द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -६)

Story About Dinosaur Experiment
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -६)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
पत्रकार काही केल्या माहिती घेतल्या शिवाय जाणार नाहीत हे आता सगळ्यांनाच कळून चुकलं होतं. सी.आय.डी. एकमेकांकडे बघत होती. त्या व्हिडिओ दाखवलेल्या पत्रकाराच्या चेहऱ्यावर एक वेगळंच कुत्सित हास्य होतं. टीमचं इशाऱ्यात काहीतरी बोलणं झालं.

"सर सांगताय ना?" लेडी रिपोर्टरने विचारलं.

"विक्रम सांग काय आहे ते." सुयश सर म्हणाले.

"सर मी कसं सांगू? तुम्हीच सांगा. तुमच्या शब्दला जास्त मान समाजात आहे त्यामुळे लोकांपर्यंत योग्य संदेश जाईल." विक्रम म्हणाला.

सगळे पत्रकार एकमेकांकडे बघून नक्की काय झालंय म्हणून अंदाज लावत होते. सुयश सर बोलण्यासाठी पुढे आले.

"खरंतर ही अशी बातमी मीडियामध्ये देणे उचित नाहीये. तरीही तुम्ही आम्हाला काही काम करूच देत नाहीये शिवाय तुम्ही सर्वांनी बाहेरून माहिती काढलीच आहे म्हणून मी आता सांगतो." सुयश सर चेहरा गंभीर करत म्हणाले.

त्या व्हिडिओ दाखवलेल्या पत्रकाराच्या चेहऱ्यावरच्या भावरेषा प्रत्येक वाक्याबरोबर बदलत होत्या. सुयश सरांनी बोलताना थोडा पॉज घेतला ते सगळ्यांचं कोणाच्याही न कळत निरीक्षण करत होते.

"सर नक्की काय होणार आहे देशात? तुम्ही सगळे नक्की कोणत्या मिशनवर काम करताय?" त्या व्हिडिओ दाखवलेल्या पत्रकाराने विचारलं.

"खरंतर आम्हाला अशी टीप मिळाली आहे की, देशात घातपात होण्याची शक्यता आहे. सगळ्या यंत्रणा त्यांच्या त्यांच्या कामाला लागल्या आहेत. याही वेळी आम्ही सगळे जनतेच्या रक्षणासाठी आहोतच." सुयश सर म्हणाले.

"सर जर हे असं असेल तर या महोदयांनी जो व्हिडिओ दाखवला त्यात सी.आय.डी. टीम अशी बंधिस्त का दिसतेय? ती कोणत्या प्राण्याची शेपूट आहे? असा कोणता प्राणी आहे ज्याची एवढी मोठी शेपूट असते?" लेडी रिपोर्टरने विचारलं.

"मी सांगतो! आम्हाला अशी टीप मिळाली होती की, तिथे काही जीवघेणी जिवंत स्फोटके आहेत म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. झालं देखील तसंच तिथे काही स्फोटके होती. हा पण हा प्राणी काही खरा नाहीये. तिथे कोणीही जाऊ नये म्हणून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तो होलोग्राम तयार करण्यात आलेला." विक्रम म्हणाला.

"मग नक्की आता देश सुरक्षित आहे? कोणाचा हा कट होता ते उघडकीस आलंय का?" पत्रकारांनी पुढचा प्रश्न केला.

"मिशन अजूनही सुरूच आहे. देशात घातपात होऊ नये म्हणून आम्ही कार्यरत आहोत. लवकरच सगळी माहिती उघडकीस येईल. फक्त तुमच्या मार्फत आम्ही जनतेला एकच आव्हान करू इच्छितो की, तुमचा आमच्यावर असलेला विश्वास ढळू देऊ नका. अनेक किडे आहेत जे देशाला वाळवीसारखे पोखरू पाहत आहेत तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. सध्या आपल्याला आपापसातील विश्वास आणि धैर्य येऊ घातलेल्या संकटाच्या तावडीतून सोडवू शकतं. खरं सांगायचं तर देशावर नेहमीचच दहशतवादचं संकट घोंगावत आहे पण आपण असे हार मानून किंवा भीती पोटी गप्प बसणार नाही हे शत्रूला दाखवून द्यायचं आहे. जनतेला आम्ही आव्हान करतो की, कोणत्याही अनामिक वस्तूंना हात लावू नका, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि काहीही संशयास्पद वाटले तरी लगेचच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. या काळात बऱ्याच अफवा पसरू शकतात तर त्यावर जराही विश्वास ठेवू नका. ज्या बातम्या सरकारी यंत्रणांकडून मिळतील फक्त त्यावर विश्वास असू द्या." सुयश सर म्हणाले.

आता सगळे पत्रकार एकदम शांत झाले होते आणि सी.आय.डी.वर जास्त प्रेशर न आणता तिथून निघूनही गेले. मात्र ज्या पत्रकाराने तो व्हिडिओ दाखवला होता तो जात असताना गणेशने त्याला पकडलं आणि तिथेच बसवलं.

"मला का थांबवलं आहे सर?" त्याने गोंधळून विचारलं.

"तुझ्याकडे तो व्हिडिओ कसा आला? बाकी पत्रकारांकडे तर काहीच नव्हतं?" विक्रमने विचारलं.

"कसा आला म्हणजे? मी पत्रकार आहे आणि सगळीकडे माझी नजर असतेच. जनतेला सावध करायचं काम आहे माझं आणि ते मी केलं." तो एकदम उध्दटपणे म्हणाला.

"बरं. आता मिळाली ना सगळ्याची उत्तरं?" विक्रमने विचारलं.

"हो." तो म्हणाला.

"तू येऊ शकतोस." सुयश सर म्हणाले.

तसा तो तिथून निघाला. सुयश सरांच्या इशाऱ्यावरून गणेश त्याच्या मागावर गेला.

"बरं झालं सर तुमच्या ट्रेनिंगमुळे बोर्डवर सगळं एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं होतं त्यामुळे कोणालाही काहीही समजलं नाही." अभिषेक म्हणाला.

"हम्म. आता लवकर आपल्याला हे प्रकरण खोदून काढायचं आहे. आपण मीडियाला जास्तवेळ दुसरीकडे अडकवून ठेवू शकत नाही." सुयश सर म्हणाले.

"सर आता जास्त वेळ लागणार नाही." नियती ब्यूरोमध्ये येत म्हणाली.

सगळ्यांनी तिच्याकडे वळून बघितलं. नक्कीच अँटीडोटमध्ये काहीतरी प्रोग्रेस झाली असेल हे सगळ्यांच्या लक्षात आलं. तिने विक्रम आणि बाकी टीम सुद्धा तिथे आली आहे हे बघितलं आणि तिथेच उभी राहिली. एक काळजी तरी मिटली होती.

"विक्रम तिथे नक्की काय झालं? तुम्ही सगळे ठीक आहात ना?" सुयश सरांनी काळजीने विचारलं.

"हो सर आम्ही ठीक आहोत. तिथे रॉबर्टने डायनासोर त्या लोकांच्या हवाली केला आहे. रिमोटने त्याला कंट्रोल करता येतंय. आम्हाला बांधून ठेवून तर ते लोक तिथून गेले पण तिथे तांत्रिक सिक्युरिटी केलेली होती." विक्रम म्हणाला आणि त्याने तिथे जे घडलं होतं ते सगळं सांगितलं.

"मग तुम्ही सगळे कसे बाहेर पडलात तिथून?" नियतीने विचारलं.

"आम्ही एक लहान दगड मारून लेझर कुठपर्यंत आहे हे बघितलं. ज्या उंचीपर्यंत लेझर होतं त्यापेक्षा मोठं तिथे एक झाड होतं. त्या झाडावर चढून त्याच्या फांद्यांचा वापर करून दुसऱ्या झाडावर जाऊन आम्ही त्यातून बाहेर पडलो." सोनाली म्हणाली.

"तेव्हाच हे सगळे खरचटलेले व्रण दिसतायत पण विक्रम तुझ्या कानाला काय झालंय? कापूस घातला आहेस त्यालाही रक्त लागलं आहे." सुयश सरांनी विचारलं.

"मी सांगतो! ती लोकं आमच्यापासून खूप लांब होती. त्यांचं बोलणं ऐकायला यावं म्हणून सायबांनी कानात हिअरिंग मशीन घातलं होतं त्याचेच हे परिणाम आहेत." डॉ. विजय म्हणाले.

"आधी तू डॉक्टरांकडे जा." सुयश सर म्हणाले.

विक्रम काही बोलणार एवढ्यात सुयश सर पुन्हा बोलू लागले; "इट्स अॅन ऑर्डर."

"ठीक आहे सर जातो पण आधी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे." विक्रम म्हणाला.
***************************
इथे रॉबर्ट त्याच्या लॅबमध्ये आला होता. त्याला त्याचाच स्वतःचा गर्व वाटत होता. कैलास एकदम शांतपणे त्याच्या डेस्कवर रॉबर्टने त्या अंड्यांवर जी प्रक्रिया करायला सांगितली होती त्याचीच तयारी करत होता.

"आता मी मालामाल झालोय. एकदा माझी ही फायनल प्रक्रिया झाली की मग तुझीही इथून मुक्तता आणि माझीही." रॉबर्ट हसत म्हणाला.

'मुक्तता तर होणार आहेच रे. माझी या तुझ्या कचाट्यातून आणि तुझी तुझ्या गर्वातून.' कैलास मनातच म्हणाला.

"तुला माहितेय? तिथे सी.आय.डी. आली होती पण आता त्यांचाच जीव धोक्यात आहे. नाही, नाही एव्हाना गेला देखील असेल. हा.. हा.. हा.." रॉबर्ट म्हणाला.

"म्हणजे? सी.आय.डी.ला हे सगळं समजलं आहे?" कैलासने मुद्दाम विचारलं.

"अगदी सगळंच नाही पण त्यांनी डायनासोर बघितला आहे आणि त्यांना माझ्यावर संशय होता हे मला समजलं होतं त्यामुळेच मी आता लॅबमध्ये थांबणार नाहीये. माझी दुसरीकडे सोय झाली आहे." रॉबर्ट त्याचं सामान आवरत म्हणाला.

"आणि सर मी? माझं काय?" कैलासने विचारलं.

"तुझं? तुझं काय? काम पूर्ण कर. मग तुला मुक्ती देतो." रॉबर्ट कुत्सित हसत म्हणाला.

कैलासला त्याच्या बोलण्याचा रोख समजला होता तरीही तो काहीच बोलला नाही.

'देवा! सगळं आयुष्य तुझ्या भक्तीत व्यतीत केलं. आत्ताही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सगळं काही तुझ्या इच्छेने होतंय हे मला माहीत आहे. नक्कीच या अश्या असुरी माणसाच्या हातून तू मला मृत्यू देणार नाहीस हेही माहीत आहे. आता पुढे काय ते तूच बघ. मी रॉबर्टच्या अपरोक्ष एक काम केलंय हे फक्त तुला आणि मला माहिती आहे त्यात यश दे.' कैलास त्याच्या डेस्कवर असलेल्या देवाच्या प्रतिमेला प्रेमाने न्याहाळत मनातच म्हणाला.

क्रमशः.....
********************************
विक्रमला काय सांगायचं असेल? रॉबर्टला तर आधीपासून माहिती आहे की, सी.आय.डी. त्याच्या मागावर आहे तर तो आता काय करेल? कैलासने असं कोणतं काम केलं असेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all