतं.

"मॅडम आम्ही त्याचा शोध घेतोच आहोत पण तुम्हीही धीर सोडू नका. तुमची तब्येत नाजूक वाटतेय निदान आता ऋषभसाठी तरी तुम्ही खंबीर राहिलं पाहिजे." सुयश सर म्हणाले.

"मला माझा ऋषभ मिळाला की मी होईन बरी." ती म्हणाली पण बोलताना तिला ठसका लागला.

सोनालीने लगेचच तिला पाणी दिलं आणि तिचं सांत्वन केलं. थोड्यावेळात तीही तिथून गेली.

"सर काय अवस्था झाली आहे यांची? यांना तर अजून सत्य माहितीही नाहीये. जेव्हा यांना हे सगळं समजेल तेव्हा तर किती खचून जातील या?" सोनाली म्हणाली.

"हम्म. आत्ता तरी त्यांना काहीच सांगायला नको. त्यांची तब्येत बघून पुढच्या वेळी सगळं शांतपणे त्यांना समजवावे लागेल." सुयश सर म्हणाले.

क्रमशः....
*********************************
विक्रमला भेटलेली बाई कोण असेल? जयश्रीला एक ना एक दिवस तर हे सत्य समजणार आहेच तेव्हा काय होईल तिची अवस्था? ऋषभ या सगळ्यातून बाहेर पडू शकेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all